एक बॉस जसा आपल्या सेक्रेटरीकडून पत्र लिहून घेतो, तसंच देवाने त्याला विश्वासू असलेल्या मानवांकडून पवित्र शास्त्र लिहून घेतलं
सृष्टिकर्त्याचा संदेश आपल्यापर्यंत कसा पोचला?
सृष्टिकर्त्याने मानवांना घडवलं तेव्हापासूनच त्याने त्यांना आपला संदेश सांगायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने देवदूतांचा आणि संदेश सांगणाऱ्या मानवांचा उपयोग केला. यासोबतच, त्याने आपला संदेश आणि आपली वचनं लिहून काढायचंही ठरवलं. भविष्यात आपल्याला जे आनंदी जीवन मिळणार आहे त्याबद्दलची ही वचनं आहेत. मग देवाची ही वचनं आज आपल्याला कुठे वाचायला मिळतील?
देवाची वचनं आणि त्याचा संदेश आपल्याला पवित्र शास्त्रात वाचायला मिळतो. (२ तीमथ्य ३:१६) हा संदेश लिहून काढण्यासाठी देवाने संदेश सांगणाऱ्या मानवांचा उपयोग केला. पण त्याने हे कसं केलं? (२ पेत्र १:२१) देवाने संदेश लिहिणाऱ्या मानवांच्या मनात आपले विचार घातले आणि मग त्या लेखकांनी ते विचार लिहून काढले. देवाने हे नेमकं कसं केलं, ते समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू या. समजा एका बॉसला कुणालातरी पत्र पाठवायचं आहे. तो आपल्या सेक्रेटरीला ते पत्र लिहायला सांगतो. पत्र जरी सेक्रेटरीने लिहिलं असलं तरी ते पत्र आणि त्यातले विचार हे कोणाचे आहेत? नक्कीच बॉसचे! अगदी तसंच पवित्र शास्त्र लिहिण्यासाठी देवाने जरी माणसांचा उपयोग केला असला तरी त्याचा मूळ लेखक देवच आहे.
पवित्र शास्त्र सगळ्यांसाठी उपलब्ध आहे
देवाचा संदेश खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यांनी तो वाचावा आणि त्यांना तो समजावा अशी त्याची इच्छा आहे. म्हणूनच त्याने प्रत्येक राष्ट्राच्या, वंशाच्या आणि भाषेच्या लोकांना तो संदेश सहज उपलब्ध करून दिला आहे. (प्रकटीकरण १४:६) तो कसा? देवाच्या मदतीने संपूर्ण पवित्र शास्त्र किंवा पवित्र शास्त्राचे काही भाग ३,००० पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहे. दुसरं कोणतंही पुस्तक आज इतक्या भाषांमध्ये उपलब्ध नाही.