यहोवा त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्यांना मदत करतो
१ पैसा, सत्ता, कार्यक्षमता, या गोष्टी यश मिळण्यासाठी महत्त्वाच्या आहेत असे पुष्कळ लोक म्हणतात. (स्तो. १२:४; ३३:१६, १७; ४९:६) परंतु जे यहोवाचे भय बाळगतात आणि त्याच्यावर भरवसा ठेवतात त्यांना बायबल असे आश्वासन देते, की परमेश्वर “त्यांचा साहाय्यकर्ता व त्यांची ढाल आहे.” (स्तो. ११५:११) आपण अशा दोन क्षेत्रांचा विचार करू या ज्यांत यहोवावर आपला भरवसा असल्याचे आपण दाखवू शकतो.
२ ख्रिस्ती सेवक: आपण मंडळीतील नेमणुका हाताळतो किंवा क्षेत्र सेवेत शिकवतो तेव्हा आपण देवावर भरवसा ठेवला पाहिजे. येशूच्या उदाहरणाचा विचार करा. तो देवाचा पुत्र होता तरीदेखील त्याने स्वतःच्या बुद्धीवर किंवा क्षमतेवर भरवसा ठेवला नाही तर आपल्या स्वर्गीय पित्यावर ठेवला. (योहा. १२:४९; १४:१०) मग आपणही देवावर किती अधिककरून भरवसा ठेवला पाहिजे! (नीति. ३:५-७) केवळ यहोवाच्या आशीर्वादानेच आपण आपल्या मर्यादित प्रयत्नांद्वारे त्याचा आदर करू व इतरांचा लाभ करू.—स्तो. १२७:१, २.
३ यहोवावर आपला भरवसा आहे हे आपण, त्याच्या मार्गदर्शनासाठी व त्याच्या पवित्र आत्म्याच्या मदतीसाठी प्रार्थना करण्याद्वारे दाखवतो. (स्तो. १०५:४; लूक ११:१३) याशिवाय, आपली शिकवण देवाचे वचन बायबल याच्यावर आधारित ठेवून आपण देवावर भरवसा असल्याचे दाखवतो. बायबलच्या संदेशात लोकांना कार्य करायला प्रवृत्त करण्यास व त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यास समर्थ आहे. (इब्री ४:१२, पं.र.भा.) ‘सेवा करताना . . . आपण देवाने दिलेल्या शक्तीवर’ अवलंबून राहतो तेव्हा यहोवाचे गौरव होते.—१ पेत्र ४:११.
४ समस्या हाताळणे: आपल्यावर दबाव येतात, आपल्यासमोर समस्या येतात तेव्हा मदतीसाठी आपण यहोवाकडे पाहिले पाहिजे. (स्तो ४६:१) उदाहरणार्थ, आपण नोकरी करतो तेथील मालक आपल्याला, एखाद्या संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी सुटी द्यायला तयार नसतील किंवा आपल्या कौटुंबिक जीवनात आपल्यासमोर एखादी कठीण परिस्थिती आली असेल. अशा वेळी यहोवावर आपला भरवसा आहे, हे आपण त्याला कळकळीची प्रार्थना करण्याद्वारे आणि त्याच्या वचनाकरवी व संघटनेकरवी तो पुरवत असलेल्या मार्गदर्शनाचा अवलंब करण्याद्वारे आपण दाखवून देऊ. (स्तो. ६२:८; ११९:१४३, १७३) असे केल्याने यहोवाचे सेवक त्यांच्या जीवनात यहोवाकडील मदत अनुभवतात.—स्तो. ३७:५; ११८:१३, १६.
५ स्वतः यहोवा आपल्याला असे आश्वासन देतो: “जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवितो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे तो धन्य!” (यिर्म. १७:७) आपण जे काही करतो त्याद्वारे आपला त्याच्यावर भरवसा आहे हे आपण दाखवून देऊ या!—स्तो. १४६:५.