वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp18 क्र. २ पृ. ६-७
  • पूर्ण झालेल्या भविष्यवाण्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पूर्ण झालेल्या भविष्यवाण्या
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आज कोणत्या भविष्यवाण्या पूर्ण होत आहेत?
  • देवाचे लोक बॅबिलोन सोडतात
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • योग्य संदेशवाहक ओळखणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • जगाचा अंत कधी होईल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२१
  • या सर्वांचा काय अर्थ होतो?
    जागृत राहा!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१८
wp18 क्र. २ पृ. ६-७
बायबल भविष्यवाण्यांचा अभ्यास करणं

पूर्ण झालेल्या भविष्यवाण्या

आधीच्या लेखात उल्लेख करण्यात आलेल्या राजा क्रोएसस याला डेल्फी इथल्या देववाणी सांगणाऱ्‍यांनी चुकीची माहिती दिल्यामुळे पारसच्या राजाकडून हार पत्करावी लागली. दुसरीकडे पाहता, याच पारसच्या राजाबद्दल बायबलमध्ये अशी उल्लेखनीय भविष्यवाणी दिली आहे ज्यामधली एकूणएक गोष्ट पूर्ण झाली.

पारसच्या राजाचा जन्म होण्याच्या सुमारे २०० वर्षांआधी यशया नावाच्या इब्री संदेष्ट्याने पारसच्या राजाचं नाव कोरेश असेल हे सांगितलं आणि तो शक्‍तिशाली बाबेल शहराला कसं काबीज करेल हेही सांगितलं.

यशया ४४:२४, २७, २८: “परमेश्‍वर म्हणतो, . . . मी खोल पाण्याच्या डोहास म्हणतो, कोरडा हो, मी तुझे प्रवाह आटवीन; मी कोरेशाविषयी म्हणतो, तो माझा मेंढपाळ आहे, तो माझे सर्व मनोरथ सिद्धीस नेईल. तो यरुशलेमेविषयी म्हणेल, ती बांधण्यात येईल, मंदिराचा पाया घालण्यात येईल.”

ग्रीक इतिहासकार हेरोडॉटस यांच्या अहवालानुसार कोरेशच्या सैन्याने बाबेल शहरातून वाहणाऱ्‍या फरात नदीचं पाणी दुसरीकडे वळवलं. कोरेशने लढवलेल्या या युक्‍तीमुळे पाण्याची पातळी कमी झाली आणि सैन्याला शहरात शिरणं शक्य झालं. बाबेल शहर काबीज केल्यावर कोरेशने तिथे बंदीवासात असलेल्या यहुदी लोकांना मुक्‍त केलं आणि त्यांना ७० वर्षांपूर्वी नष्ट झालेल्या त्यांच्या शहराचं पुनर्वसन करण्याची आणि तिथे परत जाण्याची परवानगी दिली.

यशया ४५:१: “परमेश्‍वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्‍त आहे; त्याच्यापुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे; राजास आपल्या कमरा सोडावयास मी लावतो; त्याच्यापुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाहीत, असे मी करतो.”

पारसचं सैन्य शहराच्या भिंतीला लागून असलेल्या दोन मोठ्या दरवाज्यातून शहरात शिरलं. ते निष्काळजीपणे उघडेच ठेवण्यात आले होते. जर बाबेलच्या लोकांना कोरेशच्या योजनेबद्दल जरादेखील कल्पना असती तर त्यांनी नदीच्या बाजूचे शहराचे दरवाजे बंद ठेवले असते. पण असं झालं नाही आणि शहर काबीज केलं तेव्हा बाबेलचे लोक काहीच करू शकले नाही.

बायबलमध्ये दिलेली फक्‍त हीच एक भविष्यवाणी पूर्ण झाली असं नाही, तर त्यात अशा अनेक भविष्यवाण्या आहेत ज्या पूर्ण झाल्या.a सहसा खोट्या दैवतांच्या मदतीने केल्या जाणाऱ्‍या माणसांच्या भविष्यवाण्यांसारख्या या नाहीत. बायबलमध्ये दिलेल्या भविष्यवाण्या अशा देवाकडून आहेत जो म्हणतो: “मी आरंभीच शेवट कळवतो. होणाऱ्‍या गोष्टी घडवण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे.”—यशया ४६:१०.

खरा देव यहोवा हाच असं विधान करू शकतो. कारण त्याच्या नावाचा अर्थ ‘तो व्हायला लावतो’ असा होतो. यावरून आपल्याला समजतं की त्याच्याकडे भविष्य जाणण्याची क्षमता आहे आणि तो भविष्यात घडणाऱ्‍या घटना त्याच्या इच्छेनुसार घडवून आणू शकतो. यामुळे त्याने दिलेली सर्व अभिवचनं तो नक्कीच पूर्ण करेल असा भरवसा आपल्याला मिळतो.

आज कोणत्या भविष्यवाण्या पूर्ण होत आहेत?

आपल्या दिवसांबद्दल बायबलमध्ये कोणत्या भविष्यवाण्या दिल्या आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का? सुमारे २,००० वर्षांपूर्वी बायबलमध्ये म्हटलं होतं, की “शेवटच्या दिवसांत अतिशय कठीण काळ येईल.” इथे उल्लेख केलेले शेवटचे दिवस कोणाचे आहेत? पृथ्वीचे, मानवजातीचे की आणखी कशाचे? खरंतर हजारो वर्षांपासून ज्या संघर्ष, जुलूम आणि दुःख यांचा आपण सामना करत आहोत त्याचा हा शेवट असेल. ‘शेवटच्या दिवसांची’ ओळख पटवून देणाऱ्‍या काही भविष्यवाण्यांवर आता आपण चर्चा करूयात.

२ तीमथ्य ३:१-५: “शेवटच्या दिवसांत . . . लोक केवळ स्वतःवर प्रेम करणारे, पैशावर प्रेम करणारे, बढाई मारणारे, गर्विष्ठ, निंदा करणारे, आईवडिलांचे न ऐकणारे, उपकारांची जाण न ठेवणारे, बेइमान, माया-ममता नसलेले, कोणत्याही गोष्टीशी सहमत न होणारे, इतरांची बदनामी करणारे, संयम नसलेले, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम नसलेले, विश्‍वासघात करणारे, अडेल वृत्तीचे, गर्वाने फुगलेले, देवापेक्षा चैनीची आवड असलेले, देवाची भक्‍ती करण्याचा केवळ दिखावा करून आपल्या जीवनावर तिचा प्रभाव न होऊ देणारे असे असतील.”

आज अशी प्रवृत्ती लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे या गोष्टीशी तुम्ही सहमत नाही का? आजूबाजूला लोक स्वार्थी, पैशावर प्रेम करणारे आणि गर्वाने फुगलेले असल्याचं तुम्हाला दिसतं का? लोक आज स्वतःचाच जास्त विचार करणारे आणि कोणाचंच ऐकून न घेणारे असे बनले आहेत असं तुम्हाला वाटत नाही का? आज जास्तीत जास्त मुलं आपल्या पालकांचं ऐकत नाहीत. देवावर प्रेम करण्याऐवजी मौजमस्ती करण्याकडे लोकांचा कल आहे असं तुम्हाला नक्कीच दिसलं असेल. दिवसेंदिवस परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखीनच बिकट होत चालली आहे.

मत्तय २४:६, ७: “तुम्ही लढायांचा आवाज आणि लढायांविषयीच्या बातम्या ऐकाल. . . . एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल.”

काहींनी अनुमान लावला आहे की १९१४ पासून युद्धात आणि लढाईत १० कोटी पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. ही संख्या अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा कितीतरी जास्त आहे. या सर्व लोकांनी किती अश्रू वाहिले असतील, किती यातना आणि दुःख सोसलं असेल याची कल्पना करा! पण राष्ट्रांनी यातून काही धडा घेतला का? त्यांनी युद्धांना पूर्ण विराम दिला का?

मत्तय २४:७: “ठिकठिकाणी दुष्काळ पडतील.”

जागतिक अन्‍न पुरवठा अभियान असा अहवाल देतं: “जगभरात ८१ कोटी ५० लाख लोकसंख्या आहे. आणि एवढ्या लोकांचं पोट भरेल इतकं अन्‍न आपल्याकडे आहे, पण तरीही नऊमधून एक व्यक्‍ती रोज उपाशी पोटी झोपी जाते. एवढंच नव्हे तर तीनपैकी एक व्यक्‍ती कुपोषणाच्या एखाद्या प्रकाराला बळी पडलेली असते.” असा अनुमान लावण्यात आला आहे, की दरवर्षी जवळपास ३० लाख मुलं उपाशी राहिल्यामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.

लूक २१:११: “मोठमोठे भूकंप होतील.”

लोकांना जाणवतील एवढ्या तीव्रतेचे जवळपास ५०,००० भूकंप दरवर्षी होतात. त्यांपैकी साधारण १०० असे असतात ज्यांमुळे इमारतींचं मोठं नुकसान होतं. आणि प्रत्येक वर्षी मोठ्या तीव्रतेचा एकतरी भूकंप होतोच. एका अहवालानुसार, १९७५ पासून २००० सालापर्यंत झालेल्या भूकंपात एकूण ४,७१,००० लोकांचा बळी गेला आहे.

मत्तय २४:१४: “सर्व राष्ट्रांना साक्ष मिळावी म्हणून राज्याचा हा आनंदाचा संदेश सर्व जगात घोषित केला जाईल, आणि त्यानंतर अंत येईल.”

जगभरात यहोवाच्या साक्षीदारांची संख्या ८० लाखापेक्षा जास्त आहे. ते जवळजवळ २४० देशात देवाच्या राज्याबद्दलची सुवार्ता घोषित करत आहेत. फक्‍त शहरांतच नाही तर खेडेगावांत, जंगलात, डोंगर दऱ्‍यात जाऊन ते हा संदेश सांगत आहेत. भविष्यवाणीत सांगितलं आहे की देवाची इच्छा असेपर्यंत हे कार्य सुरू राहील आणि “त्यानंतर अंत येईल.” पण अंत येईल याचा नेमका काय अर्थ होतो? याचा अर्थ मानवी राज्याचा अंत होईल आणि देवाच्या राज्याचा उदय होईल असा होतो. देवाचं राज्य येईल तेव्हा कोणती अभिवचनं पूर्ण होतील हे आपण पुढच्या लेखात पाहू या.

a या अंकातला “अचूक भविष्यवाणीचा एक मूक साक्षीदार” हा लेख पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा