प्रश्न पेटी
◼ आपल्या सभांची परिणामकारकता सुधारण्याच्या हेतूने आपण काय करू शकतो?
वडील आणि सेवा सेवक मंडळीच्या सभा संचालित करत असतात व त्यांतील बहुतेक भागही तेच हाताळत असतात; यामुळे काहीजण कदाचित असा विचार करतील, की सभा यशस्वी होण्यासाठी तेच सर्वस्वी जबाबदार आहेत. खरे तर, रंजक आणि फायदेकारक सभांसाठी आपण सर्व वैयक्तिकरित्या योगदान देऊ शकतो. पुढील दहा मार्गांनी आपण आपल्या सभा अधिक परिणामकारक बनविण्यात मदत करू शकतो:
पूर्वतयारी करा. आपण उत्तम तयारी करतो तेव्हा सभा मनोवेधक वाटतात. आपण सर्वांनीच असे केल्यास सभा अधिक उत्साहपूर्ण आणि उभारणीकारक बनतात. नियमितपणे उपस्थित राहा. हजर असलेल्या सर्वांसाठी मोठी उपस्थिती अधिक उत्तेजनात्मक असून त्यामुळे उपस्थितीत राहण्याच्या महत्त्वाविषयी कदर आणखीन वाढते. वेळेवर या. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जागेवर बसून राहिल्यास आपण सुरवातीच्या गीत आणि प्रार्थनेत सहभागी होऊ शकतो आणि परिणामी, सभांपासून पुरेपूर लाभही घेऊ शकतो. सर्व तयारीनिशी या. आपले बायबल आणि सभेदरम्यान उपयोगात आणले जाणारे साहित्य सोबत आणल्याने आपण त्यांच्यातले सदर्भ पडताळू शकतो आणि चर्चिला जात असलेला विषय अधिक चांगल्या प्रकारे ग्रहण करू शकतो. विकर्षणे टाळा. आपण समोर बसल्यास अधिक चांगल्या प्रकारे श्रवण करू शकतो. कुजबूज करणे किंवा वारंवार शौचालयास जाणे, यांमुळे आपले स्वतःचे आणि इतरांचेही लक्ष विचलित होते. सहभाग घेणारे असा. आपल्यापैकी अधिकतर लोक हात वर करतात आणि विवेचने मांडतात तेव्हा विश्वासाच्या या अभिव्यक्तींमुळे अनेकांना प्रोत्साहन मिळते व त्यांची उभारणी होऊ शकते. संक्षिप्त विवेचने मांडा. यामुळे होता होईल तितक्या अधिकांना सहभाग घेण्याची संधी मिळते. आपली संक्षिप्त विवेचने, अभ्यासल्या जाणाऱ्या साहित्यावरच आधारित असली पाहिजेत. नेमणुका पूर्ण करा. ईश्वरशासित सेवा प्रशालेतील विद्यार्थी किंवा सेवा सभेतील सहभागी या नात्याने उत्तम तयारी करा, आगाऊ सराव करा आणि आपली नेमणूक रद्द न करता ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सहभाग घेणाऱ्यांची प्रशंसा करा. इतरांनी केलेल्या प्रयत्नांची किती कदर केली जाते ते त्यांना बोलून दाखवा. यामुळे त्यांची उभारणी होते आणि पुढे आणखीन चांगले करण्यास ते प्रोत्साहित होतात. एकमेकांना प्रोत्साहन द्या. सभेच्या आधी आणि नंतरचे प्रेमळ अभिवादन व उभारणीकारक संभाषण, सभांना उपस्थित राहण्याचा आनंद आणि लाभ द्विगुणित करतात.