त्यांचे स्वागत करा!
१. कोणत्या प्रसंगी साक्ष देण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळते, आणि का?
१ वार्षिक स्मारकविधीबद्दल साक्ष देण्यासारखा दुसरा कोणताही खास प्रसंग नाही. विचार करा: या वर्षी जवळजवळ एक कोटी लोक स्मारकविधीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे, आणि खंडणीद्वारे देवाने व येशूने मानवजातीसाठी ज्या दोन महान मार्गांनी प्रेम व्यक्त केले त्याबद्दल ऐकण्याची त्यांना संधी मिळेल. (योहा. ३:१६; १५:१३) यहोवाने दिलेल्या देणगीमुळे जे आशीर्वाद आपल्याला लाभणार आहेत त्यांबद्दल त्यांना शिकता येईल. (यश. ६५:२१-२३) या प्रसंगी भाषण देणारा वक्ताच फक्त साक्ष देईल असे नाही तर स्मारकविधीला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांचे हार्दिक स्वागत करून आपल्यालाही जबरदस्त साक्ष देण्याची सुसंधी मिळेल.—रोम. १५:७.
२. आपण पाहुण्यांचे हार्दिक स्वागत कसे करू शकतो?
२ सभागृहात गेल्यानंतर लगेच जागा शोधून कार्यक्रम कधी सुरू होईल त्याची वाट बघत बसण्याऐवजी कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांशी स्वतःहून जाऊन बोला. कार्यक्रमात काय होणार आहे हे पाहुण्यांना माहीत नसते. आपण जर स्मितहास्य करून त्यांचे मनापासून स्वागत केले तर त्यांना अवघडल्यासारखे वाटणार नाही. आमंत्रण पत्रिका मिळाल्यामुळे एखादा कार्यक्रमाला आला आहे हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर तुम्ही त्याला विचारू शकता की तो पहिल्यांदाच सभेत आला आहे का किंवा तो या मंडळीत कोणाला ओळखतो का. तुम्ही त्याला आपल्यासोबत बसायला बोलवू शकता आणि त्याला तुमचे बायबल आणि गीतपुस्तक दाखवू शकता. जर कार्यक्रम राज्य सभागृहात होत असेल तर तुम्ही त्याला थोडक्यात सभागृह फिरवून दाखवू शकता. भाषण संपल्यावर त्याचे काही प्रश्न असतील तर मग त्यांची उत्तरे द्या. दुसऱ्या मंडळीच्या स्मारकविधीसाठी जर तुमचे सभागृह लवकरात लवकर रिकामे करायचे असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला म्हणू शकता: “तुम्हाला कार्यक्रमाबद्दल कसं वाटलं हे जाणून घ्यायला मला आवडेल. मी तुम्हाला पुन्हा भेटू शकतो का?” त्या व्यक्तीची आवड वाढवण्यासाठी कुठल्यातरी दिवशी भेटण्याची व्यवस्था करा. मंडळीच्या वडिलांनी खासकरून जे प्रचारक निष्क्रिय झाले आहेत त्यांना आमंत्रण देण्यास विसरू नये.
३. स्मारकविधीला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांचे आपण स्वतःहून स्वागत करणे इतके महत्त्वाचे का आहे?
३ यहोवाचे साक्षीदार म्हणून आध्यात्मिक नंदनवनात आपण अनुभवत असलेला आनंद, शांती आणि एकता अनुभवण्याची या पाहुण्यांची पहिलीच वेळ असेल. (स्तो. २९:११; यश. ११:६-९; ६५:१३, १४) कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर पाहुण्यांच्या मनावर काय छाप पडू शकते? आपण पाहुण्यांचे स्वागत कसे केले आहे यावर ते निर्भर आहे.