देवाच्या जवळ या
न्यायप्रिय देव इब्री
तुम्हाला कधी कोणी फसवले आहे का किंवा तुमच्याशी कोणी खूप अमानूषपणे वागले आहे का? आणि तुम्हाला फसवणाऱ्या या व्यक्तीला शिक्षा होत नाही किंवा तिला तुमच्याशी इतक्या वाईटपणे वागल्याचा जराही पस्तावा होत नाही, असा कधी तुम्हाला अनुभव आला आहे का? बाकीच्या गोष्टी आपण कदाचित सहन करू, पण आपल्यावर जेव्हा कोणी अन्याय करतो आणि तेही अशी व्यक्ती जिने आपल्यावर प्रेम केले पाहिजे, आपली काळजी केली पाहिजे तेव्हा मात्र आपल्याला हे दुःख असहनीय होते. त्यावेळेला, ‘देव अशा गोष्टी का होऊ देतो?’ असा प्रश्न तेव्हा आपल्या मनात आला असेल.a पण खरे तर यहोवा देवाला सर्व प्रकारच्या अन्यायाचा वीट आहे. त्याचे वचन बायबल आपल्याला असे आश्वासन देते, की उजळ माथ्याने पाप करणारे लोक, देवाच्या सूडाच्या दिवशी कुठेही पळू शकणार नाहीत. प्रेषित पौलाने इब्री लोकांस १०:२६-३१ मध्ये काय म्हटले त्यावर आपण जरा विचार करूया.
पौलाने लिहिले: “सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धिपुरस्सर पाप केले तर पापाबद्दल ह्यापुढे यज्ञ व्हावयाचा राहिला नाही.” (वचन २६) मुद्दामहून पाप करणारे तर देवासमोर आणखीनच दोषी आहेत. का? पहिले कारण, अपरिपूर्णतेमुळे जसे आपल्या सर्वांच्या हातून एखाद वेळी चूक घडते तशी चूक किंवा पाप हे लोक करत नाहीत. तर पाप करण्याची त्यांना सवयच झालेली असते. दुसरे कारण, त्यांनी ही पातके जाणूनबुजून केलेली असतात. पाप करण्याची सवय असल्यामुळे दुष्टपणा त्यांच्या रगारगात भरलेला असतो. तिसरे कारण, हे लोक अज्ञानामुळे पाप करत नाहीत; तर देवाची इच्छा आणि त्याचे मार्ग यांबद्दलच्या ‘सत्याचे ज्ञान मिळाल्यावरही’ ते पाप करतात.
अशा अपश्चात्तापी व द्वेषभावना बाळगणाऱ्या पातक्यांबद्दल देवाचा काय दृष्टिकोन आहे? पौल म्हणतो: त्यांच्या “पापाबद्दल ह्यापुढे यज्ञ व्हावयाचा राहिला नाही.” ख्रिस्ताचे बलिदान हे देवाने मानवजातीला दिलेली मौल्यवान देणगी आहे. अपरिपूर्णतेमुळे आपल्या हातून घडणाऱ्या पापांवर हे बलिदान पांघरूण घालते. (१ योहान २:१, २) पण पश्चात्तापाविना जे पाप करत राहतात ते आपल्या कृतीतून दाखवतात, की त्यांना देवाने दिलेल्या या मौल्यवान देणगीची किंमत नाही. देवाच्या नजरेत या अशा लोकांनी, ‘देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले आहे व येशूचे रक्त अपवित्र मानले आहे.’ (वचन २९) आपल्या कार्यांद्वारे ते येशूचा अनादर करतात व त्याने वाहिलेल्या रक्ताला ते कोणत्याही अपरिपूर्ण माणसाच्या रक्तापेक्षा जास्त किंमत नसल्याप्रमाणे “कुचकामी” लेखतात. (मराठी कॉमन लँग्वेज) अशा कृतघ्न लोकांना ख्रिस्ताच्या बलिदानाचे फायदे मुळीच मिळणार नाहीत.
मग काय मिळेल? ज्याला न्याय प्रिय आहे त्या देवाने असे वचन दिले आहे: “सूड घेणे मजकडे आहे, मी फेड करीन.” (वचन ३०) इतरांचा गैरफायदा घेऊन त्यांची हानी करणाऱ्या पातक्यांना एक इशारा आहे: देवाच्या नियमशास्त्राचे मुद्दामहून उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा मिळेलच. ही काळ्या दगडावरची रेष आहे. बहुतेकदा असे होते, की जे इतरांसाठी खड्डा खोदतात ते स्वतःच त्यात पडतात. (गलतीकर ६:७) आणि, आता जरी ते सुटत असले तरीपण, भविष्यात जेव्हा देव पृथ्वीवरून सर्व अन्याय नाहीसा करेल तेव्हा मात्र त्यांना पळता भुई थोडी होईल. (नीतिसूत्रे २:२१, २२) पौल अशी ताकीद देतो: “जिवंत देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे.”—वचन ३१.
तेव्हा, जाणूनबुजून पाप करणाऱ्यांना यहोवा देव खपवून घेत नाही हे माहीत होणे, खासकरून अशा लोकांकरता किती सांत्वनदायक व दिलासा देणारे आहे ज्यांना एखाद्या अट्टल गुन्हेगाराने फसवले आहे. अशावेळी, सूड घेण्याचे काम आपण पूर्ण भरवशाने, ज्याला न्याय प्रिय आहे त्या देवाच्या हाती सोडू या. (w०८ ११/१)
[तळटीप]
a देव दुःख काढून का टाकत नाही या विषयावर, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाच्या पृष्ठे १०६-११४ वर करण्यात आलेली चर्चा पाहा.