अपार्टमेंटमध्ये साक्षकार्य करून “उत्तम साक्ष द्या”
१. “सुवार्ता निश्चितार्थाने” सांगण्यात कोणत्या गोष्टीचा समावेश आहे?
१ प्रेषित पौलाप्रमाणे आपलीही, “सुवार्ता निश्चितार्थाने सांगण्याची” इच्छा आहे. (प्रे. कृत्ये २०:२४) त्यामुळे, क्षेत्रातील होता होईल तितक्या लोकांना राज्याची सुवार्ता सांगण्याचा आपण प्रयत्न करतो. यात इमारतींमध्ये राहणाऱ्या असंख्य लोकांचाही समावेश आहे. पण कधीकधी, इमारतींमध्ये प्रवेश मिळणे सोपे नसते. इमारतींमध्ये खूप लोक राहत असल्यामुळे सुवार्ता सांगण्याच्या अनेक संधी आपल्याला मिळू शकतात.
२. इमारतींमध्ये साक्षकार्य करताना आपण समंजसपणे व विचारपूर्वक वागणे महत्त्वाचे का आहे?
२ गुन्हेगारी आणि हिंसाचार यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे बऱ्याच अपार्टमेंट्सच्या गेटला कुलुपे असतात आणि वॉचमन असतात किंवा येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर पाळत ठेवण्यासाठी कॅमेरा लावला जातो. (२ तीम. ३:१, २) अनोळखी लोकांना इमारतीच्या आत प्रवेश न देण्याचा नियम अपार्टमेंटचे व्यवस्थापक करतील. अपार्टमेंटमधील एखाद्या भाडेकरूने तक्रार केली तर कदाचित तेथील वॉचमन किंवा मॅनेजर आपल्याला तिथून निघून जाण्यास सांगतील. अशा वेळी आपण समंजसपणे व विचारपूर्वक वागणे महत्त्वाचे आहे.
३. अपार्टमेंटमध्ये सेवाकार्य करणे केव्हा योग्य राहील आणि का?
३ योग्य वेळ कोणती? इतर क्षेत्रांप्रमाणे अपार्टमेंट्समधील लोक घरी असतात तेव्हा सुवार्ता सांगणे योग्य राहील. इमारतीतील बहुतेक भाडेकरू घरी नसताना आपण गेलो तर लोकांना संशय येऊ शकतो. अनेक प्रचारकांना, संध्याकाळच्या वेळी त्याचबरोबर शनिवार-रविवारच्या दिवशी लोक घरात असल्याचे दिसून आले आहे. सकाळी-सकाळीच खासकरून शनिवार-रविवारच्या दिवशी सेवाकार्य करणे योग्य राहणार नाही; कारण असे केल्याने रहिवासी मॅनेजरला तक्रार करू शकतात.
४, ५. ज्या अपार्टमेंटच्या गेटला कुलूप आहे त्यात आपण प्रवेश कसा मिळवू शकतो?
४ प्रवेश मिळवणे: प्रचारकांनी इमारतींमध्ये सेवाकार्य सुरू करण्याआधी मॅनेजरशी किंवा इमारतीच्या कार्यालयाशी संपर्क साधू नये. कुलूप असलेल्या अपार्टमेंटच्या गेटच्या बाहेर इंटरकॉमची व्यवस्था असेल तर त्याचा वापर करून आपण, जे आपल्याबरोबर बोलण्यास तयार आहेत अशा लोकांशी बोलू शकतो. ज्याने आपल्याला अपार्टमेंटच्या आत येण्याची परवानगी दिली आहे अशा व्यक्तीशी बोलून झाल्यावर आपण अपार्टमेंटमधील घरांची रचना पाहून इतर घरी जाऊ शकतो. पण इतर वेळी, त्या व्यक्तीशी बोलून झाल्यावर आपण अपार्टमेंटच्या बाहेर येऊन इंटरकॉमद्वारे दुसऱ्या घरातील व्यक्तीशी संपर्क साधणे योग्य राहील. असे करून आपण एकाच वेळी किती लोकांशी बोलू शकतो हे ठरवताना तारतम्य बाळगणे महत्त्वाचे आहे.
५ अपार्टमेंटमधील काही रहिवासी आपल्याला, इंटरकॉमवरच आपल्या येण्याचा उद्देश विचारतील. अशा वेळी स्नेहभावाने स्वतःची ओळख द्या. इंटरकॉमच्या यादीत किंवा नावांच्या पाटीवर घरमालकाचे नाव असल्यास, ते नाव घेऊन त्याच्याशी बोला. तुमचा विषय थोडक्यात सांगा.
६. ज्या अपार्टमेंटमध्ये वॉचमन आहेत तेथे आपण सेवाकार्य कसे करू शकतो?
६ अपार्टमेंटच्या बाहेर असलेला वॉचमन आपल्याला इमारतीत सेवाकार्य करू देण्याची परवानगी देत नसेल तर आपण त्याला साक्ष देऊ शकतो. अनेक वॉचमनना आपली नियतकालिके वाचायला आवडतात. कधीकधी तर आपण त्यांच्याबरोबर बायबल अभ्यास सुरू करू शकतो. अपार्टमेंटमधल्या एखाद्या व्यक्तीने आवड दाखवली आणि आपण तिला भेटण्यासाठी वॉचमनकडून परवानगी घेऊन इमारतीत आत प्रवेश करत असू तर आपण याचा गैरफायदा घेऊन अपार्टमेंटमधल्या बाकीच्या घरातील लोकांशी बोलू नये.
७. अपार्टमेंटच्या प्रतिनिधीची परवानगी मिळवण्यासाठी आपण काय म्हणू शकतो?
७ इमारतींमध्ये सेवाकार्य करायला मिळावे यासाठी काही वेळा वॉचमन आपल्याला अपार्टमेंटच्या मॅनेजरची परवानगी घ्यायला सांगतील. अपार्टमेंटच्या प्रतिनिधीला, अध्यक्षांना किंवा सेक्रेटरीला आपण भेटतो तेव्हा असे बोलू शकतो: “माझं नाव ____________________________ आहे. संपूर्ण जगभरात आम्हाला यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखले जाते. आम्ही लोकांशी, कौटुंबिक जीवन सुखी बनवणे, मुलांचे संगोपन करणे, जीवनाच्या चिंतांवर मात करणे आणि भविष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे यांसारख्या काही व्यावहारिक विषयांवर बोलत आहोत. [विषयाला धरून असलेली नियतकालिके किंवा इतर साहित्ये दाखवा.] तुमची काही हरकत नसल्यास आम्ही थोडक्यात घरमालकांशी बोलू इच्छितो आणि जर त्यांची इच्छा असेल तर ते हे साहित्य विनामूल्य घेऊ शकतात. लोक व्यस्त असतील किंवा ज्यांना आमच्याशी बोलण्याची इच्छा नाही त्यांच्याशी आम्ही बळजबरीने बोलणार नाही.” दुसरा पर्याय म्हणजे, आपण असे बोलूनही आपले संभाषण संपवू शकतो: “मी आत्ताच तुमच्याशी जे काही बोललो ते या अपार्टमेंटमधल्या इतर लोकांनाही सांगण्याची परवानगी मी तुमच्याकडे घ्यायला आलो आहे. ज्यांना आवड आहे ते ही नियतकालिके विनामूल्य घेऊ शकतात.”
८. सेवाकार्याच्या बॅगबद्दल कोणती गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे?
८ साहित्ये आणि वर्तणूक: आपण हातात मोठी बॅग घेतली तर लोकांना आपला संशय येईल. त्यामुळे, आपण एक छोटीशी बॅग घेऊ शकतो किंवा काहीच न घेतलेले बरे. काही प्रचारक त्यांचे साहित्य एका छोट्याशा फोल्डरमध्ये घेतात आणि बायबल खिशात ठेवतात.
९. आपण सभ्यपणा कसा दाखवू शकतो आणि ते महत्त्वाचे का आहे?
९ अपार्टमेंटच्या आत शिरताना, दरवाजावर पायपूसणे असेल तर आपली पादत्राणे त्यावर स्वच्छ पुसा आणि गेट काळजीपूर्वक बंद करा. असे सभ्यपणाने वागण्याद्वारे आपण रहिवाशांना तक्रार करण्याची संधी देणार नाही. अपार्टमेंटच्या आत प्रवेश केल्याबरोबर टंगळमंगळ न करता सरळ एकतर लिफ्टकडे जा नाहीतर ज्या मजल्यावर तुम्ही सेवाकार्य करण्याचे ठरवले आहे त्या मजल्यावर जा. यामुळेसुद्धा येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या मनात शंका येणार नाहीत.
१०. बिल्डींगमध्ये अनावश्यक आवाज करण्याचे आपण कसे टाळू शकतो?
१० बऱ्याच अपार्टमेंटमध्ये आवाज घुमतो. तेव्हा, मोठमोठ्याने बोलण्याऐवजी घरमालकाला ऐकू येईल तितक्या मोठ्या आवाजातच बोला. इतर प्रचारकांशी बोलताना हळू पण शांत व मृदू आवाजात बोला जेणेकरून आपण संशयास्पद वागणूक टाळू शकतो. अपार्टमेंटमधल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून काही प्रचारक, एका मजल्यावर अनेक घरे असतील तर एकापाठोपाठ एक घर करण्याऐवजी, ते एका घरी बोलल्यानंतर दुसऱ्या टोकाला असलेल्या घरी बोलायला जातात; आणि अशा प्रकारे ते त्या मजल्यावरील सर्व घरी प्रचार करतात. तसेच दरवाजावर जोर-जोराने थाप मारण्याचेही टाळा; नाहीतर आतील लोक विनाकारण घाबरून जातील.
११. पीपहोल असणाऱ्या दारावर बोलताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो?
११ बाहेर कोण आले आहे हे पाहण्यासाठी दारावर पीपहोल असेल तर त्याच्यासमोर उभे राहा जेणेकरून घरमालक तुम्हाला व तुमच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला पाहू शकेल. सरळ पीपहोलमध्ये पाहा, आणि जेव्हा तुम्हाला असे वाटते की आतून तुम्हाला कोणीतरी पाहत आहे तर चेहऱ्यावर स्नेहभाव दाखवा आणि संभाषण सुरू करा. जर घरमालकाने ‘कोण आहे?’ असे विचारले तर लगेच स्वतःचे आणि तुमच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीचे नाव सांगा. घरमालक तेव्हा कदाचित दार उघडण्यास कचरणार नाही. त्यांनी दार उघडले नाही तरी तुम्ही येण्यामागचे कारण त्यांना सांगा.
१२. कुलुपे असणाऱ्या दारांच्या फटीत तुम्ही साहित्य ठेवू इच्छित असाल तर कोणत्या गोष्टी तुम्ही टाळू शकता?
१२ कुलुपे असलेली घरे: अपार्टमेंटच्या व्यवस्थापकांची एक नेहमीची तक्रार अशी असते, की त्यांना दारांपुढे किंवा अपार्टमेंटच्या आवारात पडलेल्या कागदांचा कचरा उचलावा लागतो. कुलूप असलेल्या दाराच्या फटीत व्यवस्थित न सरकवलेल्या पत्रिका किंवा मासिके काही वेळाने खाली पडतात आणि दारासमोर कचरा पडल्यासारखा दिसतो. त्यामुळे, कुलुपे असलेल्या दाराच्या फटीत तुम्ही कोणतेही साहित्य ठेवू इच्छित असाल तर ते व्यवस्थित, येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना दिसणार नाहीत अशा प्रकारे ठेवावीत.
१३. आपल्याला एखादा रागीट घरमालक भेटतो त्या वेळी आपण काय केले पाहिजे?
१३ रागीट घरमालक: आपण एखाद्या रागीट घरमालकाला भेटलो असू जो वॉचमनला बोलवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्वरित ती जागा सोडून नंतर कधी तेथे जाणे योग्य राहील. काही वेळेस तर ती बिल्डींगच सोडून जाणे सुज्ञपणाचे ठरेल जेणेकरून मॅनेजर किंवा वॉचमन पुन्हा आपला विरोध करणार नाहीत. जर एखादा घरमालक तुम्हाला बोलला असेल की यापुढे तुम्ही त्याला भेटायला येऊ नये तर ‘पुन्हा भेटू नये’ म्हणून नोंद करण्यासाठी त्या अपार्टमेंटच्या क्रमांकाची नोंद टेरेटरी कार्डवर करावी. घरमालकाला पुन्हा ऐकण्याची इच्छा आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी, ‘पुन्हा भेटू नये’ अशी नोंद केलेल्या लोकांना अधूनमधून जाऊन भेटावे.
१४, १५. अपार्टमेंटच्या व्यवस्थापक मंडळाने आपल्याला निघून जाण्यास सांगितले तर आपण काय करावे?
१४ जर तुम्हाला जाण्यास सांगितले: इमारतींमध्ये साक्षकार्य करताना जर तुम्हाला बिल्डींगच्या सेक्रेटरीने, वॉचमनने जाण्यास सांगितले तर त्वरित तेथून जाणे योग्य राहील. आपल्याला अशा कोणत्याही परिस्थितीत यायचे नाही ज्यामुळे आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकेल किंवा आपल्याला पोलिसांकडे नेले जाईल. बऱ्याच वेळा असे होते, की इमारतीतील व्यवस्थापकांना यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध काहीही नसते; ते फक्त आपले कर्तव्य पार पाडत असतात.
१५ कधीकधी, बिल्डींगच्या सेक्रेटरीने तुम्हाला जाण्यास सांगितले तर तुम्ही येण्यामागचे कारण त्यांना सौम्यतेने आणि कुशलतेने सांगू शकता. (१ पेत्र ३:१५) बिल्डींगमध्ये शांतता आणि सुरक्षितता ठेवण्याचे त्यांचे कामच आहे हे आपण जाणतो. त्यामुळे आपल्याशी बोलल्यानंतर कदाचित ते तुम्हाला अपार्टमेंटमध्ये प्रचार करण्याची परवानगी देतील. पण तसे झाले नाही तर त्यांच्याबरोबर वाद न घालता तेथून निघून जाणे सुज्ञपणाचे ठरेल. परिस्थिती लक्षात घेऊन तुम्ही अधून-मधून अपार्टमेंटमधल्या रहिवाशांच्या टपाल पेटीत काही साहित्ये टाकण्याची परवानगी मागू शकता. (कलस्सै. ४:६) घडलेल्या गोष्टींची माहिती सेवा पर्यवेक्षकाला दिलेली बरी.
१६. अपार्टमेंटमध्ये सेवाकार्य करताना काही अडचणी येत राहतात तेव्हा आपण त्यांना कसे सामोरे जाऊ शकतो?
१६ बऱ्याच काळानंतर कदाचित प्रचारक सुज्ञपणे त्या अपार्टमेंटमध्ये पुन्हा सेवाकार्य करण्याचा प्रयत्न करू शकतात. दुसऱ्यांदा गेल्यावरही अपार्टमेंटमध्ये प्रवेश मिळत नसेल तर, प्रचारक वेगळ्या मार्गाने रहिवाशांबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकतात; जसे की टेलिफोन किंवा पत्र लिहून साक्षकार्य केले जाऊ शकते. अपार्टमेंटच्या कार्यालयातून आपण रहिवाशांची नावे आणि टेलिफोन नंबर यांची यादी मिळवू शकतो. पत्र लिहिताना सेवा स्कूल पुस्तकातील पृष्ठे ७१-७३ यावर देण्यात आलेल्या सूचनांचा काळजीपूर्वक अवलंब करावा. काही प्रचारक, लोक जेव्हा सकाळी कामाला जाण्यास निघतात किंवा संध्याकाळी कामावरून परत येतात तेव्हा अपार्टमेंटच्या गेटच्या बाहेर किंवा जवळपासच कुठेतरी उभे राहून सेवाकार्य करतात.
१७. अपार्टमेंट्समध्ये साक्षकार्य करणे महत्त्वाचे का आहे?
१७ या जगाचा अंत खरेच खूप जवळ आहे. जे यहोवा देवाचा धावा करतात केवळ त्यांचाच बचाव होईल. पण “ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील?” (रोम. १०:१३, १४) “सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले” आहेत असे बरेच जण इमारतींमध्ये राहतात. (प्रे. कृत्ये १३:४८) सुज्ञपणा आणि समंजसपणा दाखवून आपण सुवार्ता सांगण्याद्वारे त्यांच्यापर्यंत पोहचू शकतो.