वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ३/१ पृ. ४-७
  • सावत्र कुटुंबातही आनंद

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सावत्र कुटुंबातही आनंद
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • एक मूलभूत गुण
  • सख्खे पालक
  • शिस्त—न आवडणारा विषय
  • पालकांमधील दळणवळण अत्यावश्‍यक
  • कौटुंबिक एकता मजबूत करणे
  • सावत्र कुटुंबांच्या खास समस्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • माझ्या पालकाच्या पुनर्विवाहाला मी कसे तोंड द्यावे?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • तुमच्या घरात शांती राखा
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • तुमच्या घराण्याच्या तारणासाठी कठीण परिश्रम करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ३/१ पृ. ४-७

सावत्र कुटुंबातही आनंद

सावत्र कुटुंबातही आनंद मिळवणे शक्य आहे काय? होय, विशेषतः अशा कुटुंबातील प्रत्येकाने पुढील गोष्ट लक्षात ठेवली तर, ती म्हणजे “प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍याकरिता उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ३:१६) अशा कुटुंबातील प्रत्येकजण जेव्हा बायबलमधील तत्त्वे लागू करतो तेव्हा कुटुंबाची यशस्वीरीत्या उभारणी करता येणे जवळजवळ शक्य होते.

एक मूलभूत गुण

मानवी नातेसंबंधांचे नियमन करण्याकरता बायबलमध्ये फारच थोडे वास्तविक नियम देण्यात आले आहेत. सुज्ञपणे वागण्याकरता आपल्याला मदत होईल असे उत्तम गुण आणि मनोवृत्ती विकसित करण्याचे बायबलमध्ये उत्तेजन देण्यात आले आहे. अशाप्रकारचे उत्तम गुण आणि मनोवृत्ती आनंदी कौटुंबिक जीवनाकरता मूलभूत आधार आहेत.

हे सर्व खरे असले, तरी असे म्हणणे केव्हाही उचित होईल, की कोणत्याही कुटुंबाची यशस्वीरीत्या उभारणी व्हायची असेल, तर प्रेम हा गुण अत्यावश्‍यक आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “प्रीतीमध्ये ढोंग नसावे. . . . बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा.” (रोमकर १२:९, १०) “प्रेम” या शब्दाचा अगदी विपरीत अर्थ लावला जात असला, तरी येथे पौलाने उल्लेख केलेला प्रेमाचा गुण विशेष आहे. हे ईश्‍वरी प्रेम आहे आणि ते “कधी अंतर देत नाही.” (१ करिंथकर १३:८) बायबल या प्रेमाचे वर्णन निःस्वार्थ आणि सेवा करण्यास तत्पर असणारे असे करते. दुसऱ्‍यांचे भले करण्याकरता प्रेम केव्हाही तयार असते. ते सहनशील, दयाळू आहे, ते द्वेष करत नाही, बढाई मारत नाही, अहंभाव मानत नाही. स्वतःचा स्वार्थ पाहत नाही. सहकार्य करण्यास, विश्‍वास व आशा ठेवण्यास आणि येणारी कोणतीही गोष्ट सहन करण्यास प्रेम सदैव तयार असते.—१ करिंथकर १३:४-७.

खऱ्‍या प्रेमामुळे मतभेद मिटवण्यास आणि वेगवेगळ्या प्रकारे संगोपन झालेल्या आणि भिन्‍न व्यक्‍तिमत्त्वाच्या लोकांना एकत्र आणण्यास मदत होते. घटस्फोटाच्या किंवा सख्ख्या पालकाच्या मृत्यूमुळे होणाऱ्‍या अतीव दुःखाला तोंड देण्यासही त्यामुळे मदत होते. एका सावत्र वडिलाने त्याच्या समस्येविषयी म्हटले: “मला फक्‍त माझ्या भावनांची जास्त काळजी वाटत होती त्यामुळे माझ्या सावत्र मुलांना आणि इतकंच नव्हे तर माझ्या पत्नीला काय वाटतं याकडेही मी कधी लक्ष दिलं नाही. मला कमी संवेदनक्षम व्हावं लागलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मला नम्र होण्याचं शिकावं लागलं.” आवश्‍यक ते बदल करण्यास या व्यक्‍तीला प्रेमामुळे मदत मिळाली.

सख्खे पालक

सख्खे पालक दूरावतात तेव्हा अशा मुलांशी योग्य नातेसंबंध ठेवण्यास प्रेमामुळे मदत होऊ शकते. एक सावत्र वडील असे म्हणतात: “माझ्याशिवाय इतर कोणावरही माझ्या माझ्या सावत्र मुलांनी प्रेम करू नये असं मला वाटायचं. ही मुलं त्यांच्या सख्ख्या वडिलांना भेटायला जायची तेव्हा त्यांच्या सख्ख्या वडिलांविषयी टीका करण्याचा मोह मला अनावर व्हायचा. सख्ख्या वडिलांसोबत संपूर्ण दिवसभर मौजमजा करून ही मुलं घरी आल्यानंतर मला भयंकर अस्वस्थ व्हायचं. पण, जेव्हा या मुलांचा त्यांच्या सख्ख्या वडिलांसोबतचा दिवस वाईट जायचा तेव्हा मात्र मला खूप खूप आनंद व्हायचा. खरोखर, माझी ही सावत्र मुलं माझ्यापासून दूरावतील याचीच मला भीती वाटायची. माझ्या सावत्र मुलांच्या जीवनांत त्यांच्या सख्ख्या वडिलांची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखणं आणि ती स्वीकारणं ही एक महाकठीण गोष्ट होती.”

या सावत्र वडिलांना खऱ्‍या प्रेमामुळे या वस्तुस्थितीला तोंड देण्यास मदत मिळाली, की “तत्काळ” प्रेमाची अपेक्षा करणे अवास्तविक आहे. मुलांनी आपल्याला लगेच स्वीकारले नाही म्हणून त्यांनी मनाला इतके लावून घ्यायचे नव्हते. त्यांना या गोष्टीची जाणीव झाली, की मुलांच्या मनातील सख्ख्या वडिलांची जागा त्यांना कधीही घेता येणार नाही. ही मुले त्यांच्या सख्ख्या वडिलांना लहानपणापासून ओळखत होती, पण सावत्र वडिलांशी त्यांची अलीकडेच ओळख झाल्यामुळे या सावत्र वडिलांना मुलांची मने जिंकण्याकरता जिकरीचा प्रयत्न करावा लागणार होता. एलिझाबेथ इनस्टेन ह्‍या संशोधिका अनेक अनुभवावरून असे म्हणतात: “सख्ख्या पालकांची जागा कधीही घेतली जाऊ शकत नाही—कधीच नाही. मुलाच्या पालकाचा मृत्यू झाला असेल किंवा त्याने मुलांना सोडले असेल, तरीसुद्धा त्या मुलांच्या जीवनात त्यांच्या पालकांचे स्थान अबाधित असते.”

शिस्त—न आवडणारा विषय

तरुणांना प्रेमळ शिस्तीची आवश्‍यकता आहे असे बायबल सांगते आणि या मुलांमध्ये सावत्र मुलांचाही समावेश होतो. (नीतिसूत्रे ८:३३) बायबलच्या या विचाराशी अनेक पेशेवाईक लोक आपली सहमती दर्शवू लागले आहेत. सायरीझ आलवीस डी आरायूझू या प्राध्यापकांनी असे म्हटले: “मर्यादा कोणालाच आवडत नाहीत आणि हा स्वाभाविक धर्म आहे, पण त्या आवश्‍यक असतात. ‘नाही’ हा संरक्षक शब्द आहे.”

पण, सावत्र आईवडील असलेल्या कुटुंबांत शिस्तीवरील दृष्टिकोनांत मतभेद झाल्यामुळे गंभीर भांडणेही होऊ शकतात. सावत्र मुलांवर काही प्रमाणात त्यांच्या आधीच्या पालकाकडून वेगळे संस्कार झालेले असतात. या मुलांना अशा काही सवयी असतील ज्यांमुळे त्यांचे सावत्र पालक त्यांच्यावर कदाचित रागवतील. आणि आपल्या पालकांची काही गोष्टींविषयी इतकी ठाम मते का आहेत, हे सावत्र मुलांना कदाचित समजणार नाही. ही परिस्थिती यशस्वीरीत्या कशी हाताळता येईल? पौल ख्रिश्‍चनांना बोध करतो: ‘प्रीती, धीर व सौम्यता ह्‍यांच्या पाठीस लागा.’ (१ तीमथ्य ६:११) ख्रिस्ती प्रेम, सावत्र पालकांना आणि मुलांना एकदुसऱ्‍याला समजून घेताना सौम्यतेने आणि धीराने वागण्यास मदत करील. सावत्र पालक अधीर असल्यास, त्यांच्या तोंडून ‘संताप, क्रोध आणि कटूपण’ बाहेर पडून त्याने त्याच्या सावत्र मुलांसोबत प्रस्थापित केलेला नातेसंबंध चुटकीसरशी मोडकळीस येईल.—इफिसकर ४:३१.

अशा वेळी आपल्याला काय मदत करेल, हे संदेष्टा मीखा याने सांगितले. त्याने म्हटले: “नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यांवाचून परमेश्‍वर [“यहोवा,” NW] तुजजवळ काय मागतो?” (मीखा ६:८) शिस्त लावतेवेळी निःपक्षपाती असणे फार महत्त्वाचे आहे. पण दयेविषयी काय? एका ख्रिस्ती वडिलांनी सांगितले, की रविवारी मंडळीच्या उपासनेत सहभागी होण्याकरता माझ्या सावत्र मुलांना रविवारी सकाळी लवकर उठवणे माझ्याकरता फार अवघड काम होते. त्यांच्यावर खेकसण्याऐवजी या व्यक्‍तीने दयेने काम केले. ते स्वतः सकाळी लवकर उठले, नाष्टा बनवला आणि प्रत्येक सावत्र मुलाला त्यांनी चहा नेऊन दिला. परिणामी, ही मुले त्यांच्या सावत्र वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे सकाळी लवकर उठू लागली.

प्राध्यापक ॲना, लुईझा व्हियेरा दे मॅटोस यांनी असे मनोरंजक विवेचन मांडले: “कोणत्या प्रकारचे कुटुंब आहे, हे महत्त्वाचे नाही, तर त्या कुटुंबातील नातेसंबंधाचा दर्जा कसा आहे हे महत्त्वाचे आहे. माझ्या अभ्यासावरून मला दिसून आले आहे, की वर्तनासंबंधी समस्या असलेली लहान मुले अशा कुटुंबांत वाढलेली असतात जेथे पालकीय देखरेख इतकी चांगली नसते, नियमांची आणि दळणवळणाची उणीव असते.” त्या असेही म्हणाल्या: “मुलांचे संगोपन करताना त्यांना ‘नकार’ देणे जरूरीचे आहे, या गोष्टीला महत्त्व द्यावे तितके कमीच आहे.” याखेरीज, डॉ. एमली आणि जॉन व्हिशर यांनी असे म्हटले: “शिस्त लावणाऱ्‍या व्यक्‍तीच्या प्रतिक्रिया आणि त्यासोबतचा नातेसंबंध याची पर्वा करणाऱ्‍या व्यक्‍तीला शिस्त लावली तर त्याचा फायदा होऊ शकतो.”

वरील विवेचनांमुळे, सावत्र कुटुंबात कोणी शिस्त लावावी असा प्रश्‍न उद्‌भवतो. ‘नाही’ असे कोणी म्हणावे? या विषयावर बोलताना, काही पालकांनी असे ठरवले, की त्यांच्या सावत्र मुलांशी जवळीक साधण्याकरता थोडा वेळ मिळावा म्हणून या मुलांच्या सख्ख्या पालकांनी सुरवातीला शिस्त लावावी. सावत्र आईने किंवा वडिलांनी त्यांच्या सावत्र मुलांना शिस्त लावण्याआधी तुमचे त्यांच्यावर प्रेम आहे असा विश्‍वास सावत्र मुलांमध्ये निर्माण होऊ द्यावा.

सावत्र पालक वडील असल्यास काय? वडील कुटुंबाचे मस्तक आहेत असे बायबलमध्ये सांगण्यात आले नाही का? होय. (इफिसकर ५:२२, २३; ६:१, २) पण, सावत्र मुलांना खासकरून शिक्षा देण्याची वेळ येते तेव्हा सावत्र वडील काही काळापर्यंत स्वतः मुलांना शिक्षा देणार नाहीत. सावत्र वडील त्यांच्या मुलांना ‘त्यांच्या आईची शिस्त’ पाळण्याची अनुमती देतील आणि त्याच वेळी ‘मुलांचे [नवीन] वडील मुलांनी त्यांचा बोध ऐकावा’ म्हणून पाया घालतील. (नीतिसूत्रे १:८; ६:२०; ३१:१) पुरावा हे दाखवून देतो, की असे केल्यामुळे मस्तकपदाच्या तत्त्वाचे उल्लंघन होत नाही. याशिवाय एका सावत्र वडिलांनी असे म्हटले: “बोध, सुधारणूक आणि वाग्दंड या गोष्टींचा शिस्त लावण्यात समावेश होतो हे मी लक्षात ठेवले. अशाप्रकारची शिस्त जेव्हा उचितरीत्या, प्रेमळपणे आणि दयेने केली जाते आणि पालक स्वतः मुलांसमोर याबाबतीत उदाहरण ठेवतात तेव्हा मात्र ह्‍या शिस्तीचा निश्‍चित फायदा होतो.”

पालकांमधील दळणवळण अत्यावश्‍यक

नीतिसूत्रे १५:२२ म्हणते: “मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात.” सावत्र कुटुंबातील पालकांनी एकमेकांशी शांत आणि मनमोकळेपणाने एकमेकांची मसलत घेणे महत्त्वाचे आहे. ओ एस्टेडो डे एस. पोलो या वृत्तपत्राच्या एका स्तंभलेखिकेने असे लिहिले: “पालकांनी घालून दिलेल्या मर्यादा अजमावून पाहण्याची मुलांची मनोवृत्ती असते.” सावत्र कुटुंबात हे आणखीनच खरे असेल. यामुळे पालकांना विविध विषयांच्या बाबतींत एकमत होण्याची गरज आहे जेणेकरून त्यांच्यातील ऐक्य मुलांच्या नजरेस पडेल. सावत्र पालक अन्यायीपणे वागत आहे असे सख्ख्या पालकाला वाटल्यास काय? अशा वेळी या गोष्टीची मुलांसमोर चर्चा करण्याऐवजी त्यांनी खासगीत एकमेकांशी बोलावे.

पुनर्विवाह केलेली एक माता असे म्हणते: “आईकरता सर्वात कठीण गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे सावत्र वडील तिच्या सख्ख्या मुलांना शिस्त लावत असल्याचे पाहणे, विशेषतः तेव्हा, जेव्हा तिला वाटते, की मुलांचे सावत्र वडील तिच्या सख्ख्या मुलांशी उतावीळपणे किंवा अन्यायाने वागत आहेत. हे पाहून या मातेचे मन खचून जाते. तिला आपल्या मुलांची बाजू घ्यावीशी वाटते. अशावेळी मुलांच्या सावत्र वडिलांच्या अधीन राहणे आणि त्यांच्या पाठीशी राहणे कठीण जाते.

“एकदा, १२ आणि १४ वर्षांच्या माझ्या दोन मुलांनी काहीतरी करण्याकरता त्यांच्या सावत्र वडिलांकडे परवानगी मागितली. त्यांनी लगेच त्यांना नाही म्हटलं आणि आपल्याकरता तसं करणं किती महत्त्वाचे आहे, हे मुलांना सांगण्याची संधी देण्यापूर्वीच ते निघूनही गेले. मुलं तर रडकुंडीला आली होती आणि मी फक्‍त पाहत राहिले. थोरल्या मुलानं माझ्याकडे पाहिलं आणि म्हटलं: ‘आई, त्यांनी काय केलं हे तू पाहिलंस ना?’ मी म्हटलं: ‘हो, मी पाहिलं. पण तरी ते आपल्या घराचे मस्तक आहेत, आणि मस्तकपदाचा आदर करावा असं बायबल आपल्याला सांगतं.’ मुलं गुणी असल्यामुळे त्यांनी माझं ऐकलं आणि ती शांत झाली. त्याच संध्याकाळी मी माझ्या पतीसोबत याविषयी बोलले आणि आपण फारच अधिकारवाणीने बोललो हे त्यांनी कबूल केले. ते तडक मुलांच्या खोलीत गेले आणि मुलांजवळ झालेल्या गोष्टीबद्दल खेद व्यक्‍त केला.

“या घटनेवरून आम्ही पुष्कळ काही शिकलो. निर्णय घेण्यापूर्वी लक्षपूर्वक ऐकण्याचे माझे पती शिकले. प्रमुखपदाचे तत्त्व उंचावून धरण्याचे मला समजले; मग त्यामुळे आपले मन दुखावले गेले तरीही. मुलांनी अधीन राहण्याचे महत्त्व जाणले. (कलस्सैकर ३:१८, १९) आणि माझ्या पतीने मनःपूर्वक खेद व्यक्‍त केला त्यावरून आम्हा सर्वांना नम्रतेचा महत्त्वाचा धडा शिकता आला. (नीतिसूत्रे २९:२३) आज, ही दोन्ही मुलं मंडळीत वडील म्हणून काम पाहतात.”

चुका होतीलच. मुले असे काही बोलतील किंवा करतील ज्यामुळे मन दुखावले जाईल. त्या-त्या वेळच्या दबावामुळे सावत्र पालक अवाजवीपणे वागतील. पण, “माझं चुकलं, मला क्षमा कर,” यांसारखे साधे शब्द खचलेले मन सावरण्याकरता पुष्कळ काही करू शकतात.

कौटुंबिक एकता मजबूत करणे

सावत्र कुटुंबात जिव्हाळ्याचा नातेसंबंध तयार होण्याकरता वेळ लागतो. तुम्ही सावत्र पालक असल्यास सहानुभाव दाखवण्याची तुम्हाला गरज आहे. समंजसपणा दाखवा आणि मुलांसोबत वेळ घालवा. कुटुंबातील लहान मुलांशी खेळा. मोठ्यांशी बोलण्यास तयार असा. एकत्र वेळ कसा घालवता येईल ते पाहा—उदाहरणार्थ, घरकामात मुलांची मदत घ्या, जसे की स्वयंपाक करताना किंवा गाडीची साफसफाई करताना. बाजाराला जाताना तुमच्या मुलांना सोबत घेऊन जा, त्यांची मदत घ्या. याशिवाय, प्रेमाच्या हावभावांवरूनही तुमच्या सावत्र मुलांवरील तुमचे प्रेम व्यक्‍त होऊ शकते. (अर्थात, सावत्र वडिलांनी त्यांच्या सावत्र मुलींशी वागताना योग्य मर्यादा राखली पाहिजे त्यामुळे त्यांना त्यांच्या सावत्र वडिलांच्या सहवासात अस्वस्थ वाटणार नाही. मुलांना देखील मर्यादा आहेत, हे सावत्र आईंनी लक्षात ठेवण्यास हवे.)

सावत्र कुटुंबातही आनंद मिळू शकतो. आणि पुष्कळ कुटुंबे आनंदी झाली आहेत. सावत्र कुटुंबातील सर्व सदस्य आणि खासकरून आईवडील योग्य मनोवृत्ती आणि वाजवी अपेक्षा ठेवतात तेव्हा या कुटुंबांत आनंदाचे वातावरण तयार होते. प्रेषित योहानाने लिहिले: “प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रीति करावी, कारण प्रीति देवापासून आहे.” (१ योहान ४:७) होय, मनापासून केलेले प्रेम आनंदी सावत्र कुटुंबाची खरी गुरुकिल्ली आहे.

[७ पानांवरील चित्र]

आनंदी सावत्र कुटुंबे

एकत्र मिळून देवाच्या वचनाचा अभ्यास करतात . . .

एकत्र मिळून वेळ घालवतात . . .

एकत्र मिळून बोलतात . . .

एकत्र मिळून काम करतात . . .

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा