खंडणी बलिदानाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण
१, २. आपण येशूच्या खंडणी बलिदानाचे कृतज्ञतेने का स्मरण केले पाहिजे?
१ येशूच्या आज्ञेचे पालन करून संपूर्ण जगभरातील ख्रिस्ती शनिवार, मार्च २२, २००८ रोजी सूर्यास्तानंतर येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करण्यासाठी एकत्र जमतील. (लूक २२:१९; १ करिंथ. ११:२३-२६) सुमारे १,९७५ वर्षांपूर्वी याच दिवशी जे काही साध्य करण्यात आले होते त्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञतेपोटी आपल्याला हा विधी साजरा करण्यास आनंद वाटतो. वंधस्तंभावर यातनामय मृत्यू सहन करण्याद्वारे देवाशी एकनिष्ठ राहून येशूने आपल्या पित्याचे नाव पवित्र केले व सैतानाच्या टोमण्यांना जोरदार उत्तर दिले.—ईयो. १:११; नीति. २७:११.
२ येशूच्या वाहिलेल्या रक्तामुळे नवीन करार कायदेशीर बनला. यामुळे, अपरिपूर्ण मानवांना ख्रिस्तासोबत त्याच्या स्वर्गीय राज्यात राज्य करण्याकरता देवाचे पुत्र म्हणून दत्तक घेणे शक्य झाले. (यिर्म. ३१:३१-३४; मार्क १४:२४) शिवाय, मानवजातीबद्दल देवाला किती प्रेम आहे हे त्याने आपल्या अतिप्रिय पुत्राचे बलिदान देऊन स्पष्टपणे दाखवले असे येशूने निकदेमाला सांगितले.—योहा. ३:१६.
३. स्मारकविधीला उपस्थित राहणाऱ्यांना कोणता फायदा होऊ शकतो?
३ इतरांना आमंत्रण द्या: आमची राज्य सेवा याच्या या अंकाच्या पुरवणीत, ओळखीच्या लोकांची यादी करून त्यांना व्यक्तिशः आमंत्रण द्या, असे सुचवण्यात आले आहे. अशी यादी करून तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांना आमंत्रण द्यायला सुरुवात केली आहे का? स्मारकविधीचे आमंत्रण देण्याकरता मार्च १ तारखेपासून सुरू होणाऱ्या मोहिमेत पूर्ण भाग घेण्याकरता तुम्ही योजना करत आहात का? स्मारकविधीच्या दिवशी दिले जाणारे शास्त्रवचनावर आधारित भाषण जे ऐकतील त्यांचा खंडणीवर विश्वास वाढेल व यामुळे त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याची संधी मिळू शकेल.—रोम. १०:१७.
४. आपण सभागृहात लवकर का आले पाहिजे?
४ ज्यांना शक्य आहे त्यांनी सभागृहात लवकर येऊन, खास आमंत्रण स्वीकारून आलेल्यांचे हार्दिक स्वागत केले पाहिजे. स्मारकविधी प्रसंगी उपस्थिती मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे, आपण नवीन लोकांकडे व अधूनमधून सभांना येणाऱ्या लोकांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
५. स्मारकविधीसाठी तुम्ही आपल्या मनाची तयारी कशी करू शकता?
५ मनाची तयारी करा: शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे—२००८ आणि २००८ कॅलेंडर यावर, मार्च १७ पासून सुरू होणाऱ्या खास स्मारकविधीच्या बायबल वाचनाचा आराखडा देण्यात आला आहे. येशूच्या पृथ्वीवरील जीवनाच्या शेवटल्या दिवसांत घडलेल्या महत्त्वपूर्ण घटनांवर विचारमंथन केल्याने, स्मारकविधी पाळण्याकरता तुम्हाला तुमच्या मनाची तयारी करता येईल. बायबलमधील या अहवालांवर प्रार्थनापूर्वक मनन केल्याने यहोवा आणि त्याचा पुत्र यांनी खंडणीची जी व्यवस्था केली तिच्याबद्दल आपल्या मनातील कृतज्ञता आणखी वाढेल.—स्तो. १४३:५.
६. खंडणीबद्दल आपली कृतज्ञ मनोवृत्ती वाढल्यास आपल्याला काय लाभ होईल?
६ स्मारकविधीचा दिवस जसजसा जवळ येतो तसतसे आपण या महत्त्वपूर्ण प्रसंगासाठी स्वतःला तयार करू शकतो व इतरांनाही तयार होण्यास मदत करू शकतो. खंडणी बलिदानाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केल्याने यहोवा आणि त्याचा पुत्र यांच्याबरोबरचा आपला नातेसंबंध आणखी मजबूत होईल. (२ करिंथ. ५:१४, १५) शिवाय, इतरांबद्दल निःस्वार्थ प्रेम दाखवून या दोघांचे अनुकरण करण्यासही आपण प्रवृत्त होऊ.—१ योहा. ४:११.