पालकांनो, तुमचे उदाहरण काय शिकवते?
“देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा, आणि . . . प्रीतीने चाला.”—इफिसकर ५:१, २.
१. पहिल्या मानवी दांपत्याला यहोवाने कोणत्या प्रकारचे मार्गदर्शन दिले होते?
यहोवा कौटुंबिक व्यवस्थेचा जनक आहे. त्याने पहिल्या कुटुंबाची स्थापना केली आणि पहिल्या मानवी दांपत्याला प्रजननशक्ती दिली या कारणास्तव प्रत्येक कुटुंब त्याचे ऋणी आहे. (इफिसकर ३:१४, १५) आदाम आणि हव्वा यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांच्या संबंधाने त्याने काही मूलभूत सूचना दिल्या आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरता त्याने त्यांना पुरेसे स्वातंत्र्य देखील दिले. (उत्पत्ति १:२८-३०; २:६, १५-२२) आदाम आणि हव्वा यांनी केलेल्या पापामुळे कुटुंब चालवणे अवघड होऊन बसले. पण, आपल्या सेवकांना सहायक ठरतील अशी काही मार्गदर्शक तत्त्वे यहोवाने दिली आहेत.
२. (अ) लिखित सूचनांसोबत तोंडी मार्गदर्शन देण्याकरता यहोवाने कोणाचा उपयोग केला आहे? (ब) पालकांनी कोणता प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे?
२ आपला महान शिक्षक या नात्याने, यहोवाने आपण काय करावे आणि काय करू नये याविषयी केवळ लिखित सूचना देण्यापेक्षा पुष्कळ काही केले आहे. प्राचीन काळी त्याने याजक आणि संदेष्टे तसेच कुटुंबांच्या मस्तकांद्वारे लिखित सूचनांसोबत तोंडी मार्गदर्शन देखील दिले. आज, अशा प्रकारचे तोंडी मार्गदर्शन पुरवण्याकरता तो कोणाचा उपयोग करत आहे? ख्रिस्ती वडिलांचा आणि पालकांचा. तुम्ही पालक असल्यास, यहोवाच्या मार्गानुसार कुटुंबाला मार्गदर्शन देण्याची भूमिका तुम्ही पार पाडत आहात का?—नीतिसूत्रे ६:२०-२३.
३. प्रभावी शिक्षक या नात्याने कौटुंबिक मस्तक यहोवाकडून काय शिकू शकतात?
३ अशा प्रकारच्या सूचना कुटुंबामध्ये कशाप्रकारे देण्यात याव्यात? याबाबतीत यहोवाने कित्ता घालून दिला आहे. काय चांगले आणि काय वाईट हे तो स्पष्टपणे सांगतो तसेच तो या गोष्टींची पुष्कळ वेळा पुनरावृत्तीही करतो. (निर्गम २०:४, ५; अनुवाद ४:२३, २४; ५:८, ९; ६:१४, १५; यहोशवा २४:१९, २०) तो विचारांना प्रेरणा देणाऱ्या प्रश्नांचा उपयोग करतो. (ईयोब ३८:४, ८, ३१) दृष्टान्त आणि वास्तविक जीवनातील उदाहरणे यांद्वारे तो भावनांना स्पर्श करतो आणि आपल्या मनाला आकार देतो. (उत्पत्ति १५:५; दानीएल ३:१-२९) पालकांनो, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना शिकवता तेव्हा यहोवाने घालून दिलेल्या आदर्शाचे तुम्ही अनुकरण करता का?
४. शिक्षा देण्याच्या बाबतीत आपण यहोवाकडून काय शिकू शकतो आणि शिक्षा करणे महत्त्वाचे का आहे?
४ सत्याच्या बाबतीत यहोवा दृढ आहे, पण अपरिपूर्णतेच्या परिणामांची त्याला जाण आहे. म्हणून शिक्षा करण्याआधी, तो अपरिपूर्ण मानवांना शिकवतो आणि वारंवार बजावतो तसेच आठवण करून देतो. (उत्पत्ति १९:१५, १६; यिर्मया ७:२३-२६) शिक्षा करताना देव शिक्षेचा अतिरेक न करता ठराविक मर्यादेत शासन करतो. (स्तोत्र १०३:१०, ११; यशया २८:२६-२९) अशीच वागणूक आपण मुलांना देतो तेव्हा यहोवाला आपण जाणत असल्याचे दाखवून देतो व त्यामुळे मुलांना देखील यहोवास जाणणे सोपे जाईल.—यिर्मया २२:१६; १ योहान ४:८.
५. ऐकण्याच्या बाबतीत पालक यहोवाकडून काय शिकू शकतात?
५ आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रेमळ स्वर्गीय पिता या नात्याने यहोवा आपले ऐकतो. तो केवळ आज्ञाच देत राहत नाही. आपले मन त्याच्यापुढे मोकळे करण्याचे तो उत्तेजन देतो. (स्तोत्र ६२:८) व्यक्त करत असलेल्या भावना योग्य नसल्यास तो स्वर्गातून आपल्याला धमकावत नाही. तो धीराने आपल्याला शिकवतो. त्यामुळे प्रेषित पौलाने दिलेला सल्ला किती योग्य आहे: “देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा.” (इफिसकर ४:३१–५:१) पालकांनी त्यांच्या मुलांना कशा सूचना द्याव्यात या बाबतीत यहोवाने किती उत्तम उदाहरण मांडले! आपल्या अंतःकरणापर्यंत पोहंचणारे आणि देवाच्या मार्गात चालण्यास प्रेरणा देणारे हे उदाहरण आहे.
उदाहरणामुळे प्रभावित
६. पालकांची मनोवृत्ती आणि उदाहरण यांचा त्यांच्या मुलांवर कसा परिणाम होतो?
६ तोंडी मार्गदर्शनासोबतच लहान मुलांवर उदाहरणाचा देखील मोठा प्रभाव पडतो. पालकांची इच्छा असो अगर नसो, मुले त्यांचे अनुकरण करतातच. आपलेच काही शब्द आईवडील आपल्या मुलांच्या तोंडून ऐकतात तेव्हा त्यांना कौतुक वाटते—काहीवेळा तर धक्का देखील बसतो. जेव्हा आध्यात्मिक गोष्टींविषयी मनापासून वाटणारी कदर पालकांच्या वर्तनातून आणि मनोवृत्तीतून दिसून येते तेव्हा या गोष्टीचा मुलांवर चांगला प्रभाव पडतो.—नीतिसूत्रे २०:७.
७. इफ्ताहाने त्याच्या मुलीकरता कोणते उदाहरण मांडले आणि त्याचा काय परिणाम झाला?
७ आईवडिलांच्या आदर्शाचा मुलांवर कसा परिणाम होतो याची बायबलमध्ये कितीतरी चांगली उदाहरणे आहेत. अम्मोनी लोकांवर विजय मिळवण्याकरता यहोवाच्या मार्गदर्शनाखाली इस्राएलचे नेतृत्व करणारा इफ्ताह एक पालक देखील होता. अम्मोनच्या राजाला त्याने कसे उत्तर दिले याचा अहवाल वाचताना लक्षात येते, की यहोवाने इस्राएलसोबत केलेल्या व्यवहारांविषयीचा इतिहास इफ्ताहाने वारंवार वाचला असावा. हा इतिहास त्याने अगदी न अडखळता सांगितला, शिवाय त्याने यहोवावर पूर्ण विश्वास दाखवला. म्हणूनच, त्याच्या उदाहरणामुळे त्याच्या मुलीला तशाच प्रकारचा विश्वास आणि स्वत्यागी आत्मा विकसित करण्यास मदत मिळाली, ज्यामुळे तिने विवाह न करता संपूर्ण जीवनभर यहोवाची सेवा केली.—शास्ते ११:१४-२७, ३४-४०; पडताळा यहोशवा १:८.
८. (अ) शमुवेलाच्या पालकांनी कोणती उत्तम मनोवृत्ती दाखवली? (ब) शमुवेलाला कसा फायदा झाला?
८ शमुवेल, हा लहानपणी तर एक आदर्श बालक होताच, शिवाय त्याच्या नंतरच्या संपूर्ण जीवनातही त्याने देवाचा संदेष्टा म्हणून विश्वासूपणे कार्य केले. त्याच्याप्रमाणे तुमच्या मुलांनीही व्हावे असे तुम्हाला वाटणार नाही का? एलकाना आणि हन्ना या शमुवेलाच्या पालकांनी घालून दिलेल्या उदाहरणाचे परीक्षण करा. त्यांच्या घरची परिस्थिती इतकी चांगली नव्हती, तरी ते पवित्र निवासमंडप असलेल्या शिलो या ठिकाणी उपासनेकरता नियमितपणे जात असत. (१ शमुवेल १:३-८, २१) हन्नाने किती कळकळीने प्रार्थना केली हे विचारात घ्या. (१ शमुवेल १:९-१३) देवाला दिलेले वचन पूर्ण करण्याच्या बाबतीत त्या दोघांची कशी मनोवृत्ती होती याकडे लक्ष द्या. (१ शमुवेल १:२२-२८) त्यांच्या उत्तम उदाहरणामुळे शमुवेलास असे गुण विकसित करण्यास मदत मिळाली ज्यांमुळे यहोवाची सेवा करण्याचा दावा करणाऱ्या त्याच्या भोवतालच्या लोकांनी देवाच्या मार्गांचा अनादर केला तरी देखील तो धार्मिकतेच्या मार्गावरून ढळला नाही. कालांतराने, यहोवाने शमुवेलास त्याचा संदेष्टा या नात्याने निवडले.—१ शमुवेल २:११, १२; ३:१-२१.
९. (अ) तीमथ्याच्या घरातील कोणत्या गोष्टींमुळे त्याच्यावर चांगला प्रभाव पडला? (ब) तीमथ्य कोणत्या प्रकारचा मनुष्य बनला?
९ प्रेषित पौलाचा तरुण सोबती अर्थात तीमथ्य याच्यासारखे तुमच्या मुलाने व्हावे असे तुम्हाला वाटत नाही का? तीमथ्याचे वडील विश्वासात नव्हते, पण त्याच्या आईने आणि आजीने आध्यात्मिक गोष्टींविषयी कदर करण्यात उत्तम उदाहरण मांडले होते. आणि तीमथ्याच्या सबंध ख्रिस्ती जीवनासाठी हा एक भक्कम पाया ठरला यात शंका नाही. आपल्याला असे सांगण्यात येते, की त्याची आई युनीके आणि आजी लोईस यांच्या ‘विश्वासात कोणताही दांभिकपणा’ नव्हता. ख्रिस्ती या नात्याने त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचा दिखावटीपणा नव्हता. दावा करत असलेल्या विश्वासानिशी त्या खरोखरच जगत होत्या आणि तरुण तीमथ्यालाही त्यांनी तेच करण्यास शिकवले. तीमथ्याने हे शाबीत करून दाखवले, की तो विश्वासयोग्य होता आणि इतरांच्या कल्याणाची त्याला खरोखरच चिंता होती.—२ तीमथ्य १:५, NW; फिलिप्पैकर २:२०-२२.
१०. (अ) आपल्या मुलांवर बाहेरच्या कोणत्या लोकांचा परिणाम होऊ शकतो? (ब) अशाप्रकारचा प्रभाव आपल्या मुलांच्या बोलण्यात आणि वागण्यात दिसतो तेव्हा आपण कशाप्रकारे प्रतिक्रिया दाखवू शकतो?
१० पण, घरच्या लोकांशिवाय बाहेरच्या लोकांच्या उदाहरणांचाही मुलांवर प्रभाव पडतो. उदाहरणार्थ, शाळकऱ्यांचा, मुलांच्या कोवळ्या मनाला आकार देणाऱ्या शिक्षकांचा, जातीधर्माच्या रूढीगत रितीरिवाजांप्रमाणे सर्वांनी वागले पाहिजे असा अट्टहास करणाऱ्या लोकांचा, सर्वत्र ज्यांची वाहवा केली जाते अशा क्रिडाविश्वातील विजेत्यांचा, तसेच ज्यांच्या वर्तनावर प्रसारमाध्यमातून वारंवार प्रकाश टाकला जातो अशा अधिकाऱ्यांचा. कोट्यवधी मुले युद्धामधील क्रूरतेला बळी पडतात. तर मग, आपल्या मुलांच्या बोलण्यात किंवा वागण्यात अशा प्रकारचा प्रभाव दिसून आल्यास ते आश्चर्य करण्यासारखे आहे का? असे घडते तेव्हा आपली काय प्रतिक्रिया असावी? त्यांच्यावर खेकसल्याने किंवा कडक शब्दांत भाषण दिल्याने समस्या सुटणार आहे का? आपल्या मुलांना लगेच दटावण्याऐवजी ‘ही समस्या हाताळण्यासाठी यहोवा आपल्याशी ज्याप्रकारे व्यवहार करतो त्यातून काही अनुकरण करण्यासारखे आहे का, असे स्वतःला विचारणे शहाणपणाचे ठरेल.’—पडताळा रोमकर २:४.
११. पालकांच्या चुकांचा मुलांवर कसा प्रभाव पडतो?
११ अर्थात, अपरिपूर्ण पालकांना नेहमीच सर्वोत्तम मार्गाने परिस्थिती हाताळता येणार नाही. त्यांच्याकडून चुका ह्या होणारच. जेव्हा मुलांना हे कळते तेव्हा त्यांना आपल्या पालकांविषयी वाटणारा आदर कमी होईल का? होऊ शकतो; विशेषतः जेव्हा पालक आपलेच म्हणणे खरे करून स्वतःच्या चुका झाकण्याचा प्रयत्न करतात. पण तेच जर त्यांनी नम्र होऊन आपल्या चुका मनमोकळ्यापणाने मान्य केल्या तर असे होणार नाही. या बाबतीत, पालक आपल्या मुलांकरता एक मूर्तिमंत उदाहरण मांडू शकतात जेणेकरून मुले त्यांच्या या उदाहरणाचे अनुसरण करू शकतील.—याकोब ४:६.
आपले उदाहरण काय शिकवू शकते
१२, १३. (अ) प्रीतीविषयी मुलांना काय शिकण्याची गरज आहे आणि हे प्रभावीपणे कसे शिकवले जाऊ शकते? (ब) मुलांनी प्रीतीविषयी शिकावे हे महत्त्वाचे का आहे?
१२ तोंडी मार्गदर्शनाला एका उत्तम आदर्शाची जोड असल्यास अनेक महत्त्वपूर्ण धडे अतिशय प्रभावशालीरित्या शिकवणे शक्य होते. याची काही उदाहरणे विचारात घ्या.
१३ निःस्वार्थ प्रेम दाखवणे: उदाहरणाद्वारे शिकवण्याचा एक सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे प्रीतीचा अर्थ सांगणे. “पहिल्याने [देवाने] आपणावर प्रीति केली, म्हणून आपण प्रीति करितो.” (१ योहान ४:१९) तो प्रेमाच्या अत्युत्तम उदाहरणाचा स्रोत आहे. या तत्त्वबद्ध अगापे प्रीतीचा बायबलमध्ये १०० पेक्षा जास्त वेळा उल्लेख आहे. हा असा गुण आहे ज्यामुळे खऱ्या ख्रिश्चनांची ओळख पटते. (योहान १३:३५) अशाप्रकारचे प्रेम देव, येशू ख्रिस्त तसेच एकमेकांना—इतकेच नव्हे तर आपल्याला न आवडणाऱ्या लोकांनाही दाखवले पाहिजे. (मत्तय ५:४४, ४५; १ योहान ५:३) आपल्या मुलांना या प्रेमाविषयी शिकवण्यापूर्वी हे प्रेम प्रथम आपल्या हृदयांत असले पाहिजे, शिवाय आपल्या जीवनातून ते झळकले पाहिजे. क्रियेविना वाचाळता व्यर्थ असे म्हणतात. अशाप्रकारचे प्रेम आणि स्नेह यासारखे प्रेमाशी संबंधित असणारे इतर गुण मुलांना घरातच पाहण्यास आणि अनुभवण्यास मिळायला हवेत. या गोष्टींविना मुलांची शारीरिकरित्या, मानसिकरित्या आणि भावनात्मकरित्या वाढ खुंटते. याशिवाय, सहख्रिश्चनांप्रती प्रेम आणि स्नेह योग्यप्रकारे कसा व्यक्त केला जातो हे देखील मुलांनी दाखवण्याची गरज आहे.—रोमकर १२:१०; १ पेत्र ३:८.
१४. (अ) समाधान मिळेल असे चांगले काम करण्याकरता मुलांना कसे शिकवले जाऊ शकते? (ब) तुमच्या कौटुंबिक परिस्थितीत हे कसे केले जाऊ शकते?
१४ काम करण्याचे शिकणे: काम जीवनातील एक मूलभूत अंग आहे. आत्मसन्मान बाळगण्याकरता एखाद्या व्यक्तीला चांगल्याप्रकारे काम करण्याचे शिकले पाहिजे. (उपदेशक २:२४; २ थेस्सलनीकाकर ३:१०) तुम्ही तुमच्या मुलाला अगदी जुजबी सूचना देऊन एखादे काम करायला सांगता; आणि मग त्याच्याकडून तुमच्या मनाप्रमाणे काम न झाल्यामुळे तुम्ही त्याच्यावर खेकसता; पण, असे केल्यामुळे चांगल्याप्रकारे काम करण्याचे तो कधी शिकेल का? पण, पालक स्वतः आपल्या मुलाबरोबर काम करतात, त्याने केलेल्या कामाची प्रशंसा करतात तेव्हा मनासारखे काम करण्याचे मूल शिकेल. पालकांच्या उदाहरणामुळे आणि त्यासोबतच त्यांनी मुलांना दिलेल्या आवश्यक मार्गदर्शनामुळे काम पूर्ण कसे करावे, येणाऱ्या समस्यांवर मात कशी करावी, काम नेटाने पूर्ण कसे करीत राहावे आणि विचारपूर्वक निर्णय कसे घ्यावेत या सर्व गोष्टी मुले शिकतील. या बाबतींत त्यांना हे समजावून सांगता येईल, की खुद्द यहोवा देखील काम करतो, आणि ते तो करायचे म्हणून नव्हे तर चांगल्याप्रकारे करतो आणि या बाबतीत येशू देखील त्याच्या पित्याचे अनुकरण करतो. (उत्पत्ति १:३१; नीतिसूत्रे ८:२७-३१; योहान ५:१७) एखादे कुटुंब शेती किंवा उद्योगधंदा करत असल्यास घरातील काही लोकांना एकत्र येऊन काम करता येईल. किंवा मग स्वयंपाक कसा करावा आणि जेवण झाल्यानंतर आवराआवर कशी करावी याविषयी आई आपल्या मुलाला किंवा मुलीला शिकवू शकते. वडिलांची नोकरी घरापासून दूर असल्यास ते घरात मुलांसोबत एकत्र मिळून एखादे काम करण्याची योजना आखू शकतात. मुलांकडून एखादे काम करून घेताना तात्पुरता विचार न करता त्यांना भावी जीवनासाठी तयार करण्याचे उद्दिष्ट पालकांनी मनी बाळगल्यास किती लाभदायक होईल!
१५. विश्वासाचे धडे कोणत्या मार्गांनी दिले जाऊ शकतात? स्पष्ट करा.
१५ विपत्तीच्या काळात विश्वास कायम ठेवणे: विश्वास हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. कौटुंबिक अभ्यासात विश्वासाची चर्चा केली जाते तेव्हा मुलांना कदाचित विश्वासाचा अर्थ कळेल, विश्वास बळकट करणाऱ्या पुराव्यांची कदाचित त्यांना माहिती मिळेल. पण, जेव्हा कठीण परिस्थितीतही आपले पालक विश्वासात टिकून आहेत हे ते प्रत्यक्ष पाहतात, तेव्हा त्यांच्या जीवनावर कायमचा परिणाम होऊ शकतो. पनामामधील एका बहिणीला तिच्या पतीकडून असे धमकावण्यात आले, की तिने एकतर यहोवाची सेवा सोडावी किंवा घर सोडावे. तरीसुद्धा, ती नियमितपणे जवळच्या राज्य सभागृहात उपस्थित राहण्याकरता आपल्या चार लहान मुलांसोबत १६ किलोमीटर पायी चालत जाते आणि त्यानंतर बसने ३० किलोमीटरचा प्रवास करते. तिचे हे उदाहरण पाहून तिच्या कुटुंबातील सुमारे २० लोकांनी नंतर सत्य स्वीकारले.
दररोज बायबल वाचन करण्यात उदाहरण मांडणे
१६. दररोज बायबलचे वाचन करण्यावर जोर का दिला जातो?
१६ बायबलचे नियमित वाचन करणे ही चांगली सवय प्रत्येक कुटुंबाला लावून घेता येईल. या चांगल्या प्रघातामुळे पालकांना तर लाभ होईलच पण मुलांसाठीही हा एक उत्तम आदर्श असेल. शक्यतो, दररोज बायबलच्या काही भागाचे वाचन करा. तुम्ही किती वाचता हे सगळ्यात महत्त्वाचे नाही; तर तुम्ही किती नियमितपणे आणि कशाप्रकारे बायबलचे वाचन करता हे अधिक महत्त्वाचे आहे. बायबल वाचनासोबत मुले बायबल कथांचं माझं पुस्तक याचे त्यांना समजणाऱ्या भाषेत ध्वनिमुद्रण झाले असल्यास त्याची कॅसेट मुले ऐकू शकतात. दररोज देवाच्या वचनाचे वाचन केल्यामुळे आपल्याला त्याच्या विचारांचे विस्मरण होणार नाही. आणि हे बायबल वाचन एकेकट्याने न करता सर्व कुटुंबाने मिळून केल्यास संपूर्ण कुटुंबाला देवाच्या मार्गानुसार चालण्याकरता मदत होऊ शकते. कुटुंबांनो—दैनिक बायबल वाचन आपल्या जीवनाचा मार्ग बनवा! या अलीकडील “ईश्वरी जीवनाचा मार्ग” अधिवेशनातील नाटकात हेच करण्याचे उत्तेजन देण्यात आले होते.—स्तोत्र १:१-३.
१७. कौटुंबिक बायबल वाचन केल्यामुळे आणि प्रमुख शास्त्रवचने लक्षात ठेवल्यामुळे इफिसकर ६:४ येथील सल्ल्याचे पालन करण्याकरता कशी मदत होते?
१७ कुटुंब मिळून बायबलचे वाचन करणे ही गोष्ट प्रेषित पौलाने इफिसमधील ख्रिश्चनांना लिहिलेल्या प्रेरित पत्रात जे काही म्हटले होते त्याच्या एकवाक्यतेत आहे: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” (इफिसकर ६:४) याचा काय अर्थ होतो? “शिक्षण” असे भाषांतरित करण्यात आलेल्या मूळ ग्रीक शब्दाचा खरे तर “मन घालणे” असा अर्थ होतो; त्यामुळे ख्रिस्ती वडिलांना आर्जवले जाते, की त्यांच्या मुलांमध्ये त्यांनी यहोवा देवाचे मन घालावे—देवाचे विचार जाणण्यास मुलांची मदत करावी. काही महत्त्वाची शास्त्रवचने पाठ करण्याचे उत्तेजन मुलांना देऊन पालक असे करू शकतात. उद्देश हा की यहोवाच्या विचारांनी मुलांच्या विचारसरणीला मार्गदर्शित करावे ज्यामुळे पालक त्यांच्यासोबत असोत अगर नसोत त्यांच्या इच्छा-आकांक्षा आणि वर्तन उत्तरोत्तर ईश्वरी स्तरांच्या अनुरूप व्हावे. आणि अशा विचारसरणीचा मूलाधार म्हणजे बायबल.—अनुवाद ६:६, ७.
१८. बायबल वाचन करताना (अ) ते स्पष्टपणे समजण्याकरता (ब) त्यामधील सल्ल्यापासून लाभ मिळवण्याकरता (क) यहोवाच्या उद्देशाविषयी त्यात प्रकट केलेल्या माहितीनुरूप वागण्याकरता (ड) लोकांच्या मनोवृत्तींविषयी आणि कृत्यांविषयी ते काय म्हणते त्यापासून लाभ घेण्याकरता काय करावे लागेल?
१८ अर्थात, बायबलचा आपल्या जीवनावर परिणाम होण्याकरता बायबल काय म्हणते ते आपण नीट समजून घेतले पाहिजे. त्याकरता अनेकांना बायबलचे विशिष्ट भाग वारंवार वाचावे लागतील. काही अभिव्यक्तींची पूर्ण समज प्राप्त करण्याकरता आपल्याला त्या शब्दांचा अर्थ शब्दकोशातून किंवा शास्त्रवचनावरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) या पुस्तकातून पाहावा लागेल. शास्त्रवचनामध्ये सल्ला किंवा एखादी आज्ञा असल्यास ती आपल्या दिवसांतील परिस्थितीला कशाप्रकारे समर्पक आहे यावर थोडे थांबून विचार करा. त्यानंतर तुम्ही असे विचारू शकता, ‘या सल्ल्याचे पालन केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?’ (यशया ४८:१७, १८) शास्त्रवचनामध्ये देवाच्या उद्देशाच्या एखाद्या पैलूविषयी सांगण्यात आले असल्यास असे विचारा, ‘यामुळे आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडतो?’ तुम्ही कदाचित असा अहवाल वाचत असाल ज्यामध्ये लोकांच्या मनोवृत्तीविषयी किंवा वर्तनाविषयी सांगण्यात आले असेल. जीवनात ते कोणत्या दबावांना तोंड देत होते? या परिस्थितीला त्यांनी कसे तोंड दिले? त्यांच्या उदाहरणापासून आपल्याला कसा फायदा होऊ शकतो? त्या विशिष्ट अहवालाचा आपल्या जीवनाकरता काय अर्थ होतो, याची चर्चा करण्याकरता नेहमी वेळ काढा.—रोमकर १५:४; १ करिंथकर १०:११.
१९. देवाचे अनुकरण करण्याद्वारे आपण आपल्या मुलांपुढे काय मांडू?
१९ आपल्या मनांवर आणि हृदयांवर देवाचे विचार ठसविण्याचा किती हा उत्तम मार्ग! ‘देवाची प्रिय मुले ह्या नात्याने त्याचे अनुकरण’ करण्याकरता आपल्याला यामुळे खरोखरच मदत होईल. (इफिसकर ५:१) आणि अशाप्रकारे आपणही आपल्या मुलांसमोर एक खरोखरच अनुकरणीय उदाहरण मांडू.
तुम्हाला आठवते का?
◻ यहोवाच्या उदाहरणापासून पालकांना कशाप्रकारे फायदा होऊ शकतो?
◻ मुलांना दिल्या जाणाऱ्या तोंडी मार्गदर्शनाला आईवडिलांच्या उत्तम उदाहरणाची जोड का मिळाली पाहिजे?
◻ अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या आईवडिलांच्या उदाहरणाद्वारेच सर्वात उत्तमप्रकारे शिकवल्या जाऊ शकतात?
◻ कौटुंबिक बायबल वाचनाद्वारे आपल्याला कशाप्रकारे पूर्णपणे फायदा होऊ शकतो?
[१० पानांवरील चित्र]
कित्येक कुटुंबे दररोज एकत्र मिळून आनंदाने बायबल वाचन करतात