यहोवा आपल्या सर्व परीक्षांमध्ये आपलं सांत्वन करतो
“सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव . . . आपल्या सर्व परीक्षांमध्ये आपले सांत्वन करतो.”—२ करिंथ. १:३, ४.
१, २. संकटांत किंवा परीक्षांत यहोवा आपलं सांत्वन कसं करतो? आणि आपल्याला तो काय अभिवचन देतो?
एक अविवाहित तरुण बांधव, बायबलमधील १ करिंथकर ७:२८ या वचनावर बऱ्याच काळापासून विचार करत होता. त्यात म्हटलं आहे: “जे लग्न करतील त्यांना शारीरिक दुःखे सहन करावी लागतील.” त्यामुळे, त्या बांधवाने आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या आणि मंडळीत वडील म्हणून सेवा करणाऱ्या एका विवाहित बांधवाला विचारलं: “यात ‘दु:खे’ असं जे म्हटलं आहे त्याचा काय अर्थ होतो? आणि पुढे जर माझं लग्न झालं, तर मला या दुःखांचा सामना कसा करता येईल?” पण, या प्रश्नांची उत्तरं देण्याआधी, वडिलांनी त्या तरुण बांधवाला प्रेषित पौलने लिहिलेल्या आणखी एका गोष्टीवर विचार करण्याचं प्रोत्साहन दिलं. पौलने लिहिलं, की यहोवा हा “सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव आहे . . . तो आपल्या सर्व परीक्षांमध्ये [“संकटांमध्ये,” तळटीप] आपले सांत्वन करतो.”—२ करिंथ. १:३, ४.
२ आपल्या सर्वांना माहीत आहे, की आपला पिता यहोवा आपल्यावर प्रेम करतो आणि सर्व संकटांत आपलं सांत्वन करतो. यहोवाने त्याच्या वचनाद्वारे कशा प्रकारे तुम्हाला आधार दिला आणि तुमचं मार्गदर्शन केलं, याचे काही विशिष्ट प्रसंगही तुम्हाला आठवत असतील. प्राचीन काळातील सेवकांप्रमाणेच आजही आपल्या सेवकांचं भलं व्हावं अशी यहोवाची इच्छा आहे, याची आपण खातरी बाळगू शकतो.—यिर्मया २९:११, १२ वाचा.
३. या लेखात आपण कोणत्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत?
३ समस्यांचं किंवा संकटांचं मूळ कारण काय आहे हे जर आपल्याला माहीत झालं, तर त्यांचा सामना करणं सहसा सोपं होऊन जातं. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनाच्या बाबतीतही हे खरं आहे. मग प्रश्न आहे, की वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात समस्या का निर्माण होऊ शकतात? आणि बायबलच्या काळातील, तसंच आपल्या काळातील कोणत्या काही उदाहरणांतून आपल्याला आवश्यक असलेलं सांत्वन मिळू शकतं? या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यास परीक्षांचा सामना करायला आपल्याला मदत होऊ शकते.
वैवाहिक जीवनातील समस्या
४, ५. पती-पत्नीच्या जीवनात कोणकोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात?
४ यहोवाने पहिल्या स्त्रीची निर्मिती केल्यावर तिला पुरुषाकडे आणलं आणि ती त्याची पत्नी बनली. मग, यहोवा म्हणाला: “पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.” (उत्प. २:२४) अर्थात, आपण सगळेच अपरिपूर्ण आहोत. (रोम. ३:२३) त्यामुळे, एक स्त्री आणि पुरुष जेव्हा विवाहबंधनात एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या उद्भवणं हे साहजिकच आहे. उदाहरणार्थ, लग्नाआधी स्त्रीला बहुधा आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहावं लागत असेल. पण, लग्नानंतर मात्र तिचा पती तिचे मस्तक असल्यामुळे, तिला त्याच्या अधीन राहणं गरजेचं आहे. (१ करिंथ. ११:३) पुरुषालाही सुरुवातीला कदाचित आपलं मस्तकपद चालवायला आणि आपल्या पत्नीला मार्गदर्शन द्यायला कठीण जाऊ शकतं. तसंच, पत्नीलासुद्धा आपल्या आईवडिलांऐवजी आपल्या पतीचं मार्गदर्शन स्वीकारायला कठीण जाऊ शकतं. शिवाय, नवीनच लग्न झालेल्या एखाद्या जोडप्याचे सासरच्या लोकांशी मतभेद होऊ शकतात; आणि हीसुद्धा एक प्रकारची समस्याच ठरू शकते.
५ त्याचप्रमाणे, आपल्याला मूल होणार आहे हे पती-पत्नीला समजतं, तेव्हा त्यांना कसं वाटू शकतं याचाही विचार करा. या गोड बातमीमुळे त्यांना आनंद होत असला, तरी त्यांच्या मनात अनेक चिंताही निर्माण होऊ शकतात. बाळंतपण नीट होईल का? बाळ सुदृढ असेल का? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात येऊ शकतात. तसंच, बाळाच्या आगमनानंतर आपला खर्च वाढेल याचीही पती-पत्नीला कल्पना असते. शिवाय, बाळाचा जन्म झाल्यानंतर आईवडिलांना नवीन परिस्थितीशी देखील जुळवून घ्यावं लागतं. आईचा बराचसा वेळ कदाचित बाळाची काळजी घेण्यातच जाईल. त्यामुळे, पती व पत्नी पूर्वी एकमेकांना जितका वेळ द्यायचे तितका वेळ ते आता देऊ शकत नसतील. तसंच, वडील या नात्याने पतीच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या असतील. आणि आपल्या पत्नीच्या आणि मुलांच्या सर्व गरजा पूर्ण होत आहेत की नाही, याकडे त्याला लक्ष द्यावं लागत असेल.
६-८. मूलबाळ होत नसल्यामुळे एखाद्या वैवाहिक जोडप्याला कसं वाटू शकतं?
६ काही वैवाहिक जोडप्यांना एका वेगळ्याच प्रकारच्या समस्येला तोंड द्यावं लागतं. आपल्याला मूल असावं असं त्यांना मनापासून वाटत असतं, पण त्यांना मूल होत नाही. एखाद्या स्त्रीला जेव्हा मूल होत नाही, तेव्हा ती भावनिक रीत्या पार कोलमडून जाऊ शकते. (नीति. १३:१२) बायबलच्या काळात, एखाद्या स्त्रीचं लग्न होणं आणि तिला मुलंबाळं होणं खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळेच, याकोबची पत्नी राहेल हिला मूल होत नसल्यामुळे ती अतिशय दुःखी झाली होती; दुसरीकडे पाहता, तिच्या बहिणीला मात्र बरीच मुलं होती. (उत्प. ३०:१, २) आजही काही देशांमध्ये एखाद्याला बरीच मुलं असणं खूप गरजेचं आहे, असं मानलं जातं. अनेकदा, तिथे सेवा करणाऱ्या मिशनरींना लोक विचारतात: ‘तुम्हाला मूलबाळ नाही का?’ पण, या प्रश्नाचं शक्य तितक्या चांगल्या प्रकारे उत्तर दिल्यानंतरही काही जण या मिशनरींनी म्हणतात, “काळजी करू नका, आम्ही प्रार्थना करू तुमच्यासाठी!”
७ आणखी एक उदाहरण विचारात घ्या. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या आपल्या एका बहिणीला मनापासून वाटत होतं, की आपल्याला मूल असावं. पण, या दुष्ट व्यवस्थेत आपल्याला मूल होणार नाही, हे समजल्यावर ती भावनिक रीत्या उद्ध्वस्त झाली. मग, तिने आणि तिच्या पतीने मूल दत्तक घेण्याचं ठरवलं. पण, त्यानंतरही काही काळापर्यंत ती दुःखीच होती. याविषयी बोलताना तिने म्हटलं: “मूल दत्तक घेणं आणि आपल्या स्वतःच्या मुलांना जन्म देणं यात खूप फरक आहे.”
८ बायबल म्हणतं, “मुलांना जन्म देण्याद्वारे ती [स्त्री] सुरक्षित राहील.” (१ तीम. २:१५) पण याचा अर्थ, मुलंबाळं झाल्यामुळे एका स्त्रीला सर्वकाळाचं जीवन मिळेल असा होत नाही. तर मग, या वचनाचा काय अर्थ होतो? एक आई सहसा आपल्या मुलांची आणि घरादाराची काळजी घेण्यात अतिशय व्यस्त असते; त्यामुळे, वायफळ गप्पागोष्टी टाळण्यासाठी किंवा ज्याच्याशी तिचा काहीएक संबंध नाही अशा गोष्टींपासून दूर राहण्यासाठी तिला मदत मिळते. (१ तीम. ५:१३) अर्थात, तिच्या वैवाहिक व कौटुंबिक जीवनात समस्या उद्भवणारच नाहीत असं नाही.
विवाहसोबत्याचा मृत्यू झाल्यास एखाद्याला सांत्वन कसं मिळू शकते? (परिच्छेद ९, १२ पाहा)
९. वैवाहिक जोडप्यांना आणखी कोणत्या परीक्षेचा सामना करावा लागू शकतो?
९ वैवाहिक जोडप्यांना तोंड द्यावा लागणारा आणखी एक परीक्षाप्रसंग म्हणजे, विवाहसोबत्याचा मृत्यू. आपल्या बाबतीत असं काही घडेल याचा कदाचित काहींनी विचारही केला नसेल. पण, तरीसुद्धा अनेकांना या कटू प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. अर्थात, पुनरुत्थानाच्या आशेवर ख्रिश्चनांचा अढळ विश्वास आहे आणि त्यामुळे त्यांना नक्कीच खूप सांत्वन मिळतं. (योहा. ५:२८, २९) आपला पिता, यहोवा याने कठीण काळात आपलं सांत्वन करण्यासाठी अशी अनेक अभिवचनं बायबलमध्ये नमूद केली आहेत. यहोवाच्या काही सेवकांनी हे सांत्वन कसं अनुभवलं आणि त्यामुळे त्यांना कशी मदत झाली, ते आता आपण पाहू.
दुःखाचा सामना करत असताना मिळणारं सांत्वन
१०. हन्नाला कशा प्रकारे सांत्वन मिळालं? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)
१० प्राचीन काळात, एलकानाची प्रिय पत्नी हन्ना हिच्या बाबतीत काय घडलं ते विचारात घ्या. हन्नाला मुलं हवी होती, पण तिला मूल होत नव्हतं. दुसरीकडे पाहता, तिच्या पतीची दुसरी बायको, पनिन्ना हिला मात्र बरीच मुलं होती. (१ शमुवेल १:४-७ वाचा.) त्यातच भरीस भर म्हणजे हन्नाला मुलबाळ नसल्यामुळे पनिन्ना “वर्षानुवर्ष” तिची थट्टा करायची. या गोष्टीचं हन्नाला खूप वाईट वाटायचं. मग, आपल्या मनाचं सांत्वन करण्यासाठी हन्नाने काय केलं? तिने यहोवाला प्रार्थना केली. इतकंच नाही, तर यहोवाची उपासना करण्यासाठी ती निवासमंडपात गेली आणि तिथं बराच वेळ यहोवाला याचना करत राहिली. यहोवाने आपल्याला एक मुलगा द्यावा अशी विनंती तिने केली. तसंच, यहोवा नक्कीच आपल्याला मदत करेल असा भरवसाही तिने बाळगला. यहोवाला प्रार्थना केल्यानंतर हन्नाच्या मनातलं दुःख हलकं झालं आणि त्यानंतर “तिचा चेहरा उदास राहिला नाही.” (१ शमु. १:१२, १७, १८) तिला खातरी होती, की यहोवा एकतर आपल्याला मुलगा देईल किंवा मग दुसऱ्या एखाद्या मार्गाने आपलं सांत्वन करेल.
११. प्रार्थना केल्यामुळे आपल्याला सांत्वन कसं मिळू शकतं?
११ अपरिपूर्ण असल्यामुळे आणि सैतानाच्या जगात राहत असल्यामुळे, जीवनात दुःखद प्रसंग येत राहतील. (१ योहा. ५:१९) पण, त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत मिळू शकते. आपण, “सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव,” यहोवा याला प्रार्थना करू शकतो. हन्नानेही तेच केलं होतं. तिने यहोवाजवळ आपलं मन मोकळं केलं आणि मदतीसाठी त्याला याचना केली. त्याचप्रमाणे, दुःखांचा सामना करत असताना आपण यहोवाला आपल्या समस्या फक्त सांगू नयेत, तर मदतीसाठी त्याच्याकडे याचनाही केली पाहिजे आणि आपल्या भावना त्याच्याजवळ व्यक्त केल्या पाहिजेत.—फिलिप्पै. ४:६, ७.
१२. दुःखांचा सामना करत असतानाही कोणत्या गोष्टीमुळे संदेष्ट्री हन्नाला आनंदी राहण्यास मदत मिळाली?
१२ मूलबाळ नसल्यामुळे किंवा प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे आपण अतिशय दुःखी होऊ शकतो. पण, अशा दुःखद प्रसंगांतही आपल्याला सांत्वन मिळू शकतं. येशूच्या काळातील संदेष्ट्री हन्ना हिचा विचार करा. लग्नानंतर अवघ्या सात वर्षांतच तिच्या पतीचा मृत्यू झाला. शिवाय, तिला मूलबाळही नव्हतं असं दिसतं. पण मग, कोणत्या गोष्टीमुळे तिला सांत्वन मिळण्यास मदत झाली? बायबलचा अहवाल म्हणतो, की “तिने मंदिरात जाण्याचे सोडले नव्हते.” अगदी ८४ वर्षांचं वय असतानाही ती प्रार्थना करण्यासाठी आणि उपासना करण्यासाठी यहोवाच्या मंदिरात जात राहिली. (लूक २:३७) आणि याच गोष्टीमुळे तिला सांत्वन मिळालं आणि दुःखांचा सामना करत असतानाही आनंदी राहण्यास मदत मिळाली.
१३. नातेवाइकांमुळे जर आपण निराश झालो, तर खरे मित्र कशा प्रकारे आपलं सांत्वन करू शकतात?
१३ ख्रिस्ती मंडळीतील आपल्या खऱ्या मित्रांकडूनही आपल्याला सांत्वन मिळू शकतं. (नीति. १८:२४) पॉला या बहिणीचं उदाहरण घ्या. ती अवघी पाच वर्षांची होती तेव्हा तिच्या आईने यहोवाची सेवा करण्याचं सोडून दिलं होतं. त्यामुळे, पॉला अतिशय दुःखी होती आणि याचा सामना करणं तिला खूप कठीण होतं. पण मग, ॲन नावाच्या एका पायनियर बहिणीने तिला धीर दिला व आपुलकी दाखवली. पॉला म्हणते: “खरंतर, ॲन माझी कोणीच लागत नव्हती, पण तिने दाखवलेल्या प्रेमामुळे आणि आपुलकीमुळे मला खूप मदत मिळाली. आणि म्हणूनच मला यहोवाची सेवा करत राहणं शक्य झालं.” पुढे तिची आई पुन्हा यहोवाची सेवा करू लागली, तेव्हा तिला अतिशय आनंद झाला. शिवाय, यहोवाची सेवा करत राहण्यास आपण पॉलाला मदत करू शकलो याचं ॲनलाही खूप समाधान वाटतं.
१४. इतरांचं सांत्वन केल्याने आपल्याला कसा फायदा होतो?
१४ इतरांसाठी चांगल्या गोष्टी करण्यात आपण स्वतःला व्यस्त ठेवतो, तेव्हा सहसा स्वतःच्या समस्या व दुःख आपण विसरून जातो. उदाहरणार्थ, इतरांना राज्याविषयीचा आनंदाचा संदेश सांगण्यात व्यस्त असणाऱ्या अनेक विवाहित व अविवाहित बहिणींना माहीत आहे, की या कार्यात सहभाग घेतल्यामुळे त्या यहोवासोबत काम करत आहेत व त्याच्या इच्छेनुसार जीवन जगत आहेत. आणि या गोष्टीमुळे त्यांना आनंद मिळतो. खरंतर, आपण सर्वच जण इतरांना आनंदाचा संदेश सांगण्याद्वारे त्यांच्याबद्दल प्रेम असल्याचं दाखवू शकतो. शिवाय, आपल्या बंधुभगिनींवरील प्रेमापोटी आपण त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी करतो तेव्हा आपल्यातलं नातं आणखी घट्ट होतं. (फिलिप्पै. २:४) प्रेषित पौलनेसुद्धा हेच केलं. “अंगावर पाजणारी आई जशी स्वतःच्या मुलांची कोमलतेने काळजी घेते,” तशी त्याने इतरांची काळजी घेतली. तसंच, एका प्रेमळ वडिलाप्रमाणे त्याने आपल्या बांधवांचं सांत्वन केलं आणि त्यांना धीरही दिला.—१ थेस्सलनीकाकर २:७, ११, १२ वाचा.
कौटुंबिक जीवनात मिळणारं सांत्वन
१५. लहान मुलांना यहोवाबद्दल शिकवण्याची जबाबदारी मुळात कोणाची आहे?
१५ आपण मंडळीतील कुटुंबांचं कसं सांत्वन करू शकतो? काही वेळा, मंडळीतील नवीन लोक त्यांच्या मुलांना यहोवाबद्दल शिकवायला किंवा त्यांचा बायबल अभ्यास घ्यायलाही आपल्याला सांगतील. खरंतर, मुलांना शिकवण्याची व त्यांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी यहोवाने त्यांच्या पालकांवर सोपवली आहे, असं बायबल आपल्याला सांगतं. (नीति. २३:२२; इफिस. ६:१-४) अर्थात, काही परिस्थितींत इतरांची मदत घेणं गरजेचं असलं, तरी पालकांनी स्वतः आपल्या मुलांना शिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी नेहमी आपल्या मुलांशी बोललं पाहिजे.
१६. इतरांच्या मुलांना मदत करताना आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?
१६ पालक जेव्हा आपल्याला त्यांच्या मुलाचा बायबल अभ्यास घ्यायला सांगतात, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती म्हणजे, पालकांचा त्यांच्या मुलांवर जसा अधिकार आहे, तसा अधिकार आपल्याला नाही. काही वेळा, आपण सत्यात नसलेल्या पालकांच्या मुलांचा अभ्यास घेत असू. अशा वेळी, त्यांचे पालक किंवा आणखी एक प्रौढ साक्षीदार सोबत असताना त्यांच्या घरात अभ्यास करणं, किंवा मग सार्वजनिक ठिकाणी बसून अभ्यास करणं अधिक सुज्ञतेचं ठरेल. यामुळे, लोकांना आपल्याबद्दल कोणताही गैरसमज होणार नाही. तसंच काही काळानंतर, मुलांना यहोवाबद्दल शिकवण्याची जबाबदारी पालक स्वतःकडे घेऊ शकतात.
१७. मुलं आपल्या कुटुंबातील सदस्यांचं सांत्वन कसं करू शकतात?
१७ यहोवावर प्रेम करणारी व त्याच्या मार्गदर्शनाचं पालन करण्यास शिकलेली मुलंसुद्धा आपल्या कुटुंबातील सदस्यांचं सांत्वन करू शकतात आणि त्यांना धीर देऊ शकतात. ते कसं? आपल्या पालकांचा आदर करण्याद्वारे आणि व्यावहारिक मार्गांनी त्यांना मदत करण्याचा होता होईल तितका प्रयत्न करण्याद्वारे, ते असं करू शकतात. तसंच, मुलं यहोवाला विश्वासू राहतात तेव्हा संपूर्ण कुटुंबालाच आनंद होतो. जलप्रलय येण्यापूर्वीच्या काळातील लामेख या यहोवाच्या उपासकाने, आपला मुलगा नोहा याच्याबद्दल म्हटलं: “जी भूमी परमेश्वराने शापिली तिच्यासंबंधाचे आमचे काम व आमच्या हातचे कष्ट याविषयी हा आमचे सांत्वन करील.” जलप्रलयानंतर, यहोवाने भूमीला दिलेला शाप काढून टाकला तेव्हा ही भविष्यवाणी पूर्ण झाली. (उत्प. ५:२९; ८:२१) त्याचप्रमाणे, आज यहोवाला विश्वासू राहणारी मुलंसुद्धा आपल्या कुटुंबाचं सांत्वन करू शकतात. आता आणि येणाऱ्या काळात संकटांचा व परीक्षांचा सामना करण्यास मुलं कुटुंबातील प्रत्येकाला मदत करू शकतात.
१८. कोणती गोष्ट परीक्षांचा सामना करण्यास आपल्याला मदत करू शकते?
१८ आज यहोवाच्या लोकांना बायबलमधील उदाहरणांवर मनन करण्याद्वारे, प्रार्थना करण्याद्वारे आणि बंधुभगिनींसोबत मैत्रीचं नातं जोपासण्याद्वारे सांत्वन मिळत आहे. (स्तोत्र १४५:१८, १९ वाचा.) आपलं सांत्वन करण्यास तयार असलेला यहोवा देव, आपल्याला कोणत्याही संकटाचा किंवा परीक्षेचा धीराने सामना करण्यास मदत करेल, अशी खातरी आपण बाळगू शकतो.