वरचं चित्र, मृत समुद्राजवळ सापडलेल्या गुंडाळ्यांमध्ये असलेल्या यशया पुस्तकाच्या एका भागाचं आहे; याच भागाचं अरबी भाषेतलं आधुनिक भाषांतर खालच्या चित्रात आहे. पवित्र शास्त्रातल्या संदेशात कोणताही फेरबदल झालेला नाही
पवित्र शास्त्रात काही फेरबदल झाला आहे का?
काहींना असं वाटतं की पवित्र शास्त्रात फेरबदल झाला आहे. पण, देवाचा संदेश सांगणाऱ्या यशया नावाच्या माणसाने म्हटलं, की त्यातली माहिती “सर्वकाळ कायम राहते.” (यशया ४०:८) मग पवित्र शास्त्रातला संदेश आहे तसाच आहे किंवा त्यात कोणताही फेरबदल झालेला नाही, याची आपण खातरी कशी करू शकतो?
पवित्र शास्त्रातला संदेश आहे तसाच ठेवण्याची ताकद देवाकडे आहे. प्राचीन काळात पवित्र शास्त्राच्या लिखाणांच्या प्रती तयार केल्या जायच्या. प्रती तयार करणारे प्रत्येक अक्षर मोजायचे. त्यात नकळत काही माहिती तर जोडली गेली नाही ना, काही माहिती राहून गेली नाही ना किंवा काही फेरबदल तर झाले नाहीत ना, याची ते काळजी घ्यायचे. पण शेवटी प्रती तयार करणारी ही माणसंच होती. त्यामुळे त्यांच्यापैकी काहींकडून किरकोळ चुका झाल्या.
आज पवित्र शास्त्रात असलेला संदेश हा देवाने दिलेला मूळ संदेश आहे असं आपण का म्हणू शकतो?
पवित्र शास्त्राच्या मूळ लिखाणांच्या हजारो प्रती आज उपलब्ध आहेत. एखाद्या प्रतीमध्ये थोडाजरी फरक दिसून आला तर इतर प्रतींसोबत तिची तुलना करून नेमकी चूक कुठे झाली आहे, हे माहीत केलं जाऊ शकतं. जास्त माहितीसाठी jw.org/hi या वेबसाईटवर, “क्या बाइबल के संदेश में फेरबदल किया गया है?” हा लेख पाहा.
उदाहरण घ्यायचं झालं तर, १९४७ मध्ये बेडोईन जमातीच्या लोकांना मृत समुद्राजवळ असलेल्या गुहांमध्ये काही गुंडाळ्या सापडल्या. त्या गुंडाळ्यांमध्ये २,००० पेक्षा जास्त वर्षांआधी लिहिलेले पवित्र शास्त्राचे काही भाग होते. विद्वानांनी या गुंडाळ्यांची तुलना आज आपल्याजवळ असलेल्या पवित्र शास्त्राशी केली. त्यातून त्यांना काय समजलं?
काळजीपूर्वक केलेल्या परीक्षणातून त्यांच्या लक्षात आलं, की आज आपल्याजवळ असलेल्या पवित्र शास्त्रातली माहिती आणि मूळ लिखाणांतली माहिती ही एकसारखीच आहे.a यावरून आपण खातरी बाळगू शकतो, की आज आपल्याजवळ असलेल्या पवित्र शास्त्रातला संदेश आहे तसाच आहे. देवाने आपल्या पवित्र लिखाणांमध्ये कोणताही फेरबदल होऊ दिला नाही.
त्यामुळे पवित्र शास्त्रातली माहिती अचूक आहे असा पूर्ण भरवसा ठेवून आपण त्याचं वाचन करू शकतो. आता पुढच्या लेखात आपण पाहू की देवाचा संदेश सांगणाऱ्यांकडून आपण देवाबद्दल काय शिकू शकतो.
a गेझा व्हर्मेस यांनी लिहिलेल्या, द कमप्लीट डेड सी स्क्रोल्स इन इंग्लीश या पुस्तकातलं पृष्ठ १६.