यहोवासारखं नेहमी दयाळूपणे वागा
लिसाa नावाच्या एका बहिणीला जेव्हा विचारण्यात आलं की कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही सत्याकडे आकर्षित झाला तेव्हा ती म्हणाली, “भाऊबहिणींच्या प्रेमळ वागणुकीचा आणि दयाळूपणाचा माझ्यावर सगळ्यात जास्त परिणाम झाला.” ॲनी नावाच्या एका बहिणीच्या बाबतीतही असंच घडलं. ती म्हणते, “यहोवाच्या साक्षीदारांच्या शिकवणींपेक्षा त्यांचा दयाळूपणा मला जास्त भावला.” आज या दोन्ही बहिणींना बायबल वाचायला आणि त्यात शिकवलेल्या गोष्टींवर मनन करायला खूप आवडतं. पण मुळात साक्षीदारांच्या दयाळूपणामुळे त्या सत्याकडे आकर्षित झाल्या.
इतरांना दिलासा आणि सांत्वन मिळावं म्हणून आपण त्यांना दयाळूपणा कसा दाखवू शकतो? आपण हे दोन मार्गांनी करू शकतो. आपल्या बोलण्यातून आणि आपल्या वागण्यातून. या दोन मार्गांवर चर्चा केल्यानंतर आपण पाहू की आपण कोणाकोणाला दयाळूपणा दाखवला पाहिजे.
तुमच्या जिभेवर “दयेचा नियम” आहे का?
नीतिवचनं पुस्तकातल्या ३१ व्या अध्यायात एका सद्गुणी स्त्रीचं वर्णन केलंय. त्यात म्हटलंय की तिच्या जिभेवर “दयेचा नियम” असतो. (नीति. ३१:२६) याचा काय अर्थ होतो? याचा असा अर्थ होतो, की ती इतरांशी जे बोलते आणि ज्या पद्धतीने ते बोलते त्यातून नेहमी दयाळूपणा दिसून येतो. कुटुंबात वडिलांच्या जिभेवरसुद्धा हा “दयेचा नियम” असला पाहिजे. आईवडिलांना हे माहीत आहे की मुलांशी कठोर शब्दांत किंवा घालून-पाडून बोलल्यामुळे त्यांच्यावर वाईट परिणाम होतो. आईवडील जेव्हा आपल्या मुलांशी अशा प्रकारे बोलतात तेव्हा मुलं सहसा त्यांचं ऐकत नाहीत. याउलट जेव्हा आईवडील मुलांशी दयाळूपणे आणि प्रेमळपणे बोलतात तेव्हा मुलांना त्यांचं ऐकणं आणि त्याप्रमाणे वागणं सोपं जातं.
आपण आईवडील असलो किंवा नसलो तरीही आपण इतरांशी दयाळूपणे बोललं पाहिजे. मग दयाळूपणे बोलायला आपल्याला कसं शिकता येईल? नीतिवचनं ३१:२६ या वचनाच्या पहिल्याच भागात याबद्दल एक गोष्ट आपल्याला कळते. तिथे सद्गुणी स्त्रीबद्दल असं म्हटलंय, “तिच्या तोंडून बुद्धीच्या गोष्टी निघतात.” म्हणजेच ती बोलण्याआधी काय बोलायचं आणि कसं बोलायचं याबद्दल विचार करते. आपणही तसंच केलं पाहिजे. त्यासाठी आपण स्वतःला असा प्रश्न विचारू शकतो, ‘मी आता जे बोलणार आहे त्यामुळे समोरच्या व्यक्तीला राग येईल की वातावरण शांत होईल?’ (नीति. १५:१) खरंच, विचार करून बोलल्यामुळे बुद्धी दिसून येते.
आणखी एका नीतिवचनात असं म्हटलंय: “विचार न करता बोललेले शब्द तलवारीच्या घावांसारखे असतात.” (नीति. १२:१८) आपल्या शब्दांमुळे आणि आपण ज्या पद्धतीने ते बोलतो, त्यामुळे इतरांवर काय परिणाम होईल याचा आपण आधीच विचार केला पाहिजे. असं केल्यामुळे आपल्या बोलण्यावर ताबा ठेवायला आपल्याला मदत होते. “दयेचा नियम” पाळल्यामुळे आपण इतरांना लागतील असे शब्द वापरायचं आणि कठोरतेने बोलायचं टाळू. (इफिस. ४:३१, ३२) इतरांबद्दल नकारात्मक विचार करण्याऐवजी किंवा नकारात्मक बोलण्याऐवजी आपण इतरांबद्दल प्रेमळपणे आणि उत्तेजन मिळेल अशा प्रकारे बोलू. या बाबतीत यहोवाने आपल्यासमोर एक खूप चांगलं उदाहरण ठेवलंय. एलीया संदेष्टा खूप घाबरला होता तेव्हा यहोवाने खूप प्रेमळ शब्दांत त्याला धीर दिला. त्याच्या वतीने बोलणारा स्वर्गदूत एलीयाशी खूप “शांत व मंद” शब्दांत बोलला. (१ राजे १९:१२) यावरून दिसून येतं, की इतरांशी दयेने वागण्यासाठी आपण कशा प्रकारे बोलतो तेसुद्धा महत्त्वाचं आहे. पण आपण दयेने वागतो हे फक्त आपल्या बोलण्यातूनच नाही तर आपल्या कृतीतूनही दिसून आलं पाहिजे. कसं?
दयाळूपणे वागल्यामुळे इतरांना उत्तेजन मिळतं
आपण इतरांशी प्रेमाने बोलतो आणि त्यांच्याशी प्रेमाने वागतो तेव्हा आपण यहोवाचं अनुकरण करत असतो. (इफिस. ४:३२; ५:१, २) आधी जिचा उल्लेख केला होता ती लिसा साक्षीदारांबद्दल असं म्हणते: “जेव्हा आम्हाला अचानक घर बदलावं लागलं, तेव्हा मंडळीतल्या दोन जोडप्यांनी कामावरून सुट्टी घेऊन सामान पॅक करण्यासाठी आम्हाला मदत केली. त्या वेळी तर मी बायबलचा अभ्यासही सुरू केला नव्हता!” ते भाऊबहीण प्रेमळपणे वागल्यामुळेच लिसाला सत्य जाणून घ्यावसं वाटलं.
सुरवातीला ज्या ॲनीचा उल्लेख केला होता, तीसुद्धा साक्षीदारांनी दाखवलेल्या प्रेमामुळेच प्रभावित झाली होती. ती म्हणते: “आजकाल लोकांची जी प्रवृत्ती बघायला मिळते त्यामुळे माझा स्वभाव खूप टीकात्मक बनला होता. लोकांवर भरवसा ठेवायची गोष्टच आता उरलेली नाही आहे, असं मला वाटायचं. मी यहोवाच्या साक्षीदारांना पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांचा नेमका काय हेतू आहे याबद्दल मला शंका वाटायची. मी विचार करायचे की ते माझ्याशी इतकं चांगलं का वागता आहेत? पण ज्यांनी माझा बायबल अभ्यास घेतला त्यांना खरंच माझ्याबद्दल काळजी वाटते हे समजल्यावर मी त्यांच्यावर भरवसा ठेवू लागले. त्यामुळे मी जे काही शिकत होते त्या गोष्टींवर जास्त विचार करायला मी सुरवात केली.”
मंडळीतल्या ज्या भाऊबहिणींनी लिसा आणि ॲनीला प्रेमळपणा आणि दयाळूपणा दाखवला होता, त्याचा या दोघींवर जबरदस्त प्रभाव पडला होता. आणि त्यामुळेच त्या सत्याबद्दल शिकायला प्रवृत्त झाल्या होत्या. मंडळीने दाखवलेल्या प्रेमामुळेच त्यांचा देवावरचा आणि त्याच्या लोकांवरचा भरवसा वाढला होता.
दयाळूपणे वागायच्या बाबतीत देवाचं अनुकरण करा
आपण ज्या वातावरणात आणि संस्कृतीत वाढलो आहोत त्याच्या आपल्या स्वभावावर प्रभाव पडत असतो. काही जणांचा त्यांच्या संस्कृतीमुळेच आनंदी आणि प्रेमळ स्वभाव असेल. अशा प्रकारचा स्वभाव असणं खरंच एक चांगली गोष्ट आहे. पण अशा प्रकारे जर आपण फक्त स्वभावामुळे किंवा संस्कृतीमुळे इतरांशी दयाळूपणे वागतोय तर याचा अर्थ आपण देवाचं अनुकरण करतोय असा होत नाही.—प्रे. कार्यं २८:२ सोबत तुलना करा.
खरा दयाळूपणा हा देवाच्या पवित्र शक्तीच्या फळांपैकी असलेला एक गुण आहे. (गलती. ५:२२, २३) म्हणून खरा दयाळूपणा विकसित करण्यासाठी आपण आपल्या विचारांवर आणि वागण्या-बोलण्यावर देवाच्या पवित्र शक्तीचा प्रभाव होऊ दिला पाहिजे. जेव्हा आपण असं करतो, तेव्हा आपण खरंतर यहोवाचं आणि येशूचं अनुकरण करत असतो. तसंच, खरे ख्रिस्ती या नात्याने आपल्याला इतर लोकांबद्दल मनापासून काळजी वाटते. याचा अर्थ, यहोवावर आणि इतर लोकांवर असलेल्या प्रेमामुळेच आपण दया दाखवायला प्रेरित होतो. अशा प्रकारचा दयाळूपणा मनापासून येणारा एक जबरदस्त गुण आहे. आणि जेव्हा आपण असा दयाळूपणा दाखवतो तेव्हा यहोवाला आनंद होतो.
आपण कोणाकोणाला दयाळूपणा दाखवला पाहिजे?
आपल्या ओळखीच्या लोकांना आणि जे आपल्याशी दयाळूपणे वागतात त्यांना दया दाखवणं आणि त्यांची कदर करणं आपल्याला कदाचित सोपं वाटेल. (२ शमु. २:६; कलस्सै. ३:१५) पण एखादी व्यक्ती दया दाखवायच्या लायक नाही असं आपल्याला वाटत असेल तर काय?
विचार करा, यहोवा आपल्या सगळ्यांवर अपार कृपा करतो. कृपा किंवा दया दाखवायच्या बाबतीत त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. आणि आपण हा गुण कसा दाखवू शकतो याबद्दल त्याच्या वचनातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. “अपार कृपा” हे शब्द ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत बऱ्याच वेळा आले आहेत. पण यहोवा आपल्याला ही कृपा कशी दाखवतो?
लाखो करोडो माणसांना यहोवा आजपर्यंत कशा प्रकारे दया दाखवत आला आहे त्याचा विचार करा. तो त्यांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी दयाळूपणे पुरवतो. (मत्त. ५:४५) खरंतर आपल्याला यहोवाची ओळखसुद्धा नव्हती तेव्हा यहोवाने आपल्याला दया दाखवली. (इफिस. २:४, ५, ८) त्याने मानवजातीसाठी त्याचा सगळ्यात प्रिय, एकुलता एक मुलगा दिला. प्रेषित पौलने असं म्हटलं, की यहोवाने त्याच्या “महान अशा अपार कृपेमुळे” आपल्यासाठी खंडणी दिली. (इफिस. १:७) तसंच, आपण बऱ्याच वेळा चुका करतो आणि यहोवाचं मन दुखावतो, तरीसुद्धा तो आपलं मार्गदर्शन करत राहतो आणि आपल्याला शिकवतो. त्याच्या सूचना आणि त्याचे शब्द “रिमझिम पावसासारखे” सुखावणारे आहेत. (अनु. ३२:२) यहोवा आपल्याला दाखवत असलेल्या अपार कृपेची आपण कधीच परतफेड करू शकत नाही. आणि यहोवाच्या दयेमुळे आणि कृपेमुळेच आपल्याला भविष्याची एक सुंदर आशासुद्धा मिळाली आहे.—१ पेत्र १:१३ सोबत तुलना करा.
खरंच, यहोवाच्या दयेमुळे आपण त्याच्या आणखी जवळ येतो आणि आपल्यालाही इतरांना दया दाखवायची प्रेरणा मिळते. यहोवाप्रमाणेच आपण फक्त काही लोकांशीच नाही तर सर्वांशीच दयाळूपणे वागायचा प्रयत्न केला पाहिजे. (१ थेस्सलनी. ५:१५) आपण जेव्हा अशा प्रकारे आपल्या रोजच्या जीवनात दयाळूपणा दाखवतो तेव्हा आपल्यामुळे इतरांना सांत्वन मिळतं. कडाक्याच्या थंडीत जशी शेकोटीमुळे ऊब मिळते, तसंच इतरांना आपला सहवास उबदार वाटतो. आपल्या दयाळूपणामुळे घरच्या लोकांना, मंडळीतल्या लोकांना, आपल्यासोबत काम करणाऱ्यांना, वर्गसोबत्यांना आणि शेजाऱ्यांनाही आपल्यामुळे सांत्वन आणि दिलासा मिळतो.
तुमच्या दयाळू शब्दांमुळे आणि वागण्यामुळे तुमच्या कुटुंबात किंवा मंडळीत कोणाला मदत होऊ शकते याचा विचार करा. कदाचित तुमच्या मंडळीत असं कोणीतरी असेल ज्याला घरातल्या किंवा इतर कामांमध्ये किंवा बाजारातून सामान आणण्यासाठी मदतीची गरज असेल. किंवा कदाचित प्रचार करताना तुम्हाला असं कोणीतरी भेटू शकतं ज्याला मदतीची गरज असेल. तुम्ही अशा व्यक्तीला काही व्यावहारिक मदत करू शकता का?
तर मग आपण सर्व जण यहोवाचं अनुकरण करायचा प्रयत्न करू या आणि सगळ्यांना आपल्या शब्दांनी आणि कृतींनी दयाळूपणा दाखवू या!
a नावं बदलण्यात आली आहेत.