“सर्व प्रकारच्या” लोकांबद्दल करुणा विकसित करा
येशूने आपल्या शिष्यांना आनंदाचा संदेश प्रचार करायला शिकवलं, तेव्हा त्याने त्यांना इशारा दिला की लोक त्यांचा संदेश ऐकतीलच असं नाही. (लूक १०:३, ५, ६) आपल्या सेवाकार्याबद्दलही हे खरं आहे. सेवाकार्यात आपल्याला असेही लोक भेटतील जे कदाचित उद्धट किंवा आक्रमकही असतील. त्यांच्या अशा वागण्यामुळे आपल्याला त्यांना करुणा दाखवणं आणि प्रचार करणं कठीण जाऊ शकतं.
एक दयाळू किंवा करुणामय व्यक्ती लोकांच्या गरजा, समस्या पाहण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या परिस्थितीबद्दल तिला वाईट वाटतं आणि म्हणून त्यांना मदत करायची तिची इच्छा असते. पण सेवाकार्यात भेटत असलेल्या लोकांविषयी असलेली करुणा आपण गमावली तर काय? यामुळे आपण सेवेतला आपला आवेश गमावू शकतो म्हणजेच, त्यांना प्रचार करायला आपण उत्सुक राहणार नाही व यामुळे आपल्याला त्यांना मदत करता येणार नाही. आपल्या आवेशाची तुलना आपण आगीसोबत करू शकतो. ती तेजस्वीपणे जळत राहण्यासाठी तिच्यात भरपूर प्रमाणात लाकडं घालत राहण्याची गरज असते. त्याच प्रकारे, आवेश टिकवून ठेवण्यासाठी आपल्यात करुणा असणं गरजेचं आहे!—१ थेस्सलनी. ५:१९.
कठीण वाटत असलं तरीही आपण करुणा दाखवायला कसं शिकू शकतो? यासाठी आता आपण यहोवा, येशू आणि प्रेषित पौल यांच्या उदाहरणाचं कसं अनुकरण करू शकतो यावर चर्चा करू या.
यहोवाने दाखवलेल्या करुणेचं अनुकरण करा
हजारो वर्षांपासून लोक यहोवाबद्दल खोट्या गोष्टी सांगत आहेत. पण तरीही तो ‘उपकार न मानणाऱ्यांवर व दुष्ट लोकांवर’ दया करतो. (लूक ६:३५) तो कशा प्रकारे त्यांच्यावर दया करतो? तो सर्वांशी धीराने वागतो. यहोवाची इच्छा आहे की “सर्व प्रकारच्या लोकांचे तारण व्हावे.” (१ तीम. २:३, ४) यहोवा जरी दुष्टतेचा द्वेष करत असला, तरी त्याच्या नजरेत लोक मौल्यवान आहेत व कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही.—२ पेत्र ३:९.
लोकांना खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवायला भाग पाडण्यात सैतान खूप तरबेज आहे हे यहोवाला माहीत आहे. (२ करिंथ. ४:३, ४) बऱ्याच जणांना लहानपणापासून देवाबद्दल खोटं शिकवलं जातं. ते ज्या प्रकारे विचार करतात किंवा त्यांना जे वाटतं कदाचित यामुळे त्यांना सत्य स्वीकारायला कठीण जाऊ शकतं. पण यहोवा त्यांना मदत करायला उत्सुक आहे. असं आपण का म्हणू शकतो?
हे समजण्यासाठी एक उदाहरण पाहू या. निनवे शहरात राहणाऱ्या लोकांबद्दल यहोवाला जे वाटलं त्याचा विचार करा. ते हिंसक होते, तरी यहोवा योनाला त्यांच्याबद्दल म्हणाला: “उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांस कळत नाही अशी एक लाख वीस हजाराहून अधिक माणसे . . . ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय?” (योना ४:११) यहोवाबद्दल सत्य माहीत नसणाऱ्या त्या लोकांबद्दल त्याला दया आली. म्हणून त्यांना चेतावणी देण्यासाठी यहोवाने योनाला त्यांच्याकडे पाठवलं.
यहोवाच्या नजरेत लोक मौल्यवान आहेत आणि आपल्यालाही तसंच वाटतं. यहोवाप्रमाणेच आपलीदेखील त्यांना मदत करायची इच्छा आहे. ते सत्य स्वीकारणार नाहीत असं जरी वाटत असलं तरी आपण त्यांना यहोवाबद्दल शिकवायला उत्सुक असतो.
येशूने दाखवलेल्या करुणेचं अनुकरण करा
आपल्या पित्याप्रमाणेच येशूलाही लोकांचा कळवळा आला. “कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे जखमी झालेले व भरकटलेले होते.” (मत्त. ९:३६) त्यांची अशी अवस्था का आहे हे त्याला माहीत होतं. कारण धार्मिक नेते त्यांना गैरवागणूक द्यायचे व त्यांना खोटं शिकवायचे. येशूचं ऐकून घ्यायला आलेले अनेक जण वेगवेगळ्या कारणांमुळे त्याचे अनुयायी बनणार नाहीत हे माहीत असूनही त्याने त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवल्या.—मार्क ४:१-९.
जर एखाद्याने सुरुवातीला आपल्या संदेशाप्रती आवड दाखवली नाही तर निराश होऊ नका
जीवनातली परिस्थिती बदलल्यावर लोकांची सत्याप्रती असलेली प्रतिक्रियाही बदलू शकते
जेव्हा लोक आपल्या संदेशाला नकारात्मक प्रतिसाद देतात तेव्हा त्यांना असं का वाटतं हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बायबलबद्दल किंवा ख्रिश्चनांबद्दल त्यांचा कदाचित चुकीचा समज असेल. स्वतःला ख्रिस्ती म्हणवून घेणाऱ्या काही जणांची वाईट कार्यं त्यांनी पाहिली असतील म्हणून कदाचित ते असा विचार करत असतील. काही जणांनी आपल्या विश्वासाबद्दल खोट्या गोष्टी ऐकल्या असतील. तर काही असेही असतील ज्यांना असं वाटत असेल की जर ते आपल्याशी बोलले, तर त्यांचे नातेवाईक किंवा त्यांच्या समाजातले लोक त्यांची निंदा करतील आणि म्हणून ते आपल्याशी बोलायला घाबरतात.
आपल्याला असेही लोक भेटतात ज्यांना त्यांच्या जीवनात खूप वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागलं असेल व याचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला असेल. किम नावाची मिशनरी बहीण म्हणते, की तिच्या क्षेत्रात असे लोक आहेत जे युद्धाच्या परिणामांना सामोरे गेले आहेत आणि त्यात त्यांनी आपलं सर्वकाही गमावलं आहे. त्यांना भविष्याबद्दल खरी आशा नाही. त्यांचं मन अशांत आहे व ते कोणावरही भरवसा ठेवत नाही. या क्षेत्रातले लोक साक्षीदारांना प्रचार करण्यापासून अनेकदा रोखतात. एकदा तर सेवाकार्यात असताना किमवर हल्लाही झाला होता.
लोक किमला गैरवागणूक देत असले तरीही तिला दया दाखवायला कशामुळे मदत होते? ती नीतिसूत्रे १९:११ हे वचन नेहमी लक्षात ठेवते. या वचनात म्हटलं आहे: “विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो.” तिच्या क्षेत्रातल्या लोकांना सहन कराव्या लागलेल्या गोष्टींचा जेव्हा ती विचार करते, तेव्हा तिला त्यांच्याबद्दल दया विकसित करायला मदत होते. आणि क्षेत्रात सर्वच जण नकारात्मक प्रतिसाद देतात असंही नाही. त्याच क्षेत्रात तिच्याकडे काही चांगल्या पुनर्भेटीही आहेत.
आपण स्वतःला विचारू शकतो: ‘मला सत्य माहीत नसतं आणि साक्षीदार माझ्या घरी आले असते तर मी कसा प्रतिसाद दिला असता?’ उदाहरणार्थ, साक्षीदारांबद्दल बऱ्याच खोट्या गोष्टी आपल्याला माहीत असत्या तर आपण कसा प्रतिसाद दिला असता? कदाचित आपणही नकारात्मक प्रतिसाद दिला असता आणि तेव्हा आपल्यावरही दया दाखवण्याची गरज भासली असती. आपल्याला जशी वागणूक दिली जावी अशी आपली इच्छा असते तशीच वागणूक आपणही इतरांना दिली पाहिजे, असं येशूने म्हटलं. तेव्हा कठीण वाटत असलं तरीही इतरांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत व त्यांच्याशी धीराने वागलं पाहिजे.—मत्त. ७:१२.
पौलने दाखवलेल्या करुणेचं अनुकरण करा
प्रचारादरम्यान प्रेषित पौलशी हिंसकपणे वागणाऱ्या लोकांनादेखील त्याने करुणा दाखवली. का? कारण तो आधी जसा वागला ते तो कधीच विसरला नाही. त्याने म्हटलं: “मी पूर्वी देवाची निंदा करणारा, त्याच्या लोकांचा छळ करणारा आणि एक उद्धट मनुष्य होतो. तरीसुद्धा, मला दया दाखवण्यात आली कारण मी अजाणतेत आणि विश्वास नसल्यामुळे तसे वागलो.” (१ तीम. १:१३) यहोवा आणि येशू यांनी पौलवर खूप करुणा दाखवली आहे, हे त्याला माहीत होतं. जे लोक त्याला प्रचार करण्यापासून अडवत होते, ते असं का करत आहेत हे तो समजू शकत होता, कारण एकेकाळी तोही त्यांच्यासारखाच विचार करायचा.
कधीकधी पौलला असे लोक भेटले ज्यांचा खोट्या शिकवणींवर जबरदस्त विश्वास होता. याबद्दल त्याला कसं वाटलं? प्रे. कार्ये १७:१६ मध्ये आपल्याला वाचायला मिळतं की अथेन्समध्ये असताना “संपूर्ण शहर मूर्तींनी भरलेले आहे हे पाहून पौलला चीड आली.” पण चीड आणणाऱ्या त्या विषयाचा वापर करूनच पौलने लोकांना शिकवलं. (प्रे. कार्ये १७:२२, २३) त्याने संदेश सांगण्याच्या पद्धतीत फेरबदल केला. त्याला “कसेही करून काहींचे तारण” करायचं होतं म्हणून त्याने वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांशी बोलताना वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला.—१ करिंथ. ९:२०-२३.
जेव्हा प्रचारात लोक नकारात्मक प्रतिसाद देतात किंवा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात तेव्हा आपणही पौलचं अनुकरण करू शकतो. त्यांच्याबद्दल माहीत असलेल्या गोष्टींचा वापर करून आपण त्यांना ‘शुभवर्तमानाबद्दल’ शिकायला मदत करू शकतो. (यश. ५२:७) डॉरथी नावाची बहीण म्हणते: “आमच्या क्षेत्रात पुष्कळ लोकांना शिकवलं गेलं आहे, की देव क्रूर व दोष लावणारा आहे. त्यांचा देवावर अटळ विश्वास आहे याबद्दल मी त्यांची प्रशंसा करते आणि त्यानंतर यहोवा देवाच्या प्रेमळ व्यक्तिमत्वाबद्दल व भविष्यासाठी त्याने दिलेल्या अभिवचनांबद्दल, बायबल काय म्हणतं याकडे मी त्यांचं लक्ष आकर्षित करते.”
“बऱ्याने वाइटाला जिंकत राहा”
आपण अंताच्या जसजसं जवळ जात आहोत तसतसं काही लोकांची मनोवृत्ती “अधिकाधिक वाईट” होत जाईल अशी अपेक्षा आपण करू शकतो. (२ तीम. ३:१, १३) पण त्यांच्या प्रतिक्रियेमुळे आपण करुणा किंवा आनंद गमावता कामा नये. “बऱ्याने वाइटाला जिंकत” राहण्यासाठी लागणारी शक्ती यहोवा आपल्याला देऊ शकतो. (रोम. १२:२१) जेसीका नावाची पायनियर म्हणते की तिला प्रचारात अनेकदा गर्विष्ठ आणि साक्षीदारांची व त्यांच्या संदेशाची थट्टा करणारे लोक भेटतात. पुढे ती म्हणते: “यामुळे चीड येऊ शकते. चर्चा सुरू केल्यावर मी मनातल्या मनात यहोवाला प्रार्थना करते. आणि त्याच्या दृष्टिकोनाने समोरच्या व्यक्तीला पाहण्यासाठी मदत मागते.” यामुळे जेसीकाला स्वतःच्या भावनांवर नाही, तर त्या व्यक्तीला कशी मदत करता येईल यावर लक्ष केंद्रित करायला मदत होते.
आपण सत्य जाणून घेणाऱ्यांना शोधण्याचा प्रयत्न करत राहतो
कालांतराने काही लोक आपली मदत स्वीकारून सत्य शिकतील
आपल्या बंधुभगिनींसोबत प्रचार करताना आपण त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्नही केला पाहिजे. जेसीका म्हणते की ती जेव्हा प्रचारात असते आणि तिला किंवा तिच्या सोबत काम करणाऱ्याला वाईट अनुभव आला तर ती त्यावर जास्त विचार करत बसत नाही. या उलट, ती काही सकारात्मक गोष्टी बोलते. जसं की, काहींनी नकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी प्रचारामुळे किती चांगले परिणाम घडून येत आहेत याबद्दल ती बोलते.
प्रचार करणं कधीकधी कठीण जाऊ शकतं हे यहोवाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. पण आपण त्याच्या दयेच्या गुणाचं अनुकरण करत आहोत हे पाहून त्याला खूप आनंद होतो! (लूक ६:३६) यहोवा या जगातल्या लोकांप्रती नेहमीसाठी करुणा व धीर दाखवणार नाही. अंत कधी आणायचा याची योग्य वेळ त्याला माहीत आहे, ही खात्री आपण बाळगू शकतो. तोपर्यंत मात्र आपण तातडीने प्रचार करत राहणं गरजेचं आहे. (२ तीम. ४:२) तेव्हा आपण सर्व जण आवेशाने प्रचार करत राहू या आणि “सर्व प्रकारच्या” लोकांना मनापासून करुणा दाखवत राहू या.