यहोवाचे प्रतापी नाम अतिआदरणीय माना
१ सैतानाने आपल्या मूळ पालकांना पाप करण्यास प्रवृत्त करून देवाच्या नावावर कलंक आणला. यहोवा देव आदामाशी खोटे बोलला असे अगदी कावेबाजपणे त्या दियाबलाने भासवले. (उत्प. ३:१-५) शिवाय, ईश्वरी नावाचा संबंध देवाने दिलेले अभिवचन पूर्ण करण्याच्या त्याच्या क्षमतेशी असल्यामुळे सैतानाने देवावर लावलेला हा दोषारोप म्हणजे निंदेची हद्दच होती. पण, यहोवाने टप्प्याटप्प्याने आपले उद्देश पूर्ण करून आपल्या नावाला लागलेला हा बट्टा पुसून टाकला आणि आपले नाम प्रतापी केले.—यश. ६३:१२-१४.
२ यहोवाने आपल्याला ‘त्याचे नाव दिले आहे.’ (प्रे. कृत्ये १५:१४, १७) त्यामुळे त्याचे नाव पवित्र करण्याविषयी आपणा प्रत्येकाला काय वाटते हे दाखवण्याची संधी आपल्याला मिळते. यहोवाचे नाव खरोखरच प्रतापी आहे कारण त्याच्या नावावरून हे दिसून येते, की तो पूर्णपणे, संपूर्णतः चांगला, कृपाळू, प्रेमळ, दयाळू आणि नीतिमान आहे. देवाचे वैभवशाली नाम किती प्रतापी आहे याची प्रचिती मिळाल्याने आपल्या मनात त्याच्या नामाविषयी आदरयुक्त भीती निर्माण होते. (स्तोत्र ८:१; ९९:३; १४८:१३) यामुळे मग काय करण्यास आपण प्रवृत्त झाले पाहिजे?
३ देवाचे नाम पवित्र करा: देवाचे नाव मुळातच परमपवित्र असल्यामुळे त्यास आणखीन पवित्र करण्याची गरज नाही. पण आपल्या सदाचरणाद्वारे आणि राज्य प्रचार कार्याद्वारे आपण हे दाखवू शकतो, की आपल्याला देवाचे नाम अतिशय आदरणीय आहे. “परमेश्वराचा [“यहोवाचा,” NW] धन्यवाद करा, त्याच्या नामाचा जयघोष करा, राष्ट्रांमध्ये त्याची कृत्ये विदित करा, त्याचे नाम थोर आहे अशी वाखाणणी करा,” असे मोठ्या आनंदाने आपण म्हणू या. (यश. १२:४) पण, आपल्याला हे कसे करता येईल?
४ असे करण्याचा एक मार्ग म्हणजे, इतरांना यहोवाचे नाव आणि त्याच्या नावासंबंधित माहिती सांगण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घेणे. आपल्या प्रचार कार्याद्वारे आपण खरे तर यहोवाच्या नावाचा सन्मान करत असतो; मग आपले हे साक्षीकार्य कोणत्याही स्वरूपाचे असो—औपचारिक किंवा अनौपचारिक, घरोघरचे किंवा दुकाना-दुकानातले, रस्त्यावरचे किंवा टेलिफोनवरचे. म्हणून मग, आस्था दाखवणारे लोक आपल्याला भेटतात तेव्हा पुन्हा त्यांची भेट घेऊन त्यांना यहोवाबद्दल अधिक शिकवण्यासाठी आपण निश्चित योजना केली पाहिजे. त्याचा अर्थ, न चुकता ठरलेल्या वेळी आपण त्यांची भेट घ्यावी आणि गृह बायबल अभ्यास सुरू करण्याचा सतत प्रयत्न करावा. आनंदाची गोष्ट अशी, की दर वर्षी असंख्य लोकांना यहोवाच्या प्रतापी नावाची ओळख होत आहे आणि ते या नावाचा आदर करून त्यास पवित्र करत आहेत.
५ देवाचे नाम पवित्र करण्याच्या या कार्यात स्वखुशीने हिस्सा घेऊन आपण हेच दाखवत असतो, की एदेन बागेत सैतानाने उभ्या केलेल्या वादविषयासंबंधी आपण कोणत्या बाजूला उभे आहोत. होय, हे सगळ्यात उदात्त आणि सन्माननीय कार्य आहे. तेव्हा, यहोवाचे प्रतापी नाम अतिआदरणीय मानून आपण आवेशाने त्याची स्तुती करू या!—१ इति. २९:१३.