चांगला नावलौकिक जपून ठेवणे
सुंदर चित्र न्याहाळणे हा किती सुखद अनुभव! सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर कळून येईल, की चित्रकाराने कुंचल्याच्या शेकडो फटकाऱ्यांनी कॅन्व्हसवरील चित्र विविध रंगांनी रंगवले आहे.
त्याचप्रमाणे चांगला नावलौकिक विकसित केला जातो; चित्रकलेच्या भाषेत सांगायचे झाल्यास कुंचल्याच्या निव्वळ उभ्या-आडव्या फटकाऱ्याने नव्हे, तर कित्येक काळापर्यंत केलेल्या अनेक लहान-सहान कृतींनी. होय कृतींद्वारे नावलौकिक हळूहळू कमावला जातो.
दुसऱ्या बाजूला पाहता, कुंचल्याच्या एखाद्या चुकीच्या फटकाऱ्यामुळे त्या संपूर्ण चित्राची किंमत कमी होते. आपल्या नावाच्या बाबतीतही असेच आहे. बुद्धिमान राजा शलमोनाने असे म्हटले: “मनुष्याची मूर्खता त्याला मार्गभ्रष्ट करिते.” (नीतिसूत्रे १९:३) जराशा मूर्खतेमुळे—कदाचित हिंसाचारी रागाचा उद्रेक, मद्याचा अतिरेक किंवा एकच अनैतिक काम—यांमुळे एखाद्याच्या चांगल्या नावास बट्टा लागतो. (नीतिसूत्रे ६:३२, १४:१७; २०:१) त्यामुळे हे किती महत्त्वाचे आहे, की चांगले नाव कमवण्याचा आणि ते जपून ठेवण्याचा आपण उत्साहाने प्रयत्न करावा.—पडताळा प्रकटीकरण ३:५.