७-१३ सप्टेंबर, २०२६
गीत ८८ तुझे मार्ग मला शिकव
गिबोनी लोकांकडून आपण काय शिकू शकतो?
“गिबोनी लोक इस्राएली लोकांशी शांतीचा करार करून त्यांच्यासोबत राहू लागले.”—यहो. १०:१.
या लेखात:
गिबोनी लोकांच्या उदाहरणातून आणि यहोवा त्यांच्याशी जसा वागला त्यातून आपण काय शिकू शकतो ते पाहा.
१-२. आपण गिबोनी लोकांकडून काय शिकू शकतो?
ही इ.स.पू. १४७३ ची गोष्ट आहे. इस्राएली लोकांनी वचन दिलेला देश काबीज करायला नुकतीच सुरुवात केली आहे. त्यांनी यरीहो आणि आय या शहरांवर अद्भुत विजय मिळवलाय. पण अचानक एक अनपेक्षित गोष्ट घडते. काही लोक त्यांच्याकडे येतात आणि त्यांना सांगतात, की ते एका दूरच्या देशातून आले आहेत आणि त्यांना त्यांच्यासोबत शांतीचा करार करायचा आहे.
२ ते खरंतर गिबोनी लोक होते. बायबलमधल्या या अहवालात पहिल्यांदाच त्यांच्याबद्दल वाचायला मिळतं. पण त्यात पुढेही बऱ्याचदा त्यांचा उल्लेख आढळतो. बायबलमधल्या बऱ्याच अहवालांवरून कळतं, की ते पुष्कळ वर्षं इस्राएली लोकांसोबत राहिले. या अहवालांवरून आपण बरेच महत्त्वाचे धडे शिकू शकतो. तसंच, आपल्याला यहोवाबद्दलही खूप काही शिकता येईल.
त्यांचा यहोवावर विश्वास होता, ते नम्र होते
३. (क) गिबोनी लोक कोण होते? (ख) त्यांची इस्राएली लोकांसोबत शांतीचा करार करायची इच्छा का होती?
३ इस्राएली लोकांनी वचन दिलेल्या देशात पाऊल टाकलं, तेव्हा त्यांना सात कनानी राष्ट्रांशी लढायचं होतं. ही राष्ट्रं त्यांच्यापेक्षा खूप बलाढ्य होती आणि त्यांच्याकडे इस्राएली लोकांच्या तुलनेत जास्त सैनिक होते. (अनु. ७:१) हिव्वी हे त्या सात राष्ट्रांपैकी एक होतं आणि गिबोनी लोक याच राष्ट्राचा भाग होते. हे लोक गिबोन नावाच्या तटबंदी असलेल्या शहरात राहायचे आणि “त्यातले सर्व पुरुष योद्धे होते.” (यहो. १०:२) इतर कनानी लोकांप्रमाणे त्यांना इस्राएली लोकांशी लढायचं नव्हतं. यहोवा इस्राएली लोकांच्या वतीने लढतोय आणि त्याने कनानी लोकांना देशातून घालवून द्यायचं त्यांना वचन दिलंय हे त्यांना माहीत होतं. म्हणून आपला त्यांच्यासमोर टिकाव लागणार नाही याची त्यांना जाणीव होती. (निर्ग. ३४:११; यहो. ९:२४) त्यामुळे इस्राएली लोकांनी यरीहो आणि आय शहरांवर विजय मिळवल्यावर गिबोनी लोकांनी त्यांच्या काही लोकांनाa गिलगाल इथे यहोशवाकडे पाठवलं. कारण त्यांची इस्राएली लोकांसोबत शांतीचा करार करायची इच्छा होती.
४. (क) यहोशवा ९:८-१३ प्रमाणे, इस्राएली लोकांसोबत शांतीचा करार करण्यासाठी गिबोनी लोकांनी काय केलं? (चित्रसुद्धा पाहा.) (ख) गिबोनी लोकांचं पितळ उघडं पडल्यावर इस्राएली लोकांनी काय केलं?
४ यहोशवा ९:८-१३ वाचा. गिबोनी लोक इस्राएली लोकांशी खोटं बोलले आणि आपण दूर देशातून आल्याचं त्यांना सांगितलं. यहोवाच्या मदतीनेच इस्राएली लोकांनी इजिप्तवर, तसंच सीहोन आणि ओग या अमोरी राजांवर विजय मिळवला होता हे त्यांनी मान्य केलं. पण इस्राएली लोकांनी नुकतंच यरीहो आणि आय या शहरांवर मात केल्याचा त्यांनी अजिबात उल्लेख केला नाही. त्यांना माहीत होतं, की असं केलं तर ते दूरच्या देशातून आले नाहीत हे इस्राएली लोकांना लगेच कळेल. कारण त्या काळात अशा बातम्या दूरच्या देशांपर्यंत पोहोचायला फार वेळ लागायचा. यहोशवा आणि इस्राएली लोकांनी गिबोनी लोकांवर विश्वास ठेवला आणि यहोवाशी सल्लामसलत न करता त्यांच्याशी शांतीचा करार केला. (यहो. ९:१४, १५) काही काळातच त्यांचं पितळ उघडं पडलं. पण इस्राएली लोकांनी त्यांच्यासोबत केलेला शांतीचा करार मोडला नाही. कारण त्यांनी ‘इस्राएलचा देव यहोवा याच्या नावाने शपथ घेऊन’ त्यांच्याशी करार केला होता. (यहो. ९:१६-१९) इस्राएली लोकांनी गिबोनी लोकांना सांगितलं, की ते त्यांच्यासोबत राहू शकतात, पण त्यांना दासाचं काम करावं लागेल. म्हणून त्यांनी त्यांना “वेदीसाठी लाकूड तोडणारे आणि पाणी भरणारे म्हणून नेमलं.”—यहो. ९:२७.
गिबोनी लोकांनी यहोशवाला फसवून इस्राएली लोकांसोबत शांतीचा करार केला (परिच्छेद ४ पाहा)
५. गिबोनी लोकांनी यहोवावर भरवसा कसा दाखवला?
५ गिबोनी लोकांनी इस्राएली लोकांसोबत शांतीचा करार केल्याचं पाच अमोरी राजांनी ऐकलं, तेव्हा त्यांनी एकत्र येऊन गिबोनवर हल्ला करायचं ठरवलं. म्हणून गिबोनी लोकांनी यहोशवाकडे मदतीची भीक मागितली. (यहो. १०:३-७) त्यामुळे यहोशवा आणि इस्राएली लोक गिबोनी लोकांच्या वतीने लढले. या लढाईत यहोवाही त्यांच्यासोबत होता. यहोवाने अमोरी लोकांवर मोठमोठ्या गारांचा पाऊस पाडला. इतकंच काय, तर इस्राएलचं सैन्य जिंकेपर्यंत त्याने सूर्य मावळू दिला नाही. (यहो. १०:९-१४) इस्राएली लोकांसोबत शांतीचा करार करून आणि समस्येत असताना यहोशवाकडे मदतीची भीक मागून, गिबोनी लोकांनी यहोवावर भरवसा असल्याचं दाखवून दिलं. यहोवा दिलेलं वचन नक्की पूर्ण करेल आणि त्यांना वाचवेल याची त्यांना पूर्ण खातरी होती.
६. यहोवा गिबोनी लोकांशी जसा वागला, त्यातून आपण त्याच्याबद्दल काय शिकू शकतो?
६ या अहवालातून आपल्याला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं? यहोवा नम्र आणि दयाळू आहे. त्याने इस्राएली लोकांना कनान देशातल्या ‘सर्व रहिवाशांना हाकलून’ लावायला सांगितलं होतं. त्यात गिबोनी लोकही सामील होते. (गण. ३३:५१, ५२) पण इस्राएली लोकांनी त्यांच्यासोबत शांतीचा करार केल्यामुळे, यहोवाने गिबोनी लोकांवर दया केली. इस्राएली लोकांनी हे सगळं करताना यहोवाला विचारलंही नव्हतं, तरीही यहोवाने असं केलं. एवढंच नाही, तर यहोवाने इस्राएली लोकांना त्यांचा करार पाळायलाही मदत केली आणि चमत्कार करून गिबोनी लोकांना वाचवलं.—यहो. ९:२६; ११:१९.
७. आपण गिबोनी लोकांसारखा विश्वास आणि नम्रता कशी दाखवू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)
७ आपण गिबोनी लोकांसारखं कसं वागू शकतो? आपण यहोवावरचा आपला भरवसा वाढवू शकतो. गिबोनी लोकांपेक्षा आज आपल्याकडे यहोवाबद्दल जास्त माहिती आहे. त्यामुळे त्याच्यावर भरवसा ठेवायची आपल्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त कारणं आहेत. (स्तो. ४०:४, ५) यहोवाच्या सेवेत कोणतंही काम करायला तयार राहूनसुद्धा आपण गिबोनी लोकांसारखं वागू शकतो. (यहो. ९:२३, २७) आपला भाऊ लूक याच्या अनुभवाचा विचार करा. त्याने एकदा बेथेलमधल्या एका वयस्कर भावाला एक साधं काम करताना पाहिलं. त्यांच्याकडे बेथेलमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या. तरीसुद्धा ते राज्य सभागृहाच्या बांधकामाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पहारा द्यायला तयार झाले. विशेष म्हणजे, त्यांनी ही गोष्ट कोणालाही कळू दिली नाही. लूक म्हणतो: “आपल्याला फक्त वाटतं म्हणून आपण नम्र आहोत असं नाही. तर नम्रता आपल्या कामांतून दिसून येते.” जर आपण समस्येत असताना यहोवावर अवलंबून राहिलो आणि त्याच्या सेवेत कोणतंही काम करायला तयार असलो, तर आपला यहोवावरचा भरवसा दिसून येईल.
यहोवाच्या सेवेत कोणतंही काम करायला तयार राहून गिबोनी लोकांसारखी नम्रता दाखवा (परिच्छेद ७ पाहा)
अन्याय काढून टाकण्यासाठी त्यांनी यहोवाची वाट पाहिली
८. शौलने गिबोनी लोकांवर कसा अन्याय केला?
८ बायबलमध्ये शौल राजाच्या काळातही गिबोनी लोकांचा उल्लेख करण्यात आलाय. “इस्राएलच्या आणि यहूदाच्या लोकांसाठी असलेल्या आपल्या अति-आवेशामुळे शौलने त्यांचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न केला.”b (२ शमु. २१:२, ५, ६) याचा परिणाम म्हणजे बऱ्याच गिबोनी लोकांचा जीव गेला. खरंच, त्यांच्यावर किती मोठा अन्याय झाला! इस्राएली लोकांनी एकेकाळी गिबोनी लोकांसोबत केलेला शांतीचा करार शौलने मोडला.
९. गिबोनी लोकांवरचा अन्याय दूर करण्यासाठी यहोवाने कधी पाऊल उचललं?
९ पण गिबोनी लोकांवर अन्याय झाला तेव्हा यहोवाने लगेच पाऊल उचललं नाही. खरंतर शौलनंतर जेव्हा दावीद राजा झाला, तेव्हा यहोवाने या गोष्टीची दखल घेतली. यहोवाने इस्राएल देशात तीन वर्षं दुष्काळ आणला. दावीदने यहोवाला याचं कारण विचारलं तेव्हा यहोवाने सांगितलं, की शौल आणि त्याच्या घराण्याने गिबोनी लोकांवर अन्याय केल्यामुळे त्याचा राग भडकलाय. ते रक्तदोषी असल्यामुळे त्यांच्यावर ही समस्या आली आहे.—२ शमु. २१:१.
१०. २ शमुवेल २१:३-६ प्रमाणे, गिबोनी लोक दावीदला जे बोलले त्यावरून हे कसं दिसून आलं की त्यांना देवाचे नियम पाळण्याची इच्छा होती?
१० २ शमुवेल २१:३-६ वाचा. शौलने केलेल्या पापाची भरपाई कशी करता येईल असं दावीदने गिबोनी लोकांना विचारलं. मग न्याय मिळवण्यासाठी त्यांना बराच काळ थांबावं लागलं असल्यामुळे त्यांनी दावीदकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला का? नाही. उलट ते म्हणाले, “त्याची भरपाई सोन्या-चांदीने होऊ शकणार नाही.” त्यांना माहीत होतं, की नियमानुसार खून करणारा मृत्यूदंड मिळण्यासाठी पात्र ठरतो आणि त्याच्या जिवासाठी खंडणी दिली जाऊ शकत नाही. (गण. ३५:३०, ३१) पण त्यांना हेसुद्धा माहीत होतं, की राजाच्या परवानगीशिवाय ते कोणालाही ठार मारू शकत नाहीत. शेवटी दावीदने शौलच्या वंशातल्या सात पुरुषांना ठार मारण्याची परवानगी दिली, कारण गिबोनी लोकांच्या हत्येत कदाचित त्यांनी शौलला साथ दिली असावी. त्यानंतर देशात पाऊस पडला आणि दुष्काळ संपला. यावरून स्पष्ट झालं, की यहोवाचा राग शांत झालाय आणि गिबोनी लोकांना न्याय मिळालाय.—२ शमु. २१:९, १०, १४.
११. या अहवालातून आपल्याला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
११ या अहवालातून आपल्याला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं? यहोवा एक न्यायी देव आहे. (स्तो. ३७:२८) आज बरेच लोक दुसऱ्या देशातल्या किंवा संस्कृतीतल्या लोकांसोबत भेदभाव करतात. पण कोणासोबतही भेदभाव होऊ नये आणि सगळ्यांना समान वागणूक मिळावी अशी यहोवाची इच्छा आहे. आज यहोवाच्या बऱ्याच सेवकांनासुद्धा अन्यायाचा सामना करावा लागतो. पण यहोवा त्याच्या ठरवलेल्या वेळी हा अन्याय नक्की दूर करेल. या अहवालातून आपल्याला आणखी एक गोष्ट शिकायला मिळते. इस्राएली लोकांनी गिबोनी लोकांसोबत केलेला शांतीचा करार त्यांनी पाळावा अशी यहोवाची इच्छा होती. त्याच प्रकारे, आपणसुद्धा इतरांना दिलेलं वचन नेहमी पाळावं अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो.—आमोस १:९ सोबत तुलना करा.
१२. अन्याय होतो तेव्हा आपण गिबोनी लोकांसारखं कसं वागू शकतो?
१२ आपण गिबोनी लोकांसारखं कसं वागू शकतो? आपल्या भाऊबहिणींनी आपल्यावर अन्याय केला, तरी आपण धीर धरला पाहिजे. असं करून आपण दाखवतो, की यहोवा योग्य वेळी पाऊल उचलेल यावर आपला पूर्ण भरवसा आहे. आपली बहीण लॉरा फ्रेंच हिच्या अनुभवाचा विचार करा. १९२६ मध्ये ती कॅनडा बेथेलमध्ये सेवा करू लागली. पण जवळपास दहा वर्षांनंतर तिच्यावर घोर अन्याय झाला. ती धर्मत्यागी लोकांच्या गटात सामील आहे असा तिच्यावर आरोप लावण्यात आला आणि तिला बेथेलमधून काढून टाकण्यात आलं. मग तिने काय केलं? तिला खूप वाईट वाटलं, पण तरी तिने कधीच संघटनेविरुद्ध किंवा भावांविरुद्ध तक्रार केली नाही. उलट, पुढची चार वर्षं ती आवेशाने पायनियर सेवा करत राहिली. १९४० मध्ये तिला पुन्हा बेथेलला बोलावण्यात आलं, तेव्हा तिला खूप आनंद झाला. त्यानंतर जवळजवळ ५० वर्षं, म्हणजे तिचं पृथ्वीवरचं जीवन संपेपर्यंत ती विश्वासूपणे सेवा करत राहिली. आपल्यावरही अन्याय होतो तेव्हा या बहिणीसारखंच आपणही योग्य ते करत राहिलं पाहिजे आणि यहोवा त्याच्या ठरवलेल्या वेळी अन्याय दूर करेपर्यंत धीर धरला पाहिजे.—यश. २६:३, ४.
ते विश्वासूपणे यहोवाची सेवा करत राहिले
१३. “नथीनीम” कोण होते आणि बाबेलच्या बंदिवासातून परत आल्यावर त्यांनी काय केलं?
१३ दावीद राजाच्या कारकिर्दीच्या जवळजवळ ५०० वर्षांनंतर, गिबोनी लोकांचा पुन्हा बायबलमध्ये उल्लेख आढळतो. इ.स.पू. ५३७ मध्ये, इस्राएली लोकांचा बाबेलमधला ७० वर्षांचा बंदिवास संपला. तेव्हा यहुद्यांचा पहिला गट राज्यपाल जरुब्बाबेलसोबत यरुशलेमला परत आला. (एज्रा २:१, २, ५८) मग इ.स.पू. ४६८ मध्ये एज्रासोबत दुसरा गट परत आला. (एज्रा ७:१-७) हे दोन्ही गट जरी छोटे असले, तरी त्या दोन्ही गटांमध्ये “नथीनीम” होते असं बायबलमध्ये म्हटलंय. (एज्रा २:५८ आणि ७:७ वरच्या तळटिपा पाहा.) हे नथीनीम कोण होते? ते मंदिरात सेवा करणारे गैर-इस्राएली होते आणि त्यांतले बरेच जण गिबोनी लोकांचे वंशज असावेत.—शब्दार्थसूचीत, “नथीनीम” पाहा.
१४. गिबोनी लोकांनी यहोवाला विश्वासू असल्याचं कसं दाखवून दिलं? (१ इतिहास ९:२ आणि तळटीप)
१४ १ इतिहास ९:२ आणि तळटीप वाचा. बंदिवासातून इस्राएलला परत आलेल्या पहिल्या गटात ‘मंदिरातले सेवकही’ होते. ही खरंच खूप खास गोष्ट होती, कारण सगळेच यहुदी इस्राएलला परत आले नव्हते. बऱ्याच यहुदी लोकांची बाबेलमध्ये चांगली घरं होती, तसंच ते तिथे बराच पैसाही कमवायचे. म्हणून त्यांना इतकं चांगलं आयुष्य सोडून यरुशलेमला यायची आणि पुनर्बांधणीच्या कामात हातभार लावायची इच्छा नव्हती. पण गिबोनी लोकांचे काही वंशजही विश्वासू यहुद्यांसोबत पुन्हा इस्राएला गेले. कारण त्यांना यहोवासाठी नवीन मंदिर बांधायचं होतं आणि त्याची उपासना करायची होती. त्यांच्यासाठी इस्राएलला जाणं सोपं नसलं, तरी ते तिथे गेले. इतर यहुद्यांसारखं गिबोनी लोकांकडे इस्राएलमध्ये वारशाने मिळालेली जमीन नव्हती, तरीसुद्धा ते मंदिरातलं त्यांचं काम करायला आणि यरुशलेमच्या भिंतींची दुरुस्ती करायला तिथे गेले.—नहे. ३:२६.
१५. गिबोनी लोकांच्या अहवालातून आपल्याला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
१५ या अहवालातून आपल्याला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं? यहोवा त्याची विश्वासूपणे सेवा करणाऱ्यांची कदर करतो आणि नेहमी त्यांची काळजी घेतो. यहोवाने यहोशवाच्या काळात गिबोनी लोकांना वाचवलं आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद दिला. याच्या जवळजवळ १,००० वर्षांनंतर म्हणजे, इ.स.पू. ६०७ मध्ये बाबेलने यहूदा आणि यरुशलेमचा नाश केला तेव्हाही यहोवाने गिबोनी लोकांचा नाश होऊ दिला नाही. इतकंच काय, तर ते यहुदी लोकांसोबत बंदिवासातून परत आले तेव्हाही यहोवाने त्यांची काळजी घेतली आणि त्यांना मंदिरात लेव्यांसोबत काम करायची संधी दिली. असं दिसतं, की गिबोनी लोकांच्या वंशजांपैकी काही जण मंदिराच्या जवळच राहायचे. (एज्रा २:७०; नहे. ११:२१) इतकंच काय, तर मंदिरात सेवा करत असल्यामुळे त्यांच्यावर कोणताही कर, खंडणी किंवा जकात लादला जात नव्हता.—एज्रा ७:२४.
१६. उपासनेच्या बाबतीत आपण गिबोनी लोकांसारखं कसं वागू शकतो?
१६ आपण गिबोनी लोकांसारखं कसं वागू शकतो? यहोवाच्या सेवेत आपलं सगळ्यात चांगलं ते द्यायला आपण तयार राहू शकतो. यासाठी आपल्याला काही त्यागही करावे लागू शकतात. पण आपलं यहोवावर प्रेम असल्यामुळे आणि त्याला खूश करायची इच्छा असल्यामुळे आपण असं करायला नेहमी तयार असू. फिलिपीन्समध्ये राहणाऱ्या ॲलविनने असंच केलं. एका मोठ्या कंपनीत त्याची चांगल्या पगाराची नोकरी होती. पण त्याला त्याची सेवा वाढवायची इच्छा होती. विभागीय पर्यवेक्षक त्याच्या मंडळीला भेट द्यायचे, तेव्हा तो सुट्टी काढून प्रचारात जास्तीत जास्त वेळ घालवायचा. त्याला पायनियर सेवा करायची होती. म्हणून त्याने बऱ्याचदा यहोवाला प्रार्थना केली आणि नोकरी सोडायचं ठरवलं. त्याला माहीत होतं, की त्याला यामुळे आधीसारखा पैसा कमवता येणार नाही. तरीही त्याने त्याची नोकरी सोडली. त्याला नवीन नोकरी मिळाली तेव्हा तो खूप खूश झाला, कारण त्याला आता पायनियर सेवा करता येणार होती. त्याच्या बायकोनेही पायनियर सेवा सुरू केली आणि त्या दोघांनी मिळून २१ लोकांना सत्यात यायला मदत केली. खरंच, यहोवाला त्या दोघांचा किती अभिमान वाटत असेल! आपणही यहोवाच्या सेवेसाठी त्याग करतो तेव्हा यहोवा त्याची कदर बाळगतो. अशा वेळी तो आपल्या गरजा नक्की पूर्ण करेल याची आपण पूर्ण खातरी ठेवू शकतो.—मत्त. ६:३३.
१७. गिबोनी लोकांकडून आपण काय शिकलो?
१७ बायबलमधल्या गिबोनी लोकांच्या उदाहरणातून आपल्याला यहोवाबद्दल बरंच काही शिकायला मिळालं. तो नम्र, दयाळू, न्यायी आणि एकनिष्ठ आहे. तो त्याच्या विश्वासू सेवकांना आशीर्वाद दिल्यावाचून राहत नाही. बायबलच्या या अहवालांमधून आपल्याला बरेच व्यावहारिक धडेही शिकता आले. गिबोनी लोकांसारखा आपला यहोवावर मजबूत विश्वास असला पाहिजे आणि समस्येत असताना आपण त्याच्यावर अवलंबून राहिलं पाहिजे. जर आपला विश्वास मजबूत असेल, तर यहोवाच्या सेवेत मिळालेलं कोणतंही काम करायला आपण तयार असू. तसंच, यहोवा सगळा अन्याय दूर करेल तोपर्यंत आपण धीराने वाट पाहिली पाहिजे. शिवाय, यहोवाच्या सेवेत आपलं सगळ्यात चांगलं ते द्यायला आपण तयार असलं पाहिजे. तर चला, आपण गिबोनी लोकांचं चांगलं उदाहरण कायम लक्षात ठेवू या आणि त्यांच्यासारखं वागत राहू या!
गीत १४८ यहोवा आपल्याला सोडवतो
a या लोकांमध्ये कदाचित कफीरा, बैरोथ आणि किर्याथ-यारीम या तीन हिव्वी शहरातले लोकही असावेत.—यहो. ९:१७.
b शौल गिबोनी लोकांशी असा का वागला याबद्दल बायबलमध्ये काही सांगण्यात आलेलं नाही. पण काही विद्वानांचं असं म्हणणं आहे, की कोणत्याही विदेश्याने इस्राएलमध्ये राहू नये अशी त्याची इच्छा असावी.