खचू नका
१ १९९१ चे वार्षिक अहवाल पुस्तक सबंध जगभर जी थरारक वाढ होत आहे त्याविषयी माहिती देते. देशामागून देशात नवे उच्चांक गाठले जात आहेत.
२ पण तुमच्या क्षेत्राविषयी काय दिसते? तुम्हाला बेपर्वाईचा सामना करावा लागतो का? देवाच्या राज्य संदेशाविषयी लोक उदासीन वृत्ती दाखवीत आहेत का? फारच कमी लोक घरी आढळतात का? खूपच थोडे लोक आस्था दाखवितात का? तसे आहे तर मग, तुम्हाला, प्रेषित पौलाने गलतीकर ६:९ मध्ये दिलेल्या या सूचनेद्वारे प्रोत्साहन मिळू शकेल कीः “चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.” चांगले ते करण्यामध्ये घरोघरी राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याचे निश्चितपणे समाविष्ट आहे. काम संपले आहे असे यहोवाने सांगेपर्यंत आपण निकडीने प्रचार करण्याचे चालू ठेवले पाहिजे. (यशया ६:८) कठीण क्षेत्रामध्ये देखील मेंढरासमान असणारे लोक अद्याप आढळत आहेत.
३ आपल्या उपाध्यपणात खचून जाऊ नये यासाठी आपण काय करू शकू? आमचा पवित्रा बदलणे किंवा आमच्या प्रास्ताविकात फरक करणे हे कदाचित साहाय्यक ठरू शकेल. याविषयी रिझनिंग पुस्तकात उत्तम सूचना दिल्या आहेत. तुम्ही त्या वापरुन पाहिल्या का? त्रोटक पण थेट स्वरुपाचा पवित्रा घरमालकाचे लक्ष काबीज करण्यात यशस्वी ठरू शकेल. तुम्ही लोकांविषयी आस्था राखून आहात व त्यांचे कल्याण व्हावे ही सद्भावना तुमच्या मनी आहे हे त्यांना कळू द्या.
जुनी पुस्तके सादर करा
४ फेब्रुवारी व मार्च दरम्यान १९२ पृष्ठांची जुनी पुस्तके सादर करून आपल्याला लोकांविषयी वाटणारी चिंता व्यक्त करता येईल. आपण देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याद्वारे व्यक्तीशः त्याची शिफारस करून त्याला पाठबळ दाखवीत असतो. या राज्याविषयी शिकण्यासाठी सद्य जीवन हे पुस्तक खूपच उत्तम साधन आहे. ते, लोक ज्याविषयी प्रार्थना करतात पण ज्याची खूपच थोडी माहिती त्यांना आहे त्या राज्याविषयी अधिक माहिती पुरवू शकेल.
५ या पुस्तकातील प्रत्येक अध्यायावर आपल्याला काही ना काही बोलता येईल. तुम्हाला १५, १६, १७ किंवा १८ अध्यायांची शीर्षके दाखवता येतील व त्यापैकी एकात एखादा योग्य मुद्दा सांगता येईल. पृष्ठ १८४ वर “खरोखरीचा फायदेकारक मार्ग” या शीर्षकाखाली काही चांगले मुद्दे आहेत, जे आपल्या सध्याच्या संभाषणाच्या विषयासोबत अनुरुप आहेत.
६ दर आठवड्याला आपण राज्याचा प्रचार करण्यात सहभागी झालो तर त्यामुळे आम्हाला व्यक्तीशः प्रोत्साहन लाभेल व बळकटी आल्याचे वाटेल. यासोबत देवाच्या वचनाचा नियमित अभ्यास आणि मंडळीच्या सभांमधील नियमित रुपाचा सहभाग यामुळे आमची आध्यात्मिकता वरच्या पातळीवर राखली जाईल.—इब्री. १०:२३-२५.
बळकट होण्यास इतरांना उत्तेजन द्या
७ क्षेत्रावर इतरांसमवेत मिळून कार्य करण्याद्वारे तुम्हाला स्वतःला तसेच इतरांना उत्तेजन देता येईल. (गल. ६:१०) तर मग, पायनियरांना तसेच वृद्ध बांधवांना, तुम्ही त्यांच्यासमवेत कार्य करू इच्छिता हे का कळवू नये? तसेच तुम्ही अनियमित व अक्रियाक लोकांविषयी आस्था दाखविल्यास त्यांना यामुळे निश्चितपणे प्रोत्साहन लाभेल.
८ आम्ही सर्वांनी यहोवाच्या सेवेत टिकून राहण्याची व या शेवटल्या कठीण काळात खचून न जाण्याची गरज आहे. अशी ही सहनशीलता आम्हाला कठीण समयात तसेच इतरांनी उदासीन वृत्ती दाखवली तरी आमचा ख्रिस्ती आवेश टिकवून ठेवण्यात साहाय्यक ठरेल. (इब्री. १०:३६-३९) यहोवाकडे बळ मिळण्यासाठी प्रार्थना करा. (यशया ४०:२९-३१) तुम्ही सहनशील राहावे व सरळ मनोवृत्ती व्यक्त करीत राहावे यासाठी त्याची मदत मागा. आपण देवाचे कार्य करीत आहोत हे लक्षात असू द्या. आपण जे करतो ते तो बघत असतो व तो ते विसरीत नाही. (इब्री. ६:१०) यास्तव, आपण खचू नये! उलटपक्षी, “प्रभूच्या कामात अधिक करीत राहण्यात” तत्पर राहू या व याचवेळी ‘चांगल्या कामा’साठी बळ यावे म्हणून यहोवावर विसंबून राहू या.—१ करिंथ. १५:५८; गल. ६:९.