वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w06 ११/१ पृ. १२-१५
  • देवाच्या व मानवांच्या दृष्टीने आदरणीय लग्नसमारंभ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाच्या व मानवांच्या दृष्टीने आदरणीय लग्नसमारंभ
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आदरणीय विवाह—कायदेशीर विवाह
  • पारंपरिक व नोंदणी विवाह
  • विवाहाची आदरणीयता टिकवून ठेवा
  • विवाह सोहळ्याचा आनंद आणि प्रतिष्ठा द्विगुणीत करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • यहोवाचा आदर होईल अशा प्रकारे लग्नाची तयारी करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • यहोवाला सन्मानित करणारे विवाह
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • यहोवाच्या नावाला गौरव आणणारे आनंदी विवाहसोहळे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
w06 ११/१ पृ. १२-१५

देवाच्या व मानवांच्या दृष्टीने आदरणीय लग्नसमारंभ

“काना येथे एक लग्न होते . . . येशूला व त्याच्या शिष्यांनाहि लग्नाचे आमंत्रण होते.”—योहान २:१, २.

१. येशूने काना येथील एका लग्नसमारंभात जे केले त्याविषयीच्या अहवालातून काय दिसून येते?

देवाच्या लोकांमध्ये एक आदरणीय लग्नसमारंभ किती आनंददायक असू शकतो याची येशूला, त्याच्या आईला व त्याच्या काही शिष्यांना चांगली कल्पना होती. ख्रिस्ताने तर त्याचा पहिला लिखित चमत्कार एका लग्नातच केला होता. या चमत्कारामुळे तेथे उपस्थित असलेल्या लोकांचा आनंद तर द्विगुणीत झालाच पण तो लग्नसमारंभही अविस्मरणीय ठरला. (योहान २:१-११) विवाहित होऊन यहोवाची आनंदाने सेवा करू इच्छिणाऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या लग्न समारंभांना कदाचित तुम्ही उपस्थित राहिला असाल. आपलाही विवाह असाच आनंददायक ठरावा अशी तुमचीही इच्छा असेल. किंवा तुम्ही एखाद्या मित्राला त्याच्या लग्नसमारंभाचे आयोजन करण्यास मदत करत असाल. हे समारंभ आदरणीय व आनंददायक ठरावेत म्हणून काय केले जाऊ शकते?

२. लग्नसमारंभांविषयी बायबलमध्ये कोणती माहिती सापडते?

२ यहोवाच्या साक्षीदारांचा हा अनुभव आहे की एक स्त्री व पुरुष जेव्हा लग्न करायचे ठरवतात, तेव्हा देवाच्या प्रेरित वचनातील सल्ला अतिशय उपयुक्‍त ठरतो. (२ तीमथ्य ३:१६, १७) अर्थात, ख्रिस्ती लग्नसमारंभ कसा असावा त्याची नेमकी रूपरेषा बायबलमध्ये दिलेली नाही. आणि हे समजण्याजोगे आहे, कारण निरनिराळ्या कालखंडांत, व निरनिराळ्या ठिकाणी लग्नासंबंधीचे रितीरिवाज आणि कायदे देखील वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ, प्राचीन इस्राएलात लग्नाचा औपचारिक समारंभ होत नसे. लग्नाच्या दिवशी नवरा मुलगा आपल्या वधूला स्वतःच्या किंवा वडिलांच्या घरी आणत असे. (उत्पत्ति २४:६७; यशया ६१:१०; मत्तय १:२४) या जाहीर कृतीलाच लग्नाचा दर्जा दिला जात असे; आजच्या लग्नसमारंभात होतात त्याप्रकारचे कोणतेही विधी त्याकाळी होत नसत.

३. काना येथे येशूने कोणत्या सोहळ्यात सहभाग घेतला?

३ नवरीला घरी घेऊन येण्याची ती कृती म्हणजेच लग्न समजले जायचे. त्यानंतर, योहान २:१ यात वर्णन केल्याप्रमाणे काहीजण मेजवानी करत असत. बऱ्‍याच भाषांतरांत त्या वचनाचा, “काना येथे एक लग्न होते,” असाच अनुवाद करण्यात आला आहे. पण मूळ भाषेतल्या शब्दाचे अचूक भाषांतर “लग्नाची मेजवानी” अथवा “लग्नसमारंभाचे जेवण”a असे आहे. (मत्तय २२:२-१०; २५:१०; लूक १४:८) या अहवालावरून स्पष्ट होते की येशू एका यहुदी लग्नाच्या मेजवानीला उपस्थित राहिला होता व त्याने त्या सोहळ्यात सहभागही घेतला. पण एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्याकाळात ज्याला लग्न समजले जात असे ते आजच्या काळातल्या लग्नाच्या विधीपेक्षा वेगळे होते.

४. काही ख्रिस्ती कशापद्धतीने लग्न करायचे ठरवतात?

४ आज बऱ्‍याच देशांत, ज्या ख्रिश्‍चनांना लग्न करण्याची इच्छा आहे त्यांना काही कायदेशीर अटी पूर्ण कराव्या लागतात. या अटी पूर्ण केल्यानंतर ते कोणत्याही कायदेशीर पद्धतीने लग्न करण्यास मोकळे असतात. उदाहरणार्थ, सरकारद्वारे अधिकृत असलेल्या एखाद्या न्यायाधीशाच्या, नगराध्यक्षकाच्या अथवा धार्मिक सेवकाच्या साक्षीने लग्नाचा साधासा विधी करू शकतात. काहीजण अशा पद्धतीने लग्न करायचे ठरवतात. इच्छा असल्यास, ते या महत्त्वाच्या प्रसंगी उपस्थित राहून त्यांच्या आनंदात सहभागी होण्याकरता आपल्या कुटुंबीयांना व जवळच्या काही मित्रांना आमंत्रित करू शकतात. (यिर्मया ३३:११; योहान ३:२९) दुसरीकडे पाहता, मोठ्या मेजवानी किंवा स्वागतसमारंभाकरता बरेच पूर्वनियोजन व खर्च लागत असल्यामुळे इतर ख्रिस्ती अशाप्रकारचा समारंभ न करण्याचे ठरवतील. त्याऐवजी ते फक्‍त जवळच्या काही लोकांना बोलवून लहानसा व साधासा समारंभ करतील. या बाबतीत आपली वैयक्‍तिक पसंत काहीही असो, आपण हे आठवणीत ठेवले पाहिजे की इतर प्रौढ ख्रिस्ती बांधवांचा आपल्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन असू शकतो.—रोमकर १४:३, ४.

५. बरेच ख्रिस्ती आपल्या लग्नाच्या प्रसंगी बायबल आधारित भाषण दिले जाण्याची व्यवस्था का करतात आणि या भाषणात कोणती माहिती सादर केली जाते?

५ बहुतेक ख्रिस्ती जोडपी आपल्या लग्नाच्या प्रसंगी बायबलवर आधारित भाषण दिले जाण्याची व्यवस्था करतात.b त्यांना जाणीव आहे की विवाहांचा जनक यहोवा असून यशस्वी व आनंददायक वैवाहिक जीवनाकरता तो आपल्या वचनात उपयुक्‍त मार्गदर्शन पुरवतो. (उत्पत्ति २:२२-२४; मार्क १०:६-९; इफिसकर ५:२२-३३) आणि बहुतेक जोडपी आपल्या लग्नाच्या आनंदी प्रसंगात ख्रिस्ती मित्रांना व नातेवाईकांना सहभागी करू इच्छितात. पण लग्नाशी संबंधित ज्या निरनिराळ्या कायदेशीर अटी आहेत त्यांविषयी व स्थानिक रितीरिवाजांविषयी आपण कसा दृष्टिकोन बाळगावा? या लेखात निरनिराळ्या प्रदेशांतील परिस्थितीचा विचार केला जाईल. यातील काही प्रथा कदाचित तुमच्या माहितीतल्या किंवा तुमच्या क्षेत्रात प्रचलित असलेल्या प्रथांपेक्षा अगदीच वेगळ्या असतील. तरीपण, देवाच्या सेवकांकरता महत्त्वाच्या असणाऱ्‍या काही तत्त्वांची किंवा मुद्दयांची तुम्ही यांतून नोंद घेऊ शकता.

आदरणीय विवाह—कायदेशीर विवाह

६, ७. विवाहासंबंधी असलेल्या कायदेशीर गोष्टींविषयी आपण दक्ष का असावे आणि हे आपण कसे दाखवू शकतो?

६ विवाह व्यवस्थेची सुरुवात करणारा स्वतः यहोवा असला तरीसुद्धा, विवाहित होऊ इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तींच्या कृतींवर काही अंशी मानवी सरकारांचेही नियंत्रण असते. हे योग्यच आहे. येशूने म्हटले होते: “कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या.” (मार्क १२:१७) त्याचप्रकारे, प्रेषित पौलाने असे मार्गदर्शन केले होते: “प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन असावे; कारण देवापासून नाही असा अधिकार नाही; जे अधिकार आहेत ते देवाने नेमलेले आहेत.”—रोमकर १३:१; तीत ३:१.

७ बहुतेक देशांत कैसर म्हणजेच सरकारी प्रशासन हे ठरवते की कोणत्या व्यक्‍ती लग्न करण्यास योग्य आहेत. त्यामुळे, दोन ख्रिस्ती शास्त्रवचनांनुसार विवाह करण्यास मोकळे असले तरीही ते स्थानिक कायद्यांशी सहकार्य करण्याची काळजी घेतात. यात लग्न करण्याकरता परवाना मिळवणे, सरकारने अधिकृत केलेल्या प्रतिनिधीकडून लग्न लावून घेणे तसेच, लग्नाची अधिकृत नोंदणी करणे समाविष्ट आहे. कैसर औगुस्त याने ‘नावनिशी लिहिली जाण्याची’ आज्ञा दिली तेव्हा, मरीया व योसेफ यांनी या आज्ञेचे पालन केले व ते ‘नावनिशी लिहून द्यावयास’ आपल्या गावी अर्थात बेथलेहेम येथे गेले.—लूक २:१-५.

८. विवाह कितपत बंधनकारक आहे आणि यहोवाचे साक्षीदार असे मानत असल्यामुळे ते काय करत नाहीत?

८ दोन ख्रिस्ती कायदेशीर व सर्वमान्य पद्धतीने लग्न करतात तेव्हा देवाच्या नजरेत हे बंधन दोघांकरताही बंधनकारक ठरते. म्हणूनच यहोवाचे साक्षीदार लग्नाचा कायदेशीर विधी केवळ एकदाच पार पाडतात. तसेच, ते २५ व्या किंवा ५० व्या लग्न वाढदिवसाला पुन्हा लग्नाची शपथ घेण्याची प्रथा पाळत नाहीत. (मत्तय ५:३७) (काही चर्च कायदेशीररित्या अधिकृत पद्धतीने केलेल्या विवाहाला महत्त्व देत नाहीत. त्यांचे म्हणणे असे की जोपर्यंत एक पाळक लग्नाचा विधी पार पाडून जोडप्याला नवरा-बायको म्हणून जाहीर करत नाही तोपर्यंत तो विवाह योग्य नसतो.) बऱ्‍याच देशांत, सरकाराद्वारे यहोवाच्या साक्षीदारांपैकी असलेल्या एखाद्या सेवकाला लग्नाची नोंदणी करण्याचा अधिकार दिला जातो. शक्य असल्यास, तो हा लग्नाचा कायदेशीर विधी राज्य सभागृहातील लग्नाच्या भाषणाच्या वेळीच पार पाडू शकतो. हे स्थानिक परिसरातील खऱ्‍या उपासनेचे ठिकाण असून यहोवाने सुरुवात केलेल्या विवाह व्यवस्थेबद्दल भाषण देण्याकरता योग्य ठिकाण आहे.

९. (क) नोंदणी पद्धतीने विवाह केल्यास ख्रिस्ती जोडपे काय करण्याचे ठरवू शकतात? (ख) लग्नसमारंभाच्या समायोजनात वडिलांची काय भूमिका असू शकते?

९ इतर काही देशांतला कायदाच असा आहे की जोडप्याने सरकारी कार्यालयात, उदाहरणार्थ नागरी प्रशासनाच्या कार्यालयात जाऊन किंवा नियुक्‍त नागरी अधिकाऱ्‍यासमोर लग्नाची नोंदणी केली पाहिजे. या देशांत राहणारे ख्रिस्ती या कायद्याचे पालन करतात आणि त्यानंतर, एकतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्‍या दिवशी राज्य सभागृहात लग्नाचे भाषण दिले जाण्याची व्यवस्था करतात. (कायदेशीर नोंदणीनंतर बऱ्‍याच दिवसांनी बायबल आधारित भाषण देणे योग्य ठरणार नाही कारण त्यांचा विवाह देवासमोर व मनुष्यासमोर, अर्थात ख्रिस्ती मंडळीसमोरही झाला पाहिजे.) जर नोंदणी पद्धतीने विवाह केल्यानंतर जोडप्याला विशिष्ट राज्य सभागृहात भाषणाचे आयोजन करायचे असेल तर त्यांनी त्या मंडळीच्या सेवा समितीत असलेल्या वडिलांची आधीपासूनच परवानगी घ्यावी. हे वडील या जोडप्याचे चारचौघांमध्ये चांगले नाव आहे किंवा नाही हे बघण्यासोबतच, याचीही खात्री करतील की लग्नसमारंभामुळे नेहमीच्या सभांच्या व इतर नियोजित कार्यक्रमांच्या वेळांत व्यत्यय येणार नाही. (१ करिंथकर १४:३३, ४०) तसेच लग्नसमारंभाकरता सभागृहात काही आगाऊ तयारी करण्याची जोडप्याने इच्छा व्यक्‍त केली असेल, तर याकरता परवानगी दिली जावी किंवा नाही तसेच सभागृहाच्या वापरासंबंधी मंडळीला सूचना दिली जावी किंवा नाही याविषयी वडिलांनी मिळून निर्णय घ्यावा.

१०. नोंदणी पद्धतीने विवाह केल्यास, याचा लग्नाच्या भाषणावर कसा प्रभाव पडेल?

१० लग्नाचे भाषण देणाऱ्‍या वडिलांनी मैत्रिपूर्ण, आध्यात्मिकरित्या उत्तेजनदायक व आदरणीय पद्धतीने बोलावे. जर जोडपे आधीच नोंदणी पद्धतीने विवाहित झालेले असतील तर त्यांनी आपल्या भाषणात हे स्पष्ट करावे की कैसराच्या कायद्यानुसार हे जोडपे विवाहित झाले आहे. जर त्या नोंदणी पद्धतीच्या लग्नात, विवाहाच्या शपथा घेण्यात आल्या नसतील तर भाषणादरम्यान जोडपे या शपथा घेऊ शकतात.c जर नोंदणी करतानाच शपथा घेतल्या असतील आणि तरीसुद्धा यहोवासमोर व मंडळीसमोर त्या पुन्हा घेण्याची जोडप्याची इच्छा असेल, तर त्यांनी भूतकाळ वापरून या शपथा घ्याव्यात जेणेकरून ते आधीच “जोडले” गेले आहेत हे समजेल.—मत्तय १९:६; २२:२१.

११. काही ठिकाणी विवाह कशाप्रकारे संपन्‍न होतो आणि याचा विवाहाच्या भाषणावर कसा प्रभाव पडेल?

११ काही ठिकाणी, कायद्यानुसार विधीपूर्वक लग्न करणे आवश्‍यक नसते. काही ठिकाणी सरकारी अधिकाऱ्‍यासमोर विवाहित होणेही आवश्‍यक नसते. अशा ठिकाणी विवाहाच्या नोंदणी अर्जावर सह्‍या करून अधिकाऱ्‍याच्या सुपूर्द केल्यावर विवाह झाला आहे असे समजले जाते. यानंतर विवाहाचा दाखला नोंदला जातो. तेव्हापासूनच त्या जोडप्याला पती पत्नी म्हणून लेखले जाते आणि तीच त्यांच्या विवाहाची तारीख असते. याआधी सांगितल्याप्रमाणे, अशारितीने लग्न झालेले जोडपे या नोंदणीनंतर लगेच राज्य सभागृहात त्यांच्या विवाहाचे भाषण देण्याची व्यवस्था करू शकतात. भाषण देण्याकरता निवडलेला आध्यात्मिकरित्या प्रौढ बंधू सर्वांना सूचित करेल की या जोडप्याच्या विवाहाची नुकतीच नोंदणी झाली असल्यामुळे ते पतीपत्नी आहेत. शपथा घ्यायच्या असल्यास, परिच्छेद १० मध्ये व त्याखालील तळटीपेत दिलेल्या सूचनांचे पालन करावे. राज्य सभागृहात उपस्थित झालेले जोडप्याच्या आनंदात सहभागी होतील व देवाच्या वचनातून देण्यात आलेल्या मार्गदर्शनाचा त्यांनाही फायदा होईल.—गीतरत्न ३:११.

पारंपरिक व नोंदणी विवाह

१२. पारंपरिक विवाह म्हणजे काय आणि अशा पद्धतीने विवाह केल्यानंतर कोणते पाऊल उचलणे योग्य आहे?

१२ काही देशांत जोडपी पारंपरिक (किंवा आदिम) पद्धतीने विवाह करतात. पण हे विवाह न करता एकत्र राहण्यासारखे किंवा ज्याला कॉमन लॉ विवाह म्हणतात तसेही नाही. कॉमन लॉ विवाहांना काही ठिकाणी मान्यता असली तरीही तो पूर्णार्थाने कायदेशीर विवाह नसतो.d पारंपरिक विवाह म्हणजे विशिष्ट जमातीच्या अथवा प्रदेशाच्या सर्वमान्य परंपरेनुसार केलेला विवाह. यात वधूच्या कुटुंबाला द्यावयाची पूर्ण रक्कम देणे व वधूच्या कुटुंबाने ती स्वीकारणे हे समाविष्ट असू शकते. तेव्हाच त्या जोडप्याचा कायदेशीर व शास्त्रवचनांनुसार विवाह झाला आहे असे समजतात. सरकार देखील या पारंपरिक विवाहाला ग्राह्‍य, कायदेशीर व बंधनकारक लेखते. हे पारंपरिक लग्न पार पडल्यानंतर लग्नाची नोंदणी करता येते आणि नोंदणी केल्यावर वधुवरास अधिकृत सर्टीफिकिट दिले जाते. नोंदणी करणे हे त्या जोडप्याकरता एकप्रकारचे संरक्षण ठरू शकते; तसेच पत्नीला वैधव्य आल्यास तिच्याकरता व मुलांकरताही हे संरक्षण ठरू शकते. अशाप्रकारचा पारंपरिक विवाह करणाऱ्‍यांना लवकरात लवकर त्याची नोंदणी करण्याचे मंडळीने प्रोत्साहन द्यावे. विशेष म्हणजे, इस्राएल राष्ट्र मोशेच्या नियमशास्त्राधीन असतानाही विवाहाची व जन्माची अधिकृत नोंदणी केली जात होती असे दिसते.—मत्तय १:१-१६.

१३. पारंपरिक विवाहानंतरही भाषण देणे योग्य का आहे?

१३ अशा पारंपरिक पद्धतीने कायदेशीररित्या लग्न झाल्यानंतर हे जोडपे पती पत्नी बनतात. याआधी सांगितल्याप्रमाणे, ख्रिस्ती जोडपे अशाप्रकारचा कायदेशीर विवाह केल्यानंतर राज्य सभागृहात विवाहाचे भाषण दिले जाण्याची व या भाषणादरम्यान विवाहाची शपथ घेण्याची व्यवस्था करू शकतात. या भाषणात वक्‍त्‌याने हे स्पष्ट करावे की जोडप्याचे आधीच कैसराच्या कायद्यांना अनुसरून लग्न झाले आहे. हे भाषण एकदाच दिले जावे. कायदेशीररित्या योग्य असलेल्या पारंपरिक पद्धतीने त्यांचे एकदा लग्न झालेले असल्यामुळे शास्त्रवचनांच्या आधारावर एकदाच भाषण दिले जावे. पारंपरिक पद्धतीने लग्न व राज्य सभागृहात दिले जाणारे भाषण, या दोन घटनांमध्ये मोठा अवधी जाता कामा नये. शक्यतो त्याच दिवशी भाषण ठेवण्याची व्यवस्था करणे उत्तम ठरेल. यामुळे समाजात ख्रिस्ती विवाहाबद्दल लोकांच्या मनात आदराची भावना वाढेल.

१४. एखाद्या ठिकाणी पारंपरिक व नोंदणी या दोन्ही पद्धतीने विवाह करण्यास मान्यता असल्यास ख्रिस्ती व्यक्‍तीने काय करावे?

१४ काही देशांत जेथे पारंपरिक विवाहाला मान्यता दिली जाते, तेथे शासकीय अधिकाऱ्‍याकडे जाऊन नोंदणी पद्धतीने लग्न करण्याचीही सोय असते. नोंदणी पद्धतीचे लग्न सहसा शासकीय अधिकाऱ्‍यापुढे पार पाडले जाते. यात वधूवर हे दोघेही शपथ घेतात आणि नोंदवहीत सह्‍या करतात. काही ख्रिस्ती जोडपी पारंपरिक विवाहापेक्षा या नोंदणी पद्धतीने लग्न करण्याचे पसंत करतात. कायद्याच्या दृष्टिकोनातून या दोन्ही पद्धतीने लग्न करणे आवश्‍यक नाही. यांपैकी कोणतीही एक पद्धत कायद्याच्या दृष्टीने चालण्यासारखी आहे. विवाहाचे भाषण व शपथ यांविषयी परिच्छेद ९ व १० यात जे सांगितले आहे ते याबाबतीतही समर्पक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की विवाहेच्छुक जोडप्याचे लग्न देवाच्या व मानवाच्याही दृष्टीने आदरणीय अशा पद्धतीने झाले पाहिजे.—लूक २०:२५; १ पेत्र २:१३, १४.

विवाहाची आदरणीयता टिकवून ठेवा

१५, १६. विवाहात आदर कशाप्रकारे समाविष्ट असावा?

१५ एका पर्शियन राजाच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण झाली तेव्हा ममुखान या त्याच्या मुख्य सल्लागाराने असा सल्ला दिला की ज्यामुळे एक चांगला परिणाम घडून यावा, अर्थात ‘सर्व बायकांनी आपल्या नवऱ्‍यास मान द्यावा.’ (एस्तेर १:२०) ख्रिस्ती विवाहांत कोणा मानवी राजाने याबाबतीत आज्ञा देण्याची जरूर भासू नये. कारण ख्रिस्ती स्त्रिया स्वेच्छेने आपल्या पतींना मान देतात. त्याचप्रकारे, ख्रिस्ती पतीही आपल्या ‘स्त्रियांना मान देतात’ व त्यांची प्रशंसा करतात. (नीतिसूत्रे ३१:११, ३०; १ पेत्र ३:७) विवाहात आदराची भावना ही लग्न होऊन अनेक वर्षे लोटल्यानंतर येऊ नये. तर ती अगदी सुरुवातीपासूनच, अर्थात लग्नाच्या दिवसापासूनच दिसून आली पाहिजे.

१६ हा आदर पुरुष व स्त्रीने—पती व पत्नीने केवळ लग्नाच्याच दिवशी नव्हे तर पुढेही व्यक्‍त करावा. जर एक ख्रिस्ती वडील लग्नाचे भाषण देणार असतील तर त्या भाषणातूनही आदर व्यक्‍त झाला पाहिजे. भाषण जोडप्याला उद्देशून असले पाहिजे. त्यांच्याबद्दल आदर व्यक्‍त करण्याकरता वक्‍त्‌याने लोकप्रिय विनोदी विधाने उद्धृत करू नयेत. तसेच वधूवराला व श्रोत्यांना ज्यांमुळे संकोचल्यासारखे होईल अशाप्रकारचे अतिशय वैयक्‍तिक अभिप्राय त्यांनी मांडू नयेत. त्याऐवजी त्यांनी प्रेमळ, व उत्तेजनदायक पद्धतीने बोलावे आणि विवाहाचा जनक व त्याच्या श्रेष्ठ मार्गदर्शनाकडे लक्ष वेधावे. अशाप्रकारचे आदरणीय भाषण, यहोवा देवाला आदर देणाऱ्‍या विवाहास बऱ्‍याच प्रमाणात हातभार लावेल.

१७. ख्रिस्ती विवाहांची कायदेशीर बाजू लक्षात घेणे महत्त्वाचे का आहे?

१७ या लेखात विवाहाच्या कायदेविषयक बाबींसंबंधी बरेच मुद्दे होते हे तुमच्या लक्षात आलेच असेल. कदाचित काही मुद्दे तुमच्या भागात तितके समर्पक नसतील. तरीपण, यहोवाचे साक्षीदार विवाहाचे नियोजन करताना स्थानिक कायद्यांबद्दल अर्थात कैसराच्या नियमांबद्दल किती आदर दाखवतात याची आपल्या सर्वांना जाणीव असण्यास हवी. (लूक २०:२५) पौलाने आपल्याला असे आर्जवले: “ज्याला जे द्यावयाचे ते त्याला द्या; ज्याला कर द्यावयाचा त्याला तो द्या; ज्याला जकात द्यावयाची त्याला ती द्या; . . . व ज्याचा सन्मान करावयाचा त्याचा सन्मान करा.” (रोमकर १३:७) ख्रिश्‍चनांनी अगदी लग्नाच्या दिवसापासूनच देवाने सध्याच्या काळाकरता घालून दिलेल्या व्यवस्थेबद्दल आदर दाखवणे योग्य आहे.

१८. विवाहासंबंधी कोणती एक ऐच्छिक बाब आहे जिच्याकडे लक्ष देणे जरूरीचे आहे व यासंबंधी समर्पक माहिती आपल्याला कोठे सापडेल?

१८ बऱ्‍याच ख्रिस्ती लग्नांनंतर स्वागत समारंभ किंवा मेजवानी आयोजित केली जाते. येशू देखील अशा एका समारंभाला उपस्थित राहिला होता हे तुम्हाला आठवत असेल. अशाप्रकारचा समारंभ आयोजित करताना बायबलमधील सल्ला आपल्याला कशी मदत करू शकतो, जेणेकरून देवाला सन्मान मिळेल आणि नवविवाहित जोडप्याची व ख्रिस्ती मंडळीचीही प्रशंसा होईल? पुढील लेखात याच विषयाबद्दल चर्चा केली आहे.e (w०६ १०/१५)

[तळटीपा]

a हाच शब्द लग्नाशी संबंधित नसलेल्या मेजवानीकरताही उपयोगात आणला जाऊ शकतो.—एस्तेर ९:२२, सेप्टुअजिंट.

b यहोवाचे साक्षीदार “देवाच्या दृष्टिकोनातील आदरणीय विवाह” असे शीर्षक असलेली ३० मिनिटांच्या भाषणाची एक रूपरेषा वापरतात. या भाषणात कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकात व यहोवाच्या साक्षीदारांच्या इतर प्रकाशनांत सापडणाऱ्‍या शास्त्रवचनीय सल्ल्याच्या आधारावर माहिती दिलेली आहे. ही माहिती केवळ ज्यांचे लग्न आहे त्या जोडप्याकरताच नव्हे तर लग्नाला उपस्थित असलेल्या सर्वांच्या उपयोगाची आहे.

c स्थानिक कायद्यानुसार ग्राह्‍य असल्यास पुढील शपथा सहसा वापरल्या जातात. या शपथा देवाला आदर देतात. वरासाठी: “मी [वराचे नाव], [वधूचे नाव] हिचा माझी पत्नी म्हणून, देवाच्या विवाह व्यवस्थेप्रमाणे आम्ही दोघेही पृथ्वीवर एकत्र राहू तोपर्यंत, ख्रिस्ती पतीसाठी पवित्र शास्त्रवचनांमध्ये दिलेल्या ईश्‍वरी नियमानुसार प्रेम व संभाळ करण्यास स्वीकार करतो.” वधूसाठी: “मी [वधूचे नाव], [वराचे नाव] यांचा माझे पती म्हणून, देवाच्या विवाह व्यवस्थेप्रमाणे आम्ही दोघेही पृथ्वीवर एकत्र राहू तोपर्यंत, ख्रिस्ती पत्नीसाठी पवित्र शास्त्रवचनांमध्ये दिलेल्या ईश्‍वरी नियमानुसार प्रेम व संभाळ करण्यास तसेच अंतःकरणपूर्वक आदर दाखवण्यास स्वीकार करते.”

d टेहळणी बुरूज मे १, १९६२ अंकात पृष्ठ २८७ वर कॉमन लॉ विवाहाविषयी मार्गदर्शन दिले आहे.

e पृष्ठ २८ वर “विवाह सोहळ्याचा आनंद व प्रतिष्ठा द्विगुणित करा” हा लेख देखील कृपया पाहा.

तुम्हाला आठवते का?

• लग्नासंबंधीच्या कायदेशीर व आध्यात्मिक, दोन्ही बाबतींत आपण रस का घ्यावा?

• एखादे ख्रिस्ती जोडपे जर नोंदणी पद्धतीने विवाह करणार असेल तर मग त्यानंतर लवकरच ते कोणते पाऊल उचलण्याचे ठरवू शकतात?

• राज्य सभागृहात लग्नाचे भाषण का दिले जाते?

[१२ पानांवरील चित्र]

प्राचीन इस्राएली लग्नात वर आपल्या वधूस स्वतःच्या अथवा आपल्या पित्याच्या घरी आणत असे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा