नव्या विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
१ या अस्थिर जगात, विश्वासात स्थिर राहण्यासाठी आपण यहोवावर भरवसा ठेवला पाहिजे. याचा नेमका काय अर्थ होतो? यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे, आपल्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनावर काय परिणाम होतो? यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे आपल्याला सैतानी जगाच्या प्रभावाचा प्रतिकार करण्यास मदत कशी मिळते? २००३ सेवा वर्षाच्या विभागीय संमेलन कार्यक्रमात या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील. या संमेलनाचा विषय आहे, “यहोवावर भाव ठेवा व सदाचाराने वागा.”—स्तो. ३७:३.
२ आपण केवळ काही खास प्रसंगी किंवा तातडीच्या प्रसंगीच यहोवावर भरवसा असल्याचे दाखवत नाही. तर, आपल्या दररोजच्या जीवनशैलीवरून आपला यहोवावरचा भरवसा दिसून येतो. “सर्व प्रसंगी यहोवावर भाव ठेवा” या सुरवातीच्या भाषणात याच गोष्टीवर भर देण्यात आला आहे. (स्तो. ६२:८) “यहोवावर भाव प्रदर्शित करणे” या चार भागाच्या परिसंवादात, विवाह यशस्वी कसा करायचा, कौटुंबिक वर्तुळात उद्भवणाऱ्या समस्या कशा हाताळायच्या व आपल्या भौतिक गरजा कशा पूर्ण करायच्या याबाबतीत काही उपयुक्त बायबल आधारित माहिती मिळवून ती कशी अंमलात आणायची ते दाखवण्यात आले आहे.
३ सैतानाचे जग आपल्यावर, बरोबर काय आणि चूक काय याबाबतचा विपर्यस्त दृष्टिकोन लादण्याचा आणि महत्त्वाचे काय व बिनमहत्त्वाचे काय याबाबत आपल्या मनात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करते. (यश. ५:२०) “जीवनातील व्यर्थ गोष्टींपासून सावध राहा” आणि “वाईटापासून दूर राहा—चांगले ते करा” ही भाषणे, यहोवाच्या अत्युच्च दर्जांनुसार वागण्याचा आपला निश्चय आणखी पक्का करतील.—आमो. ५:१४.
४ यहोवा सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत करणार असल्यामुळे त्याच्या सेवकांनी त्याच्यावर संपूर्ण भरवसा ठेवणे आवश्यक आहे. हेच, “जगाच्या दुःखमय परिस्थितीतून लवकरच मुक्तता” या जाहीर भाषणात ठळकपणे सांगण्यात आले आहे. त्यानंतर आपल्याला, “देवाच्या राज्याकरता तुम्ही योग्य ठरवले जाल का?” या भाषणाद्वारे स्वतःचे परीक्षण करण्याची विनंती केली जाईल. “यहोवाच्या अभिवचनांवर भाव ठेवा” या आर्जवरूपी भाषणाने कार्यक्रम समाप्त होईल.
५ बाप्तिस्म्याचे भाषण हे प्रत्येक संमेलनाचे वैशिष्ट्य असते. जे कोणी बाप्तिस्मा घेऊ इच्छितात त्यांनी होता होईल तितक्या लवकर आपल्या मंडळीच्या अध्यक्षीय पर्यवेक्षकांना हे सांगावे जेणेकरून आवश्यक त्या योजना केल्या जाऊ शकतील.
६ या अस्थिर काळांत, केवळ यहोवाच भरवशाचा व स्थैर्याचा खरा स्रोत आहे. (स्तो. ११८:८, ९) तेव्हा, विभागीय संमेलनाच्या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याद्वारे आपण यहोवावरील आपला भरवसा आणखी पक्का करू या.