वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ६/१ पृ. ४-७
  • आपल्या वचनाविषयी देव विलंब करीत नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्या वचनाविषयी देव विलंब करीत नाही
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पापाचा घडा भरणे अद्याप बाकी
  • कार्य करण्याची देवाची वेळ जवळ आली आहे
  • तुम्ही कार्य करण्याचा समय
  • देवाचे न्यायदंड ते क्रूर होते का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • न्यायाचा दिवस व त्यानंतर
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • यहोवाच्या सहनशीलतेचे अनुकरण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ६/१ पृ. ४-७

आपल्या वचनाविषयी देव विलंब करीत नाही

“हे परमेश्‍वरा, मी किती वेळ ओरडू? तू ऐकत नाहीस.” सा.यु.पू. सातव्या शतकात हयात असलेल्या इब्री संदेष्टा हबक्कूकचे हे शब्द आहेत. पण हे शब्द काहीसे परिचित वाटतात; नाही का? आपल्याला अतिशय आवडणाऱ्‍या गोष्टी ताबडतोब किंवा होता होईल तितक्या लवकर मिळाव्यात अशी इच्छा करणे हा मानवाचा स्वभावच आहे. आणि तात्काळ समाधानाच्या या आपल्या युगात तर ही गोष्ट अगदी खरी आहे.—हबक्कूक १:२.

देवाने आपली अभिवचने लवकरात लवकर पूर्ण करायला पाहिजे होते असा विचार करणारे काही लोक पहिल्या शतकात होते. ते इतके अधीर झाले होते, की देव विलंब किंवा उशीर करीत होता असेही त्यांना वाटले. म्हणूनच, प्रेषित पेत्राला त्यांना आठवण करून द्यावी लागली, की वेळे बाबतीत आपल्या आणि देवाच्या दृष्टिकोनात जमीन आस्मानाचा फरक आहे. पेत्र लिहितो: “ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की, प्रभूला एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत.”—२ पेत्र ३:८.

या दृष्टिकोनातून पाहिल्यास, ८० वर्षांची एक व्यक्‍ती फक्‍त दोन तास जगलेली असेल व मानवजातीचा संपूर्ण इतिहास फक्‍त सहा दिवसांचा असेल. या दृष्टिकोनातून आपण पाहतो तेव्हा देवाचे आपल्याबरोबरचे व्यवहार समजण्यास आपल्याला सोपे जाते.

परंतु, समयाच्या बाबतीत देव निष्काळजी नाही. उलट, त्याला समयाची खूप जाणीव आहे. (प्रेषितांची कृत्ये १:७) यास्तव पेत्र पुढे म्हणतो: “कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभु आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करितो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९) वेळ निघून चालली आहे म्हणून पटापट कार्य करावे, हे जसे मानवांना वाटते तसे देवाला वाटत नाही. ‘सनातन राजा’ या नात्याने त्याला, सर्व गोष्टींचा विलक्षण आढावा आहे व कालौघात त्याच्या कार्यांचा सर्व संबंधितांना केव्हा सगळ्यांत उत्तम लाभ होईल हे तो ठरवू शकतो.—१ तीमथ्य १:१७.

देव विलंब करीत आहे असे वरवर वाटण्याचे कारण स्पष्ट केल्यानंतर पेत्र हा इशारा देतो: “चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल.” त्याचा अर्थ, एका अनपेक्षित समयी लेखा घेण्याचा दिवस येईल. मग, पुढील वचनांत पेत्र, ‘पवित्र वर्तणूक व सुभक्‍ती’ प्रदर्शित करणाऱ्‍यांना असलेल्या अद्‌भुत आशेचा उल्लेख करतो; ही आशा म्हणजे देवाचे वचनयुक्‍त “नवे आकाश व नवी पृथ्वी” यांत ते बचावून जातील.—२ पेत्र ३:१०-१३.

यावरून आपण आणखी कृतज्ञ असले पाहिजे, की देवाचा न्यायदंड अद्याप आलेला नाही. त्याने धीर धरल्यामुळेच तर आपण त्याचा उद्देश जाणू शकलो, त्याचे वचनयुक्‍त आशीर्वाद प्राप्त करण्याकरता आपल्या जीवनात फेरबदल करू शकलो. पेत्र युक्‍तिवाद करतो त्याप्रमाणे मग आपण, “प्रभूची सहनशीलता तारणच आहे” असे समजू नये का? (२ पेत्र ३:१५) पण, देव धीर धरतो यामागे आणखी एक कारण आहे.

पापाचा घडा भरणे अद्याप बाकी

देवाने गत काळात मानवजातीबरोबर केलेल्या व्यवहारांचा अभ्यास केल्यावर आपल्याला दिसून येते, की परिस्थिती अगदी हाताबाहेर गेली तरच तो न्यायदंड बजावत असे, तोपर्यंत नाही. उदाहरणार्थ, कनानी लोकांवर आपल्या न्यायदंडाविषयी देवाने अब्राहामाला कनानी लोकांची पापे आधीच दाखवून दिली. पण न्यायदंड बजावण्याची त्याची नियुक्‍त वेळ अद्याप आलेली नव्हती. का नव्हती? बायबल म्हणते: “कारण अमोरी [कनानी] लोकांच्या पापाचा घडा अद्यापि भरला नव्हता;” किंवा नॉक्स आवृत्तीच्या भाषेत: “अमोरी लोकांच्या दुष्टाईची मुदत पूर्णत्त्वास [आली] नव्हती.”—उत्पत्ति १५:१६.a

पण, सुमारे ४०० वर्षांनंतर, देवाने आपला न्यायदंड बजावला आणि अब्राहामाच्या वंशजांनी अर्थात इस्राएल लोकांनी देशावर कब्जा मिळवला. आधुनिक पुरातत्त्वीय उत्खननात दिसून आल्याप्रमाणे, मोजकेच कनानी लोक जसे की राहाब आणि गिबोनी लोक त्यांची मनोवृत्ती व त्यांची कार्ये यांमुळे वाचले; तर बहुतेक लोक अशुद्धतेच्या अगदी रसातळाला पोहंचले होते. त्यांच्यात लिंग उपासना, मंदिरातील वेश्‍याव्यवसाय आणि बाल अर्पणे चालत होती. हॅले यांचे बायबल हस्तपुस्तक (इंग्रजी) म्हणते: “कनानी शहरांचे संशोधन करणाऱ्‍या पुराणवस्तुशास्त्रज्ञांना, देवाने या शहरांचा आधी का नाश केला नाही याचे आश्‍चर्य वाटते.” शेवटी, कनानी लोकांच्या ‘पापाचा घडा पूर्ण भरला;’ त्यांच्या दुष्टाईची “मुदत पूर्णत्त्वास आली” होती. योग्य मनोवृत्ती दाखवणाऱ्‍यांना वाचवून बाकी संपूर्ण राष्ट्रातील अशुद्धता काढून टाकली तेव्हा, देव अन्यायी आहे असे कोणीही म्हणू शकले नाही.

नोहाच्या दिवसांतही आपल्याला असेच चित्र दिसते. जलप्रलयाआधी लोक दुष्ट होते हे खरे असले तरी, आपल्या दयेपोटी त्यांना आणखी १२० वर्षे जगू देण्याचे देवाने ठरवले. त्या काळात काही समयापर्यंत नोहाने “नीतिमत्त्वाचा उपदेशक” या नात्याने काम केले. (२ पेत्र २:५) पण, वेळ जसजशी निघून गेली तसतसा त्यांचा दुष्टपणा वाढत गेला. “देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तो पाहा, ती भ्रष्ट होती; कारण पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांनी आपली चालचलणूक बिघडविली होती.” (उत्पत्ति ६:३, १२) त्यांच्या ‘पापाचा घडा पूर्ण भरला होता.’ काळाच्या ओघात त्यांची वाईट प्रवृत्ती विकोपाला गेली होती. देवाने कार्य केले तेव्हा तो पूर्णपणे न्यायी ठरला. देवाच्या नजरेत फक्‍त आठ जण धार्मिक होते आणि देवाने त्यांना वाचवले.

देवाने इस्राएलबरोबर केलेल्या व्यवहारांत हाच नमुना दिसतो. ते इतक्या अविश्‍वासूपणे व वाईट मार्गाने वागले होते तरी देवाने त्यांच्याबाबतीत शेकडो वर्षांपर्यंत धीर धरला. अहवाल म्हणतो: ‘यहोवा त्यांच्याकडे आपले दूत पाठवत राहिला, कारण त्याची आपल्या प्रजेवर करुणा होती. पण त्यांनी देवाच्या दूतांची टर उडवली व त्यांची वचने तुच्छ मानली व त्यांच्या संदेष्ट्यांची निर्भर्त्सना केली; शेवटी परमेश्‍वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही.’ (२ इतिहास ३६:१५, १६) हे लोक अशा टोकापर्यंत पोहंचले होते की त्यांचे मागे वळणे अगदी अशक्य होते. यिर्मयासह मोजकेच लोक बचावू शकले. म्हणूनच देवाने शेवटी बाकीच्यांवर न्यायदंड बजावला तेव्हा तो अन्यायी ठरला नाही.

कार्य करण्याची देवाची वेळ जवळ आली आहे

या उदाहरणांवरून आपल्याला हेच दिसते, की सध्याच्या व्यवस्थीकरणावरील नाश योग्य समयापर्यंतच देव थोपवून ठेवणार आहे. देवाच्या लाक्षणिक दंडाधिकाऱ्‍याला जी आज्ञा देण्यात आली आहे त्यावरून हे स्पष्ट होते: “तू आपला तीक्ष्ण धारेचा विळा चालवून पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून घे; तिची द्राक्षे पिकली आहेत. तेव्हा त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले.” मानवजातीचा दुष्टपणा ‘पिकला’ आहे, म्हणजे मानवजात अशा अवस्थेत येऊन पोहंचली आहे की तिची सुधारणा होण्याची शक्यता नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे देव न्यायदंड बजावेल तेव्हा त्याचा हा हस्तक्षेप न्यायी आहे यावर कसलीही शंका घेतली जाणार नाही.—प्रकटीकरण १४:१८, १९.

वरील गोष्टीचा विचार केल्यावर हे स्पष्ट होते, की जगाविरुद्धचा देवाचा न्यायदंड जवळ आला असला पाहिजे, कारण गत काळांत देवाने ज्या प्रवृत्तींसाठी न्यायदंड बजावला होता तीच प्रवृत्ती आजच्या जगात दिसून येते. आपण कोठेही पाहिले तर आपल्याला, नोहाच्या दिवसांतील जलप्रलयाआधी जशी हिंसा होती तशीच आजही पृथ्वीवर पाहायला मिळते. उत्पत्ति ६:५ मध्ये म्हटल्यानुसार आज लोकांची मनोवृत्ती झाली आहे: “[मानवाच्या] मनातील येणाऱ्‍या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट” आहेत. देवाने ज्या गंभीर पापांसाठी कनानविरुद्ध न्यायदंड आणला होता ती पापे आज सर्वसामान्य बनली आहेत.

पहिल्या महायुद्धापासून खासकरून मानवजातीने धक्कादायक बदल अनुभवले आहेत. लक्षावधी लोकांच्या रक्‍ताने पृथ्वी माखलेली मानवजातीने पाहिली आहे. युद्धे, जातीयसंहार, दहशतवाद, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार संपूर्ण जगात माजला आहे. दुष्काळ, रोगराई आणि अनैतिकता यांनी तर आपल्या विश्‍वाला पछाडले आहे. हा सर्व पुरावा सूचित करतो, की “हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही” असे येशूने जिच्याविषयी म्हटले होते त्या दुष्ट पिढीत आपण जगत आहोत. (मत्तय २४:३४) जगाच्या ‘पापाचा घडा’ भरत चालला आहे. “पृथ्वीच्या द्राक्षीचे घड” कापणीसाठी पिकत आहेत.

तुम्ही कार्य करण्याचा समय

न्यायदंडाचा समय जसजसा जवळ येईल तसतसे दोन प्रकारचे पिकणे घडेल असे प्रेषित योहानाला सांगण्यात आले होते. एकीकडे, “दुराचारी माणूस दुराचार करीत राहो. मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करीत राहो.” पण दुसरीकडे, “नीतिमान माणूस नैतिक आचरण करीत राहो; पवित्राचरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहो.” (प्रकटीकरण २२:१०, ११) ही नंतरची घटना, संपूर्ण जगभरात यहोवाचे साक्षीदार करत असलेल्या शैक्षणिक कार्याच्या संबंधाने पूर्ण होत आहे. सार्वकालिक जीवन मिळण्याच्या योग्यतेचे गणले जाण्याकरता देव त्यांच्याकडून काय अपेक्षितो हे लोकांना शिकवणे, हा त्यांच्या कामामागचा हेतू होय. हे कार्य आता २३३ देशांत ८७,००० मंडळ्यांद्वारे पार पाडले जात आहे.

देव विलंब लावत नाही. त्याच्या वचनांच्या सुसंगतेत आपले जीवन आणावे म्हणून लोकांना “नवा मनुष्य धारण” करावयास लागणारा वेळ त्याने धीराने देऊ केला आहे. (इफिसकर ४:२४) आज, जगातील सतत बिकट होत चाललेल्या परिस्थितीतही देव धीर धरून आहे. संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार त्यांच्या परीने होईल तितके आपल्या शेजाऱ्‍यांना चिरकालिक जीवनाप्रत नेणारे ज्ञान देण्याचा प्रयत्न करीत आहेत. (योहान १७:३, १७) आणि आनंदाची गोष्ट म्हणजे, दर वर्षी ३,००,००० पेक्षा अधिक लोक याला प्रतिसाद देऊन बाप्तिस्मा घेत आहेत.

सार्वकालिक जीवन दृष्टिपथात ठेवून, आता थांबून राहायची नव्हे तर कार्य करण्याची वेळ आहे. कारण थोडक्याच अवधीत आपण येशूने दिलेल्या अभिवचनाची पूर्णता पाहणार आहोत: “जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्‍वास ठेवतो तो कधीहि मरणार नाही.”—योहान ११:२६.

[तळटीपा]

a या वचनावर द सॉनसिनो खूमॉश यात दिलेल्या तळटीपेनुसार: “हकालपट्टी होण्यासाठी; कारण एखाद्या राष्ट्राच्या पापाचा घडा पूर्ण भरत नाही तोपर्यंत देव त्या राष्ट्राचा नाश करत नाही.”

[६ पानांवरील चित्र]

पृथ्वीच्या द्राक्षीचा घड पिकल्यावर विळा चालवण्यास देवाच्या दंडाधिकाऱ्‍याला सांगण्यात आले होते

[७ पानांवरील चित्र]

जगभरातील यहोवाचे साक्षीदार देवाकडून येणाऱ्‍या चिरकालिक आशीर्वादांच्या योग्यतेचे होण्यास लोकांना मदत करीत आहेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा