‘हे स्वीकारावे’
१ एकदा, आपल्या शिष्यांबरोबर लग्नाविषयी बोलताना येशूने, अविवाहितपणा एक “दान” आहे असे उल्लेखले. मग तो पुढे म्हणाला: “ज्याला हे स्वीकारिता येते त्याने स्वीकारावे.” (मत्त. १९:१०-१२) काही वर्षांनंतर, प्रेषित पौलाने अविवाहितपणाच्या फायद्यांविषयी लिहिले आणि अविवाहित राहण्याबाबतीत आपल्या उदाहरणाचे अनुकरण करण्यास इतरांना उत्तेजन दिले. (१ करिंथ. ७:७, ३८) आज पुष्कळांनी अविवाहित राहणे ‘स्वीकारले’ आहे व यामुळे मिळणाऱ्या फायद्यांचा ते आनंद लुटत आहेत. कोणते फायदे त्यांना मिळाले आहेत?
२ “एकाग्रतेने” सेवा करणे: पौलाने ओळखले होते, की अविवाहित राहिल्यामुळे त्याला यहोवाची सेवा “एकाग्रतेने” करता येत होती. तसेच आजही, अविवाहित असलेला बांधव सेवा प्रशिक्षण प्रशालेत जाण्याचा प्रयत्न करू शकतो; अविवाहित व्यक्ती सहसा, पायनियर सेवेत प्रवेश करायला, दुसरी भाषा शिकायला, अधिक गरज असलेल्या ठिकाणी जायला, बेथेलमध्ये सेवा करायला किंवा सेवेचे इतर खास विशेषाधिकार स्वीकारायला मोकळी असते. तिच्याकडे गहन व्यक्तिगत अभ्यासासाठी, मनन करण्यासाठी, यहोवाला मनापासून प्रार्थना करण्यासाठी अधिक वेळ असतो, अनेक संधी असतात. अविवाहित व्यक्तीकडे सहसा, इतरांची मदत करायला अधिक वेळ असतो. ही सर्व कार्ये तिच्याच “हितासाठी” असतात.—१ करिंथ. ७:३२-३५; प्रे. कृत्ये २०:३५.
३ विकर्षणांविना केलेल्या देवाच्या या सेवेमुळे विपुल आशीर्वाद मिळतात. केनियामध्ये २७ वर्षे राहिल्यानंतर, एका अविवाहित भगिनीने लिहिले: “मला अनेक मित्र-मैत्रिणी भेटल्या, शिवाय माझ्याकडे भरपूर कामही होतं! आम्ही सर्व मिळून काम करायचो, एकमेकांना भेटायला जायचो. . . . मी अविवाहित राहिल्यामुळे मला मिळालेल्या जादा वेळेचा आणि संधीचा उपयोग करून मी सेवेत व्यस्त राहिले आणि यामुळे मला खूप आनंद मिळाला आहे.” ती पुढे म्हणते: “या वर्षांदरम्यान यहोवाबरोबरचा माझा नातेसंबंध अधिक गहिरा झाला आहे.”
४ हे स्वीकारावे: “स्वर्गाच्या राज्यासाठी” अविवाहित राहणे हा हेतू, अविवाहितपणाचे दान स्वीकारण्यामागे असला पाहिजे. (मत्त. १९:१२) कोणत्याही देणगीतून आपल्याला जर आनंद घ्यायचा असेल किंवा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला त्या देणगीचा उचित उपयोग केला पाहिजे आणि ही गोष्ट अविवाहित राहण्याच्या देणगीच्या बाबतीतही खरी आहे. अविवाहित राहिल्यामुळे मिळणाऱ्या संधींचा फायदा घेऊन तसेच बुद्धी व शक्तीसाठी यहोवावर अवलंबून राहून पुष्कळ अविवाहित लोकांना, अविवाहित राहण्याच्या देणगीतून मिळालेल्या लाभांचे मूल्य समजले आहे.