कुशलपणे शिकवण्याकरता पूर्वतयारी करणं गरजेचं आहे
येशूला निदान दोन प्रसंगी तरी, सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी काय करावं लागेल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. आणि त्यानं दोन्ही वेळा, प्रश्न विचारणाऱ्याला समजेल अशा प्रकारे उत्तर दिलं. (लूक १०:२५-२८; १८:१८-२०) आपणही अनेक बायबल अभ्यास घेत असू. आपण वापरत असलेल्या प्रकाशनांतली माहिती कदाचित आपल्याला तोंडपाठ झाली असेल. तरीसुद्धा, प्रत्येक विद्यार्थ्यासोबत अभ्यास करण्याअगोदर त्याला लक्षात ठेवून आपण त्या माहितीची उजळणी केली पाहिजे. आपण अभ्यास करणार असलेल्या माहितीतील कोणते मुद्दे कदाचित त्याला समजायला किंवा मान्य करायला कठीण वाटतील? परिच्छेदात उल्लेख केलेली कोणती वचनं आपण बायबल उघडून वाचली पाहिजेत? किती परिच्छेदांचा त्याच्याबरोबर आपण अभ्यास केला पाहिजे? आपण अभ्यास करणार असलेली माहिती त्याच्या हृदयापर्यंत जाण्याकरता आपल्याला कदाचित त्याला एखादं उदाहरण द्यावं लागेल. किंवा, आणखी स्पष्टीकरण द्यावं लागेल अथवा काही प्रश्न विचारावे लागतील. आपण फक्त सत्याचं बीज पेरायचं काम करत असतो. यहोवा ते वाढवत असतो. त्यासाठी, अभ्यासाची पूर्वतयारी करण्याअगोदर आपण यहोवाला प्रार्थना करू शकतो. आपण करत असलेल्या तयारीचा विद्यार्थ्याला फायदा व्हावा आणि त्यानं प्रगती करावी, अशी आपण यहोवाला विनंती करू शकतो.—१ करिंथ. ३:६; याको. १:५.