वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w13 १०/१५ पृ. २१-२५
  • एका अर्थभरीत प्रार्थनेतून शिकण्यासारखे धडे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एका अर्थभरीत प्रार्थनेतून शिकण्यासारखे धडे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • एक खास महिना
  • पातके कबूल करण्याचा दिवस
  • त्यांनी देवाच्या वैभवी नावाची स्तुती केली
  • यहोवाने आपल्या लोकांकरता केलेल्या अद्‌भुत गोष्टी
  • यहोवाने इस्राएली लोकांचे शासन केले
  • यहोवा माझा वाटा आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • आपल्या नावासारखेच जेरुसलेम
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
w13 १०/१५ पृ. २१-२५

एका अर्थभरीत प्रार्थनेतून शिकण्यासारखे धडे

“तुझे वैभवशाली नाम धन्य असो.”—नहे. ९:५.

तुमचे उत्तर काय असेल?

  • लेव्यांनी इस्राएली लोकांना एकत्र केले तेव्हा त्यांनी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या?

  • यहोवा त्याच्या नावानुसार वागला हे इतिहासातील कोणत्या उदाहरणावरून दिसून येते?

  • लेव्यांच्या प्रार्थनेवरून आपण कोणकोणते धडे शिकतो?

१. आपण कोणत्या सभेविषयी आणखी शिकून घेणार आहोत, आणि आपण कोणत्या प्रश्‍नांवर विचार केला पाहिजे?

“उठा, यहोवा आपला देव याची स्तुती सदासर्वकाल करत जा.” या हृदयस्पर्शी शब्दांत लेव्यांनी देवाच्या लोकांना यहोवाची प्रार्थना करण्याकरता एकत्र केले. बायबलमध्ये नमूद असलेली ही सर्वात मोठी प्रार्थना आहे. (नहे. ९:४, ५, पं.र.भा.) ही सभा इ.स.पू. ४५५ या वर्षी, यहुद्यांच्या कॅलेंडरमधील तिशरी या सातव्या महिन्यातील २४ व्या दिवशी आयोजित करण्यात आली होती. आता आपण या सभेविषयी आणखी जाणून घेऊ या; असे करत असताना पुढील प्रश्‍नांवर विचार करा: ‘कोणत्या चांगल्या सवयीमुळे ही सभा यशस्वी ठरली? लेव्यांनी केलेल्या त्या अर्थभरीत प्रार्थनेवरून आपण कोणकोणते धडे घेऊ शकतो?’ पण, सर्वप्रथम या खास दिवसाच्या आधी घडलेल्या काही घटनांविषयी पाहू या.—स्तो. १४१:२.

एक खास महिना

[२२ पानांवरील चित्र]

२. इस्राएली लोकांनी आपल्यासाठी कोणते सुंदर उदाहरण मांडले?

२ या खास सभेच्या एका महिन्याआधी यहुद्यांनी जेरूसलेमच्या भिंतींच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले होते. (नहे. ६:१५) त्यांनी हे काम अवघ्या ५२ दिवसांत पूर्ण केले होते. मग, पुढील महिन्याच्या म्हणजेच तिशरी या महिन्याच्या पहिल्या दिवशी ते सर्व एका सार्वजनिक चौकात एकत्र आले; आणि तेथे एज्रा व इतर लेव्यांनी लोकांना देवाचे नियमशास्त्र वाचून दाखवले व त्याचा अर्थ समजावून सांगितला. सबंध कुटुंबे, इतकेच काय तर लहान मुलेदेखील पहाटेपासून दुपारपर्यंत तेथे उभी राहून ऐकत होती. त्या इस्राएली लोकांनी आपल्याकरता किती सुंदर उदाहरण मांडले! आज आपण राज्य सभागृहात आरामशीर बसून सभांचा आनंद घेऊ शकतो. तरीसुद्धा, कधीकधी आपले लक्ष भरकटते आणि सभा सुरू असताना आपण इतर गोष्टींचा विचार करू लागतो. पण त्या इस्राएली लोकांनी लक्षपूर्वक ऐकले आणि ऐकलेल्या गोष्टींवर विचार केला. आतापर्यंत आपण देवाच्या नियमशास्त्राचे पालन करत नव्हतो हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा ते अक्षरशः रडू लागले.—नहे. ८:१-९.

[२२ पानांवरील चित्र]

३. इस्राएली लोकांनी कोणत्या आज्ञेचे पालन केले?

३ पण ही काही पापांची कबुली देण्याची वेळ नव्हती. तो सणाचा दिवस होता आणि यहोवाची इच्छा होती की त्याच्या लोकांनी आनंदी असावे. (गण. २९:१) त्यामुळे नहेम्याने लोकांना असे सांगितले: “जा, मिष्टान्‍नाचे सेवन करा; गोडगोड पेये प्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांस वाढून पाठवा; कारण आजचा दिवस परमेश्‍वराप्रीत्यर्थ पवित्र आहे; तुम्ही उदास राहू नका; कारण परमेश्‍वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय.” आनंदाची गोष्ट म्हणजे लोकांनी या आज्ञेचे पालन केले आणि त्यामुळे त्या दिवशी “मोठा उत्सव” साजरा झाला.—नहे. ८:१०-१२.

४. इस्राएली कुटुंबप्रमुखांनी काय केले, आणि या मंडपांच्या सणादरम्यान लेव्यांनी दररोज काय केले?

४ दुसऱ्‍याच दिवशी सर्व कुटुंबप्रमुख एकत्र आले आणि राष्ट्र या नात्याने आपल्याला देवाच्या नियमशास्त्राचे आणखी चांगल्या प्रकारे पालन कसे करता येईल याविषयी त्यांनी विचार केला. शास्त्रवचनांचे परीक्षण करत असताना त्यांच्या लक्षात आले की तिशरी महिन्याच्या १५ व्या दिवसापासून २२ व्या दिवसापर्यंत मंडपांचा सण विधिपूर्वक साजरा केला पाहिजे. त्यामुळे, ते हा सण साजरा करण्याच्या तयारीला लागले. परिणामस्वरूप, तो सण अतिशय यशस्वी रीत्या साजरा करण्यात आला; यहोशवाच्या दिवसांपासून असे घडले नव्हते. “चोहोकडे आनंदच आनंद झाला.” सणाच्या प्रत्येक दिवशी लेव्यांनी देवाचे नियमशास्त्र लोकांना वाचून दाखवले.—नहे. ८:१३-१८.

[२२ पानांवरील चित्र]

पातके कबूल करण्याचा दिवस

५. लेव्यांनी प्रार्थनेला सुरुवात करण्याअगोदर देवाच्या लोकांनी काय केले?

५ सणाच्या दोन दिवसांनंतर म्हणजे तिशरी महिन्याच्या २४ व्या दिवशी लोकांनी आपल्या पापांची कबुली देण्याची योग्य वेळ आली होती. हा खाण्यापिण्याचा व उत्सव साजरा करण्याचा दिवस नव्हता. उलट त्या दिवशी देवाच्या लोकांनी उपास केला आणि आपला पश्‍चात्ताप व्यक्‍त करण्यासाठी गोणताट (तागाचे जाडेभरडे कापड) पांघरले. पुन्हा एकदा लेव्यांनी सकाळी सुमारे तीन तासांपर्यंत लोकांना देवाचे नियमशास्त्र वाचून दाखवले. दुपारी लोकांनी “आपली पातके कबूल [केली] आणि आपला देव परमेश्‍वर याची उपासना [केली].” त्यानंतर लेव्यांनी लोकांच्या वतीने सुरुवातीला उल्लेख केलेली अर्थभरीत प्रार्थना यहोवाला केली. —नहे. ९:१-४.

[२३ पानांवरील चित्र]

६. लेव्यांना इतकी अर्थभरीत प्रार्थना करणे कशामुळे शक्य झाले, आणि त्या लेव्यांकडून आपण काय शिकू शकतो?

६ लेवी नियमितपणे देवाचे नियमशास्त्र वाचायचे. यामुळेच त्यांना यहोवाला ही अर्थभरीत प्रार्थना करणे शक्य झाले. पहिल्या दहा वचनांत केवळ यहोवाच्या कार्यांची व गुणांची स्तुती केलेली आहे. प्रार्थनेच्या उर्वरित भागात देवाच्या दयेविषयी वारंवार उल्लेख करण्यात आला आहे. तसेच, इस्राएली लोक देवाच्या या दयेस पात्र नव्हते हेदेखील स्पष्टपणे कबूल करण्यात आले आहे. (नहे. ९:१९, २७, २८, ३१) आपण त्या लेव्यांकडून काय शिकू शकतो? त्यांच्याप्रमाणेच आपणदेखील दररोज देवाच्या वचनाचे वाचन आणि त्यावर मनन केले पाहिजे. असे केल्याने आपण जणू यहोवाला आपल्याशी बोलू देत असतो. आणि मग जेव्हा आपण त्याला प्रार्थना करू तेव्हा प्रार्थनेत उल्लेख करण्यासाठी योग्य विषय आपल्याला सुचतील आणि आपल्या प्रार्थना अधिक अर्थपूर्ण बनतील.—स्तो. १:१, २.

७. लेव्यांनी देवाला कोणती विनंती केली आणि यावरून आपण कोणता धडा घेऊ शकतो?

७ लेव्यांनी त्यांच्या प्रार्थनेत केवळ एक साधीशी विनंती यहोवाला केली. प्रार्थनेच्या शेवटास त्यांनी असे म्हटले: “तर आता हे आमच्या देवा, हे थोर, पराक्रमी व भयावह देवा, आपला करार व दया कायम राखणाऱ्‍या देवा, अश्‍शुरी राजाच्या काळापासून आजपर्यंत आम्हास, आमच्या राजांस, आमच्या अधिपतींस, आमच्या याजकांस, आमच्या सदेष्ट्यांस, आमच्या वाडवडिलांस आणि तुझ्या सर्व लोकांस जे कष्ट झाले आहेत ते क्षुल्लक लेखू नको.” या बाबतीतही लेव्यांनी आपल्याकरता एक सुरेख उदाहरण मांडले. यहोवाकडे कोणतीही विनंती करण्याआधी आपण त्याची स्तुती करण्यास व त्याचे आभार मानण्यास कधीही विसरू नये.

त्यांनी देवाच्या वैभवी नावाची स्तुती केली

८, ९. (क) लेव्यांनी कशा प्रकारे त्यांच्या प्रार्थनेची नम्रपणे सुरुवात केली? (ख) लेव्यांनी आकाशातील कोणत्या दोन सैन्यांचा उल्लेख केला?

८ लेवी अतिशय नम्र होते. त्यांनी विचारपूर्वक शब्द निवडून ही अर्थपूर्ण प्रार्थना केली होती. तरीसुद्धा, यहोवा ज्या स्तुतीस पात्र आहे ती स्तुती आपल्या शब्दांतून कधीही व्यक्‍त होऊ शकत नाही अशी त्यांची भावना होती. म्हणूनच, देवाच्या लोकांच्या वतीने प्रार्थना करण्यास सुरुवात करण्याआधी त्यांनी नम्रपणे असे म्हटले: “तुझे वैभवशाली नाम धन्य असो; ते सर्व धन्यवाद व स्तवन यांपलीकडे आहे.”—नहे. ९:५.

९ “तू, तूच मात्र यहोवा आहेस, तू आकाशे, आकाशांची आकाशे त्यांच्या सर्व सैन्यासुद्धा निर्माण केली आहेस, पृथ्वी व ज्या सर्व वस्तू तिच्यावर आहेत त्या, समुद्र व त्यातले सर्व काही तू केले, व ती सर्व तू वाचवतोस व आकाशांचे सैन्य तुला नमन करते.” (नहे. ९:६, पं.र.भा.) यहोवा देवाने सबंध विश्‍व निर्माण केले, ज्यात आकाश व त्याचे सैन्य म्हणजेच त्यातील असंख्य तारे व आकाशगंगा यांचा समावेश होतो. तसेच, त्याने आपला सुंदर पृथ्वी ग्रह, त्यावरील सर्व वस्तू, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले. शिवाय, सर्व सजीव प्राण्यांना त्यांच्या जातीप्रमाणे प्रजोत्पादन करत राहणे शक्य केले. लेव्यांनी त्यांच्या प्रार्थनेत आकाशातील आणखी एका सैन्याचा उल्लेख केला व हे सैन्य यहोवाला नमन करते असे त्यांनी म्हटले. हे सैन्य स्वर्गातील देवदूतांना सूचित करते. (१ राजे २२:१९; ईयो. ३८:४, ७) देवदूत नम्रपणे देवाच्या इच्छेप्रमाणे वागून मानवांची सेवा करतात. (इब्री १:१४) आज आपणदेखील एका प्रशिक्षित सैन्याप्रमाणे यहोवाची ऐक्याने उपासना करत आहोत. तेव्हा आपणही नम्रपणे देवाची सेवा करण्याद्वारे देवदूतांचे अनुकरण केले पाहिजे.—१ करिंथ. १४:३३, ४०.

१०. देवाने अब्राहामासोबत ज्या प्रकारे व्यवहार केला त्यावरून आपण काय शिकू शकतो?

१० यानंतर, अब्रामाशी देवाने कसा व्यवहार केला याविषयी लेव्यांनी त्यांच्या प्रार्थनेत उल्लेख केला. अब्राम ९९ वर्षांचा होता आणि अजूनही त्याला मूलबाळ नव्हते. तरीसुद्धा यहोवाने त्याचे नाव बदलून अब्राहाम ठेवले, ज्याचा अर्थ “राष्ट्रसमूहाचा जनक” असा होतो. (उत्प. १७:१-६, १५, १६) तसेच, देवाने अब्राहामाला वचन दिले की त्याचे वंशज कनान देशाचे वतन पावतील. मानव सहसा दिलेले वचन विसरून जातात, पण यहोवा कधीही त्याचे वचन विसरत नाही. त्याने कशा प्रकारे त्याचे वचन पूर्ण केले याविषयी लेव्यांनी प्रार्थनेत पुढे सांगितले: “हे परमेश्‍वरा, [“यहोवा,” NW] तूच देव आहेस; तू अब्रामास निवडून घेऊन खास्द्यांच्या ऊर गावातून बाहेर आणले व त्यास अब्राहाम हे नाव दिले. आणि त्याचे अंतःकरण तुझ्यासंबंधाने एकनिष्ठ आहे असे पाहून तू त्याच्याशी करार केला की मी तुझ्या वंशास कनानी . . . यांचा देश देईन; तू हे आपले वचन पुरे केले आहे, कारण तू न्यायी आहेस.” (नहे. ९:७, ८) आपणही आपल्या न्यायी देवाचे अनुकरण करून दिलेले वचन पाळण्याचा नेहमी प्रयत्न करू या.—मत्त. ५:३७.

यहोवाने आपल्या लोकांकरता केलेल्या अद्‌भुत गोष्टी

११, १२. यहोवाच्या नावाचा काय अर्थ होतो, आणि यहोवा त्याच्या लोकांशी व्यवहार करताना कशा प्रकारे आपल्या नावानुसार वागला?

११ यहोवाच्या नावाचा अर्थ “तो व्हायला लावतो” असा आहे. यावरून असे सूचित होते की यहोवा त्याची वचने पूर्ण करण्यासाठी प्रगतिशील पावले उचलतो. याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे इजिप्तच्या गुलामगिरीत असलेल्या अब्राहामाच्या वंशजांशी देवाने केलेला व्यवहार. हे राष्ट्र कधी मुक्‍त होईल आणि वचन दिलेल्या देशात वस्ती करेल हे त्या वेळी अगदीच अशक्य वाटत होते. पण, देवाने प्रगतिशील पावले उचलून त्याचे वचन पूर्ण केले. अशा रीतीने यहोवा आपल्या महान नावानुसार वागला.

१२ यहोवा देवाविषयी लेव्यांनी प्रार्थनेत असे म्हटले: “तू मिसर देशात आमच्या पूर्वजांचे कष्ट पाहिले व तांबड्या समुद्राच्या तीरी त्यांचा धावा ऐकला; फारो, त्याचे सेवक, त्याच्या देशचे सर्व लोक यांस चिन्हे व अद्‌भुत कृत्ये तू दाखवली; कारण ते त्यांजशी गर्वाने वागत होते हे तुला ठाऊक होते; तू आपल्या नामाचा महिमा प्रगट केला; तो आजवर आहे. तू त्यांच्यासमोरून समुद्र दुभंग केला, असा की ते समुद्रामधून कोरड्या जमिनीवरून चालून गेले; धोंडा महाजलाशयात टाकावा त्याप्रमाणे तू त्यांचा पाठलाग करणाऱ्‍यांस समुद्रतळी फेकले.” यहोवा देवाने आपल्या लोकांकरता आणखी काय केले याविषयी प्रार्थनेत पुढे असे म्हटले आहे: “तू त्यांच्यादेखत देशातले रहिवासी कनानी यांस पादाक्रांत केले; . . . त्यांनी तटबंदीची नगरे व सुपीक भूमी काबीज केली, आणि उत्तमोत्तम वस्तूंनी भरलेली घरे, खोदलेले हौद, द्राक्षांचे मळे, जैतुनाचे मळे व विपुल फळझाडे यांचा ताबा घेतला; ते खाऊन तृप्त झाले, धष्टपुष्ट झाले आणि तुझ्या अतिशयित चांगुलपणामुळे सुख पावले.”—नहे. ९:९-११, २४, २५.

१३. इस्राएली लोकांनी इजिप्त सोडल्यानंतर यहोवाने त्यांच्याकरता काय केले, पण त्यांनी कसा प्रतिसाद दिला?

१३ देवाने त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी आणखीही बरीच प्रगतिशील पावले उचलली. उदाहरणार्थ, इस्राएल राष्ट्र इजिप्तमधून बाहेर निघाल्यावर यहोवाने त्यांना नियम दिले आणि उपासना कशी करावी हे त्यांना शिकवले. लेव्यांनी त्यांच्या प्रार्थनेत म्हटले, “तू सीनाय पर्वतावर उतरून त्यांशी स्वर्गांतून बोललास आणि त्यांस योग्य निर्णय, खरे कायदे, चांगले नियम व आज्ञा लावून दिल्या.” (नहे. ९:१३) यहोवाने इस्राएली लोकांना आपले लोक होण्याकरता निवडून घेतले होते आणि तो त्यांना वचन दिलेला देश देणार होता. त्यामुळे, यहोवाच्या नावाला शोभेल असे त्यांनी वागावे म्हणून त्याने त्यांना मार्गदर्शन व आज्ञा दिल्या. पण इस्राएल लोकांनी यहोवाच्या आज्ञांचे पालन केले नाही.—नहेम्या ९:१६-१८ वाचा.

यहोवाने इस्राएली लोकांचे शासन केले

१४, १५. (क) यहोवाने इस्राएली लोकांना कशा प्रकारे दया दाखवली? (ख) देवाने इस्राएली लोकांशी ज्या प्रकारे व्यवहार केला त्यावरून आपण काय शिकतो?

१४ सीनाय पर्वताजवळ देवाच्या नियमशास्त्राचे पालन करण्याचे वचन दिल्यानंतर थोड्याच काळात इस्राएली लोकांनी कोणती दोन पापे केली याविषयी लेव्यांच्या प्रार्थनेत सांगितले आहे. त्या पापांमुळे, खरेतर यहोवाने त्या लोकांना सोडून दिले असते व अरण्यात मरू दिले असते तरी ते चुकीचे ठरले नसते. पण यहोवाने त्यांना दया दाखवली आणि त्यांच्या गरजा तो पूर्ण करत राहिला. लेव्यांनी प्रार्थनेत यहोवाची अशा प्रकारे स्तुती केली: “तू अती दयाळू असल्याकारणाने त्यांस तू रानात सोडून दिले नाही; . . . चाळीस वर्षे जंगलात तू त्यांचे असे पालनपोषण केले की त्यांस कशाचीही वाण पडली नाही; त्यांची वस्त्रे जीर्ण झाली नाहीत; त्यांच्या पायांस सूज आली नाही.” (नहे. ९:१९, २१) आज, यहोवा आपल्याही गरजा प्रेमळपणे पूर्ण करतो, जेणेकरून आपल्याला त्याची विश्‍वासूपणे सेवा करता येईल. त्यामुळे आपण कधीही त्या हजारो इस्राएली लोकांप्रमाणे बनू नये ज्यांनी यहोवाप्रती अविश्‍वास दाखवून त्याच्या आज्ञांचे उल्लंघन केले आणि जे अरण्यातच मरण पावले. त्यांच्या वाईट उदाहरणावरून आपल्याला धोक्याचा इशारा मिळतो.—१ करिंथ. १०:१-११.

१५ दुःखाची गोष्ट म्हणजे वचन दिलेल्या देशात प्रवेश केल्यानंतर इस्राएली लोक यहोवाला विश्‍वासू राहिले नाहीत. त्यांनी कनानी देवतांची उपासना करण्यास सुरुवात केली. या उपासनेत अनैतिक गोष्टी केल्या जायच्या आणि लहान मुलांचा बळी दिला जायचा. त्यामुळे यहोवाने इतर राष्ट्रांना इस्राएल राष्ट्रावर अत्याचार करू दिले. पण जेव्हा इस्राएली लोकांनी पश्‍चात्ताप केला तेव्हा यहोवाने त्यांना क्षमा केली आणि त्यांच्या शत्रूंपासून त्यांचे संरक्षण केले. हे “अनेक वेळा” घडले. (नहेम्या ९:२६-२८, ३१ वाचा.) लेव्यांनी कबूल केले: “तू पुष्कळ वर्षे त्यांची गय केली व आपल्या आत्म्याने संदेष्ट्यांच्या द्वारे त्यांस बजावीत आलास; पण त्यांनी कान दिला नाही म्हणून तू त्यांस अनेक देशातील लोकांच्या हाती दिले.”—नहे. ९:३०.

१६, १७. (क) बंदिवासातून परतल्यानंतर इस्राएली लोकांच्या परिस्थितीत कोणता फरक घडून आला होता? (ख) इस्राएली लोकांनी काय कबूल केले, आणि त्यांनी काय करण्याची शपथ घेतली?

१६ बंदिवासातून सुटून परत आल्यानंतरही इस्राएली लोकांनी पुन्हा यहोवाच्या आज्ञांचे उल्लंघन करण्यास सुरुवात केली. पण या वेळी कोणता फरक होता? लेव्यांनी प्रार्थनेत पुढे म्हटले: “पाहा, आज आम्ही दास बनलो आहो; आमच्या पूर्वजांनी उत्तम उत्पन्‍न उपभोगावे म्हणून जो देश तू त्यांस दिला त्यात आम्ही केवळ दास आहो. आमच्या पापांमुळे जे राजे तू आम्हावर नेमले आहेत त्यांस या देशाचे पुष्कळ उत्पन्‍न मिळत आहे; . . . आम्ही फार फार संकटात आहो.”—नहे. ९:३६, ३७.

१७ देवाने त्याच्या लोकांवर हे दुःख येऊ दिले त्याअर्थी देव अन्यायी होता असे लेव्यांना सुचवायचे होते का? मुळीच नाही! त्यांनी उलट असे कबूल केले, “आम्हावर जे काही गुदरले आहे त्याच्या बाबतीत तू न्यायशील आहेस; तू आमच्याशी सत्यतेने वागलास पण आम्ही दुष्टाई केली आहे.” (नहे. ९:३३) यापुढे इस्राएल राष्ट्र देवाच्या नियमशास्त्राचे विश्‍वासूपणे पालन करेल, अशी शपथ वाहून लेव्यांनी निःस्वार्थ भावना व्यक्‍त करणाऱ्‍या या प्रार्थनेचा शेवट केला. (नहेम्या ९:३८ वाचा; १०:२९) त्यांनी या शपथेची लेखी प्रत तयार केली आणि त्यावर ८४ यहुदी नेत्यांची मोहर लावण्यात आली.—नहे. १०:१-२७.

१८, १९. (क) देवाच्या नव्या जगात जायचे असल्यास आपण काय केले पाहिजे? (ख) आपण कशासाठी प्रार्थना करत राहिली पाहिजे, आणि का?

१८ देवाच्या नीतिमान नव्या जगात जाण्यास योग्य ठरण्यासाठी आपणही यहोवाकडून होणारे शासन स्वीकारले पाहिजे. प्रेषित पौलाने विचारले, “ज्याला बाप शिक्षा करत नाही असा कोण पुत्र आहे?” (इब्री १२:७) आपण देवाची सेवा विश्‍वासूपणे व धीराने करत राहतो आणि त्याच्या आत्म्याला आपल्या व्यक्‍तिमत्त्वात सुधारणा करू देतो तेव्हा आपण दाखवतो की आपण आपल्या जीवनात देवाचे मार्गदर्शन स्वीकारले आहे. आपल्या हातून गंभीर पाप जरी घडले, तरी आपण मनापासून पश्‍चात्ताप केला आणि जे काही शासन केले जाते ते नम्रपणे स्वीकारले तर यहोवा आपल्याला क्षमा करेल याची आपण खातरी बाळगू शकतो.

१९ इस्राएली लोकांची इजिप्तमधून सुटका करताना यहोवाने ज्या अद्‌भुत गोष्टी केल्या होत्या त्याहीपेक्षा आश्‍चर्यकारक घटना तो लवकरच घडवून आणणार आहे. तेव्हा सर्वांना हे कळेल की यहोवा किती महान देव आहे. (यहे. ३८:२३) इस्राएली लोकांना वचन दिलेल्या देशात नेण्याची प्रतिज्ञा ज्याप्रमाणे यहोवाने पूर्ण केली, त्याचप्रमाणे जे ख्रिस्ती यहोवाची विश्‍वासूपणे उपासना करतील व शेवटपर्यंत टिकून राहतील ते देवाच्या नीतिमान नव्या जगात जीवन उपभोगतील. (२ पेत्र ३:१३) आपल्यापुढे इतके अद्‌भुत भवितव्य असल्यामुळे आपण देवाचे वैभवी नाव पवित्र केले जावे अशी प्रार्थना करत राहू या. सध्याच्या काळात आणि सर्वकाळ देवाचे आशीर्वाद उपभोगण्यासाठी काय करणे गरजेचे आहे हे दाखवणाऱ्‍या आणखी एका प्रार्थनेची आपण पुढील लेखात चर्चा करू या.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा