अभ्यास लेख २४
देवाच्या ज्ञानाच्या विरोधात असलेले तर्कवितर्क उलथून टाका!
“सर्व प्रकारचे तर्कवितर्क व देवाच्या ज्ञानाच्या विरोधात उभी केलेली प्रत्येक गोष्ट आम्ही उलथून टाकतो.”—२ करिंथ. १०:५.
गीत १८ देवाचे खरे प्रेम
सारांशa
१. अभिषिक्त ख्रिश्चनांना पौलने कोणता इशारा दिला होता?
“या जगाच्या व्यवस्थेचे अनुकरण करू नका.” (रोम. १२:२) हा इशारा प्रेषित पौलने पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांना दिला होता. यहोवाला समर्पित आणि पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त झालेल्या ख्रिश्चनांना पौलने इतका कडक इशारा का दिला?—रोम. १:७.
२-३. सैतान कशा प्रकारे आपल्याला यहोवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो? आणि आपण आपल्या मनात असलेल्या भक्कम बुरुजांसारख्या गोष्टी कशा प्रकारे पाडू शकतो?
२ सैतानाच्या जगातल्या हानीकारक विचारांचा काही ख्रिश्चनांवर प्रभाव झाला होता आणि यामुळे पौल चिंतित होता. (इफिस. ४:१७-१९) हीच गोष्ट आपल्यापैकी कोणाच्याही बाबतीत घडू शकते. सैतान या जगाचा शासक असल्यामुळे तो वेगवेगळ्या युक्त्यांचा उपयोग करून आपल्याला यहोवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. त्यातली एक युक्ती म्हणजे स्वतःला महत्त्व देण्याची किंवा प्रतिष्ठा मिळवण्याची इच्छा. या इच्छेचा वापर करून तो आपल्याला यहोवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. तसंच, तो आपली पार्श्वभूमी, संस्कृती आणि आपलं शिक्षण यांमधल्या काही विशिष्ट पैलूंचा उपयोग करून आपल्याला त्याच्यासारखा विचार करायला लावतो.
३ आपल्या मनात असलेल्या “भक्कम बुरुजांसारख्या” गोष्टी उलथून टाकणं शक्य आहे का? (२ करिंथ. १०:४) पाहा, पौल याचं कशा प्रकारे उत्तर देतो: “सर्व प्रकारचे तर्कवितर्क व देवाच्या ज्ञानाच्या विरोधात उभी केलेली प्रत्येक गोष्ट आम्ही उलथून टाकतो आणि प्रत्येक विचाराला कैदी बनवून ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला लावतो.” (२ करिंथ. १०:५) खरंच, आपण यहोवाच्या मदतीने आपल्या मनात रुजलेले चुकीचे विचार काढू शकतो. ज्या प्रकारे औषधामुळे विषबाधेचा प्रभाव नाहीसा होतो त्याच प्रकारे देवाचं वचन सैतानाच्या जगामुळे झालेल्या विषबाधेचा प्रभाव नाहीसं करू शकतं.
“आपली विचारसरणी” बदलणे
४. आपण सत्य स्वीकारलं तेव्हा आपल्यापैकी बऱ्याच जणांना कोणते बदल करावे लागले?
४ तुम्ही जेव्हा सत्य स्वीकारलं आणि यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तुम्हाला किती बदल करावे लागले होते याचा जरा विचार करा. आपल्यापैकी बऱ्याच जणांना यहोवाची सेवा करण्यासाठी चुकीच्या गोष्टी सोडाव्या लागल्या होत्या. (१ करिंथ. ६:९-११) खरंच, आपण यहोवाचे किती आभारी आहोत की त्याच्या मदतीने आपण वाईट सवयींवर मात करू शकलो!
५. रोमकर १२:२ या वचनानुसार आपण कोणत्या दोन गोष्टी केल्या पाहिजेत?
५ आता आणखी काही बदल करण्याची गरज नाही असा आपण विचार करू नये. आपण जरी बाप्तिस्मा घेण्याआधी गंभीर पाप करण्याचं सोडून दिलं असलं, तरी आतादेखील आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. पुन्हा त्या पापांकडे नेणारा कोणताही मोह टाळण्यासाठी आपल्याला सतत मेहनत घेण्याची गरज आहे. हे आपण कसं करू शकतो? पौल आपल्याला सांगतो: “या जगाच्या व्यवस्थेचे अनुकरण करू नका, तर आपली विचारसरणी बदलून स्वतःचे रूपांतर होऊ द्या.” (रोम. १२:२) यासाठी आपण दोन गोष्टी केल्या पाहिजेत. पहिली म्हणजे, या जगाचं “अनुकरण करू नका” म्हणजेच आपण त्याद्वारे प्रभावीत होऊ नये. दुसरी म्हणजे, आपल्याला आपली “विचारसरणी बदलून स्वतःचे रूपांतर” करावे लागेल.
६. मत्तय १२:४३-४५ या वचनांनुसार आपल्याला येशूच्या शब्दांतून कोणता महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो?
६ पौल ज्या रूपांतराबद्दल बोलत होता ते फक्त आपण बाहेरून कसे दिसतो त्याबद्दल नव्हतं. तर तो अशा रूपांतराबद्दल बोलत होता ज्यामुळे आपलं व्यक्तिमत्त्व आतून आणि बाहेरून बदलतं. (“रूपांतर की रूप घेणं” ही चौकट पाहा) आपण पूर्णपणे म्हणजे आपली मनोवृत्ती, भावना आणि इच्छा यांत बदल केला पाहिजे. म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला विचारलं पाहिजे की, ‘ख्रिस्ती बनण्यासाठी मी केलेले बदल फक्त वरवरचे आहेत की मनापासून आहेत?’ आपलं आतलं व्यक्तिमत्त्व बदलणं खूप महत्त्वाचं आहे. मत्तय १२:४३-४५ या वचनांनुसार आपल्याला काय करण्याची गरज आहे याबद्दल येशूने सांगितलं. (वाचा.) या वचनांतून आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. तो म्हणजे आपण मनातून चुकीचे विचार काढणंच पुरेसं नाही, तर त्याजागी देवाला मान्य असलेले विचार भरणंही गरजेचं आहे.
“तुमच्या विचारांना दिशा देणाऱ्या मनोवृत्तीत तुम्ही सतत नवीन होत जावे”
७. आपण आतून ज्या प्रकारची व्यक्ती आहोत त्यात आपण कशा प्रकारे बदल करू शकतो?
७ आपण आतून ज्या प्रकारची व्यक्ती आहोत त्यात बदल करणं खरंच शक्य आहे का? देवाचं वचन सांगतं: “तुमच्या विचारांना दिशा देणाऱ्या मनोवृत्तीत तुम्ही सतत नवीन होत जावे, आणि देवाच्या इच्छेनुसार निर्माण करण्यात आलेले, तसेच खरे नीतिमत्त्व आणि एकनिष्ठता यांवर आधारित असलेले नवे व्यक्तिमत्त्व तुम्ही धारण करावे.” (इफिस. ४:२३, २४) यावरून स्पष्ट आहे की आतून बदल करणं शक्य आहे. पण हे सोपं नाही. आपण फक्त चुकीच्या इच्छांचा आणि कार्यांचा प्रतिकार करणंच पुरेसं नाही तर आपल्या “विचारांना दिशा देणाऱ्या मनोवृत्तीत” बदल करणंही गरजेचं आहे. यांमध्ये आपली इच्छा, मनोवृत्ती आणि प्रेरणा यांत बदल करणंही सामील आहे आणि यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करण्याची गरज आहे.
८-९. आपण आतून ज्या प्रकारची व्यक्ती आहोत त्यात बदल करणं का गरजेचं हे एका बांधवाच्या अनुभवातून कसं दिसून येतं?
८ आता आपण अशा एका बांधवाचं उदाहरण पाहू या जो आधी हिंसक होता. तो खूप दारू प्यायचा आणि मारामारी करायचा. पण नंतर त्याने स्वतःत बदल केला आणि बाप्तिस्मा घेतला. यामुळे त्याच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना एक चांगली साक्ष मिळाली. मग बाप्तिस्म्याच्या काही काळानंतरच त्याला एका अनपेक्षित समस्येला तोंड द्यावं लागलं. एका संध्याकाळी एक माणूस दारू पिऊन त्या बांधवाच्या घरी आला आणि त्याला मारामारी करण्यासाठी प्रवृत करू लागला. सुरुवातीला या बांधवाने तसं करण्याच्या इच्छेचा प्रतिकार केला. पण शेवटी जेव्हा तो माणूस यहोवाबद्दल वाईटसाईट बोलू लागला, तेव्हा मात्र बांधवाचा राग अनावर झाला. तो घरातून बाहेर आला आणि त्याने त्या माणसासोबत मारामारी केली. हा बांधव असा का वागला? हे खरं आहे, की बायबल अभ्यासामुळे त्याला आपल्या हिंसक वृत्तीला आळा घालायला मदत झाली होती. पण असं असलं तरी त्याने विचारांना दिशा देणाऱ्या मनोवृत्तीत बदल केला नव्हता. दुसऱ्या शब्दांत सांगायचं, तर तो बांधव आतून ज्या प्रकारची व्यक्ती होता त्यात त्याने बदल केला नव्हता.
९ तरीपण, त्या बांधवाने प्रगती करण्याचं थांबवलं नाही. (नीति. २४:१६) तो वडिलांच्या मदतीद्वारे प्रगती करत राहिला आणि शेवटी त्याने वडील बनण्याची योग्यता प्राप्त केली. नंतर एका संध्याकाळी राज्य सभागृहात असताना त्या बांधवासमोर अशी एक समस्या आली जिचा त्याने काही वर्षांआधी सामना केला होता. एक दारू प्यायलेला माणूस एका वडिलावर हात उचलणार होता. तेव्हा आपल्या या बांधवाने काय केलं? त्याने शांत राहून नम्रपणे दारू प्यायलेल्या माणसाशी तर्क केला, त्याला शांत केलं आणि त्याला त्याच्या घरापर्यंत पोहोचायला मदत केली. या वेळी हा बांधव वेगळ्या रीतीने का वागला? कारण बांधवाने त्याच्या विचारांना दिशा देणाऱ्या मनोवृत्तीत बदल केला होता. तो आतून शांतिप्रिय आणि नम्र व्यक्ती बनला होता आणि यामुळे यहोवाची महिमा झाली.
१०. आपण आतून ज्या प्रकारची व्यक्ती आहोत त्यात बदल करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे?
१० आतून बदल करणं हे लगेच किंवा आपोआप होत नसतं. यासाठी आपल्याला कदाचित बरीच वर्षं “होताहोईल तितका प्रयत्न” करावा लागेल. (२ पेत्र १:५) आपण बरीच वर्षं सत्यात असल्यामुळे हे बदल आपोआप होतील असं नाही. तर आपण आतून ज्या प्रकारची व्यक्ती आहोत त्यात बदल करण्यासाठी आपण पुरेपूर मेहनत घेतली पाहिजे. हे बदल करण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाची पावलं उचलावी लागतील. आता आपण त्यावर चर्चा करू या.
आपण विचारांना दिशा देणाऱ्या मनोवृत्तीत कशा प्रकारे बदल करू शकतो?
११. आपल्या विचारांना दिशा देणाऱ्या मनोवृत्तीत बदल करण्यासाठी प्रार्थनेमुळे कशी मदत होते?
११ सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे प्रार्थना. स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपल्यालाही प्रार्थना करण्याची गरज आहे. त्याने म्हटलं: “हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.” (स्तो. ५१:१०) आपल्या विचारांना दिशा देणाऱ्या मनोवृत्तीत बदल करणं गरजेचं आहे हे आपण मान्य केलं पाहिजे आणि मदतीसाठी यहोवाकडे प्रार्थना केली पाहिजे. बदल करण्यासाठी यहोवा आपल्याला मदत करेल याची आपण खातरी कशी बाळगू शकतो? यहेज्केलच्या दिवसांतल्या हट्टी इस्राएली लोकांना यहोवाने जे अभिवचन दिलं होतं त्यातून आपल्यालाही आश्वासन मिळतं: “मी तुम्हाला नवे अंतःकरण आणि नवा आत्मा देईन . . . देवप्रीतीने भरलेली मृदू अंतःकरणे मी तुम्हाला देईन.” (यहे. ११:१९, सुबोधभाषांतर) इस्राएली लोकांना स्वतःमध्ये बदल करता यावा यासाठी यहोवा त्यांना मदत करायला तयार होता आणि तो आज आपल्यालाही मदत करायला तयार आहे.
१२-१३. (क) स्तोत्र ११९:५९ या वचनानुसार आपल्याला कोणत्या गोष्टींवर मनन करण्याची गरज आहे? (ख) आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत?
१२ दुसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे मनन करणं. आपण दररोज देवाचं वचन वाचतो तेव्हा आपल्याला कोणते विचार आणि भावना बदलण्याची गरज आहे, यावर आपण मनन किंवा विचार करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. (स्तोत्र ११९:५९ वाचा; इब्री ४:१२; याको. १:२५) आपल्या विचारांवर आणि भावनांवर जगाच्या विचारांचा प्रभाव झाला आहे का, हे आपण ओळखलं पाहिजे. आपल्यात कमतरता आहेत हे आपण प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे आणि नंतर त्यांवर मात करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे.
१३ उदाहरणार्थ, स्वतःला विचारा: ‘माझ्या मनात काही प्रमाणात हेवा किंवा ईर्ष्या आहे का?’ (१ पेत्र २:१) ‘माझी पार्श्वभूमी, शिक्षण आणि आर्थिक स्थिती यांमुळे माझ्यात गर्वाची भावना आहे का?’ (नीति. १६:५) ‘ज्यांच्याजवळ माझ्यासारख्या गोष्टी नाहीत अशांना किंवा जे वेगळे वंशाचे आहेत त्यांना मी कमी लेखतो का?’ (याको. २:२-४) ‘सैतानाच्या जगातल्या गोष्टींकडे मी आकर्षित होतो का?’ (१ योहा. २:१५-१७) ‘अनैतिक आणि हिंसक मनोरंजनाकडे माझी ओढ आहे का?’ (स्तो. ९७:१०; १०१:३; आमो. ५:१५) या प्रश्नांवर विचार केल्याने आपल्याला कुठे सुधार करण्याची गरज आहे हे समजायला मदत होईल. “भक्कम बुरुजांसारख्या” वाटणाऱ्या भावना किंवा विचार यांवर विजय मिळवल्यामुळे आपल्याला यहोवाचं मन आनंदित करता येईल.—स्तो. १९:१४.
१४. चांगले मित्र निवडणं का महत्त्वाचं आहे?
१४ आपल्याला तिसरं महत्त्वाचं पाऊल उचलणंही गरजेचं आहे, ते म्हणजे चांगले मित्र निवडणं. आपल्याला जाणीव असो किंवा नसो, आपल्या मित्रांचा आपल्यावर जबरदस्त प्रभाव होत असतो. (नीति. १३:२०) कामावरचे किंवा शाळेतले सोबती आपल्याला देवासारखे विचार करायला शिकवणार नाहीत. पण ख्रिस्ती सभांमध्ये मात्र आपल्याला चांगले मित्र भेटू शकतात. सभा एक असं ठिकाण आहे, जिथे आपण “प्रेम आणि चांगली कार्ये करण्यासाठी” प्रवृत्त किंवा उत्साहित होतो.—इब्री १०:२४, २५, तळटीप पाहा.
“विश्वासात स्थिर व्हा”
१५-१६. सैतान आपले विचार कशा प्रकारे बदलण्याचा प्रयत्न करतो?
१५ सैतानाला कसंही करून आपले विचार बदलायचे आहेत हे लक्षात ठेवा. आपल्यावर देवाच्या वचनाद्वारे झालेला चांगला प्रभाव नाहीसा करण्यासाठी सैतान सर्व प्रकारचे तर्कवितर्क वापरतो.
१६ सैतानाने एदेन बागेत हव्वाला जो प्रश्न विचारला होता, तोच प्रश्न तो आजही आपल्याला विचारत आहे. तो म्हणजे, “देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय?” (उत्प. ३:१) हे जग सैतानाच्या नियंत्रणात आहे आणि इथे आपल्या विश्वासांबद्दल संशय निर्माण करणारे प्रश्न सहसा आपल्या कानी पडतात. जसं की: ‘देव खरंच समलिंगी विवाहाला मान्यता देत नाही का? आपण नाताळ आणि वाढदिवस साजरा करू नये अशी खरंच देवाची इच्छा आहे का? आपण रक्त संक्रमण करू नये अशी खरंच देव आपल्याकडून अपेक्षा करतो का? बहिष्कृत झालेल्या प्रियजनांशी आपण संगती करू नये अशी अपेक्षा एक प्रेमळ देव खरंच आपल्याकडून करेल का?’
१७. विश्वासाबद्दल आपल्या मनात शंका निर्माण करण्यासाठी प्रश्न विचारले जातात तेव्हा आपण काय केलं पाहिजे आणि असं केल्यामुळे कलस्सैकर २:६, ७ या वचनानुसार कोणते चांगले परिणाम घडून येतात?
१७ आपल्या विश्वासांबद्दल आपल्याला पूर्णपणे खातरी असली पाहिजे. आपण जर आपल्या मनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळवली नाहीत तर त्या विश्वासांबद्दल आपल्याला शंका वाटू लागेल. अशा शंकांमुळे आपले विचार हळूहळू बदलू शकतात आणि आपला विश्वास नष्ट होऊ शकतो. मग अशा वेळी आपल्याला काय करण्याची गरज आहे? देवाचं वचन आपल्याला आपल्या विचारसरणीचं रूपांतर करायला सांगतं, यामुळे “देवाची उत्तम, स्वीकारयोग्य आणि परिपूर्ण इच्छा काय आहे” याची आपण स्वतःला खातरी पटवून देऊ शकू. (रोम. १२:२) नियमितपणे अभ्यास केल्यामुळे, बायबलमधून शिकलेल्या गोष्टी सत्य आहेत यावर आपला पक्का विश्वास बसेल. यामुळे यहोवाचे स्तर योग्य आहेत याबद्दल आपल्या मनात तिळमात्र शंका उरणार नाही. मग मुळं खोलवर रुजलेल्या एका वृक्षाप्रमाणे आपणही मुळावलेले म्हणजेचं “विश्वासात स्थिर” असू.—कलस्सैकर २:६, ७, वाचा.
१८. सैतानाच्या जगामुळे झालेल्या विषबाधेचा प्रभाव काढण्यासाठी आणि त्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे मदत होईल?
१८ विश्वासात स्थिर होण्यासाठी प्रत्येकाला स्वतः मेहनत घ्यावी लागते. हे इतर कोणी आपल्यासाठी करू शकत नाही. तेव्हा, तुमच्या विचारांना दिशा देणाऱ्या मनोवृत्तीत सतत नवीन होत राहा. यासाठी सतत प्रार्थना करत राहा; यहोवाच्या पवित्र आत्म्याची मदत मागत राहा. मनन करा; आपल्या विचारांचं आणि हेतूचं परीक्षण करत राहा. चांगले मित्र निवडा; अशा लोकांसोबत मैत्री करा जे तुमच्या विचारसरणीत बदल करण्यासाठी तुम्हाला मदत करतील. असं केल्याने तुम्हाला सैतानाच्या जगामुळे झालेल्या विषबाधेचा प्रभाव काढून टाकणं शक्य होईल आणि “सर्व प्रकारचे तर्कवितर्क व देवाच्या ज्ञानाच्या विरोधात” उभ्या असलेल्या गोष्टी यशस्वी रीत्या उलथून टाकायला मदत होईल.—२ करिंथ. १०:५.
गीत ४८ प्रतिदिनी यहोवासोबत चालू या
a आपली पार्श्वभूमी, संस्कृती आणि आपलं शिक्षण यांचा आपल्या विचारांवर चांगला किंवा वाईट प्रभाव पडत असतो. आपल्याला कदाचित जाणवेल की आपल्यात चुकीची मनोवृत्ती किंवा चुकीचे विचार खोलवर रुजलेले आहेत. जर आपण चुकीची मनोवृत्ती विकसित केली असेल तर आपल्याला त्यावर मात कशी करता येईल हे या लेखात आपण पाहणार आहोत.