आजच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे बायबलमध्ये
आपल्या काळासाठी बायबल व्यवहार्य आहे का? आजच्या काळातल्या लोकांना महत्त्वपूर्ण वाटणाऱ्या प्रश्नांवर या पुराण ग्रंथात मार्गदर्शन असेल तरच असे म्हणता येईल. पण, आजच्या जगात महत्त्वपूर्ण वाटणाऱ्या विषयांवर बायबल खरंच उपयुक्त मार्गदर्शन देते का?
त्यासाठी, आपण आपल्या दिवसांतील दोन विषय विचारात घेऊ या आणि त्या विषयांवर बायबलचे काय म्हणणे आहे त्याचे परीक्षण करू या.
देव आपल्याला दुःख का भोगायला लावतो?
सध्याची परिस्थिती विचारात घेता, निरपराधी लोकांवर अन्याय होतो तेव्हा देव का काही करत नाही, असा एक प्रश्न राहून राहून लोकांच्या मनात डोकावतो. आणि हा खरोखरच एक समर्पक प्रश्न आहे. कारण आज वाढत्या संख्येने लोक हिंसात्मक गुन्हे, भ्रष्टाचार, जातीसंहार, अपघात आणि अशा इतर गोष्टींचे बळी ठरत आहेत.
उदाहरणार्थ, जून १९९८ मध्ये उत्तर जर्मनीत एका ट्रेन अपघातात १०० हून अधिक प्रवासी मृत्यूमुखी पडले. जखमी झालेल्या आणि मृत्यू पावलेल्या लोकांच्या सेवेसाठी आलेले अनुभवी डॉक्टर आणि अग्नीशामक दलाचे सेवकही अपघाताचे ते भयंकर दृश्य पाहून शहारले. या घटनेसंबंधी ईव्हॅनजेलिकल चर्चच्या एका बिशपने म्हटले: “देवा हे असं का घडू दिलंस?” या प्रश्नाचे उत्तर खुद्द बिशपही देऊ शकला नाही.
निरपराध लोकांना विनाकारण अन्याय सहन करावा लागतो तेव्हा सहसा ते कटू बनतात. पण, बायबल अशा लोकांची मदत करू शकते. कारण, पुष्कळदा निरपराधी लोकच दुष्टाईला, दुःखाला बळी का पडतात याचे उत्तर बायबल देते.
यहोवाने पृथ्वी आणि त्यावरील सर्वकाही घडविले तेव्हा मानव दुःखी आणि कष्टी व्हावा असा त्याचा हेतू नव्हता. हे इतक्या खात्रीने आपण का म्हणू शकतो? कारण, आपले सृष्टीकार्य पूर्ण केल्यानंतर, “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.” (उत्पत्ति १:३१) विचार करा: ‘एखादं दुष्ट कृत्य पाहून हे “फार चांगले आहे” असे कधी तुम्ही म्हणाल का?’ निश्चितच नाही! त्याचप्रमाणे, देवाने देखील सर्वकाही “फार चांगले आहे” असे म्हटले तेव्हा पृथ्वीवर दुष्टाईचा लवलेशही नव्हता. तर मग, या दुष्टाईला नेमकी केव्हा आणि कुठून सुरवात झाली?
यहोवा परमेश्वराने आपले पहिले आईवडील आदाम आणि हव्वा यांना निर्माण करून काही काळ लोटल्यावर एक शक्तिशाली आत्मिक प्राणी स्त्रीकडे गेला आणि यहोवाच्या सत्यतेबद्दल तसेच सबंध विश्वावर सत्ता चालवण्याच्या त्याच्या योग्यतेबद्दल त्याने तिच्या मनात शंका उत्पन्न केली. (उत्पत्ति ३:१-५) हा आत्मिक प्राणी, म्हणजेच दियाबल सैतान, याने नंतर एकदा असाही दावा केला की संकटे येतात तेव्हा मनुष्य देवाला विश्वासू राहणार नाही. (ईयोब २:१-५) मग, यहोवाने काय केले? त्याने वेळ जाऊ देण्याचे ठरवले. देवाच्या मार्गदर्शनाशिवाय यशस्वीपणे वाटचाल करणे मनुष्याच्या हाती नाही हे कालांतराने आपोआपच सिद्ध होईल हे देवाला माहीत होते. (यिर्मया १०:२३) मनुष्यप्राणी देवाच्या नियमांचे आणि तत्त्वांचे उल्लंघन करतात, म्हणजेच ते पाप करतात, आणि यामुळेच वाईट परिस्थिती निर्माण होते. (उपदेशक ८:९; १ योहान ३:४) पण, अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील काहीजण आपल्याला विश्वासू राहतील हे यहोवाला ठाऊक होते.
एदेन बागेत सुरू झालेल्या त्या विद्रोहामुळे मानवजातीवर असंख्य दुःखे ओढवली. दरम्यान जवळजवळ ६,००० वर्षे लोटली आहेत. हा फार मोठा कालावधी वाटतो का? यहोवाला खरे तर कित्येक शतकांपूर्वीच सैतानाचे आणि त्याच्या समर्थकांचे अस्तित्व नष्ट करता आले असते. पण, सबंध विश्वावर सत्ता चालवण्यास यहोवा योग्य आहे की नाही तसेच मानव यहोवाला निष्ठावान राहतील की नाही या दोन वादविषयांबद्दल असलेली एकूणएक शंका दूर होईपर्यंत यहोवाने वेळ जाऊ दिला आहे हे योग्यच नाही का? आजच्या कायदेव्यवस्थेतही, एखाद्या न्यायालयीन खटल्याचे खरेखोटे करण्यासाठी कधीकधी वर्षानुवर्षे थांबावे लागत नाही का?
स्वतः यहोवा देव आणि सबंध मानवजातीशी संबंधित असणारे हे दोन वादविषय कोणत्याही साधारण न्यायालयीन खटल्यासारखे नाहीत. संपूर्ण विश्वाची सत्ता आणि सबंध मानवजातीची देवाप्रती निष्ठा यात गोवलेली असल्यामुळे ते अतिशय निर्णायक आहेत. तेव्हा, हे वादविषय मिटवण्यासाठी देवाने वेळ जाऊ दिला हा त्याच्या अगाध बुद्धीचाच पुरावा नाही का? त्याने असे केल्यामुळेच, देवाच्या नियमांकडे दुर्लक्ष करून सर्व व्यवहार चालवण्याचा प्रयत्न करण्याचे दुष्परिणाम आज आपल्याला अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत. सर्वत्र दुष्टाई पसरली आहे. आणि म्हणूनच निरपराध लोकांना दुःख, अन्याय सोसावा लागतो.
पण निराश होऊ नका. देवाच्या वचनानुसार ही दुष्टाई कायम अशीच चालणार नाही. किंबहुना लवकरच, यहोवा दुष्टाईचा आणि दुष्कृत्य करणाऱ्यांचा समूळ नायनाट करील. नीतिसूत्रे २:२२ म्हणते: “दुर्जनांचा देशांतून उच्छेद होईल, अनाचाऱ्यांचे त्यांतून निर्मूलन होईल.” पण, देवाला विश्वासू राहणारे लोक मात्र अशा एका काळाची आस धरू शकतात, ज्यात ‘मरण नसेल; शोक, रडणे व कष्टही नसेल.’ तो काळ आता जवळ आला आहे.—प्रकटीकरण २१:४.
तर मग, निरपराध लोकांना दुःख, अन्याय का सोसावा लागतो याचे सुस्पष्ट उत्तर आपल्याला बायबलमध्ये सापडते. दुष्टाई आणि दुःख लवकरच इतिहासजमा होईल असेही आश्वासन बायबल आपल्याला देते. पण, आज जीवनाच्या खडतर समस्यांना तोंड देताना आणखी एक महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्यासमोर येतो.
जीवनाचा उद्देश काय?
इतिहासात पहिल्यांदाच, इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पुष्कळ जण विचार करतात: ‘आपण शेवटी जगतो कशासाठी? जीवनात खरंच काही अर्थ आहे का?’ अर्थात, निरनिराळी परिस्थिती लोकांना असे प्रश्न विचारण्यास भाग पाडते.
कदाचित, कोणत्या तरी दुर्दैवी घटनेमुळे एखाद्याचे जीवन पार उद्ध्वस्त झाले असेल. १९९८ सालाच्या सुरवातीला बवारिआ, जर्मनीमध्ये एका १२ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिचा खून करण्यात आला. ही घटना घडून एक वर्ष उलटल्यानंतर, या मुलीची आई सांगते की ती जवळजवळ दररोज विचार करते की आपल्या जगण्यात खरंच काही अर्थ आहे का, पण तिला या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. काही युवकांनाही आपले जीवन उद्देशहीन वाटू लागते. त्यांना जीवनात केवळ सुरक्षितता, सफलता आणि समाजात एक स्थान हवे असते; पण फसवेगिरी आणि भ्रष्टाचाराने पोखरलेल्या या जगात त्यांची घोर निराशा होते. काही लोक आपल्या करिअरलाच आपले जीवन मानतात पण लवकरच त्यांना कळून चुकते की सत्ता, प्रतिष्ठा, पैसा या सर्व गोष्टी मिळूनही जीवनाचा अर्थ शोधण्याची आपली प्रबळ इच्छा तृप्त होऊ शकत नाही.
जीवनाच्या उद्देशाबद्दल विचार करायला लोकांना प्रवृत्त करणारी परिस्थिती वेगवेगळी असू शकते. पण त्यांच्या या प्रश्नाचे अर्थपूर्ण आणि समाधानकारक उत्तर मिळणे जरूरीचे आहे. आणि या बाबतीतही बायबलच आपली मदत करू शकते. बायबल दाखवून देते की यहोवा हा उद्देश बाळगून ते उद्देश पूर्ण करणारा देव आहे; त्याच्या प्रत्येक कृत्यामागे काही ना काही सबळ कारण असते. हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण असा प्रश्न विचारू शकतो: ‘काहीएक कारण नसताना उगाचच तुम्ही एखादे घर बांधाल का?’ मुळीच नाही; कारण घर बांधण्यासाठी बराच पैसा खर्च करावा लागतो शिवाय ते एका रात्रीत बांधून होत नाही; त्याला अनेक महिने, कधीकधी वर्षेही लागतात. कुणीतरी त्यात राहावे या उद्देशानेच तुम्ही घर बांधता. हाच तर्क यहोवाच्या बाबतीतही केला जाऊ शकतो. ज्याअर्थी त्याने पृथ्वी निर्माण केली आणि त्यावर सर्व जीवधारी प्राणी घडवले त्याअर्थी असे करण्यामागे नक्कीच काहीतरी ठोस कारण, काहीतरी उद्देश असावा. (पडताळा इब्री लोकांस ३:४.) मग, तो उद्देश कोणता?
बायबल स्पष्टपणे दाखवून देते, की आज्ञाधारक मानवांनी पृथ्वीवर राहून पृथ्वीची देखभाल करावी या उद्देशाने देवाने पृथ्वीची निर्मिती केली. (उत्पत्ति १:२७, २८) यशयाच्या भविष्यवाणीत यहोवाविषयी म्हटले आहे की, “[खरा] देव, . . . पृथ्वीचा घडणारा व कर्ता” आहे. आणि “त्याने तिची [पृथ्वीची] स्थापना केली; त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही, तर तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली.” (यशया ४५:१८) होय, पृथ्वीची घडण झाली तेव्हापासून आजपर्यंत पृथ्वीसंबंधी यहोवाचा एकच उद्देश राहिला आहे आणि तो म्हणजे या पृथ्वीवर लोकांनी राहावे, जीवन व्यतीत करावे. हाच विचार, स्तोत्र ११५:१६ मध्ये देखील मांडलेला आहे; ते म्हणते: “स्वर्ग तर परमेश्वराचा आहे, पण पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे.”
पण, आदाम आणि हव्वेने केलेल्या विद्रोहामुळे यहोवाने आपला उद्देश बदलला का? मुळीच नाही. हे कशावरून? त्यासाठी पुढील मुद्दा विचारात घ्या: एदेन बागेतील विद्रोहाला हजारो वर्षे उलटल्यानंतर बायबलचे लिखाण करण्यात आले. त्यामुळे देवाने जर आपला मूळ उद्देश बदलला असता तर बायबलमध्ये तसा उल्लेख आपल्याला आढळला नसता का? तेव्हा याचे साधेसुधे उत्तर हेच आहे की पृथ्वी आणि मानवजात यांसंबंधीचा देवाचा उद्देश बदललेला नाही.
शिवाय, यहोवाचा उद्देश कधीच निष्फळ ठरत नाही. याची शाश्वती तो यशयामार्फत आपल्याला देतो: “पाहा, पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात; आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून, पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत; त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.”—यशया ५५:१०, ११.
आपल्याकडून यहोवा काय अपेक्षा करतो?
तेव्हा, पृथ्वीवर आज्ञाधारक मानवांनी सर्वकाळ राहावे हा देवाचा उद्देश निश्चित पूर्ण होईल यावर आपण भरवसा ठेवू शकतो. पण, पृथ्वीवर सदासर्वकाळ राहण्याचा अद्भुत आशीर्वाद आपल्यालाही मिळावा असे आपल्याला वाटत असल्यास शलमोन राजाने म्हटले त्याप्रमाणे आपण केले पाहिजे. त्याने म्हटले: “देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.”—उपदेशक १२:१३: योहान १७:३.
मानवजातीसाठी यहोवाचा जो उद्देश आहे त्या उद्देशाच्या एकवाक्यतेत जीवन जगणे म्हणजे खऱ्या देवाला जाणून घेणे आणि पवित्र शास्त्रवचनांमध्ये त्याने घालून दिलेल्या अटी पूर्ण करणे. आपण आताच असे केले तर एका नवीन सुखदायक पृथ्वीवर सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याची आशा आपण मनी बाळगू शकतो; त्या नवीन जगात आपल्याला देवाबद्दल आणि त्याच्या अद्भुत सृष्टीबद्दल सतत नवनवीन गोष्टी शिकत राहण्याची संधी मिळेल. (लूक २३:४३) त्या उज्ज्वल भविष्याबद्दल विचार करणेही किती आनंददायक आहे!
जीवनाचा उद्देश शोधणारे बरेच लोक बायबलचा आश्रय घेतात आणि आज ते आनंदात आहेत. या बाबतीत अल्फ्रेड नावाच्या युवकाचे उदाहरण घ्या; पूर्वी, आपले जीवन अगदी अर्थशून्य आहे असे त्याला वाटायचे. युद्धांना पाठिंबा देणाऱ्या धर्मांची त्याला घृणा वाटू लागली. तर राजकारणातील दुतोंडेपणा आणि भ्रष्टाचार पाहून तो भयंकर अस्वस्थ झाला होता. जीवनाचा उद्देश काय हे जाणून घेण्याच्या तीव्र इच्छेने त्याला उत्तर अमेरिकेतील इंडियन्सकडे आकृष्ट केले; पण, तिथेही त्याला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. शेवटी निराश होऊन तो युरोपला परतला आणि ड्रग्स आणि बेफाम संगीतात रमण्याचा प्रयत्न करू लागला. पण नंतर, बायबलचे नियमितपणे काळजीपूर्वक परीक्षण केल्यामुळे अल्फ्रेडला आपल्या जीवनाचा खरा उद्देश सापडला आणि तो खऱ्या अर्थाने आनंदी झाला.
जीवनाच्या मार्गावरील खरा प्रकाश
तर मग, बायबलविषयी शेवटी काय म्हणता येईल? आपल्या या काळातही ते उपयुक्त आहे का? बिलकुल. कारण चालू घडामोडींवर उपाय काय हे बायबलमध्ये सांगितलेले आहे. बायबल स्पष्टपणे दाखवते की आजच्या जगात दिसणाऱ्या दुष्टाईला देव जबाबदार नाही तसेच जीवनाचा उद्देश काय आहे आणि जीवनात खरे समाधान कसे मिळवता येईल हेही बायबल सांगते. याशिवाय, लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर देखील बायबल बरेच मार्गदर्शन पुरवते. उदाहरणार्थ विवाह, मुलांचे संगोपन, मानवी नाती आणि मृतांसाठी असलेली आशा अशा सर्व विषयांवर बायबलमध्ये मार्गदर्शन दिलेले आहे.
तुम्ही कधी बायबलचा अभ्यास करून पाहिला आहे का? नसेल, तर एकदा जरूर करून पाहा. यातील अनमोल मार्गदर्शन जीवनाकरता किती उपयुक्त आहे याची खात्री पटल्यावर, यहोवा देवाला आपले मार्गदर्शन करण्याची विनंती करणाऱ्या स्तोत्रकर्त्याप्रमाणे तुम्हीही म्हणाल: “तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाश आहे.”—स्तोत्र ११९:१०५.
[६ पानांवरील चित्र]
देव निरपराधी लोकांना दुःख, अन्याय का सोसू देतो तुम्हाला माहीत आहे का?
[७ पानांवरील चित्र]
तुम्ही एक उद्देशपूर्ण, अर्थभरीत जीवन जगू शकता