इतरांना सावध करण्यासाठी तुम्ही आणखी जास्त प्रयत्न कराल का?
विसाव्या शतकात, अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को या शहरातील जीवन कसे होते याची झलक अ ट्रिप डाऊन मार्केट स्ट्रीट या मोहक मूक चित्रपटाद्वारे दाखवण्यात आली. चित्रपटाच्या निर्मात्यांनी केबल कारच्या समोर कॅमेरा लावून सॅन फ्रॅन्सिस्कोच्या मुख्य रस्त्यावरील दृश्ये चित्रित केली. या चित्रपटात घोडागाड्या व जुन्या काळातील मोटारी चित्रित करण्यात आल्या. शिवाय, बाजारासाठी आलेल्यांच्या आणि वर्तमानपत्र विकणाऱ्यांच्या दररोजच्या जीवनाचे चित्रण करण्यात आले.
हा चित्रपट अंतःकरणाला भिडतो याचे एक कारण म्हणजे एप्रिल १९०६ मध्ये त्याचे चित्रीकरण झाल्यानंतर काही दिवसांनीच म्हणजे १८ एप्रिल रोजी एका अतिशय विनाशकारी भूकंपामुळे आणि आगीमुळे या शहरातील हजारो लोक मरण पावले आणि शहरातील हा भाग जवळजवळ नष्ट झाला. या चित्रपटात आपण ज्या लोकांचे आनंदी चेहरे पाहतो ते केवळ काही दिवस जगणार होते. चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एकाचे वंशज असलेले स्कॉट माईल्स सांगतात: “मी चित्रपटात फक्त त्या लोकांना पाहतो. लवकरच त्यांच्यावर कोणतं संकट येणार आहे याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. त्यांना पाहून त्यांच्याविषयी वाईट वाटतं.”
१९०६ मध्ये अचानक झालेल्या भूकंपामुळे व त्यानंतर लागलेल्या आगीमुळे सॅन फ्रॅन्सिस्कोच्या मुख्य व्यापारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
वरील माहितीमुळे आपण आपल्या दिवसांविषयी गांभीर्याने विचार करण्यास प्रवृत्त होतो. आपल्यालासुद्धा आपल्या शेजाऱ्यांना पाहून वाईट वाटते. ते त्यांच्या जीवनातील गोष्टी अगदी निश्चिंतपणे करत असतात. पण लवकरच या गोष्टींचा व या जगाचा नाश होणार आहे याची त्यांना जराही कल्पना नाही. एक भूकंप जसा अचानक येतो तशा प्रकारचा हा नाश नाही. देवाच्या न्यायाच्या दिवसाबद्दल आपल्या शेजाऱ्यांना सावध करण्यासाठी आपल्याजवळ अजूनही थोडा काळ उरलेला आहे. दर आठवडी घरोघरचे सेवाकार्य करण्यासाठी तुम्ही नक्कीच वेळ काढत असाल. पण इतरांना सावध करण्यासाठी तुम्ही आणखी काही करू शकता का?
येशू चोवीस तास सुवार्तिक होता
प्रचार करण्याबाबत येशूचे उदाहरण लक्ष देण्याजोगे आहे कारण त्याने केव्हाही सुवार्ता घोषित करण्यापासून अंग चोरले नाही. तो ज्या कोणाला भेटायचा त्याला साक्ष द्यायचा. उदाहरणार्थ, तो रस्त्याने चालत असता एका जकातदाराशी बोलला आणि एकदा दुपारी विहिरीजवळ बसला असता एका स्त्रीशी बोलला. (लूक १९:१-५; योहा. ४:५-१०, २१-२४) त्याला विश्रांती घ्यायची असली, तरी तो स्वतःचा विचार न करता आनंदाने लोकांना शिकवायचा. लोकांना पाहून त्याला कळवळा यायचा आणि म्हणून तो लोकांना वरवर नव्हे तर अगदी मनापासून साक्ष द्यायचा. (मार्क ६:३०-३४) येशूने ज्या निकडीच्या भावनेने प्रचार कार्य केले त्याचे अनुकरण आज कसे केले जात आहे?
ते प्रत्येक संधीचा फायदा घेतात
मेलीका, कडक सुरक्षा असलेल्या एका बिल्डिंगमध्ये राहते. तिच्या शेजारी बरेच विदेशी विद्यार्थी राहतात ज्यांचे मोबाईल नंबर कोणत्याही यादीत नोंदलेले नाहीत. शिवाय बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांच्या यादीतही त्यांची नावे नाहीत. त्यामुळे, या लोकांपर्यंत राज्याचा संदेश पोहचवणे कठीण आहे. या भाडेकरूंसोबत बिल्डिंगच्या लॉबीत व लिफ्टमध्ये आध्यात्मिक गोष्टींवर संभाषण सुरू करण्याची खास संधी तिला लाभली आहे, ज्याबद्दल तिला खूप कदर वाटते. ती म्हणते: “मी या ठिकाणांना साक्ष देण्याचं माझं क्षेत्र बनवलं आहे.” मेलीका आपल्यासोबत बऱ्याच भाषांतील प्रकाशने ठेवते आणि अनेक जण ट्रॅक्ट आणि नियतकालिके स्वीकारतात. ती लोकांना jw.org या आपल्या वेबसाइटविषयीदेखील सांगते. अशा रीतीने तिने अनेक बायबल अभ्यास सुरू केले आहेत.
सॉन्या हीदेखील होताहोईल तितक्या लोकांना साक्ष देण्याचा प्रयत्न करते. ती एका हॉस्पिटलमध्ये कामाला आहे आणि तिच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाला चांगल्या प्रकारे साक्ष देण्याचे ध्येय तिने ठेवले. सर्वात पहिले तिने प्रत्येकाच्या गरजा व आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मग, आध्यात्मिक गोष्टींवर चर्चा करण्यासाठी तिने जेवणाच्या सुटीत प्रत्येकाकडे जाऊन त्यांची भेट घेतली. यामुळे सॉन्याला दोन बायबल अभ्यास सुरू करता आले. आता ती मधल्या सुटीत हॉस्पिटलच्या लॉबीत जाऊन तिथे डॉक्टरांची वाट पाहत बसलेल्यांशी बोलण्याचाही विचार करत आहे.
मिळेल त्या संधीचा फायदा घ्या
१९०६ मध्ये झालेल्या भूकंपात बचावलेल्या एकाने म्हटले, “यापूर्वी कोणत्याही देशात किंवा शहरात इतकं भयंकर संकट आलं नसेल.” पण, लवकरच “देवाला ओळखत” नसलेल्यांवर देवाचा सूड घेण्याचा दिवस येणार आहे आणि हे संकट सर्व संकटांच्या तुलनेत अतिशय विनाशकारी असेल. (२ थेस्सलनी. १:८) लोकांनी आपली मने बदलावीत आणि यहोवाचे साक्षीदार जो इशारेवजा संदेश देत आहेत त्याकडे लक्ष द्यावे अशी यहोवाची मनापासून इच्छा आहे.—२ पेत्र ३:९; प्रकटी. १४:६, ७.
दैनंदिन कामांत भेटणाऱ्या लोकांना साक्ष देण्याच्या प्रत्येक संधीचा तुम्ही पुरेपूर फायदा घेता का?
आपण शेवटल्या काळात जगत आहोत याबद्दल लोकांना सांगण्याची आणि स्वार्थी इच्छांना बळी न पडता यहोवाची सेवा करण्यास त्यांना मदत करण्याची मौल्यवान संधी आपल्याला लाभली आहे. (सफ. २:२, ३) तेव्हा तुम्ही कामावरच्या मित्रांना, शेजाऱ्यांना आणि दैनंदिन व्यवहारात ज्या लोकांना भेटता त्यांना साक्ष देण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घेऊ शकता का? इतरांना सावध करण्यासाठी तुम्ही आणखी जास्त प्रयत्न कराल का?