त्यांनी आपले नाव केले नाही
बायबलमध्ये, बाबेलचा कुप्रसिद्ध बुरूज बांधणाऱ्यांची नावे दिलेली नाहीत. तो अहवाल सांगतो: “मग ते म्हणाले, ‘चला! आपणासाठी एक नगर आणि गगनचुंबित शिखराचा एक बुरूज बांधू; आणि आपले नाव करू म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही.’” (तिरपे वळण आमचे.)—उत्पत्ति ११:४.
“ते” कोण होते? ही घटना जलप्रलय होऊन गेल्यावर २०० वर्षांनंतर घडली. तोपर्यंत ८०० वर्षांचा झालेला नोहा त्याच्या इतर अनेक वंशजांसोबत राहत होता. ते सर्वजण एकच भाषा बोलत होते आणि एकाच ठिकाणी राहत होते जेथे तो व त्याचे मुलगे जलप्रलयानंतर तळ ठोकून राहिले होते. (उत्पत्ति ११:१) पुढे काय झाले की, या मोठ्या लोकसमुदायातले काही जण हळूहळू पूर्वेच्या दिशेकडे निघून गेले आणि तेथे त्यांना “शिनार देशात एक मैदान लागले.”—उत्पत्ति ११:२.
निव्वळ अपयश
याच मैदानात त्या गटाने देवाविरुद्ध बंड करायचे ठरवले. ते कसे? “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका” अशी आज्ञा पहिल्या मानवी दांपत्याला देण्यात आली, तेव्हा यहोवा देवाने आपला उद्देश प्रकट केला होता. (उत्पत्ति १:२८) जलप्रलयानंतर हीच आज्ञा नोहा आणि त्याच्या पुत्रांनाही देण्यात आली. देवाने त्यांना सूचना दिली: “तुम्ही फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वीवर विपुल वंशवृद्धि करा, तिच्यावर बहुगुणित व्हा.” (उत्पत्ति ९:७) यहोवाच्या निर्देशनाच्या विरोधात या लोकांनी एक शहर बांधले ज्यामुळे त्यांची “पृथ्वीच्या पाठीवर . . . पांगापांग होणार नाही.”
त्याशिवाय, हे लोक ‘स्वतःचे नाव करण्याच्या’ उद्देशाने देखील हा बुरूज बांधू लागले. परंतु, त्यांच्या अपेक्षांच्या अगदी उलटच घडले; बुरूजाचे बांधकाम त्यांना पूर्ण करता आले नाही. बायबल अहवाल दाखवून देतो की, यहोवाने त्यांच्या भाषेत गोंधळ निर्माण केला आणि म्हणून त्यांना एकमेकांची भाषा समजेना. “नंतर,” प्रेरित अहवाल सांगतो की, “परमेश्वराने तेथून त्यांस सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले; ह्याप्रमाणे त्यांचे नगर बांधावयाचे राहिले.”—उत्पत्ति ११:७, ८.
या धाडसी कृत्याचे पूर्ण अपयश यावरून स्पष्ट होते की, बांधणाऱ्यांचे ‘नाव झाले’ नाही अथवा ते प्रसिद्ध बनले नाहीत. खरे तर, त्यांची नावे कोणालाच ठाऊक नाहीत आणि ती मानवी इतिहासातून पुसून टाकण्यात आली आहेत. पण नोहाचा पणतू, निम्रोद याच्याविषयी काय? देवाविरुद्धच्या या बंडाळीचा तो नेता नव्हता का? मग त्याचे नाव प्रसिद्ध नाही का?
निम्रोद—उद्धट बंडखोर
निःसंशये, निम्रोद हा नायक होता. उत्पत्ति १० वा अध्याय त्याची ओळख “परमेश्वरासमोर बलवान पारधी” अशी पटवून देतो. (उत्पत्ति १०:९) शास्त्रवचने असेही म्हणतात की, “तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला.” (उत्पत्ति १०:८) निम्रोद एक योद्धा, हिंसा करणारा मनुष्य होता. जलप्रलयानंतर स्वतःला राजा नियुक्त करणारा तो पहिला मानवी शासक बनला. निम्रोद बांधकाम करणारा देखील होता. त्याने बाबेलला धरून आठ शहरे वसवली असे बायबल म्हणते.—उत्पत्ति १०:१०-१२.
यास्तव देवाचा विरोधी, बाबेलचा राजा आणि शहरे बांधणाऱ्या निम्रोदाचा, बाबेलचा बुरूज बांधण्यात निश्चितच हात होता. मग त्याने आपले नाव केले नाही का? निम्रोद या नावाविषयी पौर्वात्य भाषा व इतिहास तज्ज्ञ इ. एफ. सी. रोझनमुलर यांनी लिहिले: “निम्रोदला त्याचे नाव इब्री अर्थानुसार [मराध], अर्थात ‘त्याने बंड केले,’ ‘तो विरोधी बनला,’ यापासून देण्यात आले.” मग रोझनमुलर स्पष्ट करतात की, “पौर्वात्य लोकांमध्ये, प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींना मृत्यूनंतर दिलेल्या नावाने ओळखण्याची प्रथा आहे; यावरूनच काहीवेळा, दिलेले नाव आणि केलेले कार्य यांमध्ये आश्चर्यकारक साम्यता आढळून येते.”
अनेक विद्वानांचे याबाबतीत एकमत आहे की, निम्रोद हे नाव, त्याला जन्मल्यावर देण्यात आलेले नाव नव्हते. त्याउलट, त्यांच्या मते, त्याची बंडखोर वृत्ती प्रकट झाल्यावर, त्याच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल असे नाव देण्यात आले. उदाहरणासाठी, सी. एफ. काईल म्हणतात: “[मराध] अर्थात, ‘आम्ही बंड करू’ यापासून आलेले निम्रोद हे नावच देवाविरुद्ध हिंसक प्रतिकार यास स्पष्ट करते. हे नाव इतके विशेषगुण दर्शक आहे की, केवळ त्याच्या समकालीन लोकांनी त्याला ते दिले असावे आणि अशातऱ्हेने ते त्याचे व्यक्तिगत नाव बनले.” काईल एका तळटीपेत इतिहासकार जेकब पेरीझोनियस यांचे लिखाण उद्धृत करतात: “क्रूर शिकारी आणि आपली स्वतःची टोळी असलेला हा मनुष्य [निम्रोद], इतरांना बंडखोर बनण्यास उद्युक्त करण्यासाठी नेहमी ‘निम्रोद, निम्रोद,’ अर्थात ‘आपण बंड करू! आपण बंड करू!’ असे म्हणत होता आणि हे शब्द दोन दोन वेळा उच्चारत होता असे मला वाटते. यास्तव, नंतरहून इतरांनी, इतकेच नव्हे तर खुद्द मोशेने देखील त्याचे हेच नाव ठेवले.”
तेव्हा निम्रोदाने आपले नाव केले नाही हे यावरून स्पष्ट होते. त्याला जन्मल्यावर दिलेले नाव स्पष्टतः अज्ञात आहे. इतिहासातून त्याचे नाव पुसून टाकण्यात आले आहे; त्याच्या अनुयायांची नावे पुसून टाकण्यात आली अगदी त्याचप्रमाणे. त्याचे नाव पुढे चालू ठेवायला त्याचा कोणी वंशही राहिला नाही. गौरव आणि प्रसिद्धी मिळण्याऐवजी त्याला कुप्रसिद्धी प्राप्त झाली. निम्रोद या नावामुळे, यहोवा देवाला मूर्खपणाने आव्हान केलेला उद्धट बंडखोर अशी त्याच्यावर कायमची छाप पडली आहे.