ग्रीक तत्त्वज्ञान—त्याने ख्रिस्ती धर्माला सुशोभित केले का?
“मूर्तिपूजक ग्रीक व रोमन संस्कृतीचा विरोध करणाऱ्या ख्रिस्ती धर्माने खरे तर त्यांचे पुष्कळसे तत्त्वज्ञान स्वीकारले.”—द एन्सायक्लोपिडिआ अमेरिकाना.
“ख्रिस्ती” विश्वासावर निश्चित प्रभाव पाडलेल्यांपैकी एक होता “संत” ऑगस्टीन. द न्यू एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका यानुसार, “ख्रिस्ती धर्मामध्ये प्लेटोच्या ग्रीक तत्त्वज्ञानाची भेसळ करण्यात [ऑगस्टीनचा] मोठा हात होता; आणि या भेसळीतून निर्माण झालेल्या शिकवणी देखील त्यानेच मध्ययुगीन रोमन कॅथलिक धर्म आणि प्रबोधन काळातील प्रोटेस्टंट धर्म यांच्यात पसरवल्या.”
ऑगस्टीनने हवाली केलेला वारसा आजपर्यंत टिकून राहिला आहे. ग्रीक तत्त्वज्ञानाने ख्रिस्ती धर्मजगतावर कोठवर प्रभाव पाडला आहे याविषयी बोलताना डग्लस टी. होल्डन म्हणतात: “ख्रिस्ती धर्म आणि ग्रीक तत्त्वज्ञान इतके एकजीव झाले आहे, की ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांमध्ये ९० टक्के ग्रीक विचार तर फक्त १० टक्के ख्रिस्ती विचार आहेत.”
काही विद्वानांना ठामपणे वाटते, की या तात्त्विक प्रभावाने त्यावेळी नुकत्याच सुरू झालेल्या ख्रिस्ती धर्माला सुशोभित केले, त्याच्या शिकवणींची गुणवत्ता वाढवली आणि तो आणखी पटण्यालायक केला. पण असे खरेच झाले का? ग्रीक तत्त्वज्ञानाचा केव्हा आणि कसा प्रभाव पडला? त्याने ख्रिस्ती धर्माला सुशोभित केले की भ्रष्ट केले?
चार विचित्र संज्ञांचे परीक्षण करून सा.यु.पू. तिसऱ्या शतकापासून सा.यु. पाचव्या शतकापर्यंत घडलेल्या घटनांचा छडा लावल्यावर आपल्याला बरीच माहिती मिळते; त्या चार संज्ञा आहेत: (१) “ग्रीक तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेला यहुदी धर्म,” (२) “ख्रिस्ती धर्माने प्रभावित झालेले ग्रीक तत्त्वज्ञान,” (३) “ग्रीक तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेला ख्रिस्ती धर्म,” आणि (४) “ख्रिस्ती तत्त्वज्ञान.”
“ग्रीक तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेला यहुदी धर्म”
पहिले, “ग्रीक तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेला यहुदी धर्म,” म्हणजे चक्क विसंगती आहे. इब्री लोकांच्या मूळ धर्माची सुरवात खरा देव यहोवा याने केली होती; हा धर्म खोट्या धार्मिक कल्पनांनी दूषित व्हायचा नव्हता. (अनुवाद १२:३२; नीतिसूत्रे ३०:५, ६) परंतु, अगदी सुरवातीपासूनच, शुद्ध उपासनेला, ईजिप्त, कनान आणि बॅबिलोन या देशांच्या खोट्या धार्मिक प्रथा आणि विचारसरणी यांनी दूषित होण्याचा धोका होता. दुःखाची गोष्ट म्हणजे, इस्राएलने शुद्ध उपासना बऱ्याच प्रमाणात भ्रष्ट होऊ दिली.—शास्ते २:११-१३.
अनेक शतकांनंतर प्राचीन पॅलेस्टाईन जेव्हा, सा.यु.पू. चौथ्या शतकात थोर सिकंदरच्या अधिकाराखाली ग्रीक साम्राज्याचा भाग बनले तेव्हा ही भ्रष्टता इतकी वाढली की यहुदी धर्माला पुन्हा शुद्ध करणे अशक्य झाले. सिकंदरने यहुद्यांना आपल्या सैन्यात भरती केले. अशाने यहुदी लोक आणि त्यांच्या नवीन राजामधील संबंध वाढल्यामुळे त्यांच्या धार्मिक विचारसरणीवर त्याचा खोलवर प्रभाव पडला. यहुदी धर्माच्या शिकवणींमध्ये ग्रीक तत्त्वज्ञान मिसळलेले होते. इतकेच नव्हे तर, महायाजक जेसनने होमरच्या विचारांचा पुरस्कार करण्याकरता सा.यु.पू. १७५ साली जेरुसलमेमध्ये एक ग्रीक शिक्षण संस्था स्थापन केली.
गंमत म्हणजे, सा.यु.पू. दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात एका शोमरोनी व्यक्तीने बायबलमधील इतिहास ग्रीक इतिहासाप्रमाणे सादर करण्याचा प्रयत्न केला. जुडीथ आणि टोबीट या बायबलमध्ये जोडण्यात आलेल्या यहुदी जादा पुस्तकांमध्ये चक्क ग्रीक शृंगारिक दंतकथांचा अप्रत्यक्ष उल्लेख केला आहे. असे पुष्कळ यहुदी तत्त्वज्ञानी जन्मले ज्यांनी ग्रीक विचारांना यहुदी धर्म आणि बायबल यांच्याशी जुळवण्याचा प्रयत्न केला.
याचे सर्वात जास्त श्रेय फायलो याला दिले जाते; तो सा.यु. पहिल्या शतकातला एक यहुदी होता. त्याने प्लेटोच्या (सा.यु.पू. चौथे शतक), पायथागोरियन आणि स्टोईक लोकांच्या शिकवणींचा उपयोग केला. यहुदी लोकांवर फायलोच्या मतांचा गहिरा प्रभाव पडला. यहुदी संस्कृतीमध्ये ग्रीक विचारांची भेसळ, या बौद्धिक करामतीविषयी यहुदी लेखक मॅक्स डिमंट यांनी असे म्हटले: “प्लेटोनिक विचार, अरिस्टोटेलियन तर्कशास्त्र आणि युक्लिडियन शास्त्र यांचे ज्ञान असलेल्या यहुदी विद्वानांनी तोरहला नवीन प्रकारे समजण्याचा प्रयत्न केला. . . . त्यांनी यहुदी शिकवणींना ग्रीक तर्कानुसार शिकवण्यास सुरू केले.”
कालांतराने, रोमनांनी ग्रीक साम्राज्य बळकावले तेव्हा जेरुसलेमवर कब्जा मिळवला. यामुळे आणखी मोठाले बदल करण्यासाठी मार्ग मोकळा झाला. सा.यु. तिसऱ्या शतकापर्यंत, प्लेटोच्या कल्पना वाढवण्याचा व एकत्र करण्याचा प्रयत्न केलेल्या विचारवंतांचे तात्त्विक व धार्मिक सिद्धान्त आकार घेऊ लागले; यालाच नवप्लेटोवाद म्हटले जाते. या विचारशैलीचा, धर्मत्यागी ख्रिस्ती धर्मावर नक्कीच गहिरा प्रभाव पडला.
“ख्रिस्ती धर्माने प्रभावित झालेले ग्रीक तत्त्वज्ञान”
आपल्या सामान्य युगाच्या पहिल्या पाच शतकांदरम्यान, काही बुद्धिवंतांनी, ग्रीक तत्त्वज्ञान आणि बायबलमध्ये प्रकट केलेल्या सत्यामध्ये संबंध आहे, हे प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला. ख्रिस्ती धर्माचा इतिहास (इंग्रजी), नावाच्या पुस्तकात असे म्हटले आहे: “येशूच्या आधीच्या दशकांमधील ग्रीक लोक देवाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी खूप भटकले; हे ज्ञान नक्की कोठे मिळू शकेल याची त्यांना जराही माहिती नव्हती. त्यांचा हा प्रयत्न जणू, शून्यातून येशूला तयार करणे, आपल्याच विचारानुसार ख्रिस्ती धर्माची कल्पना तयार करणे होता.”
असा विचार करणाऱ्यांमध्ये प्लोटिनसचा (सा.यु.पू. २०५-२७०) अग्र क्रमांक होता; त्याच्या शिकवणी खासकरून प्लेटोच्या तत्त्वज्ञानावर आधारित होत्या. आत्मा शरीरापासून वेगळा आहे या कल्पनेची सुरवात केली. प्राध्यापक ई. डब्ल्यू. हॉपकिन्स, प्लोटिनसबद्दल असे म्हणाले: “त्याच्या शिकवणींचा . . . ख्रिस्ती मताच्या नेत्यांवर काही कमी प्रभाव पडला नाही.”
“ग्रीक तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेला ख्रिस्ती धर्म” आणि “ख्रिस्ती तत्त्वज्ञान”
“ख्रिस्ती” तत्त्ववेत्त्यांनी सा.यु. दुसऱ्या शतकापासून मूर्तिपूजक बुद्धिवंतांवर आपली छाप पाडण्याचा कसोशीने प्रयत्न केला. “जे पवित्र आहे त्याला विटाळविणाऱ्या रिकाम्या वटवटीपासून” आणि “विद्या हे नाव चुकीने पडलेल्या विरोधी मतापासून” दूर राहण्याचा स्पष्ट इशारा प्रेषित पौलाने दिला होता; तरीसुद्धा या शिक्षकांनी आपल्या शिकवणींमध्ये आजूबाजूच्या ग्रीक संस्कृतींमधील तत्त्वज्ञानी विचारांचे मिश्रण केले. (१ तीमथ्य ६:२०, NW) फायलोकडे पाहून त्यांना वाटले, की प्लेटोच्या कल्पनांशी बायबलचा मेळ घालणे कदाचित शक्य होईल.—पडताळा २ पेत्र १:१६.
परंतु, प्रत्येक वेळी बायबलच्या सत्यालाच सुळावर चढवले जाई. ख्रिस्ती धर्मात आणि ग्रीक व रोमी सिद्धान्तांमध्ये साम्यता आहे असे दाखवण्याचा “ख्रिस्ती” शिक्षकांनी प्रयत्न केला. अलेक्झांड्रियाचा क्लेमेंट आणि ओरीजन (सा.यु. दुसरे आणि तिसरे शतक) यांनी नवप्लेटोवादाला, ज्याला “ख्रिस्ती तत्त्वज्ञान” म्हटले जाऊ लागले त्याचा पाया बनवले. मिलानचे बिशप ॲम्ब्रोज (सा.यु. ३३९-३९७) यांनी “सर्वात नवीन ग्रीक, ख्रिस्ती आणि अख्रिस्ती तत्त्वज्ञान—विशेषकरून अख्रिस्ती नवप्लेटोवादी प्लोटिनसच्या शिकवणी शिकून घेतल्या होत्या.” त्यांनी शिक्षित रोमनांपुढे, ग्रीक आणि रोमन तत्त्वज्ञानांचा समावेश असलेला ख्रिस्ती धर्म सादर करण्याचा प्रयत्न केला. ऑगस्टीनने देखील असेच केले.
एका शतकानंतर, डायोनायसियसने (याला नकली डायोनायसियस, असेही म्हटले जाते) नवप्लेटोवादी तत्त्वज्ञान आणि “ख्रिस्ती” वेदान्त यांना एकत्र करायचा प्रयत्न केला; डायोनायसियस, अरीयपगाचा एक सदस्य आणि कदाचित सिरियन सन्यासी होता. एका विश्वकोशानुसार, “त्याच्या लिखाणांनी मध्ययुगातील बहुतेक ख्रिस्ती शिकवणींवर आणि आध्यात्मिकतेवर नवप्लेटोवादी तत्त्वज्ञानाचा प्रभाव पाडला व त्या शिकवणींचे काही धार्मिक स्वरूपाचे भाग आजपर्यंत जसेच्या तसे आहेत.” प्रेषित पौलाने ‘माणसांच्या संप्रदायाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भुलथापा’ यांच्यापासून दूर राहण्याच्या इशाऱ्याचे किती हे घोर उल्लंघन!—कलस्सैकर २:८.
भ्रष्ट शिकवणी
असे म्हटले जाते, की “ख्रिस्ती प्लेटोवादी, देवाने सांगितलेल्या सत्य गोष्टींचा खूप आदर करत असत; शास्त्रवचनांतील शिकवणी व चर्च परंपरा समजून घेण्याचा व त्यांचे समर्थन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्लेटोनी तत्त्वज्ञान, असे त्यांना वाटले.”
मनुष्यामध्ये अमर आत्मा असतो याची पक्की खात्री स्वतः प्लेटोला झाली होती. लक्षवेधक गोष्ट म्हणजे, आत्म्याच्या अमरत्वाची शिकवण, “ख्रिस्ती” वेदान्तात शिरलेल्या खोट्या शिकवणींपैकी सर्वात प्रमुख शिकवण आहे. ही शिकवण स्वीकारल्याने ख्रिस्ती धर्म बहुतेक लोकांना अधिक आकर्षक वाटला म्हणून हे योग्य होते अशी सबब मुळीच देता येऊ शकत नाही. ग्रीक संस्कृतीचे केंद्रस्थान असलेल्या अथेन्समध्ये प्रचार करताना प्रेषित पौलाने, आत्म्यासंबंधीची प्लेटोची शिकवण दिली नाही. तर, त्याने पुनरुत्थानाची ख्रिस्ती शिकवण दिली; त्याची ही शिकवण अनेक ग्रीक लोकांना पचनी पडली नाही तरीही.—प्रेषितांची कृत्ये १७:२२-३२.
बायबलमध्ये, ग्रीक तत्त्वज्ञानापेक्षा वेगळी शिकवण दिली आहे; मृत्यूनंतर मानवाची खरी अवस्था काय असते त्याविषयी बायबल अगदी स्पष्टपणे सांगते: “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतास तर काहीच कळत नाही; त्यांस आणखी काही फलप्राप्ति व्हावयाची नसते; त्यांचे स्मरण कोणास राहत नाही.” (उपदेशक ९:५) मानवाच्या आत काहीतरी अमर आहे अशी शिकवण बायबल देत नाही. मेल्यावर मनुष्याचे अस्तित्व समाप्त होते, हे बायबलमधील साधेसोपे सत्य आहे.
दुसरी एक खोटी शिकवण येशूच्या मानवप्रकृती पूर्वीच्या अस्तित्वाविषयीची आहे; त्यावेळी तो आपल्या पित्याच्या बरोबरीचा होता अशी ती शिकवण आहे. पहिल्या तीन शतकांचे चर्च (इंग्रजी) नावाच्या पुस्तकात म्हटले आहे: “त्रैक्य शिकवणीची सुरवात, . . . यहुदी आणि ख्रिस्ती शास्त्रवचनांपासून अगदी भिन्न असलेल्या उगमाकडून झाली.” कोणता उगम? “प्लेटोचे तत्त्वज्ञान मानणाऱ्या पाळकांनी ही शिकवण निर्माण केली आणि ख्रिस्ती धर्मात जोडली.”
आणि, जसजशी वेळ निघून गेली व चर्च पाळकांवर नवप्लेटोवादाचा गहिरा प्रभाव पडत गेला तसतसे त्रैक्य सिद्धान्त मानणारे अनुयायी वाढत गेले. तिसऱ्या शतकातल्या नवप्लेटोवादी तत्त्वज्ञानाच्या साहाय्याने त्यांनी जे अशक्य ते शक्य करण्याचा प्रयत्न केला—तीन देवांचा मिळून एक देव बनवण्याचा प्रयत्न केला. तीन व्यक्तींचा एक देव असला तरी प्रत्येक व्यक्तीला आपआपले वैशिष्ट्य असू शकते अशा तत्त्वज्ञानाच्या आधारावर त्यांनी तर्क केला!
परंतु, बायबलमधील सत्य स्पष्टपणे दाखवते, की केवळ यहोवा सर्वसमर्थ देव आहे, येशू ख्रिस्त हा त्याच्या बरोबरीचा नव्हे तर निर्मित पुत्र आहे आणि पवित्र आत्मा ही देवाची कार्यकारी शक्ती आहे. (अनुवाद ६:४; यशया ४५:५; प्रेषितांची कृत्ये २:४; कलस्सैकर १:१५; प्रकटीकरण ३:१४) त्रैक्याचा सिद्धान्त एकमात्र खऱ्या देवाचा अपमान करतो व लोकांना गोंधळवून टाकतो; खरा देव कोण हे त्यांना समजत नसल्यामुळे ते त्याच्यापासून दूर जातात.
ख्रिस्ती विचारशैलीने नवप्लेटोवादी तत्त्वज्ञान स्वीकारल्यामुळे, बायबल आधारित ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीची आशा या आणखी एका शिकवणीवर प्रभाव पडला. (प्रकटीकरण २०:४-६) ओरिजन, हजार वर्षीय राज्याच्या शिकवणीवर विश्वास ठेवणाऱ्यांची निंदा करणाऱ्यांत गाजलेला होता. ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राज्याच्या मजबूत आधार असलेल्या बायबलमधील शिकवणीचा तो इतका का विरोध करत होता? कॅथलिक विश्वकोश (इंग्रजी) म्हणतो: “[ओरिजन]च्या शिकवणी नवप्लेटोवादी तत्त्वज्ञानावर आधारित असल्यामुळे . . . हजार वर्षीय राज्याची शिकवण देणाऱ्यांची तो कड घेऊ शकत नव्हता.”
सत्य
वर उल्लेखण्यात आलेल्या एकाही शिकवणीचा बायबल सत्यावर परिणाम झाला नाही. हे सत्य म्हणजे, बायबलमध्ये आढळणाऱ्या सर्व शिकवणी ख्रिस्ती आहेत. (२ करिंथकर ४:२; तीत १:१, १४; २ योहान १-४) केवळ बायबलच, सत्याचा एकमात्र उगम आहे.—योहान १७:१७; २ तीमथ्य ३:१६.
परंतु, यहोवाचा, सत्याचा, मानवजातीचा आणि सार्वकालिक जीवनाचा शत्रू दियाबल सैतान जो “मनुष्यघातक” व “लबाडीचा बाप” आहे त्याने सत्यात भेसळ करण्याच्या अनेकानेक धूर्त मार्गांचा उपयोग केला. (योहान ८:४४; पडताळा २ करिंथकर ११:३.) ख्रिस्ती शिकवणींच्या मजकुरामध्ये आणि स्वरूपामध्ये फेरबदल करण्याच्या हेतूने त्याने वापरलेल्या साधनांपैकी सर्वात शक्तिशाली साधन आहे मूर्तिपूजक ग्रीक तत्त्ववेत्त्यांच्या शिकवणी; या शिकवणी खरे तर त्याच्या स्वतःच्याच विचारसरणीच्या प्रतिबिंब आहेत.
ख्रिस्ती शिकवणींचे ग्रीक तत्त्वज्ञानाबरोबर अनुचित मिश्रण म्हणजे बायबलमधील सत्य दूषित करायचा प्रयत्न आहे, ज्यामुळे बायबल सत्याची शक्ती कमी होते आणि नम्र, प्रामाणिक व ग्रहणीय सत्य शोधकांना ते अपीलकारक वाटत नाही. (१ करिंथकर ३:१, २, १९, २०) यामुळे, स्फटिकासारख्या स्पष्ट बायबल शिकवणी देखील अशुद्ध होतात आणि खरे व खोटे यांतला फरक लोकांना पटकन कळून येत नाही.
आज, मंडळीचा मस्तक येशू ख्रिस्त याच्या मार्गदर्शनाखाली, खरी ख्रिस्ती शिकवण पूर्ववत करण्यात आली आहे. तसेच, प्रामाणिक सत्यशोधक अगदी सहजपणे खऱ्या ख्रिस्ती मंडळीला तिच्या फळांवरून ओळखू शकतात. (मत्तय ७:१६, २०) यहोवाचे साक्षीदार अशा लोकांना, सत्याचे शुद्ध पाणी मिळवून देण्यासाठी आणि आपला पिता यहोवा याच्याकडून सार्वकालिक जीवनाचा जो वारसा मिळणार आहे तो प्राप्त करण्यासाठी त्यांना मदत करण्यास तयार व उत्सुक आहेत.—योहान ४:१४; १ तीमथ्य ६:१९.
[११ पानांवरील चित्र]
ऑगस्टीन
[Picture Credit Lines on page 10]
ग्रीक उतारा: प्राचीन ग्रीक लेखक (इंग्रजी) पुस्तकातून: Plato’s Phaedo, 1957, Ioannis N. Zacharopoulos, Athens; प्लेटो: Musei Capitolini, Roma