शेवट जसजसा जवळ येतो तसतसे मर्यादेने वागा
१ यहोवाचा दिवस “चोर” येतो तसा म्हणजे, अचानक, त्वरित, चोरपावलांनी येईल असे देवाच्या वचनात वारंवार म्हटले आहे. (१ थेस्स. ५:२; मत्त. २४:४३; २ पेत्र ३:१०; प्रकटी. ३:३; १६:१५) “म्हणून तुम्हीहि सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल,” असे येशूने म्हटले. (मत्त. २४:४४) शेवट जसजसा जवळ येतो तसतसे आपण आध्यात्मिकरीत्या जागृत कसे राहू शकतो? “मर्यादेने” वागा, या ईश्वरप्रेरित सल्ल्यात आपल्याला जागृत राहण्याचे रहस्य सांगण्यात आले आहे.—१ पेत्र ४:७.
२ मर्यादेने वागण्यात, सर्व काही यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहणे समाविष्ट आहे. (इफिस. ५:१७) यामुळे आपण स्वतःला या व्यवस्थीकरणातले “प्रवासी व परदेशवासी” समजू. (१ पेत्र २:११) शिवाय, जे खरोखर महत्त्वाचे आहे ते समजण्यास, प्रमुख गोष्टींना प्राधान्य देण्यास व योग्य निर्णय घेण्यास आपल्याला यामुळे मदत मिळते.—फिलिप्पै. १:१०.
३ आध्यात्मिक ध्येये ठेवा: आध्यात्मिक ध्येये ठेवून ती पूर्ण केल्यास आपल्याला मर्यादेने वागण्यास मदत मिळेल. तुमची सध्या काही आध्यात्मिक ध्येये आहेत का जी तुम्ही पूर्ण करत आहात? तुम्ही दररोज बायबलचे वाचन करण्याचा, सर्व ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याचा, टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांचा प्रत्येक अंक वाचण्याचा किंवा सेवेतील तुमचा सहभाग वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहात का? उचित ध्येये ठेवल्यावर ती पूर्ण करण्याचा नेटाने प्रयत्न करा आणि तुमच्या प्रयत्नांवर यहोवाचे आशीर्वाद मागा; तुम्हाला मिळत असलेली प्रतिफळे पाहून तुम्ही अचंबित व्हाल.
४ मंडळीतल्या एका वडिलांनी एका तरुण जोडप्याला त्यांच्या आध्यात्मिक ध्येयांविषयी विचारले. या प्रश्नामुळे या जोडप्याला जाणीव झाली की त्यांनी आपले जीवन साधे ठेवले आणि ओझ्यासमान असलेल्या कर्जातून मुक्त झाले तर ते पायनियरींग करू शकतात. त्यांनी पायनियरींगचे ध्येय ठेवले. स्वतःवरचे सर्व कर्ज फेडून त्यांनी त्यांचा वेळ व शक्ती ज्या अनावश्यक गोष्टींमुळे खर्च होत होती त्या गोष्टी कमी केल्या. बरोबर एक वर्षानंतर या जोडप्याने आपले ध्येय गाठले. याचा परिणाम? पती म्हणतो: “आम्ही ध्येये ठेवली नसती तर आज आम्ही इथं नसतो. आम्ही खूप आनंदी आहोत. आम्ही पहिल्यापेक्षा अधिक समाधानी व उत्तम स्थितीत आहोत. यामुळे आमच्या जीवनाला अर्थ व उद्देश मिळाला आहे.”
५ यहोवाच्या दिवसाची वाट पाहत असता, मर्यादेने वागून, देवाची इच्छा पूर्ण करण्यावर आपले लक्ष एकाग्र करून आपण आध्यात्मिकरीत्या जागृत राहू शकतो.—तीत २:११-१३.