वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ५/१५ पृ. १०-१५
  • यहोवाच्या मार्गदर्शनामुळे आनंदी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या मार्गदर्शनामुळे आनंदी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा मार्ग दाखवतो
  • यहोवाच्या मार्गानुसार चाललेले काही लोक
  • काही यहोवाच्या मार्गापासून का दुरावले
  • आहाजाचे वाईट उदाहरण
  • इजिप्तमध्ये यिर्मयासोबत यहुदी
  • यहोवा त्याच्या मार्गानुसार चालणाऱ्‍यांना आशीर्वादित करतो
  • तुमचा समावेश असणारे विश्‍वव्यापी प्रकरण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • खोट्या दैवतांविरुद्ध साक्षीदार
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • तुम्ही देवाबरोबर चालाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • खऱ्‍या देवासाठी तुम्ही साक्षीदार व्हाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ५/१५ पृ. १०-१५

यहोवाच्या मार्गदर्शनामुळे आनंदी

“देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग अव्यंग आहे; परमेश्‍वराचे वचन कसास लागलेले आहे.’—२ शमुवेल २२:३१.

१, २. (अ) सर्व मानवांना कशाची मूलभूत गरज आहे? (ब) कोणाच्या उदाहरणाचे अनुकरण करणे आपल्याकरता चांगले आहे?

मार्गदर्शन ही सर्व मानवांची मूलभूत गरज आहे. होय, आपल्याला जीवनात मार्गदर्शनाची गरज लागतेच. हे खरे आहे, की चांगले आणि वाईट याची जाण होण्याकरता यहोवाने आपल्याला जन्मताच काही प्रमाणात बुद्धी आणि विवेक दिला आहे. पण, आपला विवेक विश्‍वासहार्य मार्गदर्शक व्हायचा असेल, तर त्याकरता आपण आपल्या विवेकाला प्रशिक्षित करण्याची गरज आहे. (इब्री लोकांस ५:१४) आणि आपल्याला योग्य निर्णय घ्यायचे असतील तर, आपल्या मनाला योग्य माहितीची—तसेच माहिती पडताळून पाहण्याचे प्रशिक्षण मिळण्याची आवश्‍यकता आहे. (नीतिसूत्रे २:१-५) पण, जीवनातील अनिश्‍चिततेमुळे आपल्याला योग्य वाटणारे निर्णय कदाचित चुकीचे ठरतील. (उपदेशक ९:११) पुढे काय होईल, हे आपणहून जाणून घेण्याचा कोणताही विश्‍वासयोग्य मार्ग आपल्या समोर नाही.

२ या आणि इतर अनेक कारणांमुळे संदेष्टा यिर्मया याने असे लिहिले: “हे परमेश्‍वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्याने अर्थात येशू ख्रिस्ताने मार्गदर्शनाचा स्वीकार केला. त्याने म्हटले: “पुत्र पित्याला जे काही करिताना पाहतो त्यावाचून काहीहि त्याला स्वतः होऊन करिता येत नाही; कारण जे काही तो करितो ते पुत्रहि तसेच करितो.” (योहान ५:१९) तर मग, येशूचे अनुकरण करणे आणि पावले उचलताना यहोवाचे मार्गदर्शन घेणे किती उचित आहे! राजा दावीदाने असे गायिले: “देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग अव्यंग आहे; परमेश्‍वराचे वचन कसास लागलेले आहे; त्याचा आश्रय करणाऱ्‍या सर्वांची तो ढाल आहे.” (२ शमुवेल २२:३१) आपल्या स्वतःच्या बुद्धीऐवजी आपण यहोवाच्या मार्गानुसार चालण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला परिपूर्ण मार्गदर्शन मिळेल. देवाच्या मार्गाचा अव्हेर केल्यामुळे आपण स्वतःवर संकट ओढवून घेतो.

यहोवा मार्ग दाखवतो

३. यहोवाने, आदाम आणि हव्वा यांना कसे मार्गदर्शित केले, आणि त्यांना कोणते भवितव्य बहाल केले?

३ आदाम आणि हव्वा यांच्या उदाहरणाचा विचार करा. ते पापरहित होते, तरी त्यांना मार्गदर्शनाची आवश्‍यकता होती. सुंदर एदेन बागेत आपल्या मनाप्रमाणे योजना आखण्याची यहोवाने आदामाला परवानगी दिली नव्हती. तर देवाने त्याच्याकरता काही काम राखून ठेवले होते. सर्वप्रथम, आदामाला सर्व प्राण्यांना नावे द्यायची होती. त्यानंतर यहोवाने आदामाला आणि हव्वेला काही दीर्घ-कालीन ध्येये पूर्ण करण्याकरता सांगितले. त्यांना पृथ्वीला आपल्या सत्तेखाली आणायचे होते, त्यांच्या संततीद्वारे पृथ्वी व्यापून टाकायची होती आणि प्राण्यांची काळजी देखील घ्यायची होती. (उत्पत्ति १:२८) हे फार मोठे काम होते, पण असे केल्यामुळे संपूर्ण पृथ्वी परादीस होणार होती. ज्यामध्ये परिपूर्ण मानवजात प्राण्यांसोबत आनंदाने वास करणार होती. किती अद्‌भुत भवितव्य! याशिवाय, यहोवाच्या मार्गानुसार विश्‍वासाने चालत असताना, आदाम आणि हव्वा यांना देवाशी बोलता येणार होते. (पडताळा उत्पत्ति ३:८.) किती विलक्षण विशेषाधिकार—निर्माणकर्त्यासोबत निरंतर, व्यक्‍तिगत संबंध असणे!

४. आदाम आणि हव्वा यांनी कशाप्रकारे भरवशाची आणि एकनिष्ठेची कमी दाखवली आणि त्यामुळे कोणते भयंकर परिणाम घडून आले?

४ यहोवाने पहिल्या मानवी जोडप्याला एदेन बागेतील बऱ्‍यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्‍या झाडाचे फळ खाण्याची मनाई केली आणि यामुळे त्यांना आपली आज्ञाधारकता—यहोवाच्या मार्गात चालण्याची आपली इच्छा प्रदर्शित करण्याची संधी चालून आली. (उत्पत्ति २:१७) पण लवकरच त्यांच्या आज्ञाधारकतेची परीक्षा झाली. सैतान आपल्या लबाड गोष्टींनी आदाम आणि हव्वेला फसवण्याचा प्रयत्न करू लागला, तेव्हा त्यांनी यहोवाप्रती एकनिष्ठा दाखवण्यास हवी होती आणि देवाच्या अभिवचनावर विश्‍वास ठेवण्याद्वारे त्याला आज्ञाधारकता दाखवायची होती. पण खेदाची गोष्ट म्हणजे, ते एकनिष्ठ राहिले नाहीत आणि त्यांनी यहोवावर भरवसा ठेवला नाही. जेव्हा सैतानाने हव्वेसमोर मुक्‍तता देण्याचा प्रस्ताव सादर केला आणि यहोवावर खोटे बोलण्याचा आरोप केला तेव्हा ती फसली गेली आणि तिने यहोवाची आज्ञा मोडली. आदामही नंतर तिच्या पापात सहभागी झाला. (उत्पत्ति ३:१-६; १ तीमथ्य २:१४) त्यांच्या या कृत्यामुळे फार मोठी हानी झाली. यहोवाच्या मार्गानुसार चालल्यामुळे त्यांना त्याच्या इच्छेप्रमाणे कार्य करत राहून निरंतर आनंद प्राप्त करता आला असता. पण, त्याउलट त्यांचे जीवन निराशेने तसेच दुःखाने भरले होते आणि अखेरीस त्यांचा मृत्यू होणार होता.—उत्पत्ति ३:१६-१९; ५:१-५.

५. यहोवाचा दीर्घकालीन उद्देश कोणता आहे आणि विश्‍वासू मानवांना त्या उद्देशाची पूर्णता पाहता यावी म्हणून तो त्यांना कशाप्रकारे मदत करतो?

५ पण एके ना एके दिवशी परिपूर्ण, पापमुक्‍त मानवांकरता या पृथ्वीला परादीस बनवण्याचा आपला उद्देश यहोवाने बदलला नाही. (स्तोत्र ३७:११, २९) शिवाय, त्याच्या मार्गानुसार चालणाऱ्‍यांना आणि त्याच्या अभिवचनाची पूर्णता होण्याची आशा बाळगणाऱ्‍यांना त्याने सदोदीत परिपूर्ण मार्गदर्शन दिले आहे. ज्यांना ऐकणारे कान आहेत, त्यांना यहोवाची वाणी आपल्या मागून कानी पडते: “हाच मार्ग आहे, याने चला.”—यशया ३०:२१.

यहोवाच्या मार्गानुसार चाललेले काही लोक

६. आरंभीच्या काळात कोणत्या दोन व्यक्‍ती देवाच्या मार्गानुसार चालल्या आणि त्याचा कोणता परिणाम झाला?

६ बायबलच्या अहवालानुसार, आदामाच्या संततीपैकी यहोवाच्या मार्गानुसार चाललेल्यांची संख्या फार लहान आहे. हाबेल हा त्यांच्यापैकी पहिला होता. त्याचा अकाली मृत्यू झाला, तरी मरेपर्यंत त्याच्यावर यहोवाची कृपापसंती होती आणि अशाप्रकारे देवाच्या नियुक्‍त वेळी ‘नीतिमानांचे पुनरुत्थान होईल,’ तेव्हा त्यांच्यापैकी एक असण्याचे त्याला एक निश्‍चित भवितव्य लाभले आहे. (प्रेषितांची कृत्ये २४:१५) पृथ्वी आणि मानवांकरता यहोवाचा महान उद्देश अखेरीस पूर्ण झाल्याचे त्याला पाहायला मिळेल. (इब्री लोकांस ११:४) हनोख, हा यहोवाच्या मार्गानुसार चालणारा आणखी एक मनुष्य; या व्यवस्थीकरणाच्या शेवटाविषयी त्याने केलेली भविष्यवाणी यहूदा या पुस्तकात जतन करून ठेवण्यात आली आहे. (यहूदा १४, १५) हनोखला देखील पूर्ण आयुष्य जगता आले नाही. (उत्पत्ति ५:२१-२४) तरी ‘देवाला संतोषविल्याची त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली होती.’ (इब्री लोकांस ११:५) तो मेला तेव्हा हाबेलप्रमाणे त्यालाही पुनरुत्थानाचे आणि यहोवाचे उद्देश पूर्ण झालेले पाहणाऱ्‍यांमध्ये असण्याचे निश्‍चित भवितव्य मिळाले होते.

७. नोहा आणि त्याच्या कुटुंबाने कशाप्रकारे यहोवावर एकनिष्ठा आणि भरवसा दाखवला?

७ जलप्रलयापूर्वीचे जग दुष्टतेत अधिकाधिक बुडत गेले, तसतसे यहोवाच्या आज्ञा पाळणे म्हणजे एकनिष्ठेची कठीण परीक्षाच बनली. त्या जगाचा शेवट जवळ आला तेव्हा काही मोजकेच लोक देवाच्या मार्गानुसार चालत होते. नोहा आणि त्याच्या कुटुंबाने देवाचे ऐकले आणि त्याच्या शब्दावर विश्‍वास ठेवला. त्यांना सांगण्यात आलेले काम त्यांनी विश्‍वासूपणे पूर्ण केले आणि त्याकाळातील जगाच्या दुराचरणात सामील होण्यास त्यांनी नकार दिला. (उत्पत्ति ६:५-७, १३-१६; इब्री लोकांस ११:७; २ पेत्र २:५) एकनिष्ठतेने आणि देवावर भरवसा ठेवून ते आज्ञाधारक राहिले, याकरता आपण त्यांचे कृतज्ञ होऊ शकतो. कारण आज्ञाधारकतेमुळे ते जलप्रलयातून बचावले आणि आपले पूर्वज झाले.—उत्पत्ति ६:२२; १ पेत्र ३:२०.

८. इस्राएल राष्ट्राकरता, देवाच्या मार्गानुसार चालण्यामध्ये काय गोवलेले होते?

८ कालांतराने, यहोवाने विश्‍वासू याकोबाच्या संततीसोबत करार केला आणि ते लोक देवाचे खास राष्ट्र बनले. (निर्गम १९:५, ६) या करार केलेल्या लोकांना यहोवाने लिखित नियमशास्त्र, याजकवर्ग तसेच निरंतर भविष्यसूचक माहिती यांद्वारे मार्गदर्शन दिले. पण, हे मार्गदर्शन स्वीकारावे किंवा कसे हे इस्राएल लोकांवर अवलंबून होते. यहोवाने आपल्या संदेष्ट्याद्वारे इस्राएल लोकांना म्हटले: “पाहा, आज तुमच्यापुढे आशीर्वाद व शाप हे दोन्ही मी ठेवीत आहे, म्हणजे तुमचा देव परमेश्‍वर [“यहोवा,” NW] ह्‍याच्या ज्या आज्ञा मी आज तुम्हाला सांगत आहे त्या तुम्ही पाळिल्या तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल; पण तुम्ही आपला देव परमेश्‍वर [यहोवा] ह्‍याच्या आज्ञा पाळिल्या नाहीत आणि ज्या मार्गाने जाण्याची मी आज तुम्हाला आज्ञा करीत आहे तो सोडून तुम्हाला अपरिचित अशा अन्य देवाच्या मागे तुम्ही गेला तर तुम्हाला शाप मिळेल.”—अनुवाद ११:२६-२८.

काही यहोवाच्या मार्गापासून का दुरावले

९, १०. कोणत्या परिस्थितीमुळे इस्राएल लोकांना यहोवावर विश्‍वास ठेवण्याची आणि त्याच्याप्रती एकनिष्ठा विकसित करण्याची गरज होती?

९ आज्ञाधारक राहण्याकरता आदाम आणि हव्वेला देवावर विश्‍वास ठेवणे आणि त्याला एकनिष्ठ राहणे जसे आवश्‍यक होते त्याचप्रमाणे इस्राएल लोकांनीही असे करणे आवश्‍यक होते. लहानशा इस्राएल राष्ट्राच्या आसपास भांडखोर राष्ट्रे होती. नैर्ऋत्येकडे इजिप्त आणि इथियोपिया ही राष्ट्रे होती. ईशान्येकडे सिरिया आणि अश्‍शूर ही राष्ट्रे होती. फिलिस्टिया, अम्मोन, मोआब आणि एदोम ही राष्ट्रे तर अगदी जवळपास वसलेली होती. या सर्व राष्ट्रांनी केव्हा ना केव्हा तरी इस्राएल राष्ट्राशी शत्रुत्व असल्याचे दाखवले होते. याशिवाय या सर्व राष्ट्रांत खोटा धर्म पाळला जात असे; मूर्तीपूजा; ज्योतिषशास्त्र आणि काही बाबतींत अक्षम्य लैंगिक विधी आणि क्रूरपणे मुलांना बली चढवणे ही त्यांच्या उपासनेतील काही वैशिष्ट्ये होती. इस्राएलच्या आसपासची ही राष्ट्रे कुटुंबांची भरभराट व्हावी, भरघोस पीक मिळावे आणि युद्धात विजय मिळावा म्हणून त्यांच्या दैवतांकडे प्रार्थना करत असत.

१० फक्‍त इस्राएल राष्ट्र हेच केवळ यहोवा या एकमेव देवाची उपासना करत होते. त्याचे नियम इस्राएल लोकांनी पाळल्यास त्यांच्या कुटुंबांची भरभराट होण्याचे, त्यांना भरघोस पीक देण्याचे आणि त्यांच्या शत्रूंपासून त्यांना सोडवण्याचे अभिवचन यहोवाने त्यांना दिले होते. (अनुवाद २८:१-१४) पण खेदाची गोष्ट ही, की अनेक इस्राएल लोकांनी देवाची आज्ञा पाळली नाही. आणि जे देवाच्या मार्गानुसार चालले, त्यांपैकी अनेक जणांना त्यांच्या एकनिष्ठेमुळे दुःख सहन करावे लागले. काहींना छळण्यात आले, काहींची कुचेष्टा करण्यात आली, काहींना फटके मारण्यात आले, काहींना तुरुंगात डांबण्यात आले, काहींवर दगडमार करण्यात आला आणि काही लोक तर इस्राएलमधील त्यांच्याच लोकांकडून मारले गेले. (प्रेषितांची कृत्ये ७:५१; ५२; इब्री लोकांस ११:३५-३८) विश्‍वासू लोकांकरता ती केवढी मोठी परीक्षा होती! पण अनेक जण यहोवाच्या मार्गापासून का भरकटले? इस्राएलच्या इतिहासातील दोन उदाहरणातून आपल्याला त्यांची चुकीची विचारसरणी पाहण्यास मदत होते.

आहाजाचे वाईट उदाहरण

११, १२. (अ) सिरियाकडून धमकावण्यात आले तेव्हा अहाज काय करण्यास तयार झाला नाही? (ब) अहाजने सुरक्षेकरता कोणत्या दोन उगमांकडे पाहिले?

११ सा.यु.पू. आठव्या शतकात आहाज याने दक्षिणेकडील यहूदा राज्यावर अधिपत्य गाजवले. त्याच्या राज्यात शांती नव्हती. एके प्रसंगी सिरिया आणि इस्राएलच्या उत्तरेकडील राज्याने एकत्र मिळून त्याच्याविरुद्ध युद्ध केले, तेव्हा “त्याचे मन व त्याच्या लोकांची मने कंपित झाली.” (यशया ७:१, २) यहोवा अहाजला मदत देण्यास तयार होता आणि त्याने आपली परीक्षा घ्यावी असेही देवाने त्याला आमंत्रण दिले, पण अहाजने ते सरळसरळ अव्हेरले! (यशया ७:१०-१२) परिणामी, यहूदाचा युद्धात पराभव झाला आणि बरीच प्राणहानी देखील झाली.—२ इतिहास २८:१-८.

१२ एकीकडे यहोवाची परीक्षा घेण्यास अहाजने नाकारले, पण तेच दुसरीकडे त्याला अश्‍शूरी राजाची मदत मागण्यात कोणताही कमीपणा वाटला नाही. तरीसुद्धा, यहूदावर त्याच्या आसपासच्या राष्ट्रांकडून संकटे येतच राहिली. जेव्हा अश्‍शूर देखील अहाजच्या विरुद्ध उठले आणि “त्यास त्रस्त केले,” तेव्हा “दिमिष्काच्या ज्या दैवतांनी त्यास मार दिला होता त्यास त्याने यज्ञ केले. तो म्हणाला, अरामी राजास त्याच्या दैवतांनी साहाय्य केले तर मी त्यास यज्ञ केल्यास मलाहि ते साहाय्य करितील.”—२ इतिहास २८:२०, २३.

१३. सिरियाच्या दैवतांकडे वळण्याद्वारे अहाजने काय दाखवून दिले?

१३ काही काळानंतर, यहोवाने इस्राएल लोकांना असे म्हटले: “तुला जे हितकारक ते मी परमेश्‍वर तुझा देव तुला शिकवतो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांति नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटासारखी झाली असती.” (यशया ४८:१७, १८) सिरियाच्या दैवतांकडे वळण्याद्वारे अहाजने हे दाखवून दिले होते, की ज्या मार्गावर त्याने चालण्यास हवे त्यापासून तो किती भरकटला होता. राष्ट्रांच्या विचारसरणीमुळे आणि सुरक्षेकरता यहोवाऐवजी त्यांच्या खोट्या उगमांकडे आशा लावल्यामुळे तो पूर्णपणे भरकटला होता.

१४. खोट्या दैवतांकडे वळण्याकरता अहाजाकडे कोणतीही सबब का नव्हती?

१४ सिरियातील दैवतांसोबतच या राष्ट्रांची दैवते ही “निरुपयोगी दैवते” असल्याचे केव्हाच शाबीत झाले होते. (यशया २:८, NW) दावीद राजाच्या अधिपत्याच्या सुरवातीला सिरियन लोकांना दावीदाचे सेवक बनावे लागले तेव्हा सिरियन दैवतांपेक्षा यहोवा श्रेष्ठ आहे हे अगदी स्पष्ट झाले होते. (१ इतिहास १८:५, ६) केवळ यहोवाच “देवाधिदेव, प्रभूंचा प्रभू, महान, पराक्रमी व भययोग्य देव” असून तोच केवळ खरे संरक्षण प्रदान करू शकतो. (अनुवाद १०:१७) पण, अहाजने मात्र यहोवाकडे पाठ फिरवली आणि संरक्षणाकरता इतर राष्ट्रांच्या दैवताकडे चित्त लावले. परिणामस्वरूप, यहुदावर अनर्थ ओढवला!—२ इतिहास २८:२४, २५.

इजिप्तमध्ये यिर्मयासोबत यहुदी

१५. यिर्मयाच्या काळातील इजिप्तमधील यहूद्यांनी कोणत्या प्रकारे पाप केले?

१५ यहोवाच्या लोकांच्या बेईमानीची हद्द झाल्यामुळे बॅबिलोन्यांद्वारे जेरुसलेमचा आणि त्यातील मंदिराचा नाश व्हावा म्हणून देवाने अनुमती दिली. या राष्ट्रातील बहुतेक लोकांना बॅबिलोनमध्ये दास म्हणून नेण्यात आले. काही लोकांना मात्र नेण्यात आले नाही, त्यांपैकी संदेष्टा यिर्मया हा एक होता. गदल्या या सेनापतीला कट रचून ठार मारण्यात आले तेव्हा मागे राहिलेल्या गटाने यिर्मयालासोबत घेऊन इजिप्तला पलायन केले. (२ राजे २५:२२-२६; यिर्मया ४३:५-७) तेथे, त्यांनी खोट्या दैवतांना अर्पण वाहण्यास सुरवात केली. अविश्‍वासू यहुद्यांना तसे करण्यापासून रोखण्याचा यिर्मयाने प्रयत्न केला, पण ते अडेल होते. यहोवाकडे परतण्यास ते तयार झाले नाहीत, तर त्याउलट त्यांनी “आकाशराणीस” धूप जाळण्याचा आग्रह कायम ठेवला. का? कारण ‘यहूदाच्या नगरात व यरुशलेमेच्या आळ्यात अन्‍नाची चंगळ असे आणि त्यांनी कोणते अनिष्टही पाहिले नव्हते,’ तेव्हा त्यांनी आणि त्यांच्या पूर्वजांनी हेच केले होते. (यिर्मया ४४:१६, १७) यहूद्यांनी असाही युक्‍तिवाद केला: “आम्ही आकाशराणीला धूप जाळण्याचे व तिला पेयार्पणे करण्याचे बंद केले तेव्हापासून आम्हाला सर्व गोष्टींची वाण पडली, आणि तरवारीने व दुष्काळाने आमचा नायनाट होत चालला आहे.”—यिर्मया ४४:१८.

१६. इजिप्तमधील यहूद्यांचा युक्‍तिवाद पूर्णपणे चुकीचा कसा होता?

१६ माणूस कधीकधी काही गोष्टी किती सोयीस्करपणे विसरून जातो! वास्तविक परिस्थिती काय होती? यहोवाने यहूद्यांना दिलेल्या प्रदेशात ते खोट्या दैवतांना बलिदान करत होते. काहीवेळा, अहाजच्या काळात झाल्याप्रमाणे धर्मत्यागामुळे त्यांना संकटे सहन करावी लागली. पण यहोवा करार केलेल्या त्याच्या लोकांप्रती “मंदक्रोध” होता. (निर्गम ३४:६; स्तोत्र ८६:१५) त्यांना पश्‍चात्ताप करण्याचे आर्जवण्याकरता त्याने त्याच्या संदेष्ट्यांना पाठवले. काहीवेळा, जेव्हा राजा यहोवाप्रती विश्‍वासू होता तेव्हा यहोवाने त्याला आशीर्वादित केले आणि परिणामी बहुतेक लोक अविश्‍वासू असले तरी त्यांनाही देवाच्या आशीर्वादामुळे लाभ झाला. (२ इतिहास २०:२९-३३; २७:१-६) इजिप्तमधील यहूद्यांनी जो दावा केला तो किती चुकीचा होता, की त्यांच्या मायदेशी असलेली भरभराट ही त्यांच्या खोट्या दैवतांमुळे होती!

१७. यहूदाला आपले राष्ट्र आणि मंदिर का गमवावे लागले?

१७ सा.यु.पू. ६०७ पूर्वी यहोवाने यहूदाच्या लोकांना आर्जवले होते: “माझे वचन ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईन व तुम्ही माझे लोक व्हाल; तुमचे बरे व्हावे म्हणून जो सरळ मार्ग मी तुम्हास सांगतो त्याने चला.” (यिर्मया ७:२३) यहूद्यांनी त्यांचे मंदिर व त्याबरोबरच त्यांचा प्रदेशही गमावला याचे हेच कारण होते, की त्यांनी ‘यहोवाने आज्ञा दिलेल्या मार्गावरून’ चालण्यास नकार दिला होता. तशाच प्रकारची प्राणघातक चूक आपल्या हातून होऊ नये म्हणून आपण खबरदारी घेतली पाहिजे.

यहोवा त्याच्या मार्गानुसार चालणाऱ्‍यांना आशीर्वादित करतो

१८. यहोवाच्या मार्गानुसार चालणाऱ्‍यांनी काय केले पाहिजे?

१८ भूतकाळाप्रमाणे आजही यहोवाच्या मार्गानुसार चालण्याकरता एकनिष्ठेची गरज आहे—केवळ त्याचीच सेवा करण्याचा दृढनिश्‍चय. यहोवावर भरवसा असण्याची आवश्‍यकता आहे—यहोवाची अभिवचने विश्‍वासयोग्य आहेत आणि ती पूर्ण होतीलच असा पूर्ण विश्‍वास बाळगण्याची आवश्‍यकता आहे. यहोवाच्या मार्गानुसार चालण्याकरता आज्ञाधारकतेची गरज आहे—त्याच्या मार्गावरून विचलित न होता त्याच्या नियमांचे पालन करणे आणि त्याच्या उच्च दर्जांनुसार चालणे. “परमेश्‍वर न्यायी आहे; त्याला नीतिमत्त्व प्रिय आहे.”—स्तोत्र ११:७.

१९. आज अनेक लोक कोणत्या दैवतांची उपासना करतात आणि त्याचा कोणता परिणाम होतो?

१९ अहाजने सुरक्षा प्राप्त व्हावी म्हणून सिरियाच्या दैवतांकडे डोळे लावले. इजिप्तमधल्या इस्राएल लोकांनी भौतिकरित्या संपन्‍न व्हावे म्हणून ‘आकाशराणीकडे’—प्राचीन मध्यपूर्वेमध्ये उपासना केल्या जाणाऱ्‍या देवतेवर आशा ठेवली. आज, अनेक दैवते मूर्तींच्या रूपात नाहीत. येशूने यहोवाची सेवा करण्याऐवजी “धनाची” सेवा केली जात असल्याचा इशारा दिला होता. (मत्तय ६:२४) प्रेषित पौलाने ‘लोभाला’ मूर्तिपूजा असे म्हटले. (कलस्सैकर ३:५) ‘पोट हेच दैवत’ असलेल्या लोकांविषयीही त्याने सांगितले. (फिलिप्पैकर ३:१९) होय, आज उपासना केली जाणारी प्रमुख दैवते म्हणजे पैसा आणि चैनीच्या वस्तू. वास्तविकतेत बहुतेक लोक—अनेक धार्मिक प्रवृत्तीचे लोकही—त्यांची आशा “चंचल धनावर” ठेवतात. (१ तीमथ्य ६:१७) या दैवतांची उपासना करण्याकरता अनेक लोक फार परिश्रम करतात आणि काही प्रतिफळांचा आनंदही घेतात—उत्तम घरांत राहतात, महागड्या वस्तू घेतात आणि चमचमीत अन्‍न खातात. पण सर्वच लोकांना या गोष्टी मिळत नाहीत. आणि या गोष्टी मिळालेल्या लोकांनाही असे दिसून येते की केवळ या वस्तू असून माणसाला समाधान मिळत नाही. या सर्व गोष्टी तात्पुरत्या, क्षणिक असतात आणि आध्यात्मिक गरजा त्यामुळे भागत नाहीत.—मत्तय ५:३.

२०. आपल्याला कोणता समतोल दृष्टिकोन राखण्याची आवश्‍यकता आहे?

२० या व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या काळात जगत असताना आपण व्यावहारिक असले पाहिजे हे खरे आहे. आपल्या कुटुंबांच्या भौतिक गरजा भागवण्याकरता आपल्याला काही माफक पावले उचलण्याची गरज आहे. पण आपण, उच्च राहणीमान, पैशाच्या मागे धावणे, किंवा त्यांसारख्या गोष्टींना देवाची उपासना करण्यापेक्षा जास्त महत्त्व दिल्यास आपण मूर्तिपूजेच्या पाशात पडलो आहोत आणि यहोवाच्या मार्गानुसार चालण्याचे थांबवले आहे. (१ तीमथ्य ६:९, १०) आरोग्य, आर्थिक समस्या आणि अशा इतर समस्या आपल्यासमोर आल्यास काय? आपण इजिप्तमधल्या यहुद्यांसारखे होऊ नये ज्यांनी समस्यांचा दोष देवाची उपासना करण्यावर लावला. उलटपक्षी अहाजासारखे न होता आपण यहोवाची परीक्षा पाहू या. मार्गदर्शनाकरता निष्ठापूर्वक यहोवाकडे जा. पूर्ण भरवशानिशी त्याच्या मार्गदर्शनानुसार चाला आणि प्रत्येक बाब हाताळण्याकरता सामर्थ्य आणि बुद्धी यांकरता त्याच्याकडे प्रार्थना करा. त्यानंतर यहोवाच्या आशीर्वादाकरता विश्‍वासूपणे थांबून राहा.

२१. यहोवाच्या मार्गानुसार चालणाऱ्‍यांना कोणता आशीर्वाद मिळतो?

२१ इस्राएलच्या संपूर्ण इतिहासात यहोवाने त्याच्या मार्गानुसार चालणाऱ्‍यांना खूप आशीर्वादित केले. राजा दावीदाने गायिले: “हे परमेश्‍वरा, माझ्यासाठी शत्रु टपले आहेत, म्हणून तू मला आपल्या न्यायपथाने ने.” (स्तोत्र ५:८) ज्या आसपासच्या राष्ट्रांनी नंतर आहाजला छळले त्याच राष्ट्रांवर यहोवाने दाविदाला कित्येकदा विजय मिळवून दिला. शलमोनाच्या राज्यात इस्राएलास शांती आणि भरभराट लाभली; इजिप्तमधील यहुदी याच गोष्टीकरता व्याकूळ झाले होते. अहाजचा पुत्र, हिज्कीया याला यहोवाने अश्‍शूरविरुद्ध झालेल्या लढाईत मोठा विजय प्राप्त करून दिला. (यशया ५९:१) “निंदकांच्या बैठकीत” न बसता देवाच्या नियमशास्त्रात रमणाऱ्‍या यहोवाच्या एकनिष्ठ लोकांप्रती त्याचा हात तोकडा नव्हता. (स्तोत्र १:१, २) अद्यापही तेच खरे आहे. पण, आपण यहोवाच्या मार्गानुसार चालत आहोत याची आपण आज खात्री कशी करू शकतो? पुढील लेखात याची चर्चा करण्यात येईल.

तुम्हाला आठवते का?

◻ आपल्याला यहोवाच्या मार्गानुसार चालायचे असल्यास कोणते गुण महत्त्वपूर्ण आहेत?

◻ अहाजची विचारसरणी का चुकीची होती?

◻ इजिप्तमधल्या यहूद्यांच्या युक्‍तिवादात काय चुकीचे होते?

◻ यहोवाच्या मार्गानुसार चालण्याचा निर्धार आपण कसा बळकट करू शकतो?

[१३ पानांवरील चित्र]

यहोवाऐवजी अहाजने सिरियाच्या दैवतांवर आशा ठेवली

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा