राज्य घोषकांचा वृतान्त
नामिबियात ईश्वरशासित कार्याची वाढ
नामिबियात देवाच्या राज्याची सुवार्ता १९२० च्या दशकाच्या उत्तरार्धात पहिल्यांदा ऐकवण्यात आली. तेव्हापासून प्रामाणिक अंतःकरणाच्या शेकडो लोकांनी देवाच्या तारणाचा संदेश स्वीकारला आहे. खाली दिलेल्या अनुभवांवरून दिसून येते त्याप्रमाणे यहोवा आज राष्ट्रांतील निवडक वस्तू आपल्या कळपात आणत आहे.—हाग्गय २:७
◻ नामिबियाच्या ईशान्य भागात राहणारा पोलस नावाचा एक गरीब शेतकरी विंड्होक (नामिबियाची राजधानी) येथे गेला असताना त्याची यहोवाच्या साक्षीदारांसोबत पहिल्यांदा भेट झाली. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यावर त्याला लगेच खात्री पटली की आपण ज्या सत्याच्या शोधात होतो ते हेच आहे. घरी परतताना त्याने तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक सोबत नेले. त्याच्या घरापासून सर्वात जवळचे राज्य सभागृह रुन्डू नावाच्या गावात होते; तेथे जाऊन त्याने साक्षीदारांना शोधून काढले आणि त्यांना आपल्या घरी येण्याची विनंती केली.
पण पोलसचे घर फारच दूर असल्यामुळे दर आठवडी जाऊन बायबल स्टडी घेणे साक्षीदारांना शक्य नव्हते. पोलस निराश झाला नाही, तर त्याने स्वतःहूनच बायबलचा अभ्यास सुरू केला. शिवाय, शिकलेल्या गोष्टी तो इतरांनाही मोठ्या आवेशाने सांगायचा. पाहता पाहता पोलसने एक लहानसा बायबल अभ्यास गट तयार केला. रून्डू गावात यहोवाच्या साक्षीदारांचे संमेलन होणार असल्याचे या गटाच्या सदस्यांनी रेडिओवर ऐकले, तेव्हा त्यांनी मोठ्या मुश्किलीने त्यांच्याजवळ होते नव्हते ते सर्व पैसे गोळा केले आणि संमेलनाला जाण्याची व्यवस्था केली.
कल्पना करा, पहिल्यांदा यहोवाच्या साक्षीदारांना भेटल्यावर त्यांना किती आनंद झाला असेल! लवकरच, काही सुयोग्य बांधवांना या गटाला नियमित भेटी देण्यासाठी नेमण्यात आले. आज पोलसच्या गावात सहा प्रचारक आहेत.
◻ योहान्ना नावाच्या एका स्त्रीने एकदा काही लोकांना यहोवाच्या साक्षीदारांची टीका करताना ऐकले. यहोवा हे नाव ऐकताच तिच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. ती सांगते: “यहोवा हे नाव पहिल्यांदा ऐकताच, जणू ते माझ्या मनावर कोरलं गेलं. मी विचार करू लागले, यहोवा कोण असेल? त्या वेळी आम्ही, म्हणजे मी व माझे पती नामिबियाच्या समुद्रतटावर असणाऱ्या वॉलव्हिस बे या गावाजवळ राहात होतो. एकदा गावात मला काही यहोवाचे साक्षीदार दिसले. ते रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांना टेहळणी बुरूज मासिकं देत होते. मी पण एक मासिक घेतलं आणि त्यांनी घरी येऊन माझा बायबल स्टडी घ्यावा अशी त्यांना विनंती केली कारण माझ्या मनात अनेक प्रश्न होते. त्यांनी जेव्हा मला सांगितलं की त्यांची गाडी बिघडल्यामुळे ते येऊ शकणार नाहीत, तेव्हा मला अक्षरशः रडू आलं. यानंतर काही दिवसांनी अचानक माझ्या पतीचा मृत्यू झाला. मी केट्मानशोप या गावात राहायला गेले. त्या ठिकाणी एका स्पेशल पायनियरला (पूर्ण-वेळेचा सुवार्तिक) नेमण्यात आलं होतं. त्यांच्याकडून मला सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते हे पुस्तक मिळालं. अगदी सुरवातीपासूनच मला जाणीव झाली की या पुस्तकात दिलेली सर्व माहिती खरी आहे.
“काही दिवसांनी मला प्रचार कार्यात सहभाग घेण्याचं प्रोत्साहन देण्यात आलं. पण मनुष्याची भीती ही माझ्यापुढे फार मोठी अडचण होती. एका घरातून दुसऱ्या घरी जाताना मी यहोवाला प्रार्थना करायचे की मला मरण दिलं तरी चालेल पण हे घरोघर जाऊन प्रचार करणं मला जमणार नाही. पहिल्यांदा रस्त्यावरच्या साक्षकार्यात मी गेले तेव्हा कोणी मला पाहू नये म्हणून मी मुद्दामहून एक लहानशा गल्लीत जाऊन उभी राहिले. बऱ्याच वेळानं, सगळं धैर्य एकवटून मी समोरून जाणाऱ्या एका व्यक्तीला मासिक दाखवलं आणि कसेबसे दोन शब्द बोलले. त्यानंतर मात्र यहोवाच्या मदतीनं त्या दिवशी मी कित्येक लोकांशी बायबलच्या आशेविषयी बोलू शकले.
“आज त्या घटनेला १२ वर्षं होऊन गेली आहेत. जगाच्या दृष्टीनं मी गरीब आहे पण खरं पाहता मी श्रीमंत आहे कारण पायनियर सेवेची बहुमोल संधी मला लाभली आहे. लोकांना देवाच्या राज्याचं सत्य सांगताना मला जो आनंद मिळतो तो पैशात मोजता येणार नाही, आजही मी हा आनंद उपभोगते आहे.”