वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ८/१ पृ. १४-१९
  • तुमचे बंधुप्रेम टिकून राहो!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमचे बंधुप्रेम टिकून राहो!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सहानुभूती व्यक्‍त करा
  • प्रशंसा करणे
  • प्रेमळ कृपेची कृत्ये
  • आपलं बंधुप्रेम टिकवून ठेवण्याचा निर्धार करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • बंधुप्रेमाची गुरूकिल्ली शोधणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • आमच्या बंधुवर्गाविषयीची रसिकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • एकमेकांवरचं प्रेम आपण मजबूत कसं करत राहू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ८/१ पृ. १४-१९

तुमचे बंधुप्रेम टिकून राहो!

‘तुमचे बंधुप्रेम टिकून राहो.’—इब्री लोकांस १३:१.

१. कडाक्याची थंडी पडलेल्या रात्री आग तेवत ठेवण्याकरता तुम्ही काय कराल व आपल्या सर्वांवर अशाचप्रकारची कोणती जबाबदारी आहे?

बाहेर कडाक्याची थंडी पडली आहे आणि तापमान उतरत चालले आहे. तुमच्या घरात तडतडणारी शेकोटीच तुम्हाला ऊब देऊ शकते. त्यातील आग जळत ठेवण्यावरच अनेकांचे जीव अवलंबून आहेत. अशा वेळी तुम्ही आग विझत असल्याचे, त्यातील लालभडक निखारे मंद, थंड होत असल्याचे हातावर हात ठेवून नुसते बघत राहाल का? मुळीच नाही. आग तेवत ठेवण्याकरता तुम्ही अविश्रांतपणे त्यात इंधन घालत राहता. एका अर्थाने, सर्वांहून अधिक महत्त्वपूर्ण असलेल्या ‘आगीच्या’ बाबतीत, अर्थात आपल्या अंतःकरणात पेटली पाहिजे अशा आगीच्या बाबतीत आपल्या प्रत्येकाचे हेच काम आहे. ती आग आहे—प्रीती.

२. (अ) शेवटल्या काळात प्रीती थंडावली आहे असे कदाचित का म्हणता येऊ शकते? (ब) प्रीती खऱ्‍या ख्रिश्‍चनांकरिता केवढी महत्त्वपूर्ण आहे?

२ येशूने फार पूर्वी भाकीत केल्याप्रमाणे आपण अशा एका काळात जगत आहोत जेथे संपूर्ण जगात ख्रिस्ती म्हणवणाऱ्‍यांमधील प्रीती थंडावत चालली आहे. (मत्तय २४:१२) येशू, सर्वात महत्त्वपूर्ण प्रकाराच्या प्रीतीला अर्थात, यहोवा देव आणि त्याचे वचन बायबल यांबद्दलच्या प्रीतीला उद्देशून बोलत होता. प्रीतीचे इतर प्रकारही कमी होत चालले आहेत. बायबलने भाकीत केले, की “शेवटल्या काळी” अनेक जण “ममताहीन” होतील. (२ तीमथ्य ३:१-५) हे किती खरे आहे! कुटुंब ममतेचा निवारा असले पाहिजे खरे, पण तेथेही हिंसा आणि दुर्व्यवहार दिसून येतो—केव्हा केव्हा तर तो अगदीच भयानक कठोरपणे दिसतो शिवाय तो सामान्य बनला आहे. तरीपण, या जगाच्या भावनाशून्य वातावरणात ख्रिश्‍चनांना केवळ एकमेकांबद्दलच प्रीती बाळगण्याची आज्ञा दिलेली नाही तर आत्म-त्यागी प्रीती बाळगण्याची, इतरांना श्रेष्ठ मानण्याची आज्ञा देण्यात आली आहे. ही प्रीती आपण इतक्या सहजपणे दाखवली पाहिजे जेणेकरून ती इतरांना दिसली पाहिजे, ती खऱ्‍या ख्रिस्ती मंडळीचे ओळखचिन्ह बनली पाहिजे.—योहान १३:३४, ३५.

३. बंधुप्रेम काय आहे व ती टिकून राहो याचा काय अर्थ होतो?

३ ‘तुमचे बंधुप्रेम टिकून राहो,’ अशी आज्ञा देण्यास प्रेषित पौलाला प्रेरित करण्यात आले. (इब्री लोकांस १३:१) एका विद्वत्तापूर्ण प्रकाशनानुसार, येथे भाषांतरित केलेला “बंधुप्रेम” (फिलाडेलफिया) हा ग्रीक शब्द “माया, दया, सहानुभूती दाखवणे, मदत देणे यांना सूचित करतो.” हे प्रेम टिकून राहो असे म्हणण्यामागे पौलाचा काय अर्थ होता? तेच प्रकाशन पुढे म्हणते: “ते कधीही थंड होऊ द्यायचे नव्हते.” तेव्हा, आपल्या बांधवांबद्दल केवळ सहानुभूती बाळगणे पुरेसे नाही तर आपण ती व्यक्‍त होऊ दिली पाहिजे. शिवाय, आपण ही प्रीती टिकवून ठेवली पाहिजे; तिला कधीही थंड होऊ देता कामा नये. आव्हानात्मक वाटते ना? होय, पण यहोवाचा आत्मा आपल्याला बंधुप्रेम विकसित करण्यास व ते टिकवून ठेवण्यास मदत करू शकतो. प्रीतीच्या या आगीला आपल्या अंतःकरणात कायम ज्वलंत ठेवण्यासाठी इंधन पुरवण्याचे तीन मार्ग आपण पाहू या.

सहानुभूती व्यक्‍त करा

४. सहानुभूती म्हणजे काय?

४ तुम्हाला आपल्या ख्रिस्ती बंधू व भगिणींबद्दल आणखी प्रीती वाढवायची आहे तर पहिल्यांदा तुम्हाला त्यांच्याविषयी भावना झाली पाहिजे, जीवनात त्यांना येणाऱ्‍या परीक्षांमध्ये व त्यांना झेलाव्या लागणाऱ्‍या आव्हानांमध्ये त्यांना सहानुभाव दाखवला पाहिजे. प्रेषित पेत्राने जेव्हा, “तुम्ही सर्व एकचित्त, समसुखदुःखी [सहानुभूती दाखवणारे], बंधुप्रेम करणारे, कनवाळू नम्र मनाचे व्हा,” असे लिहिले तेव्हा त्याने हेच सुचवले. (१ पेत्र ३:८) “सहानुभूती” दाखवण्याकरता यासाठी येथे वापरण्यात आलेला ग्रीक शब्द, “च्या सोबत सहन करणे” याला सूचित करतो. बायबलच्या ग्रीक भाषेवरील एक ग्रंथ या शब्दाविषयी असे म्हणतो: “ते मनाच्या त्या स्थितीचे वर्णन करते जेव्हा आपण इतरांच्या भावना जणू काय आपल्याच भावना समजून जाणतो.” म्हणूनच, सहानुभावाची आवश्‍यकता आहे. यहोवाच्या एका विश्‍वासू, वृद्ध सेवकाने एकदा म्हटले: “माझ्या अंतःकरणातील तुमचे दुःख सहानुभाव आहे.”

५. यहोवाकडे सहानुभूती आहे हे आपल्याला कसे कळते?

५ यहोवाला अशी सहानुभूती वाटते का? अर्थात. जसे की, त्याच्या इस्राएल लोकांना सहन कराव्या लागणाऱ्‍या दुःखाविषयी आपण वाचतो: “त्यांच्या सर्व दुःखाने तो दुःखी झाला.” (यशया ६३:९) यहोवा त्यांचे दुःख केवळ पाहत राहिला नाही; त्याने लोकांच्या भावना जाणल्या. यहोवाला किती तीव्रपणे ते जाणवते याचे उदाहरण आपल्याला जखऱ्‍या २:८ मध्ये लिहून ठेवलेल्या शब्दांवरून पाहायला मिळते: ‘जो कोणी तुम्हास स्पर्श करील तो माझ्या डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करतो.’a एक भाष्यकर्ता या वचनाविषयी अशी नोंद करतो: “डोळा मानवी रचनेतील सर्वात क्लिष्ट व नाजूक घडण आहे; आणि डोळ्याचे बुबुळ—दृष्टी देण्यासाठी प्रकाश जेथून प्रवेश करतो तो मार्ग—सर्वात संवेदनक्षम आणि डोळ्याचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे. यहोवाच्या प्रिय वस्तुंबद्दल त्याच्या अत्युत्तम कोमल काळजीचे वर्णन इतर कोणतीही गोष्ट इतक्या सुरेखपणे करू शकत नाही.”

६. येशू ख्रिस्ताने सहानुभूती कशी प्रदर्शित केली?

६ येशूचेही सहानुभूती दाखवणारा असेच वर्णन करण्यात आले आहे. आजारी किंवा त्रस्त असलेल्या आपल्या सहमानवांचे दुःख पाहून त्याला कित्येकदा “कळवळा” आला. (मार्क १:४१; ६:३४) जर एखादा त्याच्या अभिषिक्‍त अनुयायांना दयाळूपणे वागवत नाही तर जणू काय आपल्यालाच ती वागणूक मिळत असल्यासारखे त्याला वाटते असे येशूने दर्शविले. (मत्तय २५:४१-४६) आणि आज आपला स्वर्गीय “प्रमुख याजक” या नात्याने त्याला ‘आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी सहानुभूती वाटते.’—इब्री लोकांस ४:१५.

७. एखादा बंधू किंवा एखादी भगिनी आपल्याला राग आणून देतात तेव्हा सहानुभूती आपली कशी मदत करू शकेल?

७ ‘आपल्या दुर्बलतेविषयी सहानुभूती वाटणे’—सांत्वनदायक विचार नाही का? निश्‍चितच मग आपण इतरांशी असेच वागले पाहिजे. अर्थात, इतरांच्या चुका शोधणे खूप सोपे असते. (मत्तय ७:३-५) पण पुन्हा कधी एखाद्या बांधवाने वा भगिनीने तुम्हाला त्रास दिल्यास पुढील प्रमाणे करण्यास काय हरकत आहे का? तुम्ही स्वतः त्या व्यक्‍तीच्या परिस्थितीत आहात असे समजा, म्हणजे त्याची पार्श्‍वभूमी, त्याचे व्यक्‍तिमत्त्व, त्याला झगडाव्या लागणाऱ्‍या त्याच्या व्यक्‍तिगत उणिवा तुमच्यामध्ये आहेत. तुम्ही अशाच—किंवा कदाचित याहूनही गंभीर चुका करणार नाही याची तुम्हाला पक्की खात्री आहे का? इतरांकडून अधिक अपेक्षिण्याऐवजी, आपण सहानुभूती दाखवली पाहिजे जे, आपण ‘केवळ माती आहो हे आठवणीत ठेवणाऱ्‍या’ यहोवासारखे समजदार होण्यास आपली मदत करील. (स्तोत्र १०३:१४; याकोब ३:१७) तो आपल्या मर्यादा जाणतो. आपण योग्यरीतीने जेवढे करू शकतो त्याच्यापेक्षा अधिक तो केव्हाही अपेक्षित नाही. (पडताळा १ राजे १९:५-७.) अशा प्रकारची सहानुभूती आपण सर्वांबद्दल बाळगू या.

८. एखादा बंधू अथवा भगिनी संकटातून गुजरत असताना आपली प्रतिक्रिया कशी असली पाहिजे?

८ पौलाने लिहिले, की मंडळी भिन्‍नभिन्‍न सदस्य असलेल्या परंतु एकत्र कार्य कराव्या लागणाऱ्‍या एका शरीरासारखी आहे. तो पुढे म्हणाला: “एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते.” (१ करिंथकर १२:१२-२६) परीक्षेतून गुजरणाऱ्‍यांसोबत आपणही सहन केले पाहिजे किंवा सहानुभाव दाखवला पाहिजे. असे करण्यात वडीलजन पुढाकार घेतात. पौलाने असेही लिहिले: “एखादा दुर्बळ असला तर मी दुर्बळ होत नाही काय? आणि एखादा अडखळविला गेला तर मला संताप येत नाही काय?” (२ करिंथकर ११:२९) वडीलजन आणि प्रवासी पर्यवेक्षक या बाबतीत पौलाचे अनुकरण करतात. त्यांच्या भाषणात, त्यांच्या मेंढपाळकत्वाच्या कार्यात आणि न्यायाधीन प्रकरणे हाताळताना देखील ते सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करतात. “शोक करणाऱ्‍यांबरोबर शोक करा,” अशी पौलाने शिफारस केली. (रोमकर १२:१५) मेंढपाळ खरोखरच आपल्याला समजून घेत आहेत, आपल्या मर्यादा जाणून आहेत व आपल्याला तोंड द्याव्या लागणाऱ्‍या हालअपेष्टांमुळे ते आपल्याला सहानुभाव दाखवत आहेत हे जेव्हा मेंढरांना कळते तेव्हा बहुधा ते सल्ला, मार्गदर्शन व शिक्षा स्वीकारण्यास स्वेच्छेने तयार असतात. आपल्या “जिवास विसावा मिळेल,” या भरवशाने ते उत्सुकतेने सभांना उपस्थित राहतात.—मत्तय ११:२९.

प्रशंसा करणे

९. आपल्यातील भल्या गोष्टीची यहोवा प्रशंसा करतो हे तो कसे दाखवतो?

९ प्रशंसा करणे हे बंधुप्रेमाची आग जिवंत ठेवणारे दुसरे एक इंधन आहे. इतरांची प्रशंसा करण्याकरता आपल्याला त्यांच्या सुगुणांवर आणि प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करून त्यांचा आदर केला पाहिजे. असे करताना आपण स्वतः यहोवाचे अनुकरण करत असतो. (इफिसकर ५:१) दररोज तो आपल्या अनेक लहानसहान चुका क्षमा करतो. खरोखरच पश्‍चात्ताप दाखवल्यास तो गंभीर पापांची देखील क्षमा करतो. आणि एकदा पापांची क्षमा केल्यावर पुन्हा ते उकरून काढत नाही. (यहेज्केल ३३:१४-१६) स्तोत्रकर्त्याने विचारले: “हे परमेशा, तू अधर्म लक्षात आणिशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?” (स्तोत्र १३०:३) यहोवाची सेवा करताना आपण जी भली कामे करतो त्यांवर तो आपले लक्ष केंद्रित करतो.—इब्री लोकांस ६:१०.

१०. (अ) वैवाहिक सोबत्यांनी एकमेकांची प्रशंसा न करण्यात कोणता धोका आहे? (ब) आपल्या सोबत्याविषयी प्रशंसा कमी होत चालली असेल तर तुम्ही काय केले पाहिजे?

१० कुटुंबामध्ये या उदाहरणाचे अनुसरण करणे विशेष महत्त्वाचे आहे. पालक जेव्हा एकमेकांची प्रशंसा करत असल्याचे दाखवून देतात तेव्हा ते आपल्या कुटुंबासाठी नमुना घालून देतात. विवाह अल्पकाळ टिकणाऱ्‍या या युगात, विवाहसोबत्याला मामुली समजणे, चुका मोठ्या करून दाखवून चांगल्या गुणांना कमी लेखणे या गोष्टी सहजरीत्या केल्या जातात. अशा नकारात्मक विचारांमुळे विवाह हळूहळू बरबाद होऊन निरुत्साही ओझ्यासमान वाटू लागतो. तुमच्या विवाह सोबत्याबद्दलची प्रशंसा कमी होत चालली असल्यास स्वतःस विचारा, ‘माझा सोबती खरोखरच सुगुणसंपन्‍न आहे का?’ तुमचा विवाह झाल्यावर तुम्हाला तुमचा सोबती आवडू लागल्याचा तो काळ आठवा. ही विशिष्ट व्यक्‍ती ज्या कारणांसाठी तुम्हाला आवडू लागली होती ती कारणे आता खरोखरच नाहीशी झाली आहेत का? निश्‍चितच नाही; तेव्हा, तुमच्या सोबत्याच्या चांगल्या गुणांची प्रशंसा करण्यास कष्ट घ्या आणि ती प्रशंसा शब्दांत मांडा.—नीतिसूत्रे ३१:२८.

११. विवाहातील प्रीती निष्कपट असावयास हवी तर कोणत्या चालीरिती टाळणे आवश्‍यक आहे?

११ प्रशंसा, वैवाहिक सोबत्यांना निष्कपट प्रेम दाखवण्यासही मदत करते. (पडताळा २ करिंथकर ६:६; १ पेत्र १:२२.) मनापासून केलेल्या प्रशंसेसह प्रवृत्त होणाऱ्‍या या प्रीतीस, चार भिंतींमध्ये क्रूरतेला जागा नसेल, दुखावणाऱ्‍या व अपमानास्पद शब्दांना जागा नसेल, जेथे एखादा प्रेमाचा किंवा नम्रतेचा शब्दही न काढता दिवसा मागून दिवस कंठावे लागतात अशा दुर्लक्षित वागणुकीला जागा नसेल आणि शारीरिक हिंसेला तर मुळीच जागा नसेल. (इफिसकर ५:२८, २९) मनापासून प्रशंसा करणारे पतीपत्नी एकमेकांचा आदर करतात. असे ते केवळ लोकांसमक्ष असतानाच नव्हे तर यहोवाच्या दृष्टीसमोर असतानाही म्हणजे, सर्व वेळी करतात.—नीतिसूत्रे ५:२१.

१२. पालकांनी त्यांच्या मुलांतील चांगल्या गुणांची प्रशंसा का व्यक्‍त केली पाहिजे?

१२ आपलीही प्रशंसा केली जावी असे मुलांना वाटते. पालकांनी त्यांच्यावर पोकळ फाजील स्तुतीचा वर्षाव करावा असा याचा अर्थ होत नाही, तर त्यांनी आपल्या मुलांच्या प्रशंसालायक गुणांची तसेच ते खरोखरच जे भले काम करतात त्याची प्रशंसा करावी. येशूला आपली स्वीकृती व्यक्‍त करताना यहोवाच्या उदाहरणाची आठवण करा. (मार्क १:११) दाखल्यातील ‘धनी’ असलेल्या येशूच्या उदाहरणाची आठवण करा. त्याने दोन ‘भल्या व विश्‍वासू दासांची’ सारखीच प्रशंसा केली; या दोन्ही दासांना जे देण्यात आले होते त्यात फरक होता शिवाय, प्रत्येकाने जे उत्पन्‍न काढले त्यातही अनुरूप फरक होता तरीसुद्धा त्याने त्यांची एकसमान प्रशंसा केली. (मत्तय २५:२०-२३; पडताळा मत्तय १३:२३.) त्याच प्रकारे सुज्ञ पालक प्रत्येक मुलाच्या विशिष्ट गुणांची, क्षमतांची आणि साध्यतांची प्रशंसा करण्याचे मार्ग शोधतात. त्यासोबतच ते मुलांच्या साध्यतांवर इतकाही जोर देत नाहीत ज्यामुळे मुले इतरांसमोर भाव मारू लागतील. आपल्या मुलांनी रागीट किंवा उदासीन व्हावे अशी त्यांची इच्छा नाही.—इफिसकर ६:४; कलस्सैकर ३:२१.

१३. मंडळीतील प्रत्येक सदस्याची प्रशंसा करण्यात कोण पुढाकार घेतात?

१३ ख्रिस्ती मंडळीत वडील आणि प्रवासी पर्यवेक्षक, देवाच्या कळपातील प्रत्येक व्यक्‍तीची प्रशंसा करण्यात पुढाकार घेतात. त्यांची स्थिती कठीण आहे कारण त्यांच्यावर धार्मिकतेत शिस्त लावण्याची, दोषात सापडलेल्यांना सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणण्याची व आवश्‍यक असलेल्यांना कडक सल्ला देण्याची भारी जबाबदारी आहे. या वेगवेगळ्या जबाबदाऱ्‍या ते कशा काय सांभाळतात?—गलतीकर ६:१; २ तीमथ्य ३:१६.

१४, १५. (अ) कडक सल्ला देण्याबाबतीत पौलाने समतोलपणा कसा दाखवला? (ब) ख्रिस्ती पर्यवेक्षक, चुकांची सुधारणूक करण्याची गरज आणि प्रशंसा करण्याची गरज यामध्ये समतोल कसा राखू शकतात? उदाहरण द्या.

१४ पौलाचे उदाहरण याबाबतीत बरेच सहायक आहे. तो एक उल्लेखनीय शिक्षक, वडील आणि मेंढपाळ होता. गंभीर समस्या असलेल्या मंडळ्यांना त्याला हाताळावे लागले आणि आवश्‍यकता होती तेव्हा कडक सल्ला देताना त्याने मागेपुढे पाहिले नाही. (२ करिंथकर ७:८-११) पौल आवश्‍यक किंवा उचित प्रसंगीच शाब्दिक माराचा उपयोग करीत होता हे त्याच्या सेवेच्या सारांशावरून सूचित होते. यामध्ये त्याने ईश्‍वरी सुज्ञता दर्शवली.

१५ मंडळीतील एखाद्या वडिलांच्या सेवेची तुलना संगीताच्या एखाद्या भागाशी केल्यास, शाब्दिक मार आणि कडक ताकीद त्या संगीत भागातील एकाच सूरासारखे वाटतील. तो सूर कदाचित तेथे योग्यही वाटेल. (लूक १७:३; २ तीमथ्य ४:२) समजा तो एकच सूर असलेले एक गीत आहे, ज्यामध्ये तोच सूर एक सारखा ऐकू येतो. काही वेळातच तो आपल्या कानाला कर्कश वाटू लागेल. अशाच प्रकारे, ख्रिस्ती वडील त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीला साजेसी बनवण्याचा तसेच विभिन्‍नतेचा वापर करून तिच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत असतात. शिकवणे म्हणजे समस्या सोडवणे इतकेच ते समजत नाहीत. उलट, त्यांच्या शिकवण्याची एकूण पद्धत उभारणीकारक असते. येशू ख्रिस्ताप्रमाणे प्रेमळ वडील, टीका करण्याकरता चुका न शोधता पहिल्यांदा प्रशंसनीय गोष्ट पाहतात. त्यांचे सहख्रिस्ती करीत असलेल्या परिश्रमाची ते प्रशंसा करतात. सर्व गोष्टी लक्षात घेता, प्रत्येक जण आपल्या परीने यहोवाची सेवा करण्याचा होता होईल तितका प्रयत्न करीत आहे याची त्यांना खात्री वाटते. आणि वडीलजन लगेचच आपल्या भावना बोलून दाखवतात.—पडताळा २ थेस्सलनीकाकर ३:४.

१६. पौलाच्या प्रशंसा करण्याच्या व सहानुभाव दाखवण्याच्या मनोवृत्तीचा त्याच्या सहख्रिश्‍चनांवर कोणता परिणाम झाला?

१६ यात काहीच शंका नाही, की पौलाने ज्या ख्रिश्‍चनांची सेवा केली त्यांना याची जाणीव झाली, की तो त्यांची प्रशंसा करीत होता व त्याला त्यांच्याबद्दल सहानुभूती होती. हे आपल्याला कसे काय माहीत होते? पौलाविषयी त्यांना कसे वाटले ते पाहा. तो मोठ्या अधिकारावर होता तरी त्यांना त्याची कधीच भीती वाटली नाही. तो त्यांचा प्रिय होता आणि त्याच्याकडे कोणीही सहज जाऊ शकत होते. एवढेच नव्हे तर, तो एक क्षेत्र सोडून दुसरीकडे जात होता तेव्हा ‘त्यांनी त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले.’ (प्रेषितांची कृत्ये २०:१७, ३७) अनुकरणासाठी आपल्याकडे पौलाचे उदाहरण आहे म्हणून वडिलांनी—आणि आपण सर्वांनी—किती आभारी असले पाहिजे! होय, आपण एकमेकांची प्रशंसा करत राहू या.

प्रेमळ कृपेची कृत्ये

१७. मंडळीमध्ये दयेची कृत्ये आचरल्याने कोणते चांगले परिणाम उद्‌भवतात?

१७ दयेने केलेले एखादे साधे कृत्य बंधुप्रेमासाठी सर्वात गुणकारी इंधन आहे. येशू जसे म्हणाला: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) आपण आध्यात्मिकरीत्या, भौतिकरीत्या किंवा आपला वेळ वा शक्‍ती खर्च करून देत असतो तेव्हा फक्‍त आपणच नव्हे तर इतरही खूष होतात. मंडळीमध्ये दया संसर्गजन्य आहे. दयेने केलेले एखादे कृत्य आणखी अशाचप्रकारची कृत्ये उत्पन्‍न करते. पाहता पाहता बंधुप्रेमाची भरभराट होते!—लूक ६:३८.

१८. मीखा ६:८ मध्ये ज्या ‘दयेविषयी’ सांगितले आहे त्याचा अर्थ काय होतो?

१८ यहोवाने आपल्या इस्राएल लोकांना दया दाखवण्यास आर्जविले. मीखा ६:८ [पं.र.भा.] मध्ये आपण वाचतो: “हे मनुष्या, जे उत्तम ते त्याने तुला प्रगट केले आहे; आणि न्यायाने वागणे, दयेची प्रीति धरणे व आपल्या देवासंगती नम्रपणाने चालणे यावांचून यहोवा तुझ्यापाशी काय मागतो?” “दयेची प्रीति धरणे” म्हणजे नेमके काय? येथे वापरण्यात आलेल्या ‘दया’ (चेसेद) या इब्री शब्दाचे इंग्रजीत “करुणा” असेही भाषांतर करण्यात आले आहे. द सॉनसिनो बुक्स ऑफ द बायबल नामक पुस्तकानुसार, हा शब्द “करुणा यासाठी असलेल्या निष्क्रिय इंग्रजी शब्दापेक्षा सक्रियतेचा अर्थ देते. त्याचा अर्थ, ‘कार्यांद्वारे व्यक्‍त केलेली करुणा,’ केवळ गरीब व गरजूंप्रतीच नव्हे तर सर्व सहसोबत्यांप्रती प्रेमळ दयेची स्वतः केलेली कार्ये.” म्हणूनच दुसरे एक विद्वान म्हणतात, की चेसेद याचा अर्थ “कार्यात उतरवलेली प्रीती” असा होतो.

१९. (अ) आपण मंडळीतील इतरांना दया दाखवण्यात कोणकोणत्या मार्गांद्वारे पुढाकार घेऊ शकतो? (ब) तुम्हाला बंधुप्रेम कशा प्रकारे दाखवण्यात आले त्याचे एखादे उदाहरण द्या.

१९ आपले बंधुप्रेम काल्पनिक नाही. ते वास्तविक आहे. यास्तव, तुमच्या बंधू वा भगिनींसाठी दयाशील कृत्ये करण्याकरता मार्ग शोधा. येशूसारखे व्हा, लोकांनी आपल्याकडे मदतीसाठी यावे असा विचार करून तो थांबून राहिला नाही तर बहुतेक वेळा त्याने पुढाकार घेतला. (लूक ७:१२-१६) गरजवंतांचा विशेष विचार करा. एखाद्या वृद्ध वा दुर्बळ व्यक्‍तीला भेट देण्याची किंवा कदाचित त्यांची छोटी मोठी कामे करण्याकरता मदतीची गरज आहे का? कोणा ‘अनाथाला’ वेळ व लक्ष देण्याची गरज आहे का? कोणा खिन्‍न व्यक्‍तीला ऐकणारा कान वा सांत्वनपर बोल हवेत का? आपल्याला शक्य होईल तेव्हा, दयेच्या अशा कृत्यांसाठी आपण वेळ काढू या. (ईयोब २९:१२; १ थेस्सलनीकाकर ५:१४; याकोब १:२७) अपरिपूर्ण लोकांनी भरलेल्या मंडळीत दयेच्या कृत्यांपैकी सर्वात महत्त्वपूर्ण कृत्य क्षमा करणे हे आहे. तक्रारीसाठी योग्य कारण असले तरीसुद्धा राग पूर्णपणे सोडून द्यावा. (कलस्सैकर ३:१३) क्षमा करण्याची तयारी आपल्याला मंडळीला फूटी, कुरकूर आणि कलह यांपासून मुक्‍त ठेवण्यास साहाय्य करते; कारण या गोष्टी बंधुप्रेमाच्या आगीचा कोंडमारा करणाऱ्‍या निराशेच्या व विषण्णतेच्या छायासमान आहेत.

२०. आपण सर्वांनी कशाप्रकारे आत्मपरीक्षण केले पाहिजे?

२० प्रीतीच्या या महत्त्वपूर्ण आगीला आपल्या अंतःकरणात सतत ज्वलंत ठेवण्याचा आपण सर्वजण दृढनिश्‍चय करू या. स्वतःचे परीक्षण करून पाहू या. आपण इतरांना सहानुभूती दाखवतो का? इतरांची आपण प्रशंसा करतो का? इतरांसाठी आपण दयेची कृत्ये करतो का? वरील गोष्टी आपण जोपर्यंत करीत राहू तोपर्यंत प्रीतीची आग, हे जग किती थंड झाले किंवा भावनारहित झाले तरी आपल्या बंधुसमाजाला उबदार ठेवील. तेव्हा सर्व प्रकारे तुमचे ‘बंधुप्रेम टिकून राहो’—आता आणि चिरकालासाठी!—इब्री लोकांस १३:१.

[तळटीप]

a काही अनुवाद येथे असे सूचित करतात, की देवाच्या लोकांना स्पर्श करणारा देवाच्या नव्हे तर इस्राएलच्या डोळ्याला किंवा स्वतःच्या डोळ्याला स्पर्श करतो. ही चूक काही मध्ययुगीन शास्त्र्यांमुळे झाली ज्यांनी, त्यांना आदरशून्य वाटणाऱ्‍या उताऱ्‍यांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करताना या वचनात फेरफार केला. याद्वारे त्यांनी यहोवाच्या व्यक्‍तिगत सहानुभावाची तीव्रता दुर्बोध केली.

तुम्हाला काय वाटते?

◻ बंधुप्रेम काय आहे व आपण ते टिकवून का ठेवावी?

◻ सहानुभूती आपले बंधुप्रेम टिकवून ठेवण्यास कशी मदत करते?

◻ बंधुप्रेमात प्रशंसेची कोणती भूमिका आहे?

◻ ख्रिस्ती मंडळीत दयेची कृत्ये बंधुप्रेमाची भरभराट होण्यास कशी कारणीभूत ठरतात?

[१६ पानांवरील चौकट]

कार्यांद्वारे प्रीती दिसते

काही वर्षांपूर्वी, यहोवाच्या साक्षीदारांबरोबर काही काळापर्यंत बायबलचा अभ्यास केलेल्या एका मनुष्याला बांधवांमधील प्रीतीबद्दल अजूनही काहीशी शंका होती. “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा,” असे येशूने म्हटल्याचे त्याला माहीत होते. (योहान १३:३५) पण तरीसुद्धा त्याला त्यावर विश्‍वास ठेवणे कठीण वाटत होते. एके दिवशी त्याला ख्रिस्ती प्रीती आचरणात दिसून आली.

हा मनुष्य व्हीलचेअरवर बंदिस्त होता तरीसुद्धा तो आपल्या घरापासून दूरवर प्रवास करीत होता. इस्राएलमधील बेथलेहेमच्या एका मंडळीच्या सभेला उपस्थित राहिला. तेथे, एका अरबी साक्षीदाराने भेट देणाऱ्‍या एका साक्षीदाराला आणि या बायबल विद्यार्थ्याला आपल्या घरी राहण्यासाठी बोलावले. झोपण्याआधी विद्यार्थ्याने यजमानाला विचारले, की तो पहाटे सूर्योदय पाहण्यासाठी वरांड्यात गेला तर चालेल का. परंतु यजमानाने त्याला सरळपणे नाही असे सांगितले. दुसऱ्‍या दिवशी या अरबी बांधवाने त्याचे कारण सांगितले. एका दुभाषिकाद्वारे त्याने सांगितले, की माझ्या घरात यहुदी पार्श्‍वभूमीचे पाहुणे—तो बायबल विद्यार्थी—आल्याचे माझ्या शेजाऱ्‍यांना कळाले तर ते माझ्या घरासकट मला व माझ्या कुटुंबाला जाळून टाकतील. हे ऐकून तो बायबल विद्यार्थी गोंधळून गेला आणि त्याने विचारले, “मग तुम्ही इतका मोठा धोका का पत्करलात?” आता दुभाषिकाविना त्या अरबी बांधवाने त्याच्याकडे बघत “योहान १३:३५” असे म्हटले.

बांधवांमधील खरी प्रीती पाहून त्या बायबल विद्यार्थ्यावर खोलवर प्रभाव पडला. त्यानंतर काही काळातच त्याचा बाप्तिस्मा झाला.

[१८ पानांवरील चित्र]

प्रेषित पौलाच्या मैत्रीपूर्ण व प्रशंसा करण्याच्या स्वभावामुळे लोक त्याच्याकडे सहजपणे जात असत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा