आस्था दाखवलेल्या सर्वांसाठी खरी कळकळ दाखवा
१ लवकरच, जगव्याप्त राज्य उद्घोषणा संपुष्टात येईल आणि मग “जे देवाला ओळखत नाहीत” अशांचा विनाश होईल. (२ थेस्स. १:७-९) म्हणूनच, इतरांच्या जिवांविषयी असणारी खरी कळकळ, होताहोईल तितक्या लोकांप्रत राज्याचा संदेश नेण्यास यहोवाच्या लोकांना प्रवृत्त करत आहे.—सफ. २:३.
२ “शुभवृत्त” ऐकण्यास इच्छुक असणाऱ्यांना शोधून काढण्यास प्रत्येक महिन्यात लक्षावधी तास खर्च केले जात आहेत. (यश. ५२:७) चालू साहित्य सादरतेचा परिणाम असा झाला आहे, की अनेकांनी टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या अथवा देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकाच्या प्रती स्वीकारल्या आहेत. या लोकांसाठी खरी कळकळ असल्यामुळे दाखवलेल्या सर्व आस्थांचा मागोवा घेण्याची आपल्याला प्रेरणा मिळण्यास हवी.—नीति. ३:२७.
३ अचूक नोंदी ठेवा: दाखवलेल्या आस्थेची तसेच वाटपांची तुम्ही पूर्ण व अचूक नोंद ठेवल्यास पुष्कळ काही साध्य होईल. घरमालकाचे नाव आणि पत्ता, भेट दिली तो दिवस व वेळ, दिलेले साहित्य आणि चर्चिलेला विषय अशी माहिती, पुन्हा भेट घेण्यासाठी परिणामकारक ठरेल. तसेच, तुमच्या पहिल्या संभाषणात घरमालकाने मांडलेली काही विवेचने टिपून ठेवल्यास, तुम्ही पुन्हा त्यांची भेट घेता तेव्हा संभाषण सुरू करण्यासाठी तुम्ही प्रभावीपणे यांचा उल्लेख करू शकता.
४ पुनर्भेटी करण्यात तत्पर असा: मागच्या महिन्यात, ज्यांनी तुमच्याकडून साहित्य स्वीकारले, अशांपैकी किती जणांना तुम्ही पुन्हा जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला आहे? कित्येक आठवडे संपर्कच राखला नाही का? त्यांच्या चिरस्थायी कल्याणासाठी असणारी खरी कळकळ, तुम्हाला होताहोईल तितक्या लवकर, बहुधा काही दिवसांतच परतण्यास प्रवृत्त करील जेणेकडून त्यांच्या मनांत संभाषण अगदी ताजेच असेल. त्यांची आस्था वाढवण्यासाठी तत्परतेने भेट घेतल्याने ‘त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेण्याच्या’ सैतानाच्या प्रयत्नांत आधीच बाधा आणणे तुम्हाला शक्य होईल.—मार्क ४:१५.
५ तयारीची आवश्यकता: पुनर्भेटी करण्यातील तुमच्या परिणामकारकतेचा प्रत्यक्ष संबंध, तुम्ही किती चांगली तयारी करता याच्याशी आहे. काय बोलणार ते जाण्यापूर्वीच ठरवा. तुम्हाला वर्गण्या अथवा अपेक्षा माहितीपत्रक यशस्वीरित्या सादर करता यावीत याकरता एप्रिल १९९७ ची आमची राज्य सेवा याच्या मागील पृष्ठावर दिलेल्या अनेक प्रस्तुतींचा उपयोग केला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे, पुन्हा भेट घेतेवेळी सांगण्यासाठी काही विचार लक्षात ठेवावेत. आस्थेचा मागोवा घेताना काय म्हटले जाऊ शकते? बायबल अभ्यास कसा सुरू केला जाऊ शकतो?
६ पृथ्वी साफसूफ करून तिचे रूपांतर वास्तव्य करण्याजोग्या उत्तम परिसरात करण्यासाठी कशाची गरज आहे या चर्चेचा मागोवा घेताना तुम्ही कदाचित असे म्हणू शकता:
◼ “माझ्या मागील भेटीत, आपण या निष्कर्षास पोहंचलो होतो, की पृथ्वीचं रूपांतर एका शांतिमय परादीसमध्ये करण्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. ही कामगिरी पार पाडण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी मनुष्याजवळ आहेत, असं तुम्हाला वाटतं का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] मानवाच्या व्यवहारांत देव हस्तक्षेप करील तेव्हा काय घडेल याकडं कृपया लक्ष द्या.” यशया ३५:१ वाचा. मग ज्ञान पुस्तकातील अध्याय १ उघडा आणि देव काय साध्य करील हे दाखवण्यासाठी परिच्छेद ११-१६ मधील निवडक भागांचा उपयोग करा. पुस्तकातून अभ्यास सुरू करण्याचा प्रस्ताव मांडून मागोवा घ्या.
७ पहिल्या भेटीत तुम्ही देव राज्याविषयी बोलला असाल आणि “अपेक्षा” माहितीपत्रक दिले असेल तर मग पुन्हा भेट घेताना तुम्ही असे म्हणू शकता:
◼ “मागच्या वेळी आपण चर्चा केली तेव्हा, देवाचं राज्यच सबंध पृथ्वीवर राज्य करणारं खरं सरकार असल्याचं आपण पाहिलं होतं. बायबल दाखवतं, की ख्रिस्त येशू याचा राज्यकर्ता असेल. अशा प्रकारचे सरकार आणि नेता असल्याचे कोणते फायदे असतील याची तुम्ही कल्पना करू शकता का? प्रतिसादासाठी वाव द्या. अपेक्षा माहितीपत्रकात धडा ६ उघडा. परिच्छेद ६-७ मधील निवडक मुद्द्यांचा तथा पृष्ठ १३ वरील चित्राचा उपयोग करून, भवितव्यात देवाचं राज्य मानवजातीकरता काय करील ते दाखवा. दानीएल २:४४ वाचा आणि उचित असल्यास ज्ञान पुस्तक प्रस्तुत करून बायबल अभ्यासाचा प्रस्ताव मांडा.
८ जगाच्या धर्मांमुळेच मानवजातीच्या समस्या उद्भवल्या आहेत असे कबूल करणारा कोणी भेटल्यास, पुनर्भेटीत तुम्ही कदाचित असे विचारू शकता:
◼ “देवाला कोणता धर्म स्वीकृत आहे हे आपण कसं जाणावं, याबद्दल तुम्ही स्वतः कधी विचार केला आहे का? [प्रतिसादासाठी वाव द्या.] देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे माहितीपत्रक खरा धर्म कसा ओळखावा याची काही चिन्हे पुरवते.” पाठ १३ उघडून परिच्छेद ३-७ मध्ये तिरप्या अक्षरांत दिलेले पाच मुद्दे ठळकपणे सांगा. तुम्ही असे म्हणून संभाषण जारी ठेवू शकता: “खरा धर्म ओळखण्याव्यतिरिक्त, देव वैयक्तिकपणे आपल्याकडून काय अपेक्षितो हे देखील आपण जाणून घेण्यास हवं.” योहान ४:२३, २४ वाचा. यावर अतिरिक्त चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडा. माहितीपत्रकात पाठ १ उघडा आणि आपण अभ्यास कसा करतो त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवा.
९ कौटुंबिक सौख्यानंदावरील चर्चा जारी ठेवण्याकरता तुम्ही पुन्हा भेट घेता, तेव्हा खाली सांगितल्याप्रमाणे काही तुम्ही म्हणू शकता:
◼ “आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा, कौटुंबिक जीवनाचं रहस्य म्हणजे देवाचं वचन, बायबल यात घालून दिलेला सल्ला अनुसरणं याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. आधुनिक कुटुंबाच्या गरजा लक्षात घेता, बायबल कालबाह्य आहे, की अद्ययावत आहे यावरील तुमचं वैयक्तिक मत काय आहे?” प्रतिसादासाठी वाव द्या. ज्ञान पुस्तक सादर करा. अध्याय २ उघडून परिच्छेद १३ मध्ये दिलेला उतारा वाचा. परिच्छेद ३ मध्ये दिलेले मुद्दे वापरून कौटुंबिक बायबल अभ्यासाचा प्रस्ताव मांडा.
१० अचूक नोंदी ठेवल्याने, आवश्यक ती तयारी केल्याने, तसेच त्यांची आस्था वाढवण्याच्या उद्देशास्तव तत्पर भेट घेतल्याने, उद्धाराच्या मार्गाकडे त्यांना आकृष्ट करणारे शेजार प्रेम आपण प्रदर्शित करू.—मत्त. २२:३९; गलती. ६:१०.