वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 २/१५ पृ. ८-११
  • पालकहो—आपल्या मुलांना सांभाळा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पालकहो—आपल्या मुलांना सांभाळा!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • लैंगिक शिक्षणाबाबत आफ्रिकी लोकांची मनोवृत्ती
  • शिक्षणाची का आवश्‍यकता आहे?
  • योग्य दळणवळण
  • सुरक्षित आणि आनंदी
  • आपल्या मुलांना लैंगिक शिक्षण द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • तुमच्या कुटुंबाचे विध्वंसक परिणामांपासून संरक्षण करा
    कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • कुटुंब आनंदी राहावं म्हणून तुम्ही काय करू शकता?—भाग २
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
  • पवित्र शास्त्र आणि नवयौवन नैतिकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 २/१५ पृ. ८-११

पालकहो—आपल्या मुलांना सांभाळा!

एका नायजेरियन माध्यामिक शाळेत, लैंगिक अनैतिकतेसाठी कुप्रसिद्ध असलेल्या एका मुलीला लैंगिक गोष्टींविषयी आपल्या सहविद्यार्थींना माहिती देण्यास आवडत असे. गर्भपातासाठी एक इलाज म्हणजे, तंबाखूची अधिक मात्रा असलेले उग्र व कडवट स्टाऊट बिअर, असे ती सांगायची. संभोगवर्णनाच्या पुस्तकांतून निवडलेल्या तिच्या कहाण्यांनी तिच्या अनेक सहविद्यार्थींना भुरळ पाडली होती. काही जणी लैंगिक संबंधाचा प्रयोग करून पाहू लागल्या आणि त्यांच्यातील एकीला दिवस गेले. गर्भपात करण्याकरता ती स्टाऊट/तंबाखू बिअर प्यायली. काही तासातच तिला रक्‍ताच्या उलट्या होऊ लागल्या. काही दिवसांनंतरच हॉस्पिटलमध्ये असताना तिचा मृत्यू झाला.

आजच्या जगात अनेक तरुण बेदिक्कतपणे लैंगिक संबंधावर बोलतात; आणि त्यांचे ऐकून भोळसट लोक भ्रष्ट होतात. तर मग, तरुणांनी योग्य माहितीकरता कोणाकडे गेले पाहिजे जेणेकरून त्यांचे संरक्षण होईल? “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” त्यांना वाढवण्याची जबाबदारी असलेल्या त्यांच्या ईश्‍वरी पालकांकडे ते जातात तेव्हा त्यांचे भले होते.—इफिसकर ६:४.

लैंगिक शिक्षणाबाबत आफ्रिकी लोकांची मनोवृत्ती

आपल्या मुलांबरोबर लैंगिकतेविषयी बोलण्यास संपूर्ण जगभरातील अनेक पालकांना जड जाते. हे आफ्रिकेत खासकरून खरे आहे. सिएरा लिओन मधील एक पिता, डॉनल्ड असे म्हणतात: “असं कधीच बोललं जात नाही. ते आफ्रिकी संस्कृतीत नाही.” कॉन्फिडन्ट नामक एक नायजेरियन स्त्री हे कबूल करते: “माझ्या पालकांना वाटते, की लैंगिकता ही अशी एक गोष्ट आहे जिचा कधीच उल्लेख केला जाऊ नये; आमच्या संस्कृतीत ते निषिद्ध आहे.”

काही आफ्रिकी समाजात, शिस्न, वीर्य किंवा मासिक स्राव यासारख्या लैंगिकतेशी संबंधित शब्दांचा उच्चार करणे सुद्धा अश्‍लील आहे असे समजले जाते. एका ख्रिस्ती आईने तर, आपल्या मुलीला “जारकर्म” हा शब्द बोलायला काही हरकत नाही असे म्हटले पण “लैंगिक संबंध” हा शब्द बोलायला मनाई केली. पण, देवाचे वचन बायबल मात्र लैंगिक संबंध आणि लैंगिक अवयव यांचा उघडपणे उल्लेख करते. (उत्पत्ति १७:११; १८:११; ३०:१६, १७; लेवीय १५:२) देवाच्या लोकांना धक्का बसावा किंवा त्यांना उत्तेजित करण्याकरता नव्हे तर त्यांना शिक्षण देण्याकरता यांचा वापर करण्यात आला आहे.—२ तीमथ्य ३:१६.

समाजाने निषिद्ध मानण्याव्यतिरिक्‍त, काही पालक आणखी एका कारणासाठी त्यांचा उल्लेख करीत नाहीत; एक नायजेरियन वडील त्याविषयी म्हणतात: “मी जर माझ्या मुलांबरोबर लैंगिक संबंधाविषयी बोललो तर लैंगिक अनैतिकता करण्यास ते प्रवृत्त होऊ शकतात.” पण लैंगिक संबंधाविषयी, बायबल आधारित माहिती मुलांना प्रयोग करण्याचे उत्तेजन देते का? नाही, मुळीच नाही. वास्तविक पाहता, तरुणांना जेवढे ज्ञान कमी तेवढीच त्यांची लैंगिक अनैतिकतेत पडण्याची शक्यता जास्त असते. “ज्ञान [अचूक माहितीवर आधारित] आश्रय देणारे आहे,” असे बायबल म्हणते.—उपदेशक ७:१२.

येशूने दिलेल्या दाखल्यात, सुज्ञ मनुष्याने भावी वादळांच्या शक्यतेला लक्षात ठेवूनच आपले घर खडकावर बांधले, तर मूर्ख मनुष्याने वाळूवर आपले घर बांधले आणि वादळ आले तेव्हा तो सगळे काही गमावून बसला. (मत्तय ७:२४-२७) त्याचप्रकारे, आपल्या मुलांना आजच्या जगाच्या अनिर्बंध लैंगिक दर्जांप्रमाणे वागण्याच्या वादळासमान दबावाला तोंड द्यावे लागेल हे लक्षात ठेवूनच सुज्ञ ख्रिस्ती पालक अचूक ज्ञान आणि समज त्यांना देतील, जेणेकरून त्यांच्या मुलांना दृढ उभे राहता येईल.

आणखी एका कारणामुळे पालक आपल्या मुलांबरोबर लैंगिक संबंधाविषयी चर्चा करू इच्छित नाहीत आणि त्याच्याबद्दल एका आफ्रिकी स्त्रीने सांगितले: “मी तरुण होते तेव्हा साक्षीदार असलेल्या माझ्या आईवडिलांनी माझ्याबरोबर लैंगिक गोष्टींची कधीच चर्चा केली नसल्यामुळे, आता माझ्या मुलांबरोबर त्यावर चर्चा करण्याचा मी विचारही केला नाही.” परंतु, १० किंवा २० वर्षांपूर्वी तरुण असलेल्या लोकांपेक्षा आजच्या तरुण पिढीवर जास्त दबाव आहेत. यात नवल असे काही नाही. “शेवटल्या काळी . . . दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्‍यांस फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील,” असे देवाच्या वचनाने आधीच भाकीत केले होते.—२ तीमथ्य ३:१, १३.

आणखी एक वस्तुस्थिती अशी आहे, की जी समस्येला आणखीनच हातभार लावते आणि ती म्हणजे पुष्कळ मुले आपल्या पालकांवर विश्‍वास ठेवून त्यांना काही सांगण्यास एकतर कचरतात किंवा त्यांना काही सांगूच शकत नाहीत. लहानसहान गोष्टींवरही त्यांच्यात दळणवळण नसते. एका १९ वर्षीय तरुणाने खेदाने म्हटले: “मी माझ्या आईवडिलांबरोबर कशावरही चर्चा करीत नाही. मी आणि माझे बाबा कधी एकमेकांबरोबर मोकळ्या मनाने बोलत नाही. ते माझ्याकडे लक्षच देत नाहीत.”

लैंगिक गोष्टींची विचारपूस केली, तर कदाचित आपल्याला दटावणी मिळेल अशी भीतीही काही तरुणांना वाटू शकते. एका १६ वर्षीय मुलीने म्हटले: “मी लैंगिक समस्येविषयी माझ्या आईवडिलांबरोबर बोलत नाही, कारण त्यांना भलतेच काही वाटू लागते. काही दिवसांपूर्वी, माझ्या मोठ्या बहिणीनं आईला लैंगिक संबंधाविषयी विचारलं. तर आईनं तिचे प्रश्‍न सोडवण्याऐवजी, तिनं असं का विचारलं असावं म्हणून तिच्यावरच संशय घेऊ लागली. कितींदा तरी आईनं मला बोलावून माझ्या बहिणीविषयी विचारपूस केली, तिचं वळण चांगलं नाही असं कधीकधी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवलं. माझ्याबाबतीत असं व्हावं असं मला वाटत नाही, म्हणून तिला काही न सांगणंच बरं.”

शिक्षणाची का आवश्‍यकता आहे?

लैंगिक विषयावर आपल्या मुलांना पुरेशा प्रमाणात शिक्षण देणे केवळ उचितच नव्हे, तर प्रेमळपणाचे देखील आहे. लैंगिक संबंधाविषयीचे शिक्षण पालकांनी आपल्या मुलांना दिले नाही तर दुसरे देतील—पालकांना वाटेल की आता शिक्षण देण्याची वेळ आली, पण मुलांना तर आधीच दुसरीकडून शिक्षण मिळालेले असेल, आणि तेही कदाचित ईश्‍वरी तत्त्वांनुरूप नसेल. एका १३ वर्षीय मुलीने जारकर्म केले, कारण तिच्या शाळेतील एका मैत्रिणीने तिला सांगितले होते, की तिने तिचे कौमार्य गमावले नाही तर पुढे तिला खूप त्रास होईल. “ते तुझं योनिच्छद कातरीनं कापतील,” असं तिला सांगण्यात आले होते. मग, तिने ऐकलेल्या गोष्टींविषयी आपल्या आईला का विचारले नाही असे तिला विचारल्यावर ती म्हणाली की अशा गोष्टी प्रौढांसोबत कधीच बोलल्या जात नव्हत्या.

एक नायजेरियन मुलगी म्हणाली: “माझ्या शाळेतील सर्व मैत्रिणी मला खात्री पटवून देत होत्या, की सर्वसामान्य मानवांनी लैंगिक संबंध ठेवले पाहिजेतच. त्यांनी मला सांगितले, की मी आताच जर लैंगिक संबंध ठेवले नाहीत तर २१ वर्षांची झाल्यावर मला एक आजार जडेल ज्याचा दुष्परिणाम माझ्या स्त्रीत्वावर पडेल; ह्‍यासाठी तो पुढील भयंकर त्रास टाळायचा असेल तर मी लग्नाआधीच लैंगिक संबंध ठेवले पाहिजेत.”

तिच्या आईवडिलांबरोबर याविषयी चर्चा केल्यामुळे, तिला घरात जी शिकवण मिळाली होती ती शाळेतील मैत्रिणींकडून मिळत असलेल्या माहितीच्या अगदीच विरोधात असल्याचे तिच्या लक्षात आले. “मी घरी गेले, आणि शाळेत मला जे काही सांगण्यात आले होते ते सर्व नेहमीप्रमाणे माझ्या आईला सांगून टाकले.” तिच्या आईने तिला सांगितले की तिला चुकीची माहिती मिळाली होती.—पडताळा नीतिसूत्रे १४:१५.

लैंगिक संबंधाच्या विषयावर ईश्‍वरी ज्ञान मुलांना मिळावे म्हणून आवश्‍यक माहिती देण्याद्वारे पालक त्यांना, भयंकर परिस्थिती समजण्यास व शोषण करू इच्छिणाऱ्‍या लोकांना ओळखण्यास सज्ज करीत असतात. यामुळे लैंगिक संक्रमित आजार आणि नको असलेले गर्भारपण यांपासून त्यांचा बचाव होतो. ते त्यांचा स्वाभिमान टिकवू शकतात आणि दुसऱ्‍यांकडूनही आदर मिळवू शकतात. चुकीच्या माहितींपासून व चिंतेपासून ते मुक्‍त असतात. लैंगिक संबंधाविषयी त्यांच्या मनात हितकारक व सकारात्मक मनोवृत्ती वाढते; आणि नंतर त्यांचा विवाह झाल्यास त्यांच्या आनंदात भर पडते. यामुळे ते देवासमोर स्वीकृत भूमिकेत उभे राहू शकतात. शिवाय त्यांची मुले जेव्हा, आपली प्रेमळपणे काळजी घेतली जात आहे असे पाहतात तेव्हा ते आपल्या पालकांचा अधिक आदर व प्रेम करावयास प्रवृत्त होतात.

योग्य दळणवळण

मुलांच्या गरजांनुसार पालकांनी त्यांना सल्ला देण्यासाठी दुतर्फे दळणवळण राखण्याची गरज आहे. आपल्या मुलांच्या मनात आणि अंतःकरणात काय आहे हे पालकांनी आधी जाणले पाहिजे, नाहीतर एक डॉक्टर रुग्णाचा आजार जाणून घ्यायच्या आधीच औषध देतोय अशातली गत होईल, मग पालकांनी कितीही योग्य सल्ला दिला तरी त्याचा म्हणावा तितका फायदा होणार नाही. प्रभावी सल्लागार होण्याकरता पालकांनी आधी आपली मुले वास्तविकतेत काय विचार करतात, त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेतले पाहिजे. आपली मुले दबावांना आणि समस्यांना तोंड देत आहेत, त्यांना भेडसावणारे प्रश्‍न असतात, हे सर्व पालकांनी समजून घेतले पाहिजे. मुलांचे लक्षपूर्वक ऐकून घेणे, ‘ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमे,’ असणे खूप महत्त्वाचे आहे.—याकोब १:१९; नीतिसूत्रे १२:१८; उपदेशक ७:८.

आपल्या मुलांबरोबर घनिष्ट नातेसंबंध विकसित करून तो टिकवून ठेवण्याकरता पालकांना वेळ द्यावा लागेल, सहनशील व्हावे लागेल आणि प्रयत्न करावे लागतील; हे असे नाते आहे ज्यात मुले मनमोकळेपणाने आपल्या अगदी आंतरिक भावना व्यक्‍त करतात. पालक/मुलांमध्ये असे घनिष्ट नाते असणे किती सुखावह आहे! पाच मुलांचा पिता असलेला एक पश्‍चिम आफ्रिकेतील मनुष्य म्हणतो: “मी एक पिता आणि एक विश्‍वासू मित्रही आहे. माझी मुलं माझ्याबरोबर खुल्लमखुल्ला सर्व विषयांवर, म्हणजे लैंगिक विषयांवर सुद्धा चर्चा करतात. माझ्या मुलीसुद्धा मला त्यांचं हितगुज सांगतात. आम्ही त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ काढतो. ते मला त्यांच्या गमतीदार गोष्टीही सांगतात.”

त्यांची एक मुलगी, बोला अशी म्हणते: “मी माझ्या बाबांपासून काहीही लपवत नाही. बाबा खूप विचारी आणि सहानुभूती दाखवणारे आहेत. ते आम्हाला केव्हाही धाक दाखवत नाहीत किंवा आम्ही जरी चूक केली तरी क्रूरतेने वागवत नाहीत. संतापण्याऐवजी ते आधी परिस्थिती काय आहे ते पाहतील, आम्ही काय केले पाहिजे ते सांगतील किंवा आम्ही काय करायला नको होते ते सांगतील. पुष्कळदा ते तारुण्य नावाच्या इंग्रजीतील पुस्तकाचा व कौटुंबिक सौख्यानंद पुस्तकाचा उल्लेख करतात.”a

मुले लहान असतात तेव्हाच पालकांनी आपल्या मुलांबरोबर शक्य तेव्हा लैंगिक संबंधाच्या विषयावर बोलणे उचित आहे. अशाने, सहसा कठीण जाणाऱ्‍या कुमारावस्थेत चर्चा जारी ठेवण्याकरता पाया घालता येऊ शकतो. मुले लहान असतानाच चर्चा चालू न केल्यास, नंतर जेव्हा ती मोठी होतात तेव्हा चर्चा करण्यास जड जाऊ शकते, पण तरीदेखील तुम्ही याबद्दल चर्चा करू शकता. पाच मुलांच्या एका आईने म्हटले: “मला इच्छा नसताना मी बोलण्यास सुरवात केली खरी, पण थोड्याच वेळानं आम्ही अगदी मनमोकळेपणानं बोलू लागलो.” तुमच्या मुलांचे कल्याण धोक्यात असताना तुम्ही केलेले प्रयत्न नक्कीच मौल्यवान आहेत.

सुरक्षित आणि आनंदी

ज्या मुलांना त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या पालकांनी प्रेमळपणे ज्ञान दिलेले असते अशी मुले त्यांच्या पालकांची गुणग्राहकता बाळगतात. यहोवाच्या काही आफ्रिकी साक्षीदारांचे मनोगत खाली दिले आहेत, त्यांचा अंमळ विचार करा:

चोवीस वर्षीय मोजीसोलाने म्हटले: “मी माझ्या आईचे नेहमी आभार मानेन. तिने योग्य वेळी लैंगिक गोष्टींचे शिक्षण मला दिले. मी लहान होते तेव्हापासूनच ती माझ्याबरोबर चर्चा करायची तेव्हा मला लाज वाटायची, पण आता मला कळते की तिने माझ्याच भल्यासाठी हे सर्व केले होते.”

इनिओबोंग म्हणाली: “लैंगिक गोष्टींविषयी पुरेसे शिक्षण देऊन आईने मला किती साहाय्य केले त्याची आठवण मला होते तेव्हा मला अतिशय आनंद वाटतो. ते शिक्षण, मला माझ्या तारुण्यात प्रवेश करताना खूप साहाय्य देणारे होते. मी तुम्हाला सांगते, माझ्या मुलांनाही मी असे शिक्षण नक्की देईन.”

एकोणीस वर्षीय कुनले म्हणतो: “जगिक अनैतिक स्त्रियांकडून येणाऱ्‍या दबावांचा विरोध करण्यास माझ्या पालकांनी मला मदत केली आहे. त्यांचे प्रशिक्षण मला मिळाले नसते तर मी नक्कीच वाममार्गाला लागलो असतो. त्यांनी माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल मी त्यांचा नेहमी आभारी आहे.”

ख्रिस्टियाना म्हणते: “लैंगिक बाबींवर मी माझ्या आईबरोबर नेहमी बोलत असल्यामुळे मला पुष्कळ लाभ झाला आहे. भयानक आजारपण, नको असलेले गर्भारपण यांच्यापासून माझे संरक्षण झाले आहे, शिवाय मी माझ्या लहान भावडांसमोर माझे स्वतःचे चांगले उदाहरण मांडू शकले आहे. लोक माझा आदर करतात, आणि माझा भावी पतीसुद्धा माझा आदर करील. याहून महत्त्वाचे म्हणजे, मी यहोवा देवाच्या आज्ञा पाळत असल्यामुळे त्याच्याबरोबर माझा चांगला नातेसंबंध आहे.”

आधी उल्लेखलेली बोला म्हणते: “माझ्या वर्गात एक मुलगी होती, ती म्हणायची की विवाहाच्या बंधनाव्यतिरिक्‍त लैंगिक संबंधाचा अनुभव घेतला पाहिजे. तिला ही सगळी मजा वाटत होती. पण जेव्हा तिला दिवस गेले आणि ती आमच्याबरोबर सर्टिफिकेटच्या परीक्षेला बसू शकली नाही तेव्हा तिला कळाले की ती मजा नव्हती. माझ्या प्रेमळ बाबांचे मार्गदर्शन मला मिळाले नसते तर कदाचित मलाही तिच्याप्रमाणे कठीण धडा मिळाला असता.”

सेक्ससाठी वेडेपिसे झालेल्या या जगात, “तारणासाठी ज्ञानी” होण्यास जेव्हा ख्रिस्ती पालक आपल्या मुलांना साहाय्य करतात तेव्हा त्यांना किती आशीर्वाद मिळतो! (२ तीमथ्य ३:१५) त्यांचे बायबल आधारित प्रशिक्षण एका अमूल्य हाराप्रमाणे आहे ज्यांमुळे मुले देवाच्या नजरेत सुशोभित आणि उठून दिसतात. (नीतिसूत्रे १:८, ९) मुलांना सुरक्षित वाटते आणि पालकांना समाधान मिळते. आपल्या मुलांबरोबर कायम दळणवळण ठेवणारे एक आफ्रिकी पिता म्हणतात: “आम्हाला मनाची शांती आहे. आमची पक्की खात्री आहे, की आमच्या मुलांना यहोवाला काय आवडते ते माहीत आहे; बाहेरच्या लोकांच्या फुसलावण्याला ते बळी पडू शकणार नाहीत. आमच्या कुटुंबाला काळीमा फासणारे कोणतेही कार्य ते करणार नाहीत असा आमचा आत्मविश्‍वास आहे. आमची मुले भरवशालायक सिद्ध झाल्यामुळे मी यहोवाचे आभार मानतो.”

[तळटीप]

a वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.

[१० पानांवरील चित्र]

आपल्या पालकांकडून बायबल आधारित प्रशिक्षण मिळवणारे ख्रिस्ती युवक इतर युवकांच्या विकृत कहाण्या झिडकारू शकतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा