सभांना “अधिकाधिक” उपस्थित राहा
१ एकत्र येण्याची बाब, यहोवाच्या लोकांसाठी नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. इस्राएल लोकांचे मंदिर आणि त्यांची सभास्थाने खरी उपासना, ईश्वरी शिक्षण आणि अत्यानंदित सहवासाची केंद्रस्थाने होती. त्याचप्रमाणे, आरंभीच्या ख्रिश्चनांनी देखील आपले एकत्र मिळणे सोडले नाही. आणीबाणीच्या या शेवटल्या काळात, दबाव आणि संकटप्रसंगे वाढत असताना मंडळीच्या सभा पुरवत असलेल्या आध्यात्मिक बळकटीची आपल्याला देखील गरज आहे—नव्हे, “अधिकाधिक” गरज आहे. (इब्री. १०:२५; मराठी कॉमन लँग्वेज) आपण सभांना उपस्थित का राहतो याची तीन कारणे लक्षात घ्या.
२ सहवासासाठी: शास्त्रवचने आपल्याला, “एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्नती करा” अशी सूचना देतात. (१ थेस्सलनी. ५:११) ईश्वरीय सहवास, आपल्या मनात उभारणीकारक विचारांची भर घालतो व सत्कर्मे करावयास आपल्याला उत्तेजित करतो. परंतु, आपण जर फटकून राहिलो तर मूर्ख, स्वार्थी किंवा अनैतिक कल्पनांना देखील आपल्या मनात घर करू देण्याची शक्यता असते.—नीति. १८:१.
३ शिक्षणासाठी: आपल्या अंतःकरणातील देवाविषयीचे प्रेम सजीव ठेवण्याकरता रचलेला बायबल शिक्षणाचा एक अखंड कार्यक्रम ख्रिस्ती सभा पुरवत असतात. “देवाचा संपूर्ण मनोदय [“सल्ला,” NW]” लागू करण्यासाठी त्या व्यावहारिक मार्गदर्शन देतात. (प्रे. कृत्ये २०:२७) सभा आपल्याला सुवार्तेचा प्रचार करण्याच्या आणि शिक्षण देण्याच्या कलेचे प्रशिक्षण देतात; ही कौशल्ये, बायबलचे सत्य स्वीकारतील अशा लोकांना शोधून त्यांना साह्य करण्याचा शब्दातीत आनंद लुटण्यास आता विशेषतः आवश्यक आहेत.
४ संरक्षणासाठी: या दुष्ट जगात, मंडळी खरोखरच एक आध्यात्मिक शरणस्थान—शांती आणि प्रीतीचे आश्रयस्थान आहे. आपण मंडळीच्या सभांमध्ये उपस्थित राहतो, तेव्हा देवाच्या पवित्र आत्म्याचा आपल्यावर जबरदस्त प्रभाव असतो; “प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन,” ही फळे तो आपल्यामध्ये उत्पन्न करतो. (गलती. ५:२२, २३) विश्वासामध्ये दृढ आणि खंबीर राहण्यास सभा आपल्याला बळकट करतात. पुढे येणाऱ्या संकटप्रसंगांना तोंड देण्यासही त्या आपल्याला सुसज्जित करतात.
५ नियमितपणे सभांना उपस्थित राहिल्याने स्तोत्र १३३:१, ३ येथे स्तोत्रकर्त्याने वर्णन केलेल्या गोष्टीचा आपल्याला आस्वाद घेता येईल; तेथे असे नमूद करण्यात आले आहे: “पाहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!” आज देवाचे लोक जेथे कोठे सेवा करतात व एकत्र येतात, “तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे.” (तिरपे वळण आमचे.)