अभ्यास लेख २३
“कोणीही तुम्हाला कैद करून घेऊन जाऊ नये, म्हणून सांभाळा”
“मानवी परंपरांनुसार व . . . तत्त्वज्ञान व निरर्थक अशा फसव्या गोष्टी सांगून कोणीही तुम्हाला कैद करून घेऊन जाऊ नये, म्हणून सांभाळा.”—कलस्सै. २:८.
गीत ३७ देवप्रेरित शास्त्रवचने
सारांशa
१. कलस्सैकर २:४, ८ या वचनांनुसार सैतान आपले विचार कैदेत आणण्याचा प्रयत्न कसा करतो?
आपल्याला यहोवाच्या विरोधात नेण्याची सैतानाची इच्छा आहे. हे साध्य करण्यासाठी तो आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत फेरबदल करण्याचा प्रयत्न करतो. शेवटी सैतानाचा हाच हेतू आहे की आपलं मन त्याच्या कैदेत यावं आणि आपण त्याच्यासारखा विचार करावा. आपल्याला ज्या गोष्टींचं आकर्षण वाटतं त्यांचा वापर करून तो आपल्याला त्याच्या मागे चालायला लावतो. अशा प्रकारे तो आपल्याला भुलवण्याचा किंवा फसवण्याचा प्रयत्न करतो.—कलस्सैकर २:४, ८ वाचा.
२-३. (क) आपण कलस्सैकर २:८ मध्ये दिलेल्या इशाऱ्याकडे लक्ष का दिलं पाहिजे? (ख) आपण या लेखात काय पाहणार आहोत?
२ सैतानाकडून भुलवलं जाणं हा खरंच आपल्यासाठी एक मोठा धोका आहे का? हो नक्कीच! हे लक्षात असू द्या, की पौलने कलस्सैकर २:८ मध्ये लिहिलेला इशारा अविश्वासू लोकांसाठी नव्हता, तर त्याने तो अशा ख्रिश्चनांसाठी लिहिला होता जे पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त झाले होते. (कलस्सै. १:२, ५) त्या वेळी त्या ख्रिश्चनांसमोर सैतानाकडून आपली फसवणूक होण्याचा धोका होता. पण आज आपल्यासमोर तर आणखी मोठा धोका आहे. (१ करिंथ. १०:१२) असं का म्हणता येईल? कारण सैतानाला या पृथ्वीवर फेकून देण्यात आलं आहे आणि तो देवाच्या विश्वासू सेवकांना भुलवण्यासाठी भरपूर खटाटोप करत आहे. (प्रकटी. १२:९, १२, १७) तसंच, आपण अशा काळात जगत आहोत जिथे दुष्ट व फसवी माणसं “अधिकाधिक वाईट” होत चालली आहेत.—२ तीम. ३:१, १३.
३ सैतान “निरर्थक अशा फसव्या गोष्टी” यांचा वापर करून आपले विचार भ्रष्ट करण्याचा प्रयत्न कसा करतो याबद्दल या लेखात सांगण्यात आलं आहे. तो वापरत असलेले असे तीन ‘डावपेच’ किंवा ‘कुयुक्त्या’ कोणत्या आहेत हे आपण ओळखण्याचा प्रयत्न करू या. (इफिस. ६:११; तळटीप) मग पुढच्या लेखात, त्याच्या या कुयुक्त्यांमुळे आपल्या विचारांवर झालेले वाईट परिणाम आपण कसे काढून टाकू शकतो यावर चर्चा करू या. पण सर्वात आधी आपण पाहू या, की इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात गेले तेव्हा सैतानाने त्यांची दिशाभूल करण्याचा कसा प्रयत्न केला आणि आपण त्यातून काय शिकू शकतो.
मूर्तिपूजेचा पाश
४-६. अनुवाद ११:१०-१५ या वचनांनुसार इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात राहू लागल्यावर त्यांना शेती करण्याच्या कोणत्या नवीन पद्धती शिकून घ्याव्या लागणार होत्या?
४ सैतानाने खूप चलाखीने इस्राएली लोकांना मूर्तिपूजा करण्याच्या मोहात पाडलं. हे त्याने कसं केलं? त्यांना अन्नाची गरज आहे हे त्याला माहीत होतं आणि त्याने याच गोष्टीचा फायदा उचलला. इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात पोहोचल्यावर त्यांना शेती करण्याच्या पद्धतीत बदल करावा लागणार होता. इजिप्तमध्ये असताना ते नाईल नदीतल्या पाण्याचा वापर करून शेती करायचे. पण वचन दिलेल्या देशात अशी काही सोय नव्हती आणि म्हणून शेतीसाठी त्यांना आता पाऊस आणि दव यांवर अवलंबून राहावं लागणार होतं. (अनुवाद ११:१०-१५ वाचा; यश. १८:४, ५) त्यामुळे इस्राएली लोकांना आता शेती करण्याच्या नवीन पद्धती शिकून घ्याव्या लागणार होत्या. पण या गोष्टी शिकून घेणं सोपं नव्हतं कारण शेती करण्याचा अनुभव असणाऱ्या बऱ्याचशा इस्राएली लोकांचा अरण्यात मृत्यू झाला होता.
सैतानाने इस्राएली शेतकऱ्यांचे विचार कसे बदलले? (परिच्छेद ४-६ पाहा)b
५ इस्राएली लोकांची परिस्थिती आता बदलली आहे हे यहोवाने त्यांना सांगितलं. मग त्याने त्यांना एक असा इशारा दिला ज्याचा कदाचित शेती करण्याशी काहीही संबंध नाही असं वाटू शकतं. त्याने म्हटलं: “तुम्ही सावध राहा, नाहीतर मनाला भुरळ पडून तुम्ही बहकून जाल, अन्य देवांची सेवा करू लागाल आणि त्यांना नमन कराल.” (अनु. ११:१६, १७) इस्राएली लोकांना शेती करण्याच्या नवीन पद्धती शिकून घेण्याबद्दल सांगताना यहोवाने त्यांना खोट्या दैवतांची पूजा न करण्याचा इशारा का दिला?
६ इस्राएली लोकांना मूर्तिपूजक लोकांकडून शेती करण्याच्या स्थानिक पद्धती शिकून घेण्याचा मोह होईल हे यहोवाला माहीत होतं. हे खरं आहे, की या नवीन ठिकाणी शेती कशी करायची याबद्दल इस्राएली लोकांपेक्षा त्यांच्या आजूबाजूच्या मूर्तिपूजक लोकांना जास्त अनुभव होता. यामुळे इस्राएली लोक त्यांच्याकडून शेतीसाठी उपयोगी पडतील अशा बऱ्याचशा पद्धती शिकून घेतील याची शक्यता होती. पण यात एक धोका होता. कनानी शेतकऱ्यांच्या विचारांवर बआल दैवताचा प्रभाव होता. बआल हा आकाशाचा मालक आहे आणि पाऊस पाडणारा देव आहे असा त्यांचा विश्वास होता. इस्राएली लोकांनी अशा खोट्या शिकवणींमुळे फसावं अशी यहोवाची इच्छा नव्हती. पण तरीही इस्राएली लोकांनी वारंवार बआलची उपासना करण्याचा निर्णय घेतला. (गण. २५:३, ५; शास्ते २:१३; १ राजे १८:१८) सैतानाने इस्राएली लोकांवर कसा प्रभाव पाडला हे आता आपण पाहू या.
इस्राएली लोकांना कैद करण्यासाठी सैतानाने वापरलेल्या तीन कुयुक्त्या
७. इस्राएली लोकांनी वचन दिलेल्या देशात प्रवेश केला तेव्हा त्यांच्या विश्वासाची परीक्षा कशी झाली?
७ आपल्या जमिनीवर भरपूर पाऊस पडावा या इस्राएली लोकांच्या स्वाभाविक इच्छेचा फायदा उचलण्याचा सैतानाने प्रयत्न केला. ही त्याची पहिली युक्ती होती. दरवर्षी वचन दिलेल्या देशात एप्रिलच्या अखेरपासून ते सप्टेंबरपर्यंत फारच कमी पाऊस पडायचा. लोकांचं जीवन व शेतीचं उत्पन्न हे खरंतर ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणाऱ्या पावसावर अवलंबून होतं. पण सैतानाने इस्राएली लोकांना विश्वास करायला लावला की शेतीच्या उत्पन्नात भरभराट हवी असेल तर त्यांना मूर्तिपूजा करणाऱ्या लोकांसारख्या विधी पाळाव्या लागतील. कनानी लोक विश्वास करायचे की विशिष्ट विधी पाळल्या तरच त्यांचा देव पाऊस पाडेल. ज्या इस्राएली लोकांचा यहोवावर विश्वास नव्हता, त्यांना वाटत होतं की बआल दैवताची उपासना करणं हा दुष्काळ टाळण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे त्यांनी बआल या खोट्या दैवतासाठी मूर्तीपूजक लोकांसारख्या विधी पाळायला सुरुवात केली.
८. सैतानाने कोणती दुसरी युक्ती वापरली? स्पष्ट करा.
८ सैतानाने इस्राएली लोकांना फसवण्यासाठी वापरलेली दुसरी युक्ती म्हणजे, अनैतिक इच्छा पूर्ण करण्याचा बढावा देणं. मूर्तिपूजा करणारी राष्ट्रं अतिशय घृणित अनैतिक गोष्टी करून त्यांच्या दैवतांची उपासना करायचे. अशा प्रकारच्या अनैतिक उपासनेत स्त्री आणि पुरुष मंदिरात वेश्याव्यवसाय करायचे. समलैंगिकता आणि इतर अनैतिक गोष्टी फक्त खपवूनच घेतल्या जात नव्हत्या तर त्या अगदी सर्वसामान्य झाल्या होत्या. (अनु. २३:१७, १८; १ राजे १४:२४) अशा गोष्टी केल्यामुळे त्यांचा देव पाऊस पाडेल आणि यामुळे शेतीच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास मूर्तिपूजा करणारे लोक करायचे. बरेचसे इस्राएली लोक या अनैतिक कार्यांकडे आकर्षित झाले आणि यामुळे त्यांनी खोट्या दैवतांची उपासना करण्याचा निर्णय घेतला. पण खरं पाहता, सैतानाने त्यांना कैद केलं होतं.
९. होशेय २:१६, १७ या वचनांनुसार सैतानाने इस्राएली लोकांना यहोवाची ओळख विसरायला कसं लावलं?
९ सैतानाने तिसरी युक्ती वापरली. ती म्हणजे, त्याने इस्राएली लोकांचा यहोवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. संदेष्टा यिर्मयाच्या दिवसांत यहोवाने उघडपणे सांगितलं होतं, की खोटे संदेष्टे त्याच्या लोकांना “बआल दैवतामुळे” यहोवाचं नाव विसरायला लावतील. (यिर्म. २३:२७) देवाच्या लोकांनी यहोवा हे नाव घेण्याचं थांबवलं आणि त्याच्या नावाऐवजी त्यांनी बआल हे नाव वापरायला सुरुवात केली ज्याचा अर्थ “मालक” किंवा “धनी” असा होतो. या गोष्टीमुळे इस्राएली लोकांना यहोवा आणि बआल यांच्यातला फरक समजणं कठीण झालं. यामुळे त्यांनी यहोवाच्या उपासनेत बआलच्या विधींचा समावेश केला.—होशेय २:१६, १७ वाचा.
सैतान आज वापरत असलेल्या कुयुक्त्या
१०. सैतान आज कोणत्या कुयुक्त्या वापरत आहे?
१० सैतान आजही याच कुयुक्त्या वापरतो. त्याने लोकांना आपल्या नैसर्गिक इच्छा पूर्ण करायला व लैंगिक अनैतिकतेला बढावा दिला आहे आणि यहोवाबद्दल असलेल्या लोकांच्या दृष्टिकोनात बदल केला आहे. असं करून त्याने लोकांना कैद केलं आहे. आपण सर्वात आधी शेवटच्या गोष्टीवर चर्चा करू या.
११. सैतानाने यहोवाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन कसा बदलला आहे?
११ सैतान यहोवाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलतो. प्रेषितांच्या मृत्यूनंतर ख्रिस्ती असण्याचा दावा करणाऱ्या काहींनी खोट्या शिकवणी पसरवायला सुरुवात केल्या. (प्रे. कार्ये २०:२९, ३०; २ थेस्सलनी. २:३) या धर्मत्यागी लोकांनी एकमात्र खऱ्या देवाची ओळख अस्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ, बायबलच्या प्रतींमध्ये त्यांनी देवाच्या नावाचा वापर करण्याचं थांबवलं आणि त्या जागी “प्रभू” असा शब्द वापरला. याचा काय परिणाम झाला? देवाचं वैयक्तिक नाव काढून त्या जागी “प्रभू” हे नाव घातल्यामुळे बायबल वाचकांना, यहोवा हा शास्त्रवचनातल्या इतर ‘प्रभूंपेक्षा’ कसा वेगळा आहे हे समजून घेणं कठीण झालं. (१ करिंथ. ८:५) तसंच त्यांनी यहोवा आणि येशू या दोघांसाठी एकच शब्द म्हणजे, “प्रभू” हा शब्द वापरला. यामुळे ती दोघं एक नसून वेगवेगळी आहेत आणि त्यांच्या भूमिकाही वेगवेगळ्या आहेत हे समजून घेणंही कठीण झालं. (योहा. १७:३) यामुळे देवाच्या वचनात नसलेल्या त्रैक्याच्या शिकवणीची सुरुवात झाली. म्हणून आज बऱ्याच लोकांना वाटतं की देवाला ओळखणं शक्य नाही. पण खरंच हा किती चुकीचा विचार आहे!—प्रे. कार्ये १७:२७.
सैतानाने खोट्या धर्माचा वापर करून अनैतिक इच्छांना बढावा कसा दिला आहे? (परिच्छेद १२ पाहा)c
१२. रोमकर १:२८-३१ या वचनांनुसार खोट्या धर्मामुळे कोणत्या गोष्टीला बढावा मिळाला आहे आणि याचे काय परिणाम झाले आहेत?
१२ सैतान अनैतिक इच्छा पूर्ण करण्याचा बढावा देतो. प्राचीन काळात सैतानाने खोट्या धर्माचा वापर करून इस्राएली लोकांना अनैतिक गोष्टी करण्याचा बढावा दिला. आजही तो हेच करत आहे. खोटा धर्म अनैतिक आचरण फक्त खपवूनच घेत नाही तर त्याला बढावाही देतो. याचा परिणाम म्हणजे, देवाची उपासना करण्याचा दावा करणाऱ्या अनेकांनी त्याचे नैतिक स्तर पाळण्याचं सोडून दिलं आहे. प्रेषित पौलने रोमकरांना लिहिलेल्या पत्रांत याचे काय परिणाम झाले हे अगदी स्पष्टपणे सांगितलं. (रोमकर १:२८-३१ वाचा.) “अनुचित कामे” यांत सर्व प्रकारची लैंगिक अनैतिकता आणि समलैंगिकता यांचा समावेश होतो. (रोम. १:२४-२७, ३२; प्रकटी. २:२०) त्यामुळे बायबलमध्ये दिलेल्या स्पष्ट शिकवणींना जडून राहणं खरंच खूप महत्त्वाचं आहे!
१३. सैतान वापरत असलेली आणखी एक युक्ती कोणती?
१३ सैतान आपल्या नैसर्गिक इच्छा पूर्ण करायला बढावा देतो. आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी मदत होईल अशी कौशल्यं शिकण्याची आपली नैसर्गिक इच्छा असते. (१ तीम. ५:८) ही कौशल्यं आपण सहसा शाळेत असताना मन लावून अभ्यास करताना शिकतो. पण आपण सावध असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच देशातल्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांना फक्त व्यावहारिक ज्ञानच नाही तर त्यासोबत मानवी तत्त्वज्ञानही शिकवलं जातं. विद्यार्थ्यांना देवाच्या अस्तित्वावर शंका घ्यायला आणि बायबलचा अनादर करायला प्रवृत्त केलं जातं. जीवनाची सुरुवात उत्क्रांतीनेच झाली असा सर्व बुद्धिमान लोक विश्वास करतात असं विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. (रोम. १:२१-२३) अशी शिकवण ‘देवाच्या बुद्धीच्या’ विरोधात आहे.—१ करिंथ. १:१९-२१; ३:१८-२०.
१४. मानवी तत्त्वज्ञान कशाला बढावा देतं?
१४ मानवी तत्त्वज्ञान यहोवाच्या स्तरांना फक्त नाकारतच नाही तर त्यांचा विरोधही करतं. ते देवाच्या आत्म्याच्या पैलूला बढावा देण्याऐवजी “शरीराची कामे” यांना बढावा देतं. (गलती. ५:१९-२३) यामुळे गर्व आणि उद्धटपणा निर्माण होतो आणि याचा परिणाम म्हणजे लोक “स्वतःवर प्रेम करणारे” बनतात. (२ तीम. ३:२-४) देवाच्या सेवकांना प्रोत्साहन देण्यात येतं की त्यांनी नम्रता विकसित करावी. पण या गोष्टी या गुणाच्या विरोधात आहेत. (२ शमु. २२:२८) उच्च शिक्षण घेतल्यामुळे काही ख्रिश्चनांची विचारसरणी देवासारखी नसून जगासारखी बनली आहे. या धोक्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर याचा काय परिणाम होऊ शकतो यासाठी आपण एक उदाहरण पाहू या.
मानवी तत्त्वज्ञानाचा आपल्या विचारांवर कसा प्रभाव पडू शकतो? (परिच्छेद १४-१६ पाहा)d
१५-१६. एका बहिणीच्या उदाहरणावरून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
१५ पंधरापेक्षा जास्त वर्षं पूर्ण वेळेची सेवा करत असलेली एक बहीण म्हणते: “बाप्तिस्माप्राप्त साक्षीदार या नात्याने मी उच्च शिक्षण घेण्याच्या धोक्याबद्दल वाचलं आणि ऐकलंही होतं, पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मी विचार केला हा सल्ला माझ्यासाठी नाही.” यामुळे तिला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं? ती म्हणते: “मला इतका अभ्यास असायचा की माझा सगळा वेळ आणि मेहनत त्यातच खर्च व्हायची. मला आधीसारखा यहोवाला प्रार्थना करायला वेळच उरायचा नाही, सेवाकार्यात बायबल विषयांवर चर्चा करण्यासाठी माझ्यात त्राणच नसायचा. आणि सभांसाठी तयारी करायचं म्हटलं तर मी फार थकून गेलेले असायचे. पण मला जाणीव झाली की उच्च शिक्षणात पार बुडून गेल्यामुळे यहोवासोबतचं माझं नातं कमकुवत होत आहे आणि मी कसंही करून हे थांबवलं पाहिजे. म्हणून मी लगेच उच्च शिक्षण सोडून दिलं.”
१६ उच्च शिक्षणामुळे या बहिणीच्या विचारांवर काय परिणाम झाला? ती म्हणते: “मला हे सांगताना खूप लाज वाटते की मी जे शिक्षण निवडलं त्यामुळे मी इतरांच्या, खासकरून आपल्या भाऊबहिणींच्या कमतरतांवर जास्त लक्ष देऊ लागले, त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षा ठेवू लागले आणि त्यांच्यापासून दूर राहू लागले. माझ्या विचारांमध्ये बदल करायला मला खूप वेळ लागला. स्वर्गात राहणारा पिता आपल्याला त्याच्या संघटनेकडून जो इशारा देतो त्याकडे दुर्लक्ष करणं खूप धोक्याचं ठरू शकतं हे मला या अनुभवातून शिकायला मिळालं. मी स्वतःला जितकं ओळखत नाही तितकं यहोवा मला ओळखतो. खरंच, मी त्या वेळी यहोवाचं ऐकलं असतं तर किती बरं झालं असतं!”
१७. (क) आपण कोणता पक्का निर्धार केला पाहिजे? (ख) पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?
१७ सैतानाचं जग “तत्त्वज्ञान व निरर्थक अशा फसव्या गोष्टी” यांद्वारे तुम्हाला कैद करणार नाही असा पक्का निर्धार करा. सैतान वापरत असलेल्या कुयुक्त्यांपासून नेहमी स्वतःचं संरक्षण करा. (१ करिंथ. ३:१८; २ करिंथ. २:११) यहोवा कोण आहे आणि तुम्ही त्याची उपासना कशी करावी याबद्दल सैतान आपला दृष्टिकोन बदलू पाहतो, पण त्याला तसं करू देऊ नका. यहोवाच्या उच्च नैतिक स्तरांनुसार जीवन जगा. तसंच, यहोवाच्या मार्गदर्शनांकडे दुर्लक्ष होईल अशा सैतानाच्या कुयुक्त्यांनाही फसू नका. पण समजा, या जगाच्या विचारांचा तुमच्यावर प्रभाव झाल्याचं तुम्हाला जाणवलं तर तुम्ही काय कराल? पुढच्या लेखात आपल्याला समजेल की देवाचं वचन “भक्कम बुरुजांसारख्या” असलेल्या सवयी आणि विचार यांना कसं उलथून टाकू शकतं.—२ करिंथ. १०:४, ५.
गीत ११ यहोवाचे मन हर्षविणे
a लोकांना फसवण्यात सैतान खूप हुशार आहे. अनेक लोकांना वाटतं की ते स्वतंत्र आहेत, पण खरं पाहता सैतानाने त्यांना कैद करून घेतलं आहे. तो लोकांना फसवण्यासाठी कोणते काही डावपेच किंवा युक्त्या वापरतो यावर आपण या लेखात चर्चा करणार आहोत.
b चित्रांचं वर्णन: कनानी लोकांसोबत ज्या इस्राएली लोकांनी संगती केली ते बआलची उपासना आणि अनैतिक काम करण्याच्या मोहात पडले.
c चित्रांचं वर्णन: समलैंगिकता चालवून घेणाऱ्या चर्चचं जाहिरात फलक.
d चित्रांचं वर्णन: एक तरुण बहीण उच्च शिक्षण घेते. प्रोफेसरचं मत आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञान मानवी समस्या सोडवू शकतात आणि हा विचार त्या बहिणीला आणि तिच्या वर्गसोबत्यांना पटू लागतो. नंतर ती बहीण राज्य सभागृहात येते तेव्हा ती टीकात्मक आणि आवड नसल्याची वृत्ती दाखवते.