यहोवा मार्ग मोकळा करतो
“राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल.”—मत्तय २४:१४.
१. पहिल्या आणि २० व्या शतकातील प्रचार कार्यामुळे काय साध्य झाले आहे?
यहोवा देव प्रेमळ असल्यामुळे त्याची अशी इच्छा आहे की “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे.” (१ तीमथ्य २:४) आणि म्हणूनच प्रचार करण्याची आणि शिकवण्याची एक आंतरराष्ट्रीय मोहीम राबवणे आवश्यक झाले. पहिल्या शतकात, या प्रचार कार्यामुळे ख्रिस्ती मंडळी “सत्याचा स्तंभ व पाया” बनली. (१ तीमथ्य ३:१५) त्यानंतर धर्मत्यागाचा एक प्रदीर्घ काळ आला आणि त्यादरम्यान सत्याचा प्रकाश मंदावला. अलीकडच्या काळात म्हणजे ‘अंतसमयापर्यंत,’ पुन्हा एकदा ‘खरे ज्ञान’ वृद्धिंगत झाले आहे आणि त्यामुळे लाखो लोकांना बायबलच्या आधारावर सार्वकालिक तारणाची आशा मिळाली आहे.—दानीएल १२:४, NW.
२. प्रचार कार्याच्या संबंधाने यहोवाने काय केले आहे?
२ सैतानाने देवाच्या उद्देशाच्या पूर्णतेत अडथळे आणण्याचा सतत प्रयत्न केला असला तरीसुद्धा पहिल्या शतकात आणि २० व्या शतकातही प्रचाराच्या कार्याला विलक्षण सफलता मिळाली आहे. यावरून यशयाच्या भविष्यवाणीची आठवण होते. सा.यु.पू. सहाव्या शतकात बंदिवान यहुदी लोक यहूदात परत येतील याविषयी यशयाने लिहिले: “प्रत्येक खोरे उंच होवो, प्रत्येक डोंगर व टेकडी सखल होवो; उंचसखल असेल ते सपाट होवो व खडकाळीचे मैदान होवो.” (यशया ४०:४) पहिल्या व २० व्या शतकातही यहोवाने अशाचप्रकारे महान प्रचार कार्याचा मार्ग मोकळा केला.
३. यहोवा कोणत्या मार्गांनी आपले उद्देश पूर्ण करण्यास समर्थ आहे?
३ पण, सुवार्ता प्रचाराच्या कार्याला बढावा देणारी पृथ्वीवरील प्रत्येकच घटना स्वतः यहोवाने घडवून आणली असा याचा अर्थ नाही; शिवाय, भविष्यात काय घडणार याविषयी सर्व बारीकसारीक गोष्टी जाणून घेण्यासाठी यहोवाने आपल्या पूर्वज्ञानाचा उपयोग केला असाही याचा अर्थ नाही. भविष्यातील घटना त्या घडण्यापूर्वी पाहण्याचे आणि इतकेच नव्हे तर त्यांना विशिष्टप्रकारे वळण देण्याचेही सामर्थ्य देवाजवळ आहे. (यशया ४६:९-११) पण घटना जसजशा घडत जातात तसतसे देखील तो कार्य करू शकतो. अनुभवी मेंढपाळ जसे आपल्या कळपाचे संरक्षण करतो, त्यांना दिशा दाखवतो त्याचप्रमाणे यहोवा देखील आपल्या लोकांना मार्ग दाखवतो. त्याने त्यांना आध्यात्मिकरित्या शुद्ध केले आहे. तसेच जगभरात सुवार्तेचे प्रचार कार्य यशस्वी होण्यासाठी हातभार लावणाऱ्या परिस्थितींचा व घटनांचा फायदा करून घेण्याची प्रेरणा दिली आहे आणि अशाप्रकारे तो त्यांना तारणाचा मार्ग दाखवत आहे.—स्तोत्र २३:१-४.
कठीण कामगिरी
४, ५. सुवार्तेचा प्रचार करणे आव्हानात्मक का ठरले आहे?
४ नोहाच्या काळात ज्याप्रमाणे तारवाचे बांधकाम आव्हानात्मक होते त्याचप्रमाणे पहिल्या शतकात आणि आधुनिक काळातही राज्याच्या प्रचाराचे कार्य काही साधेसुधे कार्य नव्हते. जगातल्या सर्व लोकांपर्यंत एखादा संदेश पोचवणे सोपे नाहीच, पण त्यातल्या त्यात हे कार्य तर आणखीनच कठीण होते. पहिल्या शतकातले शिष्य अगदी बोटांवर मोजण्याइतके होते. त्यांच्या पुढाऱ्याला म्हणजे येशूला राजद्रोहाच्या आरोपाखाली मृत्युदंड देण्यात आला होता. त्या काळात यहुदी धर्माचा जोर होता आणि त्यांचे जेरुसलेममध्ये एक भव्य मंदिर होते. शिवाय, भूमध्य प्रदेशात इतर यहुदेतर धर्म देखील सुस्थापित होते, त्यांचीही आपापली मंदिरे व पुरोहित गण होते. त्याचप्रकारे, १९१४ साली जेव्हा ‘अंतसमयाला’ सुरवात झाली तेव्हा अभिषिक्त ख्रिश्चनांचीही संख्या अगदीच कमी होती आणि देवाची भक्ती करण्याचा दावा करणाऱ्या इतर धर्मांचे उपासक त्यांच्या तुलनेत कितीतरी जास्त होते.—दानीएल १२:९.
५ येशूने आपल्या अनुयायांना आधीच सांगून ठेवले होते की त्यांचा छळ केला जाईल. तो त्यांना म्हणाला: “तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हास धरून देतील व तुम्हास जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करितील.” (मत्तय २४:९) या समस्यांसोबतच, “शेवटल्या काळात” ख्रिश्चनांना “कठीण” परिस्थितीलाही तोंड द्यावे लागणार होते. (२ तीमथ्य ३:१) कामगिरी अतिशय मोठी होती, छळ होईल याची खात्री होती, शिवाय कठीण काळाला तोंड द्यायचे होते; या सर्व कारणांमुळे प्रचार कार्य आव्हानात्मक व कठीण होते. मोठ्या विश्वासानिशी हे कार्य करावे लागले.
६. यहोवाने आपल्या लोकांना यशाची कोणती हमी दिली?
६ या कार्यात अडचणी येतील हे यहोवाला माहीत होते, पण त्याच वेळेस त्याला हेही माहीत होते, की काही झाले तरी ते थांबणार नाही. या कार्याला कशाप्रकारे यश येईल हे पहिल्या आणि २० व्या शतकातही मोठ्या विलक्षणरित्या पूर्ण झालेल्या एका भविष्यवाणीत भाकीत करण्यात आले होते: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (तिरपे वळण आमचे)—मत्तय २४:१४.
७. पहिल्या शतकात प्रचाराचे कार्य किती व्यापक प्रमाणात पार पाडण्यात आले?
७ पहिल्या शतकात, देवाच्या सेवकांनी त्याच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन आपल्याला नेमलेली कामगिरी हाती घेतली. यहोवा त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांनी अपेक्षाही केली नव्हती इतके प्रचंड यश त्यांना मिळाले. पौलाने कलस्सैकरांना पत्र लिहिले तोपर्यंत, म्हणजे येशूच्या मृत्यूनंतर सुमारे २७ वर्षांनंतर तो म्हणू शकला की ‘आकाशाखालच्या सर्व सृष्टीत सुवार्तेची घोषणा झाली आहे.’ (कलस्सैकर १:२३) तसेच आज, २० व्या शतकाच्या समाप्तीला, सुवार्तेचा प्रचार २३३ राष्ट्रांत सुरू आहे.
८. बऱ्याच जणांनी कशा प्रकारच्या परिस्थितींना तोंड देऊन सुवार्तेचा स्वीकार केला आहे? उदाहरणे द्या.
८ अलीकडच्या दशकांत लाखो लोकांनी सुवार्तेचा स्वीकार केला आहे आणि बऱ्याच जणांनी तर प्रतिकूल परिस्थितीत—युद्ध, सरकारी प्रतिबंध, क्रूर छळ यांसारख्या समस्यांना तोंड देऊन असे केले आहे. पहिल्या शतकातही अशीच परिस्थिती होती. एकदा पौल व सिला यांना अमानुषपणे फटके मारून बंदिशाळेत डांबण्यात आले. अशा परिस्थितीत कोण शिष्य बनवणार? पण यहोवाने याही परिस्थितीचा उपयोग करून घेतला. पौल व सिला यांची सुटका करण्यात आली आणि बंदिशाळेच्या नायकासोबत त्याच्या सबंध कुटुंबाने सत्य स्वीकारले. (प्रेषितांची कृत्ये १६:१९-३३) सुवार्तेच्या प्रचाराला विरोध करणारे या कार्याला खीळ घालू शकत नाहीत हेच अशाप्रकारच्या अनुभवांवरून दिसून येते. (यशया ५४:१७) अर्थात, ख्रिस्ती धर्माचा इतिहास हा केवळ अविरत संकटांचा व छळाचा इतिहास होता असे म्हणता येणार नाही. तर आता आपण पहिल्या आणि २० व्या शतकात सुवार्तेच्या फलदायी प्रचाराला सहायक ठरलेल्या काही गोष्टी विचारात घेऊ.
धार्मिक वातावरण
९, १०. पहिल्या आणि २० व्या शतकात यहोवाने सुवार्तेच्या प्रचाराआधी लोकांमध्ये कशाप्रकारे उत्सुकता निर्माण केली?
९ या दोन्ही काळांत ज्या विशिष्ट वेळी जागतिक प्रचार कार्य केले गेले त्याचा विचार करा. पहिल्या शतकातील स्थितीचा विचार केल्यास, दानीएल ९:२४-२७ यात दिलेल्या ७० वार्षिक सप्ताहांच्या भविष्यवाणीने मशिहा येण्याच्या नेमक्या वर्षाकडे, सा.यु. २९ या वर्षाकडे लक्ष वेधले होते. पहिल्या शतकातल्या यहुद्यांना घटनांची नेमकी वेळ माहीत नसली तरीसुद्धा ते मशिहा येण्याच्या अपेक्षेत होते, त्याची वाट पाहात होते. (लूक ३:१५) फ्रेंच भाषेतल्या मान्युएल बीब्लीक या ग्रंथात म्हटले आहे: “दानीएलाने ठरवून दिलेली वर्षांची सत्तर सप्तके संपत आली आहेत हे लोकांना माहीत होते; बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाने देवाचे राज्य जवळ आले आहे असे घोषित केले तेव्हा कोणाला फारसे आश्चर्य झाले नाही.”
१० आधुनिक काळातील स्थितीविषयी काय म्हणता येईल? या आधुनिक काळात जी अतिशय विशेष अशी घटना घडली ती म्हणजे येशूचे स्वर्गात सिंहासनारूढ होणे; त्याला राज्यसत्ता देण्यात आली आहे आणि त्याच्या उपस्थितीची सुरवात झाली आहे या गोष्टीचा हा संकेत होता. बायबलच्या भविष्यवाणींनुसार ही घटना १९१४ साली घडली. (दानीएल ४:१३-१७) आधुनिक काळातही काही धार्मिक लोक या घटनेची वेळ आली आहे हे ओळखून ती घडण्याच्या अपेक्षेत होते. झायन्स वॉचटावर ॲन्ड हेरल्ड ऑफ क्राइस्ट्स प्रेझेन्स (सियोनचा टेहळणी बुरूज व ख्रिस्ताच्या उपस्थितीचा अग्रदूत) या मूळ नावाने हे नियतकालिक १८७९ सालापासून प्रकाशित करणारे प्रांजळ बायबल विद्यार्थी देखील या घटनेच्या अपेक्षेत होते. अशाप्रकारे, पहिल्या शतकात तसेच आधुनिक काळातही धार्मिक अपेक्षा उंचावल्यामुळे सुवार्तेच्या प्रचाराकरता अनुकूल वातावरण निर्माण झाले.a
११. कोणत्या प्रकारच्या धार्मिक परिस्थितीने सुवार्तेच्या प्रचाराला हातभार लावला?
११ या दोन्ही काळांत ज्या आणखी एका गोष्टीने ख्रिश्चनांच्या कार्याला हातभार लावला ती अशी की बरेच लोक पवित्र शास्त्रवचनांशी सुपरिचित होते. पहिल्या शतकात, आजूबाजूच्या बऱ्याच विदेशी राष्ट्रांत यहुदी वसाहती होत्या. या वसाहतींत यहुद्यांची सभास्थाने होती आणि त्याठिकाणी लोक नियमितपणे एकत्र येऊन शास्त्रवचनांचे वाचन ऐकत व त्यांवर चर्चा करत. अशारितीने, लोकांजवळ जे धार्मिक ज्ञान आधीपासूनच होते त्याच्या आधारावर ख्रिश्चन लोक त्यांना अधिक शिक्षण देऊ शकले. (प्रेषितांची कृत्ये ८:२८-३६; १७:१, २) या आधुनिक काळाच्या सुरवातीला देखील यहोवाच्या लोकांना अशाच प्रकारच्या अनुकूल वातावरणाचा फायदा घेऊन अनेक देशांतील लोकांना मदत करता आली. ख्रिस्ती धर्मजगताच्या व्यापक साम्राज्यात, विशेषतः प्रोटेस्टंट राष्ट्रांत बायबल हे अगदी सर्वांच्या ओळखीचे होते. बऱ्याच ख्रिस्ती देवळांमध्ये त्याचे वाचन केले जायचे, आणि लाखो लोकांच्या घरीही बायबल होते. पण बायबल त्यांच्या हातात असले तरीसुद्धा ते कोणाच्या मदतीशिवाय समजून घेणे शक्य नव्हते.
अनुकूल कायदे
१२. पहिल्या शतकात रोमी कायदे बहुतेकवेळा कशाप्रकारे संरक्षक ठरले?
१२ बऱ्याचदा सरकारी कायदे ख्रिस्ती प्रचार कार्याला सहायक ठरले आहेत. पहिल्या शतकात रोमी साम्राज्याचे जगावर प्रभुत्व होते आणि रोमी सरकारच्या लिखित कायद्यांचा लोकांच्या दैनंदिन जीवनावर बराच पगडा होता. हे कायदे लोकांच्या संरक्षणार्थ होते आणि सुरवातीच्या ख्रिश्चनांना त्यांचा लाभ झाला. उदाहरणार्थ, एक प्रसंगी पौलाने रोमी कायद्याचा आश्रय घेतल्यामुळे त्याला कैदेतून सुटका मिळू शकली आणि फटके खावे लागले नाहीत. (प्रेषितांची कृत्ये १६:३७-३९; २२:२५, २९) रोमी कायदे व्यवस्थेतील एका कायद्याचा उल्लेख केल्यामुळे एकदा त्याला इफिस येथे एका संतप्त जमावाला शांत करता आले. (प्रेषितांची कृत्ये १९:३५-४१) एकदा, जेरुसलेम येथेही पौलाचा घात होणार होता पण तो रोमी नागरिक असल्यामुळे त्याची सुटका होऊ शकली. (प्रेषितांची कृत्ये २३:२७) नंतर, रोमी कायद्याच्याच आधारावर तो कैसरापुढे आपल्या विश्वासाचे कायदेशीर समर्थन करू शकला. (प्रेषितांची कृत्ये २५:११) बऱ्याच कैसरांच्या जुलूमशाहीतही पहिल्या शतकातील कायदे “सुवार्तेसंबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात” सहायकच ठरले.—फिलिप्पैकर १:७.
१३. आपल्या काळात कायदेव्यवस्था प्रचार कार्याला कशाप्रकारे सहायक ठरली आहे?
१३ आजही बऱ्याच राष्ट्रांत हीच परिस्थिती आहे. काहींनी “उपद्रव योजून अन्याय” करण्याचा प्रयत्न केला हे खरे असले तरीसुद्धा बहुतेक देशांच्या लिखित कायद्यांमध्ये धार्मिक स्वातंत्र्याला एक मूलभूत हक्क मानण्यात आले आहे. (स्तोत्र ९४:२०) यहोवाच्या साक्षीदारांकडून सामाजिक सुव्यवस्थेला कोणत्याही प्रकारचा धोका नाही हे ओळखून, बऱ्याच सरकारांनी आपल्या कार्याला कायदेशीर संमती दिली आहे. साक्षीदारांचे अधिकांश साहित्य अमेरिकेत मुद्रित केले जाते, आणि येथे सध्या अंमलात असणाऱ्या कायद्यांमुळे टेहळणी बुरूज नियतकालिकाचे प्रकाशन १२० वर्षांपासून अखंड सुरू असून सबंध जगातले लोक ते वाचत आहेत..
शांती व सहिष्णुतेचे कालावधी
१४, १५. तुलनात्मक सामाजिक स्थैर्यामुळे पहिल्या शतकात प्रचार कार्याला कशाप्रकारे हातभार लागला?
१४ तुलनात्मकरित्या शांतीच्या काळांचाही प्रचार कार्याला हातभार लागला आहे. ‘राष्ट्रावर राष्ट्र उठेल’ हे येशूने पहिल्या शतकासोबतच या आधुनिक काळाच्या बाबतीतही भाकीत केले होते आणि हे तंतोतंत पूर्णही झाले, पण युद्धांमधल्या शांततेच्या काळांत राज्य प्रचाराचे कार्य फार मोठ्या प्रमाणात पार पाडणे शक्य झाले. (मत्तय २४:७) पहिल्या शतकातील ख्रिस्ती लोक पॅक्स रोमॅना, अर्थात रोमन शांततेच्या अंमलाखाली राहात होते. एका इतिहासकाराने या संदर्भात असे लिहिले: “रोमने मध्यपूर्वेतील जवळजवळ सर्वच राष्ट्रांना काबीज करून जगाच्या या भागात शतकानुशतके चाललेल्या निरंतर युद्धांना पूर्णविराम दिला.” या स्थैर्यामुळे सबंध रोमी साम्राज्यात सुरक्षितपणे प्रवास करण्याचा ख्रिस्ती लोकांसाठी मार्ग मोकळा झाला.
१५ आपल्या हातात असलेल्या सत्तेच्या जोरावर लोकांत सलोखा आणण्याचे रोमी साम्राज्याचे ध्येय होते. त्यांच्या या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास, सहिष्णुता आणि आचारविचारांची देवाणघेवाण यांसारख्या गोष्टींना तर चालना मिळालीच पण त्यासोबत विश्वव्यापी बंधुत्वाची संकल्पनाही पुढे आली. सामाजिक विकासाची वाटचाल (इंग्रजी) नावाच्या पुस्तकात सांगितल्यानुसार: “[रोमी] साम्राज्यातील सलोख्यामुळे [ख्रिस्ती प्रचाराकरता] अतिशय अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. राष्ट्रभेदाचे अडसर केव्हाच दूर करण्यात आले होते. रोमचा नागरिक हा जगाचा नागरिक होता. . . . शिवाय ज्या राष्ट्राने स्वतःच विश्वव्यापी नागरिकत्वाची संकल्पना पुढे आणली होती त्या राष्ट्रात बंधुभावाची शिकवण देणाऱ्या धर्माचे साहजिकच स्वागत करण्यात आले.”—पडताळा प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५; १ पेत्र २:१७.
१६, १७. आधुनिक काळात शांतता राखण्याच्या प्रयत्नांना कशामुळे प्रेरणा मिळाली आणि बरेच लोक कोणत्या निष्कर्षावर आले आहेत?
१६ आपल्या काळाबाबत काय? २० व्या शतकात झाली तशी विनाशकारी युद्धे इतिहासात कधीच झाली नव्हती, आजही काही देशांत लढाया सुरूच आहेत. (प्रकटीकरण ६:४) तरीसुद्धा यादरम्यान तुलनात्मकरित्या शांतिमय वातावरण राहिले आहे. बलाढ्य म्हटले जाणाऱ्या राष्ट्रांनी जवळजवळ ५० वर्षांपासून एकमेकांविरुद्ध युद्ध केलेले नाही. ही परिस्थिती त्या राष्ट्रांत सुवार्तेच्या प्रचाराकरता अतिशय अनुकूल ठरली आहे.
१७ २० व्या शतकातील युद्धांत आलेल्या भयंकर अनुभवांमुळे लोकांनी एका जागतिक शासनाची गरज ओळखली आहे. जागतिक महायुद्धाच्या भितीपोटीच राष्ट्र संघ व संयुक्त राष्ट्रे या दोन्ही संघटनांचा जन्म झाला. (प्रकटीकरण १३:१४) या दोन्ही संघटनांनी जे मुख्य उद्दिष्ट घोषित केले होते ते सारखेच होते, अर्थात आंतरराष्ट्रीय सहकार्य व शांततेला बढावा देणे. ही गरज ओळखणारे लोक, खरी व कायमस्वरूपी शांती आणणाऱ्या जागतिक शासनाच्या—देवाच्या राज्याच्या सुवार्तेला सहसा चांगला प्रतिसाद देतात.
१८. कोणत्या प्रकारची धार्मिक मनोवृत्ती प्रचार कार्याला अनुकूल ठरली आहे?
१८ ख्रिश्चनांना कधीकधी अतिशय क्रूर छळ सोसावा लागला हे खरे आहे, परंतु पहिल्या आणि २० व्या शतकातही विशिष्ट काळांत धार्मिक सहिष्णुतेचे वातावरण राहिले आहे. (योहान १५:२०; प्रेषितांची कृत्ये ९:३१) रोमी लोक ज्या राष्ट्रांवर विजय मिळवायचे, त्या राष्ट्रांच्या देवीदेवतांना आपल्याशी आणि आपल्याला त्यांच्याशी जुळवून घ्यायचे. प्राध्यापक रॉड्नी स्टार्क यांनी लिहिल्यानुसार: “बऱ्याच बाबतींत रोमने जितके धार्मिक स्वातंत्र्य देऊ केले होते, तितके अमेरिकन क्रांती होईपर्यंत कोठही देण्यात आले नव्हते.” अलीकडच्या काळांत बऱ्याच देशांतील लोक इतर धर्मांच्या विचारांप्रती ग्रहणशील मनोवृत्ती दाखवू लागले आहेत आणि त्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांचा बायबलमधील संदेशही ऐकून घेण्यासाठी सहसा त्यांची हरकत नसते.
तंत्रज्ञानाचे योगदान
१९. सुरवातीच्या ख्रिश्चनांनी कशाप्रकारे कोडेक्सचा चांगला उपयोग करून घेतला?
१९ शेवटी, यावर विचार करूया की यहोवाने कशाप्रकारे आपल्या लोकांना तांत्रिक प्रगतीचा फायदा करून घ्यायला मदत केली आहे. सुरवातीच्या ख्रिश्चनांचे युग हे जलद तांत्रिक प्रगतीचे युग नव्हते हे खरे असले तरी, एक प्रगती मात्र त्यांनी केली होती; ती म्हणजे कोडेक्स, अर्थात पृष्ठांचे पुस्तक. कोडेक्स येण्याआधी गुंडाळ्या वापरल्या जायच्या, पण त्या अतिशय गैरसोयीच्या होत्या. कोडेक्सचा जन्म (इंग्रजी) या ग्रंथात सांगितले आहे: “धर्मेतर वाङ्मयात गुंडाळ्यांचा वापर थांबवून कोडेक्सचा वापर सुरू करायला बराच अवकाश लागला, टप्प्याटप्प्याने हा बदल घडून आला. पण त्याउलट ख्रिस्ती धर्मात कोडेक्सचा वापर अगदी लगेच व अतिशय व्यापक प्रमाणात सुरू करण्यात आला.” याच ग्रंथात असेही म्हटले आहे की “ख्रिस्ती धर्मात दुसऱ्या शतकात कोडेक्सचा वापर इतका व्याप्त होता की त्याची सुरवात इ.स. १०० च्याही आधी झाली असावी असे भासते.” कोडेक्स ग्रंथ हा गुंडाळीच्या तुलनेत खूपच सोयीस्कर होता. यात शास्त्रवचने अगदी लगेच शोधता यायची. पौलासारख्या सुरवातीच्या ख्रिश्चनांना याचा उपयोग निश्चितच झाला असेल, कारण ते शास्त्रवचनांचा केवळ खुलासाच करायचे नाहीत तर ज्या गोष्टी ते शिकवायचे त्यांचे संदर्भ दाखवून “प्रतिपादन” देखील करायचे.—प्रेषितांची कृत्ये १७:२, ३.
२०. देवाच्या लोकांनी जगव्याप्त प्रचार कार्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करून घेतला आहे आणि का?
२० आपल्या शतकातली तांत्रिक प्रगती खरोखर विलक्षण आहे. अति जलद मुद्रण यंत्रांमुळे बायबल साहित्याचे बऱ्याच भाषांत एकाचवेळी प्रकाशन शक्य झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे बायबलच्या भाषांतर कार्यातही गती आली आहे. ट्रक, रेल्वे, जहाजे व विमाने यांच्या मदतीने बायबल साहित्य फार कमी वेळात सबंध पृथ्वीवर पोचवले जाऊ शकते. दूरध्वनी व फॅक्स यंत्रांमुळे क्षर्णार्धात संपर्क साधण्याचे स्वप्न वास्तवात उतरले आहे. यहोवाने आपल्या आत्म्याच्या प्रेरणेने आपल्या सेवकांना सुवार्तेचा प्रचार सबंध जगात करण्यासाठी या तांत्रिक सोयीसवलतींचा पुरेपूर फायदा करून घेण्यास प्रवृत्त केले आहे. जगातल्या अत्याधुनिक आविष्कारांची माहिती करून घेण्याच्या आणि त्यांचा फायदा करून घेण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन यहोवाचे सेवक या सोयीसवलतींचा उपयोग करत नाहीत. तर आपले प्रचाराचे कार्य कशाप्रकारे सर्वात परिणामकारक रितीने पार पाडता येईल यातच त्यांना सर्वात जास्त स्वारस्य आहे.
२१. आपण कोणत्या गोष्टीची पक्की खात्री बाळगू शकतो?
२१ येशूने भाकीत केले होते: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल.” (मत्तय २४:१४) पहिल्या शतकात ज्याप्रकारे ख्रिश्चनांना या भविष्यवाणीची पूर्तता पाहायला मिळाली त्याचप्रकारे आज आपल्यालाही ती अतिशय मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. हे कार्य इतके व्यापक आणि कठीण असले तरीसुद्धा, अनुकूलच नव्हे तर प्रतिकूल परिस्थितीतही, बदलणाऱ्या कायद्यांना आणि धोरणांना तोंड देऊन, युद्धाच्या आणि शांतीच्या काळांत आणि नानाविध तांत्रिक शोध होत असताना सुवार्तेचा प्रचार करण्यात आला आणि आजही केला जात आहे. याचा विचार करून तुम्हाला यहोवाच्या बुद्धीचे आणि त्याच्या विलक्षण दूरदृष्टीचे आश्चर्य वाटत नाही का? आपण अगदी पूर्ण खात्री बाळगू शकतो की प्रचाराचे कार्य यहोवाच्या वेळापत्रकानुसार निश्चित पार पाडले जाईल आणि त्याचा प्रेमळ उद्देश पूर्ण होऊन नीतिमान लोकांना उदंड आशीर्वाद प्राप्त होतील. ते या पृथ्वीचे वतन पावतील आणि सदासर्वदा तिच्यावर वास करतील. (स्तोत्र ३७:२९; हबक्कूक २:३) आपण देवाच्या उद्देशाला अनुसरून जीवन जगलो तर आपणही त्यांच्यापैकी एक असू.—१ तीमथ्य ४:१६.
[तळटीपा]
a मशिहाशी संबंधित असलेल्या या दोन भविष्यवाण्यांवर सविस्तर स्पष्टीकरणासाठी, वॉच टावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान पुस्तकातील पृष्ठे ३६, ९७ आणि ९८-१०७ पाहा.
उजळणीचे मुद्दे
◻ सुवार्ता प्रचाराचे कार्य इतके आव्हानात्मक का ठरले आहे?
◻ सरकारी सवलती व तुलनात्मक सामाजिक स्थैर्य यांमुळे ख्रिस्ती लोकांच्या कार्याला कशाप्रकारे साहाय्य झाले आहे?
◻ प्रचार कार्यावर यहोवाने जो आशीर्वाद दिला आहे तो पाहून भविष्यातील घटनांबद्दल आपण कोणती खात्री बाळगू शकतो?