राज्य घोषकांचा वृत्तान्त
पिशाच्च प्रभावापासून मुक्त होणे
पिशाच्चवादाच्या अभ्यासाने पुष्कळ काळापासून कोट्यवधी लोकांच्या जीवनावर आधिपत्य गाजवले आहे. परंतु यातून मुक्तता शक्य आहे! इफिस या प्राचीन नगरात अनेकांच्या बाबतीत असेच झाले होते. बायबलच्या अहवालानुसार, “जादूटोणा करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून . . . जाळून टाकिली. . . . ह्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याचे वचन वाढत जाऊन प्रबल झाले.”—प्रेषितांची कृत्ये १९:१९, २०.
त्याचप्रमाणे आजही ख्रिस्ती मंडळीमध्ये वाढ होत आहे. प्राचीन इफिसमध्ये होते त्याप्रमाणे विश्वास ठेवणाऱ्यांपैकी असेही आहेत जे पूर्वी पिशाच्चवादाचा अभ्यास करत. झिम्बाब्वेमधून मिळालेला पुढील अनुभव हे दाखवून देतो.
पिशाच्चवादी शक्तीसाठी गॉगॉ (आजी) मटुपा प्रसिद्ध होती. झांबिया, बोट्सवाना आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या दूरवरच्या ठिकाणाहून जडीबुटीच्या साहाय्याने आजार बरा करण्यासाठी लोक तिच्याकडे येत. नानगा किंवा मांत्रिक होण्याबद्दल देखील गॉगॉ मटुपा इतरांना शिकवत असे. आणि काहीवेळा तर ती चक्क जादुटोनाही करत असे!
एके रविवारी सकाळी घरोघरचे सेवाकार्य करत असताना यहोवाचे साक्षीदार गॉगॉ मटुपाकडे आले. बायबलमधील अभिवचनयुक्त धार्मिक जगाबद्दल अर्थात सर्व दुष्ट प्रभावांपासून मुक्त असलेल्या नवीन जगाबद्दल त्यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर तिला आनंद झाला. तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक तिने स्वीकारले आणि गृहबायबल अभ्यासाकरता सुद्धा ती तयार झाली.a केवळ तीन वेळा अभ्यास केल्यानंतर ती सभांना येऊ लागली.
यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात बंड पुकारलेल्या दुष्टात्म्यांपासून आपल्याला खास शक्ती प्राप्त होत असल्याचे गॉगॉ मटुपाला बायबलचा अभ्यास केल्यानंतर समजले. (२ पेत्र २:४; यहूदा ६) जास्तीत-जास्त लोकांना यहोवाच्या आणि शुद्ध उपासनेच्या विरुद्ध करण्यासाठी या पिशाच्चांनी चंग बांधला असल्याचेही तिला कळले. दुरात्म्यांना बोलवण्यावर तिचा चरितार्थ चालत होता पण, ती आता काय करणार होती?
आपल्याकडील सर्व ताईत आणि पिशाच्चवादी सामान यांपासून स्वतःला दूर करण्याची इच्छा गॉगॉ मटुपाने प्रकट केली. यांमध्ये तिचा खास किरीट आणि “बैलाचे बोलणारे शिंग” सुद्धा होते. नानगा उपचार करतेवेळी ती या शिंगाचा उपयोग करत असे. एकमेव खऱ्या आणि जिवंत देवाची, यहोवाची सेवा करता यावी म्हणून अशा सर्व वस्तू दूर करण्याची गॉगॉ मटुपाची इच्छा होती.
परंतु तिच्या नातेवाईकांनी असे करण्यास हरकत घेतली कारण ती त्यांना आर्थिकरीत्या मदत करत असे. गूढ शक्तीसह तिच्या सर्व वस्तू आपल्याला द्याव्यात अशी त्यांनी तिला विनंती केली जेणेकरून त्यांना त्यानंतरही पैसे मिळवता येणे शक्य व्हावे. गॉगॉ मटुपाने तसे देखील करण्यास नकार दिला.
यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक मंडळीच्या साहाय्याने तिने सर्व पिशाच्चवादी वस्तू तीन भल्या मोठ्या थैलींत भरल्या आणि त्यांतील सर्वकाही जाळून टाकले. आगीच्या ज्वाळांनी तिच्या पिशाच्च उपासनेच्या वस्तूंना आपल्यात सामावून घेतले तेव्हा गॉगॉ मटुपाच्या तोंडून पुढील उद्गार बाहेर पडले: “पाहा! ते शिंग, ते स्वतःला देखील वाचवू शकत नाही.”
काही काळानंतर गॉगॉ मटुपाने यहोवाला समर्पणाचे द्योतक म्हणून आनंदाने पाण्याचा बाप्तिस्मा घेतला. ती आता स्वतःचा उदरनिर्वाह कशा प्रकारे चालवते? भाजी विकून. होय, देववचनाच्या शक्तीने एखादी व्यक्ती पिशाच्च उपासनेपासून मुक्त होऊ शकते. गॉगॉ मटुपा म्हणते: “मला इतकं स्वतंत्र यापूर्वी कधीही वाटलं नाही.”
[तळटीप]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.