येशूने केलेल्या हृदयस्पर्शी प्रार्थनेच्या अनुषंगाने कार्य करा
“हे माझ्या बापा, . . . पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर.”—योहा. १७:१.
१, २. इ.स. ३३ साली आपल्या विश्वासू प्रेषितांसोबत वल्हांडण सण साजरा केल्यावर येशूने काय केले?
इ.स. ३३ मधील निसान १४ च्या रात्रीची गोष्ट आहे. येशूने आणि त्याच्या शिष्यांनी आनंदाने वल्हांडण सण साजरा केला आहे. देवाने कशा प्रकारे त्यांच्या पूर्वजांना इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवले होते याची आठवण हा सण त्यांना करून देतो. पण, येशूचे विश्वासू शिष्य यापेक्षा कितीतरी अद्भुत अशी “सार्वकालिक मुक्ती” अनुभवणार आहेत. दुसऱ्या दिवशी, येशूला त्याच्या शत्रूंकडून मृत्यूदंड दिला जाईल. पण, हे द्वेषपूर्ण कृत्य एक आशीर्वादच ठरेल. येशूने केलेल्या त्याच्या परिपूर्ण जीवनाच्या बलिदानामुळे मानवजातीला पाप आणि मृत्यूच्या गुलामगिरीतून सुटका मिळणे शक्य होईल.—इब्री ९:१२-१४.
२ ही प्रेमळ तरतूद आपण विसरू नये म्हणून येशूने एका नवीन वार्षिक सणाची सुरुवात केली. या सणाने वल्हांडण सणाची जागा घेतली. त्याने एक बेखमीर भाकर मोडली आणि ती त्याच्या ११ प्रेषितांपैकी प्रत्येकाला देण्याद्वारे या सणाची सुरुवात केली. त्याने असे म्हटले: “हे माझे शरीर आहे; ते तुम्हासाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.” तसेच, लाल द्राक्षारसाचा एक प्याला घेऊन त्याने प्रेषितांना दिला आणि म्हटले: “हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. ते रक्त तुम्हासाठी ओतले जात आहे.”—लूक २२:१९, २०.
३. (क) येशूच्या मृत्यूनंतर कोणता मोठा बदल घडून आला? (ख) येशूच्या प्रार्थनेच्या संदर्भात आपण कोणते प्रश्न विचारात घेतले पाहिजेत?
३ जन्माने इस्राएली असलेल्या लोकांसोबत देवाने नियमशास्त्राद्वारे केलेला करार लवकरच संपुष्टात येणार होता. येशूच्या अभिषिक्त अनुयायांसोबत यहोवा एक नवीन करार करणार होता. या अभिषिक्त अनुयायांनी बनलेल्या नवीन राष्ट्राविषयी येशूला खूप काळजी होती. मूळ इस्राएल राष्ट्र धार्मिक आणि सामाजिक रीत्या विभाजित झाले होते, ज्यामुळे देवाच्या पवित्र नावाची निंदा होत होती. (योहा. ७:४५-४९; प्रे. कृत्ये २३:६-९) त्याउलट, येशूची इच्छा होती, की त्याच्या अनुयायांनी ऐक्यात राहावे. ऐक्याने कार्य करण्याद्वारे ते देवाच्या नावाला गौरव आणू शकत होते. तर मग, येशूने काय केले? त्याने एक अतिशय सुंदर प्रार्थना केली. ती प्रार्थना वाचण्याचा मोठा बहुमान आपल्याला लाभला आहे. (योहा. १७:१-२६; लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.) त्या प्रार्थनेचे परीक्षण करताना आपण असे विचारू शकतो: “देवाने येशूच्या प्रार्थनेचे उत्तर दिले आहे का?” तसेच, आपण स्वतःचे परीक्षण केले पाहिजे आणि स्वतःला असे विचारले पाहिजे: “मी त्या प्रार्थनेच्या अनुषंगाने कार्य करत आहे का?”
येशूने कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले?
४, ५. (क) येशूने त्याच्या प्रार्थनेची सुरुवात ज्या प्रकारे केली त्यावरून आपण काय शिकतो? (ख) येशूने स्वतःसाठी केलेल्या विनंतीचे उत्तर यहोवाने कशा प्रकारे दिले?
४ त्या रात्री येशू आपल्या शिष्यांसोबत खूप उशिरापर्यंत बोलला आणि त्याने त्यांना अनेक अद्भुत गोष्टी शिकवल्या. नंतर, त्याने स्वर्गाकडे पाहिले आणि अशी प्रार्थना केली: “हे माझ्या बापा, वेळ आली आहे; पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर; जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे. . . . जे काम तू मला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. तर आता हे माझ्या बापा, जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते त्याच्यायोगे तू आपणाजवळ माझे गौरव कर.”—योहा. १७:१-५.
५ येशूने त्याच्या प्रार्थनेच्या सुरुवातीला कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले त्याकडे लक्ष द्या. त्याने प्रामुख्याने त्याच्या स्वर्गीय पित्याचे गौरव व्हावे अशी प्रार्थना केली. येशूने त्याच्या आदर्श प्रार्थनेतदेखील सर्वात आधी अशीच विनंती केली होती: “हे पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.” (लूक ११:२) पुढे येशूने त्याच्या शिष्यांच्या गरजांबद्दल प्रार्थना केली; त्याने शिष्यांना “सार्वकालिक जीवन” देण्याविषयी विनंती केली. त्यानंतर, येशूने स्वतःसाठी काहीतरी मागितले. त्याने प्रार्थना केली, “हे माझ्या बापा, जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते त्याच्यायोगे तू आपणाजवळ माझे गौरव कर.” आपल्या विश्वासू पुत्राने जे मागितले होते त्यापेक्षा अधिक यहोवाने त्याला दिले. यहोवाने त्याला सर्व देवदूतांपेक्षा “श्रेष्ठ नाव” दिले.—इब्री १:४.
एकच खऱ्या देवाला ओळखा
६. सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी प्रेषितांनी काय करणे गरजेचे होते, आणि असे करण्यात ते यशस्वी झाले असे आपण का म्हणू शकतो?
६ पापी असल्यामुळे सार्वकालिक जीवनाची देणगी मिळवण्यास पात्र ठरण्यासाठी आपण काय केले पाहिजे याविषयीदेखील येशूने प्रार्थना केली. (योहान १७:३ वाचा.) त्याने प्रार्थनेत म्हटले, की आपण देवाला आणि ख्रिस्ताला “ओळखावे.” हे आपण कसे करू शकतो? सर्वप्रथम, आपण यहोवाविषयी आणि त्याच्या पुत्राविषयी आणखी शिकून घेतले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काही शिकतो त्याचा आपल्या जीवनात अवलंब केला पाहिजे. येशूच्या प्रेषितांनी या दोन्ही गोष्टी केल्या होत्या. म्हणूनच येशूने पुढे प्रार्थनेत असे म्हटले: “जी वचने तू मला दिली ती मी त्यांना दिली आहेत; ती त्यांनी स्वीकारली.” (योहा. १७:८) पण, सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी त्यांनी देवाच्या शिकवणींवर मनन करत राहणे आणि शिकलेल्या गोष्टी दैनंदिन जीवनात लागू करत राहणे गरजेचे होते. विश्वासू प्रेषित पृथ्वीवरील त्यांच्या जीवनाच्या शेवटापर्यंत असे करत राहिले का? हो, नक्कीच. कारण बायबलमध्ये आपण वाचतो, की येशूच्या प्रेषितांपैकी प्रत्येकाचे नाव स्वर्गीय नव्या जेरूसलेमच्या पायांच्या १२ दगडांवर कायमचे कोरण्यात आले आहे.—प्रकटी. २१:१४.
७. देवाला ओळखण्याचा काय अर्थ होतो, आणि असे करणे इतके महत्त्वाचे का आहे?
७ ग्रीक भाषेच्या विद्वानांनुसार, ज्या ग्रीक शब्दांचे भाषांतर “ओळखावे” असे करण्यात आले आहे, त्या शब्दांचे भाषांतर “ज्ञान घेत राहणे” असेही केले जाऊ शकते. हे दोन्ही अर्थ एकसमान आहेत, आणि दोन्हीही महत्त्वाचे आहेत. “ज्ञान घेत राहणे” असे जे म्हटले आहे ती एक सतत चालणारी क्रिया आहे, जिच्यामुळे आपल्याला देवाला ‘ओळखण्याचा’ बहुमान प्राप्त होतो. पण, विश्वातील सर्वात महान व्यक्तीला ओळखण्यात फक्त त्याच्या गुणांचे आणि उद्देशाचे ज्ञान घेणे इतकेच समाविष्ट नाही. तर, आपण यहोवावर गाढ प्रेम केले पाहिजे आणि त्याच्यासोबत आपला घनिष्ट नातेसंबंध असला पाहिजे. तसेच, आपण आपल्या बंधुभगिनींवरही प्रेम केले पाहिजे. बायबल म्हणते: “जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही.” (१ योहा. ४:८) शिवाय, देवाला ओळखण्यात त्याच्या आज्ञांचे पालन करणेदेखील समाविष्ट आहे. (१ योहान २:३-५ वाचा.) खरोखर, यहोवाला ओळखण्याचा किती मोठा विशेषाधिकार आपल्याला लाभला आहे! यहुदा इस्कर्योतने हा मौल्यवान विशेषाधिकार गमावला होता. त्याच्याप्रमाणे आपण हा विशेषाधिकार गमावू नये म्हणून आपण परिश्रम घेत राहू या. असे केल्यास, सार्वकालिक जीवनाची देणगी प्राप्त करण्यास आपण पात्र ठरू.—मत्त २४:१३.
“तुझ्या नावात त्यांना राख”
८, ९. पृथ्वीवरील सेवाकार्यादरम्यान येशूचा मुख्य उद्देश काय होता, आणि त्याने कोणत्या परंपरेला नाकारले असावे?
८ योहानाच्या पुस्तकातील १७ व्या अध्यायात नमूद असलेली येशूची प्रार्थना वाचल्यावर आपल्याला स्पष्टपणे दिसून येते, की येशूचे त्याच्या प्रेषितांवर तर प्रेम होतेच; शिवाय, त्या प्रार्थनेतून त्याचे आपल्यावरील प्रेमही दिसून येते. (योहा. १७:२०) पण, आपले तारण करणे याचीच येशूला सर्वात जास्त काळजी नव्हती हेदेखील आपण समजून घेणे गरजेचे आहे. पृथ्वीवरील त्याच्या सेवाकार्याच्या सुरुवातीपासूनच त्याचा मुख्य उद्देश होता, की त्याने पित्याच्या नावाच्या पवित्रीकरणासाठी आणि त्या नावाला गौरव आणण्यासाठी झटावे. उदाहरणार्थ, येशूला कोणत्या कामगिरीसाठी पाठवण्यात आले आहे याची नासरेथमधील सभास्थानात घोषणा करताना त्याने यशयाच्या ग्रंथातून असे वाचले: “यहोवाचा आत्मा माझ्यावर आहे, कारण गरिबांना शुभवर्तमान सांगायला त्याने मला अभिषेक केला.” येशूने हा उतारा वाचताना देवाच्या नावाचा स्पष्टपणे उच्चार केला असेल यात काहीच शंका नाही.—लूक ४:१६-२१, NW.
९ येशू पृथ्वीवर येण्याच्या कितीतरी काळाआधी, यहुदी धर्मगुरुंनी शिकवले की लोकांनी देवाच्या नावाचा वापर करू नये. अशी अशास्त्रीय परंपरा येशूने ठामपणे नाकारली असेल ही खात्री आपण बाळगू शकतो. विरोधकांना त्याने असे म्हटले: “मी आपल्या पित्याच्या नावाने आलो आहे पण तुम्ही माझा स्वीकार करत नाही; दुसरा कोणी स्वतःच्या नावाने आला तर त्याचा तुम्ही स्वीकार कराल.” (योहा. ५:४३) नंतर, येशूचा मृत्यू होण्याच्या काही दिवसांआधी त्याने जीवनातील त्याच्या मुख्य उद्देशाविषयी प्रार्थनेत असे म्हटले: “हे बापा, तू आपल्या नावाचे गौरव कर.” (योहा. १२:२८) म्हणूनच, आपण परीक्षण करत असलेल्या प्रार्थनेतून स्पष्टपणे दिसून येते, की आपल्या पित्याच्या नावाचे गौरव करणे हाच येशूच्या जीवनातील सर्वात मुख्य उद्देश होता.
१०, ११. (क) येशूने कशा प्रकारे त्याच्या पित्याच्या नावाविषयी इतरांना सांगितले? (ख) येशूचे शिष्य यहोवाच्या नावाविषयी इतरांना का सांगतात?
१० येशूने प्रार्थनेत म्हटले: “जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रगट केले; ते तुझे होते आणि तू ते मला दिले; आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. यापुढे मी जगात नाही, पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, यासाठी की, जसे आपण एक आहो तसे त्यांनी एक व्हावे.”—योहा. १७:६, ११.
११ येशूने त्याच्या शिष्यांना पित्याच्या नावाबद्दल सांगितले तेव्हा त्याने केवळ यहोवा या नावाचा उच्चार केला नाही. तर, यहोवा कोण आहे हे समजण्यासदेखील त्याने त्यांना मदत केली. त्याने देवाच्या अद्भुत गुणांविषयी आणि देव आपल्यासोबत कशा प्रकारे व्यवहार करतो याविषयी सांगितले. (निर्ग. ३४:५-७) येशू आज स्वर्गात राजा या नात्याने कार्य करत आहे आणि आपल्या शिष्यांना सबंध पृथ्वीवर त्याच्या पित्याचे नाव कळवण्यासाठी मदत करत आहे. कोणत्या उद्देशाने? याच, की सध्याच्या दुष्ट जगाचा शेवट होण्याआधी अधिकाधिक लोकांनी यहोवाबद्दल शिकून घ्यावे. त्या येणाऱ्या नाशापासून यहोवा त्याच्या एकनिष्ठ साक्षीदारांची सुटका करण्यासाठी कारवाई करेल तेव्हा सर्व लोकांना त्याच्या महान नावाची ओळख होईल.—यहे. ३६:२३.
“असा विश्वास जगाने धरावा”
१२. प्रचार कार्यात यशस्वी व्हायचे असेल, तर आपण कोणत्या तीन गोष्टी करणे गरजेचे आहे?
१२ येशूने ज्या कार्याची सुरुवात केली होती ते कार्य पूर्ण करण्याची आज्ञा त्याने शिष्यांना दिली. त्याने अशी प्रार्थना केली: “जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले.” पण, हे कार्य करण्यासाठी त्यांना मदतीची गरज आहे याची जाणीव त्याला होती. पृथ्वीवर असताना त्याने शिष्यांना त्यांच्या उणिवांवर मात करण्यास बरीच मदत केली. यहोवाला प्रार्थना करताना येशूने आपल्या शिष्यांना तीन आवश्यक गोष्टी करण्यास मदत करावी अशी विनंती केली. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, त्याने प्रार्थना केली की त्याच्या शिष्यांनी सैतानाच्या अपवित्र जगाचा भाग असू नये. दुसरी गोष्ट म्हणजे, त्याच्या शिष्यांनी देवाच्या वचनातील सत्याचा अवलंब करावा आणि पवित्र असावे अशी त्याने प्रार्थना केली. तिसरी गोष्ट म्हणजे, येशूने कळकळीची विनंती केली की ज्या प्रकारे पित्यामध्ये व त्याच्यामध्ये प्रीतीचे बंधन आहे त्याच प्रकारचे बंधन शिष्यांमध्येदेखील असावे. आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला असे विचारले पाहिजे, ‘येशूने ज्या तीन विनंत्या केल्या होत्या त्यांच्या अनुषंगाने मी कार्य करत आहे का?’ येशूला भरवसा होता, की शिष्यांनी या गोष्टी केल्या, तर पुष्कळ लोक त्यांचा संदेश स्वीकारतील.—योहान १७:१५-२१ वाचा.
पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार वागण्याद्वारे ऐक्य टिकवून ठेवले (परिच्छेद १३ पाहा)
१३. इ.स. पहिल्या शतकात येशूच्या प्रार्थनेचे उत्तर कशा प्रकारे देण्यात आले?
१३ शुभवर्तमानाच्या चार पुस्तकांनंतर असलेले प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक आपण वाचतो तेव्हा आपल्याला दिसून येते, की यहोवाने येशूच्या प्रार्थनेचे उत्तर दिले. सुरुवातीच्या ख्रिश्चनांमध्ये यहुदी व विदेशी, श्रीमंत व गरीब, दास व मालक यांचा समावेश होता. त्यामुळे, त्यांच्यामध्ये फुटी पडण्याची किती जास्त शक्यता होती याचा विचार करा! तरीसुद्धा, त्या सर्वांमध्ये इतके ऐक्य होते, की त्यांची तुलना मानवी शरीराच्या विविध अवयवांशी करण्यात आली, ज्याचे मस्तक येशू होता. (इफिस. ४:१५, १६) फुटी असलेल्या सैतानाच्या जगात अशा प्रकारचे ऐक्य असणे खरोखरच एक चमत्कार होता! या सर्वाचे श्रेय केवळ यहोवाला जाते, कारण त्यानेच त्याच्या शक्तिशाली पवित्र आत्म्याद्वारे हे शक्य केले.—१ करिंथ. ३:५-७.
जगभरातील यहोवाच्या लोकांमध्ये ऐक्य आहे (परिच्छेद १४ पाहा)
१४. आपल्या काळात येशूच्या प्रार्थनेचे उत्तर कशा प्रकारे देण्यात आले आहे?
१४ दुःखाची गोष्ट म्हणजे, प्रेषितांच्या मृत्यूनंतर ही अद्भुत एकता जास्त काळ टिकली नाही. आधीच सांगितल्याप्रमाणे, मोठ्या धर्मत्यागाची सुरुवात झाली आणि परिणामस्वरूप ख्रिस्ती धर्मजगतातील अनेक पंथ अस्तित्वात आले. (प्रे. कृत्ये २०:२९, ३०) पण, १९१९ मध्ये येशूने त्याच्या अभिषिक्त अनुयायांना खोट्या धर्माच्या बंधनातून मुक्त केले आणि “पूर्णता” करणाऱ्या बंधनात एक केले. (कलस्सै. ३:१४) त्यांच्या प्रचार कार्याचा जगातील लोकांवर कोणता प्रभाव पडला? या कार्याच्या परिणामस्वरूप, “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे” दुसऱ्या मेंढरांपैकी असलेले सत्तर लाखांपेक्षा जास्त लोक अभिषिक्त जनांसोबत मिळून ऐक्याने यहोवाची सेवा करत आहेत. (योहा. १०:१६; प्रकटी. ७:९) यावरून दिसून येते, की यहोवाने येशूच्या प्रार्थनेचे अद्भुत रीत्या उत्तर दिले आहे. त्याने अशी प्रार्थना केली होती: “जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली.”—योहा. १७:२३.
प्रार्थनेचा हृदयस्पर्शी शेवट
१५. येशूने त्याच्या अभिषिक्त अनुयायांसाठी कोणती एक खास विनंती केली?
१५ निसान १४ च्या त्या संध्याकाळी, काही वेळाआधी येशूने त्याच्या शिष्यांसोबत एक करार करून त्यांचे गौरव केले. तो करार होता त्याच्या राज्यात त्याच्यासोबत राज्य करण्याचा. (लूक २२:२८-३०; योहा. १७:२२) म्हणून, जे सर्व येशूचे अभिषिक्त अनुयायी बनणार होते त्यांच्याविषयी त्याने आता अशी विनंती केली: “हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे; यासाठी की, जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे; कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली.” (योहा. १७:२४) अभिषिक्त ख्रिश्चनांना मिळणाऱ्या प्रतिफळामुळे येशूच्या दुसऱ्या मेंढरांना त्यांचा हेवा वाटत नाही; उलट त्यांना आनंदच होतो. आज सर्व खऱ्या ख्रिश्चनांमध्ये ऐक्य असल्याचा हा आणखी एक पुरावा आहे.
१६, १७. (क) येशूने त्याच्या प्रार्थनेच्या शेवटी काय करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला? (ख) आपण काय करण्याचा निर्धार केला पाहिजे?
१६ आज यहोवाला खऱ्या अर्थाने ओळखणारे व ऐक्याने राहणारे लोक जगात आहेत याकडे जगातील अनेक जण दुर्लक्ष करतात. ते सहसा त्यांच्या धर्मगुरूंच्या प्रभावाला बळी पडून असे करतात. येशूच्या दिवसांतही अशीच परिस्थिती होती. म्हणून येशूने त्याच्या प्रार्थनेचा शेवट पुढील शब्दांनी केला: “हे न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे. मी तुझे नाव त्यांस कळवले आहे आणि कळवीन; यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”—योहा. १७:२५, २६.
१७ येशूने त्याच्या प्रार्थनेच्या अनुषंगाने कार्य केले होते ही गोष्ट कोणी नाकारू शकतो का? मंडळीचे मस्तक असल्यामुळे, त्याच्या पित्याच्या नावाविषयी आणि उद्देशाविषयी लोकांना सांगण्यास तो आजही आपल्याला मदत करत आहे. तेव्हा, त्याच्या मस्तकपदाच्या अधीन राहून, प्रचार करण्याबद्दल व शिष्य बनवण्याबद्दल त्याने दिलेल्या आज्ञेचे आपण मनापासून पालन करू या. (मत्त. २८:१९, २०; प्रे. कृत्ये १०:४२) तसेच, आपल्यातील अनमोल ऐक्य टिकवून ठेवण्यासाठीही आपण प्रयत्नशील राहू या. या गोष्टी केल्यास, आपण येशूच्या प्रार्थनेच्या अनुषंगाने कार्य करत असू. त्यामुळे यहोवाच्या नावाचे गौरव होईल आणि आपण सदासर्वकाळ आनंदी राहू.