वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ५/१५ पृ. २९-३१
  • शौल—प्रभूचे निवडलेले पात्र

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शौल—प्रभूचे निवडलेले पात्र
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पौलाचा कौटुंबिक इतिहास
  • शौलाचे शिक्षण
  • कौशल्यांचा सदुपयोग
  • येशू शौलला निवडतो
    बायबलमधून शिकू या!
  • “मंडळीत शांतीचा काळ आला”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • “यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • छळणाऱ्‍याचे डोळे उघडतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ५/१५ पृ. २९-३१

शौल—प्रभूचे निवडलेले पात्र

तार्सकर शौल ख्रिस्ताच्या अनुयायांचा हिंसक विरोधी होता. पण, त्याच्या भविष्यात प्रभूने वेगळेच काहीतरी राखून ठेवले होते. एकेकाळी त्याने ज्या कार्याचा इतका तीव्र विरोध केला होता त्याच कार्याचा एक प्रमुख प्रतिनिधी तो होणार होता. येशूने म्हटल्याप्रमाणे: “परराष्ट्रीय, राजे व इस्राएलाची संतति ह्‍यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे.”—प्रेषितांची कृत्ये ९:१५.

“जुलमी” शौलाला दया दाखवण्यात आली आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताचे “निवडलेले पात्र” बनला, त्यानंतर त्याचे जीवन पार बदलले. (१ तीमथ्य १:१२, १३) शौलाचा ख्रिस्ती प्रेषित पौल झाला; कधीकाळी ज्या आवेशाने तो स्तेफनाला दगडमार करण्यात सामील होण्याकरता आणि येशूच्या अनुयायांवर हल्ले करण्याकरता प्रवृत्त झाला होता त्याच आवेशाने आता तो अगदी वेगळी कार्ये साध्य करण्यात मग्न झाला. निश्‍चितच, येशूने पौलाच्या व्यक्‍तिमत्त्वात काही श्रेयस्कर गुण पाहिले असावेत. कोणते गुण? शौल मुळात कोण होता? त्याच्या विशिष्ट पार्श्‍वभूमीमुळे खऱ्‍या उपासनेच्या प्रसारासाठी तो कशाप्रकारे कार्यक्षम ठरला? त्याच्या अनुभवावरून आपण काही शिकू शकतो का?

पौलाचा कौटुंबिक इतिहास

सा.यु. ३३ च्या पेन्टेकॉस्टला स्तेफनाची हत्या करण्यात आली त्यावेळी शौल ‘एक तरुण’ होता. सा.यु. ६०-६१ च्या सुमारास त्याने फिलेमोनला पत्र लिहिले तेव्हा तो “वृद्ध झालेला” होता. (प्रेषितांची कृत्ये ७:५८; फिलेमोन ९) अभ्यासक असे सुचवतात की पूर्वीच्या वय ठरवण्याच्या पद्धतीनुसार २४-४० वयोगटातल्या व्यक्‍तीला ‘तरुण’ तर ५०-५६ वर्षांच्या व्यक्‍तीला “वृद्ध” समजले जात. तेव्हा, शौलाचा जन्म येशूच्या जन्मानंतर काही वर्षांतच झाला असावा.

त्या काळी, यहुदी लोकांचे जगाच्या बऱ्‍याच भागांत वास्तव्य होते. लढाईत झालेला पराभव, गुलामी, हद्दपारी, व्यापार, आणि स्वेच्छेने केलेले देशांतर यांसारख्या विविध कारणांमुळे ते यहुदियातून ठिकठिकाणी पांगले होते. शौलाचे कुटुंब यहुदियाच्या बाहेर स्थायिक झालेले असले तरीसुद्धा ते विश्‍वासूपणे नियमशास्त्राचे पालन करत होते; या गोष्टीवर जोर देताना शौल सांगतो, की तो “आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएल लोकांतला, बन्यामीन वंशातला, इब्य्रांचा इब्री; नियमशास्त्रदृष्टीने परूशी” होता. शौलाचे नाव देखील त्याच्या वंशातल्या एका प्रसिद्ध व्यक्‍तीच्या—इस्राएलच्या पहिल्या राजाच्या नावावरून ठेवण्यात आले होते. जन्मापासून रोमन असल्यामुळे, तार्सकर शौल याला पौलुस हे लॅटिन नाव देखील होते.—फिलिप्पैकर ३:५; प्रेषितांची कृत्ये १३:२१; २२:२५-२९.

शौल हा जन्मापासून रोमन होता याचा अर्थ त्याच्या वाडवडिलांपैकी कोणीतरी अतिशय विशेष समजले जाणारे रोमन नागरिकत्व मिळवले होते. कसे? हे अनेक मार्गांनी शक्य होते. नागरिकत्त्व हे पित्याकडून पुत्राला मिळत असे; पण या शिवाय ते विशिष्ट व्यक्‍तींवर किंवा गटांवर काही खास गुणांच्या प्रशंसेखातर, किंवा केवळ राजकीय क्षेत्रात काही खास योग्यता असल्यामुळे किंवा सरकारच्या हितासाठी काही उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे पुरस्काराच्या स्वरूपात बहाल केले जात असे. रोमन मालकाकडून आपले स्वातंत्र्य विकत घेणारा गुलाम, किंवा एखाद्या रोमन नागरिकाने मुक्‍त केलेला गुलाम देखील रोमन नागरिक बनत असे. तसेच सहायक सैन्यातल्या भूतपूर्व सैनिकांनाही रोमन सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यावर रोमन नागरिकत्व मिळत असे. रोमन वसाहतींमध्ये राहणारे स्थानिक रहिवाशी कालांतराने नागरिक बनू शकत होते. काही विशिष्ट काळांत मोठी रक्कम देऊन नागरिकत्त्व विकत घेतले जायचे असेही म्हटले जाते. पण यांपैकी नेमक्या कोणत्या मार्गाने शौलाच्या कुटुंबाला नागरिकत्त्व मिळाले होते यावर अद्याप प्रश्‍नचिन्ह आहे.

किलिकिया (सध्या दक्षिण तुर्कस्थानात असलेल्या) या रोमन प्रांतातील प्रमुख शहर आणि राजधानी असणाऱ्‍या तार्स नगरातून शौल आला होता एवढे आपल्याला माहीत आहे. या प्रदेशात यहुदी समाजाचे लोक मोठ्या संख्येने वास्तव्यास होते; तरीसुद्धा येथे राहताना शौलावर यहुदेतर संस्कृतीचाही प्रभाव पडला असेल. शिवाय, तार्स हे एक मोठे, सुसंपन्‍न शहर होते आणि ते हेल्लेणी, अर्थात ग्रीक विद्येचे माहेरघर मानले जायचे. पहिल्या शतकात या शहराची लोकसंख्या अंदाजे ३,००,००० ते ५,००,००० होती. आशिया मायनर, सिरिया आणि मेसोपोटेमिया यांच्या प्रमुख हमरस्त्यावर असलेले हे एक व्यापारी केन्द्र होते. तार्सच्या सुबत्तेची मुख्य कारणे म्हणजे व्यापार आणि या शहरासभोवतीचा सुपीक प्रदेश; धान्ये, द्राक्षारस आणि तागाचे कापड ही येथील प्रमुख उत्पादने होती. शेळीच्या लोकरीपासून कापड तयार करण्याच्या उद्योगाला या शहरात भरभराट होती; या कापडापासून तंबू तयार केले जात.

शौलाचे शिक्षण

प्रामाणिकपणे स्वतःचा खर्च चालवण्यासाठी आणि आपल्या मिशनरी कार्याला लागणारा खर्च भागवण्यासाठी शौल, अर्थात पौल तंबू बनवण्याचा व्यवसाय करायचा. (प्रेषितांची कृत्ये १८:२, ३; २०:३४) पौलाचे मूळचे ठिकाण तार्स, येथे तंबू बनवण्याचा व्यवसाय अगदी सर्वसामान्य होता. हे काम कदाचित पौल आपल्या वडिलांकडून शिकला असावा.

शौलाला वेगवेगळ्या भाषांचे ज्ञान होते—विशेषतः रोमन साम्राज्यात सर्वसामान्यपणे वापरल्या जाणाऱ्‍या ग्रीक भाषेवर त्याचे प्रभुत्त्व होते; याचा त्याला आपल्या मिशनरी कार्यात खूपच फायदा झाला. (प्रेषितांची कृत्ये २१:३७-२२:२) त्याच्या लिखाणांचे विश्‍लेषण करणाऱ्‍यांच्या मते त्याची ग्रीक भाषा उत्तम आहे. त्याची शैली प्राचीन ग्रीक लिखाणांसारखी किंवा ग्रांथिक नसून हिब्रू शास्त्रवचनांचे ग्रीक भाषांतर, अर्थात सेप्टुअजिन्ट यावर आधारित आहे; पौल सहसा या भाषांतरातून उद्धृत करत असे, थेट किंवा अनुवादरूपाने. यावरून बरेच विद्वान असा अंदाज बांधतात की पौलाला कदाचित एखाद्या यहुदी शाळेत ग्रीक भाषेचे चांगले मूलभूत शिक्षण मिळाले असावे. मार्टिन हेंजल हे विद्वान म्हणतात, “जुन्या काळात चांगले शिक्षण—विशेषतः ग्रीक माध्यमातून कोणालाही घेता येत नव्हते; आर्थिक स्थिती चांगली असल्याशिवाय ते शक्य नव्हते.” त्यामुळे पौलाच्या शिक्षणावरून असे दिसते की तो एका सुखवस्तू कुटुंबाचा होता.

शौलाने पुढचे शिक्षण घरापासून ८४० किलोमीटर अंतरावर जेरुसलेम येथे पूर्ण केले; तेव्हा तो जास्तीतजास्त १३ वर्षांचा असावा. परूशी परंपरेचा एक अत्यंत नामवंत आणि मानलेला शिक्षक गमालिएल याच्या चरणांजवळ पौलाचे शिक्षण झाले. (प्रेषितांची कृत्ये २२:३; २३:६) ते शिक्षण आजच्या विद्यापीठ पदवी शिक्षणाच्या बरोबरीचे होते आणि या शिक्षणामुळे पौलाला यहुदी समाजात मोठे नाव कमवण्याची संधी होती.a

कौशल्यांचा सदुपयोग

हेल्लेणी आणि रोमन शहरात एका यहुदी कुटुंबात जन्माला आलेला शौल खरे तर तीन समाजांशी जुळला होता. सर्वदेशीय बहुभाषिक पार्श्‍वभूमीमुळे “सर्वांना सर्व काही” होण्यासाठी त्याला निश्‍चितच मदत झाली असावी. (१ करिंथकर ९:१९-२३) रोमन नागरिकत्त्व असल्यामुळे नंतर त्याला आपल्या सेवेचा कायदेशीर बचाव करणे आणि रोमन साम्राज्यातील सर्वोच्च अधिकारापुढे सुवार्ता सांगणे शक्य झाले. (प्रेषितांची कृत्ये १६:३७-४०; २५:११, १२) अर्थात, शौलाची पार्श्‍वभूमी, त्याचे शिक्षण आणि व्यक्‍तिमत्त्व याविषयी पुनरुत्थित येशूला माहीत होते कारण तो हनन्यास म्हणाला: “जा; कारण परराष्ट्रीय, राजे व इस्राएलाची संतति ह्‍यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे; आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन.” (प्रेषितांची कृत्ये ९:१३-१६) योग्य दिशा मिळाल्यावर शौलाचा आवेश दूरदूरच्या देशांत राज्याच्या संदेशाचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरला.

येशूने ज्याप्रकारे एका खास कार्याकरता शौलाला निवडले, ती ख्रिस्ती इतिहासातील एकमात्र घटना होती. पण आजच्या काळात सर्व ख्रिस्ती आपल्याकडे असलेल्या खास कौशल्यांचा आणि कलागुणांचा सुवार्तेच्या प्रसाराकरता परिणामकारक पद्धतीने उपयोग करू शकतात. येशूला आपल्याकडून काय अपेक्षा आहे हे शौलाला समजल्यानंतर त्याने मागेपुढे पाहिले नाही. राज्याच्या वाढीकरता आपल्याकडून होईल ते सर्व त्याने केले. हे तुमच्याबाबतीतही खरे आहे का?

[तळटीपा]

a गमालिएलाकडून शौलाला कशाचे आणि कोणत्या प्रकारचे शिक्षण मिळाले असावे यासंबंधी टेहळणी बुरूज, जुलै १५, १९९६, पृष्ठे २६-९ वर पाहा.

[३० पानांवरील चौकट/चित्र]

रोमी नागरिकत्त्वाची नोंदणी आणि प्रमाण

ऑगस्टस याने सा.यु. ४ आणि ९ साली दोन कायदे प्रस्थापित करून, रोमन नागरिकांच्या कायदेशीररित्या जन्माला आलेल्या मुलांच्या जन्माची नोंदणी करण्याची प्रथा सुरू केली होती. ही नोंदणी जन्मानंतर ३० दिवसांच्या आत करणे आवश्‍यक होते. रोमन प्रांतांत कुटुंबाच्या लोकांना एका खास सरकारी नोंदणी कार्यालयात जाऊन, मुलाचा जन्म कायदेशीर असून ते रोमन नागरिक असल्याची न्यायाधिकाऱ्‍यापुढे प्रतिज्ञा घ्यावी लागे. आईवडिलांचे नाव, मुलाचे लिंग आणि नाव, तसेच जन्मतारीख नोंदण्यात येत असे. हे कायदे लागू होण्यापूर्वीही सर्व रोमन नगरपालिकांमध्ये, वसाहतींमध्ये आणि प्रीफेक्टच्या अधिकाराखाली येणाऱ्‍या प्रांतांत दर पाचव्या वर्षी जनगणना घेऊन नागरिकांची नोंदणी केली जात असे.

यामुळे, दफ्तरखान्यांत सांभाळून ठेवलेल्या नोंदणीपुस्तकांचा संदर्भ दाखवून कोणीही आपल्या स्थितीचे प्रमाण देऊ शकत होता. या नोंदणींच्या प्रमाणित प्रती सुटसुटीत लाकडी पुस्तकांच्या (उघडबंद होणाऱ्‍या पाट्यांच्या) रूपात उपलब्ध होत्या. काही विद्वानांच्या मते पौलाने रोमन नागरिकत्त्वाचा दावा केला तेव्हा त्याने आपल्या दाव्याला पुष्टी देण्याकरता अशाचप्रकारचे प्रमाणपत्र दिले असावे. (प्रेषितांची कृत्ये १६:३७; २२:२५-२९; २५:११) रोमन नागरिकत्त्व म्हणजे जणू काहीतरी “पवित्र,” असे मानले जायचे; नागरिकत्त्व असलेल्या व्यक्‍तीला निरनिराळे हक्क मिळत होते आणि बनावट दस्तऐवज बनवणे हा अत्यंत घोर अपराध मानला जायचा. बनावट दस्तऐवजाच्या मदतीने स्वतःची सामाजिक स्थिती बदलणारा मृत्यूदंडास पात्र होता.

[Credit Line]

Historic Costume in Pictures/Dover Publications, Inc., New York

[३१ पानांवरील चौकट/चित्र]

शौलाचे रोमी नाव

रोमच्या प्रत्येक पुरुष नागरिकाच्या नावात तीन नावे असत. पहिले नाव, आडनाव (कुळाचे, किंवा जेन्सचे नाव) आणि टोपणनाव. याचे एक सुप्रसिद्ध उदाहरण म्हणजे गायस जुलियस सीझर. बायबलमध्ये पूर्ण रोमन नावे आढळत नाहीत पण गैरबायबलीय ग्रंथावरून समजल्याप्रमाणे अग्रिप्पाचे पूर्ण नाव मार्कुस जुलियस अग्रिप्पा होते. गल्लियोचे पूर्ण नाव लुसियस जुनियस गल्लियो. (प्रेषितांची कृत्ये १८:१२; २५:१३) व्यक्‍तीच्या तीन नावांपैकी शेवटली दोन नावे दिल्याची काही उदाहरणे बायबलमध्ये आहेत, जसे पंतय पिलात, सिर्ग्य पौल, क्लौद्य लुसिया आणि पुर्क्य फेस्त.—प्रेषितांची कृत्ये ४:२७; १३:७; २३:२६; २४:२७.

पौलुस हे शौलाचे पहिले नाव होते की त्याचे आडनाव होते हे निश्‍चित कळायला मार्ग नाही. स्वतःच्या नावासोबत आणखी एक टोपणनाव जोडण्याचीही पद्धत सर्वसामान्य होती; कुटुंबीय आणि जवळची माणसे त्या व्यक्‍तीला या टोपणनावाने संबोधित करीत असत. शौल यासारखे गैर-रोमन नाव, टोपणनाव म्हणून वापरता येत होते. एका विद्वानाने म्हटले त्याप्रमाणे, “रोमन नावासाठी पर्याय म्हणून [शौल] हे नाव मुळीच चालण्यासारखे नव्हते. पण रोमन नागरिकाला दिले जाणारे सिग्नुम अर्थात एक मूळ नाव म्हणून ते सहज चालण्यासारखे होते.” बहुभाषिक परिसरांत त्याच्या नावांपैकी कोणत्या नावाने त्याला संबोधित केले गेले हे संबोधित करणाऱ्‍या व्यक्‍तीवर आणि त्या विशिष्ट प्रसंगावर अवलंबून आहे.

[Credit Line]

Photograph by Israel Museum, ©Israel Antiquities Authority

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा