वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ३/१ पृ. ४-७
  • ते क्षमा का मागत आहेत?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ते क्षमा का मागत आहेत?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अखिलचर्चवाद आणि नैतिक स्थिती
  • सर्वांचे एकमत नाही
  • ईश्‍वरी न्यायदंड
  • चर्चेस पापांची कबुली करतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • एकच ‘खरे चर्च’ आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ३/१ पृ. ४-७

ते क्षमा का मागत आहेत?

चर्चेसनी आपल्या चुका कबूल कराव्यात आणि स्वतःत सुधारणा कराव्यात ही कल्पना काही नवीन नाही. रेलिजोनी ए मिटी (धर्म आणि दंतकथा) नामक धर्माच्या एका शब्दकोशानुसार, प्रारंभिक चर्चच्या गृहीत एकनिष्ठेमुळे मध्ययुगीन काळात लोकांची आस्था वाढली व धर्मसुधारणा व्हावी असे अनेकांना विनंती करावयास प्रवृत्त केले.

सन १५२३ मध्ये मार्टिन लूथर रोमपासून विभक्‍त झाल्यानंतर, पोप एड्रीन सहावे यांनी, न्यूरेम्बर्गच्या मुख्य राजकारणी सभेला असा संदेश पाठवून दुफळी नाहीशी करण्याचा प्रयत्न केला की: “अनेक वर्षांपासून घृणास्पद गोष्टी पोपच्या अधिकारितेत एकत्र झाल्या आहेत हे आम्हास चांगल्याप्रकारे माहीत आहे. . . . आम्ही सर्वात आधी, या सर्व दुष्टतेचा जेथून उगम झाला असावा त्या रोमी क्यूरियात [पोपच्या मंत्रिमडळात] सुधारणा आणण्याचा सर्वंकष प्रयत्न करू.” परंतु, या कबुलीने दुफळी नाहीशी झाली नाही किंवा पोपच्या मंत्रिमंडळातील भ्रष्टाचाराचे उच्चाटन देखील करता आले नाही.

अलीकडेच, चर्चेसनी संहाराच्या बाबतीत मौन बाळगल्याबद्दलही त्यांची टीका करण्यात आली. युद्धात भाग न घेण्याचे उत्तेजन आपल्या सदस्यांना न दिल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. सन १९४१ मध्ये, दुसरे महायुद्ध जसजसे राक्षसी स्वरूप धारण करू लागले होते, प्रिमो मॉटसोलॉरी नामक एका पाळकाने विचारले: “रोम [चर्च] पूर्वी जसे कम वादग्रस्त शिकवणुकींप्रती ठामपणे प्रतिक्रिया व्यक्‍त करीत असे व अजूनही तिची [चर्चची] तीच सवय आहे त्याप्रमाणे तिने आता कॅथलिक शिकवणुकींचे महत्त्व कमी होत चाललेले पाहून त्याला ठामपणे प्रतिक्रिया का व्यक्‍त केली नाही?” कम वादग्रस्त शिकवणुकी, कशाच्या तुलनेत? ते पाळक, युद्धखोर राष्ट्रवादाच्या राक्षसाबद्दल बोलत होते जो त्यावेळच्या संस्कृतीच्या चिंधड्या उडवत होता.

परंतु वस्तुस्थिती अशी आहे, की अगदी आता आतापर्यंत धर्माने आपल्या गुन्ह्यांची कबुली देणे असामान्य होते. सन १८३२ मध्ये कॅथलिक चर्चने ‘स्वतःत सुधारणा’ करावी या काहींच्या आग्रहावर ग्रेगरी १६ वे म्हणाले: “[चर्चच्या] संरक्षणासाठी व वाढीसाठी विशिष्ट ‘पुनर्स्थापना व सुधारणा’ हवी असे म्हणणे असमंजसपणाचे व घातक आहे, जणू, चर्चच सर्व दोषांसाठी जबाबदार आहे. पण मग, नाकारता येत नाहीत अशा उघड दोषांबद्दल काय? त्यांचे समर्थन करण्याकरता विविध डावपेचांचा वापर करण्यात आला. जसे की, चर्च पवित्र आणि पापी दोन्ही आहे असे काही वेदान्तींनी मत धारण केले आहे. ही संस्था पवित्र आहे—देवाने तिला दोषापासून जपून ठेवले असे म्हटले जाते. पण, तिच्यातील सदस्य तर पापीच आहेत. तेव्हा, चर्चच्या नावाखाली जेव्हा घृणास्पद कृत्ये केली जातात तेव्हा संस्थेला नव्हे तर तिच्यातील सदस्यांना दोषी ठरवले पाहिजे. हो ना? पण रोमन कॅथलिक वेदान्ती हॅन्स कुंग यांना हे पटत नाही; त्यांनी लिहिले: “असे एकही परिपूर्ण चर्च अस्तित्वात नाही ज्यात अपरिपूर्ण चर्च सदस्य नाहीत.” त्यांनी स्पष्टीकरण दिले: “कबुली देण्याकरता पापरहित चर्च अस्तित्वातच नाही.”

अखिलचर्चवाद आणि नैतिक स्थिती

अशा कोणत्या गोष्टीने चर्चेसना आता क्षमा मागण्यास प्रवृत्त केले असावे बरे, असा कदाचित तुमच्या मनात विचार आला असेल. सुरवातीला, प्रोटेस्टंट आणि ऑर्थोडॉक्स यांनी, विविध पंथांतील “गत विभाजनांना” आपण जबाबदार असल्याचे कबूल केले. सन १९२७ मध्ये स्वीत्झर्लंडच्या लाऊसेन येथील “विश्‍वास आणि व्यवस्था” या अखिलचर्च परिषदेत त्यांनी असे कबूल केले. रोमन कॅथलिक चर्चनेही त्यांच्या पाठोपाठ त्यांचे उदाहरण गिरवले. खासकरून व्हॅटिकन दुसरे पासून,a उच्च पदावर असलेले बिशप, तसेच पोप यांनी अगदी नियमितपणे, ख्रिस्ती धर्मजगतातील विभाजनांसाठी क्षमा मागितली आहे. कशासाठी? ख्रिस्ती धर्मजगतात त्यांना अधिक ऐक्य हवे होते, हे उघड आहे. कॅथलिक इतिहासकार निकोलिनो सॉरॉल यांनी म्हटले, की जॉन पॉल दुसरे यांच्या “‘मिया कुल्पांच्या’ योजनेत एक डावपेच आहे, आणि तो आहे, अखिल चर्चवाद.”

परंतु, यात केवळ अखिलचर्चवादच गोवलेला नाही. आज, ख्रिस्ती धर्मजगताचा कुप्रसिद्ध इतिहास सर्वांनाच माहीत आहे. वेदान्ती हॅन्स उर्स फोन बॉल्टॉझॉर म्हणतात: “एखादा कॅथलिक या इतिहासाकडे इतक्या सहजासहजी दुर्लक्ष करू शकत नाही. पोप ज्या चर्चचा सभासद आहे त्या चर्चने अशी कामे केली आहेत किंवा करू दिली आहेत ज्यांना आजच्या जगात आपण निश्‍चितच अनुमती देणार नाही.” म्हणूनच, पोपनी एका मंडळाची नियुक्‍ती केली जेणेकरून “चर्चची काळी कर्तृत्वे उजेडात आणल्यावर . . . क्षमा मागता येऊ शकेल.” मग, चर्चेसनी स्वतःला आत्मसमीक्षेसाठी तयार करण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे, तिला तिची नैतिक स्थिती पुन्हा प्राप्त करायची इच्छा आहे.

तसेच, चर्चच्या क्षमा मागण्याच्या विनंतीवर विवेचन मांडताना इतिहासकार अल्बर्टो मेलोनी लिहितात: “खरे तर, ज्या दोषांसाठी चर्चला जबाबदार ठरवण्यात आले आहे त्यापासून मुक्‍त करावे हा चर्चच्या या विनंतीमागचा हेतू आहे.” होय, लोकांची विश्‍वसनीयता पुन्हा प्राप्त करण्याकरता कॅथलिक चर्च गत पापांचे ओझे कमी लेखण्याचा प्रयत्न करीत आहे असे दिसते. म्हणजे प्रांजळपणे म्हणायचे तर, देवाबरोबर शांती स्थापित करण्यापेक्षा जगाबरोबर शांती स्थापित करण्याचीच कॅथलिक चर्चला जास्त काळजी लागली आहे.

अशाप्रकारची वागणूक आपल्याला इस्राएलचा पहिला राजा शौल याची आठवण करून देते. (१ शमुवेल १५:१-१२) त्याने एक भयंकर पाप केले होते आणि ते उजेडात आले तेव्हा त्याने देवाचा विश्‍वासू संदेष्टा शमुवेल याच्यासमोर पहिल्यांदा स्वतःला निर्दोष शाबीत करण्याचा प्रयत्न केला, तो आपल्या पापाची सबब देऊ लागला. (१ शमुवेल १५:१३-२१) शेवटी कसेतरी राजाला शमुवेलाकडे हे कबूल करावेच लागले की: “मी पाप केले आहे, मी परमेश्‍वराच्या आज्ञेचे . . . उल्लंघन केले आहे.” (१ शमुवेल १५:२४, २५) होय, त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. परंतु शमुवेलाला तो पुढे जे म्हणाला त्यावरून आपल्याला, त्याला जास्त कशाची काळजी लागली होती ते दिसते पाहा: “मी तर पाप केलेच आहे, तरीपण आता माझ्या प्रजेच्या वडीलजनांसमोर व इस्राएलासमोर माझा मान राखा.” (१ शमुवेल १५:३०) स्पष्टपणे, देवाबरोबर समेट घडवून आणण्यापेक्षा त्याला इस्राएलमधील त्याच्या स्थितीची जास्त काळजी होती. त्याच्या या मनोवृत्तीमुळे तो देवाची क्षमा मिळवू शकला नाही. चर्चनेही अशीच मनोवृत्ती बाळगली तर तिला देवाची क्षमा मिळेल असे तुम्हाला वाटते का?

सर्वांचे एकमत नाही

चर्चेसनी जाहीरपणे क्षमा मागावी यावर सर्वांचेच एकमत नाही. उदाहरणार्थ रोमन कॅथलिक लोक, दास्यत्व किंवा हस व कॅलविन सारख्या “पाखंड्यांना” पूर्वस्थितीत आणल्याबद्दल त्यांचे पोप क्षमा मागतात तेव्हा अनेकांना अतिशय लाज वाटते. व्हॅटिकन उगमांनुसार, कॅथलिकवादाच्या गत हजार वर्षांच्या इतिहासावर “विवकाचे परीक्षण” करण्याच्या प्रस्तावासंबंधी कार्डिनल्सना पाठवण्यात आलेल्या दस्तऐवजाची, १९९४ च्या जूनमध्ये भरलेल्या एका धार्मिक सभेत उपस्थित असलेल्या कार्डिनल्सनी टीका केली. पोपना काहीही करून त्या प्रस्तावातील भागाचा समावेश एका विश्‍वपत्रात करण्याची इच्छा होती तेव्हा इटालियन कार्डिनल जॉकोमो बिफी यांनी एका आज्ञापत्रात अगदी ठामपणे असे म्हटले: “चर्चमध्ये काही दोष नाही.” तरीपण, त्यांनी एवढे तरी कबूल केले की: “गत शतकांत चर्चविषयक चुकांबद्दल क्षमा मागितल्याने . . . कदाचित आपली थोडीतरी प्रतिष्ठा राहील.”

“पापांची कबुली, कॅथलिक चर्चमधील सर्वात वादग्रस्त विषयांपैकी एक आहे,” असे व्हॅटिकन भाष्यकार ल्युईगी ऑकॉटोली म्हणतात. “पोपनी मिशनऱ्‍यांच्या चुका कबूल केल्या तर काही मिशनऱ्‍यांना खरोखरच राग येईल.” पुढे, एका रोमन कॅथलिक पत्रकाराने लिहिले: “पोपच्या मनात खरोखरच चर्च इतिहासाची एक भयंकर कल्पना आहे तर ते, हे चर्च ‘मानवी हक्कांचे’ चॅम्पियन आहे, खरोखरच आशादायक असलेल्या तिसऱ्‍या हजार वर्षीय राजवटीकडे मानवजातीला नेणारे एकमात्र ‘आई व शिक्षक’ आहे असे कसे काय सादर करू शकतात हे समजण्यास मला अजूनही कठीण वाटते.”

एखाद्या चुकीत सापडण्याच्या केवळ लज्जेच्या भीतीमुळे पश्‍चात्तापाचा आव आणण्याविरुद्ध बायबल ताकीद देते. अशाप्रकारच्या पश्‍चात्तापाने क्वचितच पश्‍चात्ताप करणाऱ्‍याच्या वागणुकीत बदल घडतो. (पडताळा २ करिंथकर ७:८-११.) देवाच्या नजरेत मौल्यवान असलेल्या पश्‍चात्तापाबरोबर, “पश्‍चात्तापास योग्य अशी फळे” म्हणजेच, पश्‍चात्तापाच्या खरेपणाचा पुरावाही असतो.—लूक ३:८.

पश्‍चात्ताप करणाऱ्‍याने व कबूल करणाऱ्‍याने चुकीची कामे सोडून द्यावीत, ती करणे थांबवावीत असे बायबल म्हणते. (नीतिसूत्रे २८:१३) असे झाले आहे का? रोमन कॅथलिक चर्च आणि इतर चर्चेसनी आपल्या पापांची कबुली देऊन झाल्यावर, अलीकडेच मध्य आफ्रिका आणि पूर्व युरोप येथील यादवी झगड्यांमध्ये बहुसंख्य ‘ख्रिश्‍चनांनीच’ भाग घेतला होता, मग? तेव्हा शांती आणण्याकरता चर्चेसनी आपल्या बळाचा वापर केला का? चर्चेसच्या नेत्यांनी, आपले सदस्य जो अत्याचार करत होते त्याविरुद्ध एकमताने आवाज उठवला का? नाही. उलट काही धार्मिक पुढाऱ्‍यांनीही कत्तलीत आपले हात रक्‍ताने रंगवले!

ईश्‍वरी न्यायदंड

पोप यांच्या नेहमीच्या मिया कुल्पांविषयी बोलताना, कार्डिनल बिफी यांनी उपरोधिकपणे विचारले: “गतकाळातील पापांबद्दल सार्वत्रिक न्यायदंडासाठी आपण थांबून राहिलोत तर बरे होईल, नाही का?” मानवजातीचा न्यायदंड त्वरित येणार आहे. धर्माच्या इतिहासातील काळी कर्तृत्व यहोवा देवाला चांगली ठाऊक आहेत. लवकरच तो अपराध्यांचा झाडा घेणार आहे. (प्रकटीकरण १८:४-८) तोपर्यंत, उपासनेचा असा एक प्रकार आपल्याला मिळू शकतो का, की जो रक्‍ताने माखलेला नाही, खुनी असहिष्णुता नाही किंवा ख्रिस्ती धर्मजगत आज ज्याच्याकरता क्षमा मागत आहे असे इतर गुन्हे त्याने केलेले नाहीत? होय.

ते आपण कसे करू शकतो? येशू ख्रिस्ताने घालून दिलेल्या नियमाचे अनुसरण केल्याने: “त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल.” काही धर्म ज्याला विसरून जाऊ पाहतात तो इतिहासाचा रेकॉर्ड, येशूने ज्यांना ‘खोटे संदेष्टे’ म्हटले त्यांना तसेच “चांगले फळ” उत्पन्‍न केलेल्यांना ओळखण्यास आपली मदत करतो. (मत्तय ७:१५-२०) हे चांगले फळ उत्पन्‍न करणारे कोण आहेत? यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचे परीक्षण करून तुम्ही स्वतः ते शोधून काढावे असे आम्ही आपल्याला आवाहन करतो. जगात प्रभावी हुद्दा टिकवण्याची धडपड करण्यापेक्षा देवाच्या वचनाचे खरोखर अनुसरण करण्याचा प्रयत्न करणारे कोण आहेत ते पाहा.—प्रेषितांची कृत्ये १७:११.

[तळटीप]

a सन १९६२-६५ पर्यंत, चार सत्रांमध्ये रोम येथे भरलेले २१ वे अखिलचर्च मंडळ.

[५ पानांवरील चित्र]

या अशा पीडादायक कार्यांसाठी चर्चेस आता क्षमा मागत आहेत

[Credit Line]

The Complete Encyclopedia of Illustration/J. G. Heck

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा