“ज्योतीसारखे” चमकणे
१ सद्य व्यवस्थीकरणाच्या आध्यात्मिक व नैतिक अंधकारात खरा देव यहोवा, याचे सुमारे साठ लाख उपासक संपूर्ण जगभरातील २३४ देशांत “ज्योतीसारखे” चमकत आहेत. (फिलिप्पै. २:१५) यामुळे आपण लोकांमध्ये उठून दिसतो. यहोवाकडून येणारा सत्याचा मौल्यवान प्रकाश आपण कशाप्रकारे परावर्तीत करतो?—२ करिंथ. ३:१८.
२ आपली कार्ये: आपल्या आचरणाकडे लोकांचे चटकन लक्ष जाते. (१ पेत्र २:१२) एका स्त्रीने पाहिले, की तिच्याबरोबर काम करणारा एक साक्षीदार मनुष्य दयाळू होता, तो नेहमीच इतरांना मदत करायचा, कधी घाणेरडी भाषा बोलत नव्हता किंवा घाणेरड्या विनोदांवरही हसत नव्हता. त्याच्यासमोर लोक मुद्दामहून गलिच्छ भाषा वापरून त्याला चिडवण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा तो शांत राहायचा आणि जे योग्य आहे त्याबाबतीत तो दृढ राहायचा. याचा या स्त्रीवर काय परिणाम झाला? ती आठवून सांगते: “त्याचे वर्तन पाहून मी इतकी प्रभावीत झाले की मी त्याला बायबलविषयी प्रश्न विचारू लागले. मी देवाच्या वचनाचा अभ्यास सुरू केला आणि नंतर बाप्तिस्मा घेतला.” ती पुढे म्हणते: “खरे तर, या बांधवाच्या वर्तनाने मी यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्वासांचे परीक्षण करायला प्रवृत्त झाले होते.”
३ अधिकाराप्रती आपली मनोवृत्ती, जगीक प्रथांविषयी आपला दृष्टिकोन आणि आपले हितकारक संभाषण यांमुळे यहोवाचे साक्षीदार, बायबलच्या सर्वोच्च दर्जांनुरूप जगणारे लोक म्हणून उठून दिसतात. अशा उत्तम कार्यांमुळे यहोवाचे गौरव होते आणि इतर जण त्याच्या उपासनेकडे आकर्षित होतात.
४ आपले बोलणे: अर्थातच, आपले उत्तम आचरण पाहणाऱ्यांना, आपण जोपर्यंत त्यांना आपल्या विश्वासांविषयी सांगत नाही तोपर्यंत हे कळणार नाही की आपण इतर लोकांपासून वेगळे का आहोत. तुमच्या सहकर्मचाऱ्यांना किंवा तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना तुम्ही यहोवाचे साक्षीदार असल्याचे माहीत आहे का? लोकांबरोबर बोलत असताना तुम्ही त्यांना साक्ष देण्याचा प्रयत्न करता का? प्रत्येक उचित प्रसंगी, ‘तुमचा प्रकाश लोकांसमोर पाडण्याचा’ तुमचा निश्चय आहे का?—मत्त. ५:१४-१६.
५ ज्योतिवाहक यानात्याने आपल्याला दिलेली कामगिरी पार पाडण्याकरता आपली आत्म-त्यागाची मनोवृत्ती असली पाहिजे. पूर्ण मनाने सेवा करण्याची आपली इच्छा आपल्याला, प्रचार व शिष्य बनवण्याच्या जीवनरक्षक कार्यात होता होईल तितका अधिक सहभाग घेण्याकरता प्रवृत्त करेल.—२ करिंथ. १२:१५.
६ आपल्या कार्यांद्वारे आणि बोलण्याद्वारे आपण ज्योतिसारखे चमकत राहू या. असे केल्यास इतरही आपल्याबरोबर यहोवाचे गौरव करण्यास प्रवृत्त होतील.