आपल्या समर्पणाला जागणे
१ तुमच्या जीवनातली सर्वात महत्त्वाची घटना अर्थात तुमचा बाप्तिस्मा झाला तो दिवस, मग तो अलीकडील असो अथवा खूप वर्षांआधीचा असो, तुमच्या अजूनही स्मरणात असेल. पण बाप्तिस्मा झाला याचा अर्थ सर्व काही आता संपले असे नव्हे तर ती समर्पित सेवा करण्याच्या जीवनाची केवळ सुरवात आहे जी सदासर्वकाळ टिकून राहू शकते. (१ योहा. २:१७) आपल्या समर्पणाला जागण्यात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो?
२ ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुकरण करा: बाप्तिस्मा झाल्यावर येशूने “देवाच्या राज्याची सुवार्ता” सांगण्याच्या “आपल्या कार्याचा आरंभ” केला. (लूक ३:२३; ४:४३) तसेच, आपणही यहोवाला आपले जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतो तेव्हा सुवार्तेचे नियुक्त सेवक बनतो. जीवनाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी बऱ्याच वेळेची व प्रयत्नांची गरज असली तरीसुद्धा ख्रिस्ती सेवा हे आपले प्रमुख कार्य आहे. (मत्त. ६:३३) धनसंपत्ती किंवा प्रतिष्ठा मिळवण्याच्या मागे धावण्यापेक्षा, देवाला आपले जीवन समर्पित करणारे, प्रेषित पौलाने केले त्याप्रमाणे “आपल्या सेवेला मोठेपणा” देण्याचा प्रयत्न करतात. (रोम. ११:१३) देवाची सेवा करण्याचा सुहक्क तुम्ही सांभाळून, होता होईल तितका तिचा फायदा घेत आहात का?
३ येशूप्रमाणे आपणही ‘सैतानाला अडवले’ पाहिजे. (याको. ४:७) येशूचा बाप्तिस्मा झाल्यावर सैतानाने त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला आणि आजही यहोवाचे सेवक त्याचे लक्ष्य आहेत. (लूक ४:१-१३) आपल्या अवतीभोवती सैतानाचे साम्राज्य असल्यामुळे आपण स्वतःला शिस्त लावली पाहिजे, आपले मन किंवा हृदय दूषित करू शकणाऱ्या सर्व गोष्टींपासून आपण दूर राहिले पाहिजे. (नीति. ४:२३; मत्त. ५:२९, ३०) ख्रिश्चनांना सल्ला देण्यात आला आहे की ते एकाच वेळी “‘प्रभूच्या मेजावरचे’ व भुतांच्याहि मेजावरचे” खाऊ शकत नाहीत. (१ करिंथ. १०:२१) यासाठी त्यांनी अहितकारक मनोरंजन, वाईट संगती आणि इंटरनेटचे धोके यांपासून सावध राहिले पाहिजे. धर्मत्यागी साहित्यापासूनही आपण चार हात दूर असले पाहिजे. सैतानाच्या या आणि इतर क्लृप्त्यांपासून सावध राहिल्याने, आपल्या समर्पणाला जागणण्यास आपल्याला मदत होईल.
४ देवाच्या तरतूदींचा उपयोग करा: आपल्या समर्पणाला जागण्यास आपल्याला मदत मिळावी म्हणून, यहोवाने आपले वचन आणि ख्रिस्ती मंडळी यांमार्फत साहाय्य पुरवले आहे. बायबल वाचन आणि यहोवाला प्रार्थना या गोष्टींना आपल्या नित्यक्रमाचा भाग बनवा. (यहो. १:८; १ थेस्सलनी. ५:१७) मंडळीच्या सभांद्वारे आनंद मिळवा. (स्तो. १२२:१) यहोवाचे भय मानणाऱ्या व त्याच्या नियमांचे पालन करणाऱ्यांबरोबर संगती ठेवा.—स्तो. ११९:६३.
५ यहोवा आपल्या पाठीशी असल्यामुळे आपण त्याला केलेल्या आपल्या समर्पणाला जगू शकू आणि त्याची सेवा करण्याचा आनंद चिरकाल लुटू शकू.—स्तो. २२:२६, २७; फिलिप्पै. ४:१३.