तुम्हाला माहीत होतं का?
ज्यांना येशूसारखा वधस्तंभावर मृत्युदंड दिला जायचा, अशांचा रीतसर दफनविधी करायची रोमी लोक परवानगी द्यायचे का?
बायबलमध्ये सांगितलंय, की येशूला दोन अपराध्यांच्या मध्ये वधस्तंभावर खिळण्यात आलं होतं. बऱ्याच लोकांना हा अहवाल माहीत आहे. (मत्त. २७:३५-३८) बायबलमध्ये असंही सांगितलंय, की नंतर येशूचा मृतदेह वधस्तंभावरून उतरवून त्याचा रीतसर दफनविधी करण्यात आला. पण काही लोकांनी या गोष्टीवर शंका घेतली आहे.—मार्क १५:४२-४६.
काही टीकाकारांचं म्हणणं आहे, की वधस्तंभावर खिळून मारण्यात आलेल्या अपराध्यांचा दफनविधी करायची परवानगी दिली जात नव्हती. याबद्दल एरीअल सबार नावाच्या एका पत्रकाराने स्मिथसोनियन मासिकात असं म्हटलं आहे, की “त्या काळात सहसा फक्त अट्टल गुन्हेगारांना अशी शिक्षा दिली जायची. आणि अशा अपराध्यांचा रोमी लोक मानसन्मानाने दफनविधी करू देतील असं म्हणणं हास्यास्पद आहे.” अशा अट्टल गुन्हेगारांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जायची. त्यांचा मृतदेह पक्षांसाठी आणि प्राण्यासाठी वधस्तंभावर तसाच लटकत ठेवला जायचा. आणि मग मृतदेहाचे उरले-सुरले भाग एका सामूहिक कबरेत टाकले जायचे.
प्राचीन वस्तूंच्या संशोधनातून मात्र वेगळीच माहिती समोर आली आहे. मृत्युदंड दिलेल्या काही यहुद्यांचा रीतसर दफनविधी करण्यात आला होता असं या संशोधनातून दिसून आलं आहे. प्राचीन वस्तूंचं संशोधन करणाऱ्यांना १९६८ मध्ये येशूच्या काळात मृत्युदंड देण्यात आलेल्या एका माणसाचा सांगाडा सापडला. तो यरुशलेमजवळ एका यहुदी कुटुंबाच्या मालकीच्या कबरेत एका पेटीत ठेवलेला होता. त्यांच्या लक्षात आलं, की या सांगाड्याच्या टाचेच्या हाडात एक ४.५ इंचाचा खिळा ठोकण्यात आला होता. सबार म्हणातात, की “हा सांगाडा यहोखनेन नावाच्या एका माणसाचा होता. याचा शोध लागल्यामुळे येशूचा खरोखरंच दफनविधी झाला होता का याबद्दल बऱ्याच काळापासून जो वाद सुरू होता तो एकदाचा मिटला. येशूच्या काळात रोमी लोक वधस्तंभावर खिळलेल्या माणसाचा रीतसर दफनविधी करू द्यायचे, हे यावरून स्पष्ट झालं.”
यहोखनेनच्या टाचेच्या हाडावरून येशूला वधस्तंभावर नेमकं कसं खिळण्यात आलं होतं, हे सांगता येत नाही. त्याबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे, की काही गुन्हेगारांना नुसतंच कबरेत टाकण्याऐवजी त्यांचा रीतसर दफनविधी करण्यात आला होता. यावरून दिसून येतं, की येशूचा रीतसर दफनविधी झाला होता असं जे बायबलमध्ये म्हटलंय, ते खरं आहे. आणि पुराव्यांवरून या गोष्टीची खातरी होते.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यहोवाने आधीच अशी भविष्यवाणी केली होती, की येशूला एका श्रीमंत माणसाच्या कबरेत पुरलं जाईल. आणि यहोवाचे शब्द पूर्ण होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही.—यश. ५३:९; ५५:११.