तुम्ही देवाचे मित्र आहात का? तुमच्या प्रार्थनांतून दिसून येते
तुमच्या कानांवर कोणा दोघांचे संभाषण अपघाताने पडले आहे का? त्या दोघांमध्ये कोणत्या प्रकारचा नातेसंबंध आहे हे ठरविण्यासाठी तुम्हाला निश्चितच जास्त वेळ लागला नाही—ते दोघे जिवलग मित्र होते की अनोळखी होते, निव्वळ परिचित होते अथवा खास, भरवशाचे होते. त्याचप्रमाणे आपल्या प्रार्थना आपला देवासोबत असणारा नातेसंबंध प्रकट करू शकतात.
देव “आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही,” अशी हमी बायबल आपल्याला देते. (प्रेषितांची कृत्ये १७:२७) खरोखर, स्वतःला जाणून घेण्याचे आमंत्रण यहोवा आपल्याला देतो. आपण त्याचे मित्र सुद्धा होऊ शकतो. (स्तोत्र ३४:८; याकोब २:२३) आपल्याला त्याच्यासोबत खऱ्या सलगीचा अनुभव घेणे शक्य आहे. (स्तोत्र २५:१४) स्पष्टपणे, देवासोबतचा आपला नातेसंबंध मौल्यवान आहे आणि अपरिपूर्ण मनुष्याला या नातेसंबंधात येणे शक्य आहे. त्याच्यासोबत असलेल्या आपल्या मैत्रीला यहोवा मोलवान समजतो. हे खरे आहे कारण आपला त्याच्यासोबतचा नातेसंबंध त्याच्या एकुलत्या एका पुत्रावर असलेल्या आपल्या विश्वासावर आधारलेला आहे; त्याच्या पुत्राने आपल्यासाठी स्वतःचे जीवन दिले.—कलस्सैकर १:१९, २०.
यामुळे आपल्या प्रार्थनांतून यहोवाप्रती आपले सखोल प्रेम आणि आपली कदर दिसून आली पाहिजे. तुमच्या प्रार्थना श्रद्धापूर्ण आहेत खऱ्या पण, त्यांत निर्भेळ भावनांची कमी असल्याचे तुम्हाला कधी वाटले आहे का? असे वाटणे सामान्य आहे. या बाबतीत सुधारणा करण्यासाठी काही तोडगा आहे का? यहोवा देवासोबत तुमची मैत्री वाढवा.
प्रार्थनेसाठी सवड काढणे
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, मैत्री वाढविण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी काही काळ जावा लागतो. तुमचे दररोज अनेक लोकांसोबत संभाषण होत असेल—शेजारी, सहकामगार, बस चालक, दुकानदार वगैरे. परंतु याचा असा अर्थ होत नाही, की तुम्ही त्यांचे खरोखरचे मित्र आहात. तुम्ही एखाद्याशी मनःपूर्वक बोलता, वरवर बोलण्याखेरीज एखाद्यासमोर तुमच्या अंतःकरणातील भावना आणि तुमचे विचार तुम्ही उघड करता तेव्हा कुठे तुम्हा दोघांतील मैत्रीसंबंधात वाढ होते.
अशाच प्रकारे, यहोवाच्या जवळ येण्यासाठी प्रार्थना तुम्हाला मदत करतात. परंतु त्यासाठी पुरेसा वेळ देण्याची गरज आहे; जेवणाच्यावेळी करण्यात येणाऱ्या त्रोटक प्रार्थनेपेक्षा अधिक काही करण्याची गरज आहे. यहोवासोबत अधिक बोलल्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भावनांचे, विचारांचे आणि कार्यांचे अधिक परीक्षण करणे शक्य होते. देवाचा पवित्र आत्मा देववचनातील तत्त्वे आपल्या मनात आणतो तेव्हाच कठीण समस्यांचे निरसन होण्यास सुरवात होते. (स्तोत्र १४३:१०; योहान १४:२६) याशिवाय, तुम्ही प्रार्थना करता तसे यहोवा तुमच्यासाठी अधिक वास्तविक बनतो आणि तुमच्याप्रती त्याची प्रेमळ आस्था आणि चिंता यांची तुम्हाला अधिक चांगल्याप्रकारे जाणीव होऊ लागते.
हे विशेषतः तेव्हा घडते जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रार्थनांचे उत्तर मिळते. ‘आपल्या मागण्या आणि कल्पना यांच्या अधिक्याने कार्य करण्यास’ यहोवा समर्थ आहे! (इफिसकर ३:२०) देव तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणेल, असा याचा अर्थ होत नाही. तथापि, आपले लिखित वचन, विश्वासू दास वर्गाची प्रकाशने किंवा प्रेमळ बांधव आणि भगिनी यांच्या साहाय्याने यहोवा तुम्हाला आवश्यक तो सल्ला आणि मार्गदर्शन देईल. तसेच तग धरण्यासाठी किंवा मोहपाशाला विरोध करण्यासाठी आवश्यक असणारे सामर्थ्य देखील तो तुम्हाला देईल. (मत्तय २४:४५; २ तीमथ्य ४:१७) अशा प्रकारचे अनुभव आपल्या स्वर्गीय मित्राची मनःपूर्वक कदर करण्यास प्रेरित करतात!
त्यामुळे एखाद्या व्यक्तीने प्रार्थनेसाठी सवड काढणे अगत्याचे आहे. हे खरे आहे, की या धकाधकीच्या जीवनात वेळ मिळणे दुरापास्त झाले आहे. परंतु तुम्ही एखाद्याची खरोखरच काळजी घेता तेव्हा त्याच्यासोबत घालविण्यासाठी तुम्ही सामान्यपणे काही वेळ काढताच. स्तोत्रकर्त्याने स्वतःविषयी काय म्हटले त्याकडे लक्ष द्या: “हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी लुलपते तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी, तान्हेला झाला आहे; मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन?” (स्तोत्र ४२:१, २) देवासोबत बोलण्याची अशीच मनीषा तुमचीही आहे का? तर मग, असे करण्यासाठी वेळ विकत घ्या!—पडताळा इफिसकर ५:१६.
उदाहरणार्थ, खासगीत प्रार्थना करता यावी म्हणून कदाचित सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. (स्तोत्र ११९:१४७) तुम्हाला रात्री काही वेळा झोप येत नाही का? तर मग, स्तोत्रकर्त्याप्रमाणे तुम्हीही अशा त्रासदायक समयाकडे देवाला तुमची चिंता कळविण्याची संधी म्हणून पाहू शकता. (स्तोत्र ६३:६) किंवा तुम्हाला दिवसभरात कित्येकवेळा त्रोटक प्रार्थना करता येतील. स्तोत्रकर्त्याने देवाला म्हटले: “मी दिवसभर तुझा धावा करितो.”—स्तोत्र ८६:३.
आपल्या प्रार्थनांचा दर्जा सुधारणे
तुमच्या प्रार्थनांची लांबी वाढविणे हे सहायक असल्याचे तुम्हाला अनेकदा दिसून येईल. त्रोटक प्रार्थनेत वरवरच्या गोष्टी बोलण्याकडे तुमचा कल असेल. परंतु तुम्ही जेव्हा लांब आणि भावनाशील प्रार्थना करता तेव्हा तुम्ही साहजिकच तुमचे विचार आणि तुमच्या मनातील भावना व्यक्त करता. येशूने किमान एकदा संपूर्ण रात्रभर प्रार्थना केली. (लूक ६:१२) प्रार्थनेच्यावेळी घाई करण्याचे टाळल्यास तुमच्या प्रार्थना अधिक सलगीच्या आणि अर्थपूर्ण झाल्याचे तुम्हाला निश्चितच दिसून येईल.
तुम्हाला जे थोडक्यात म्हणायचे आहे त्याची पाल्हाळ लावणे, वारंवार तेच ते शब्द अर्थहीनपणे म्हणणे, असा याचा अर्थ होत नाही. येशूने असा इशारा दिला: “तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका, आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारिखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच, जाणून आहे.”—मत्तय ६:७, ८.
तुम्हाला चर्चा करावयाच्या विषयांवर तुम्ही आधीच विचार केल्यास तुमची प्रार्थना अधिक अर्थभरीत होईल. या विषयांमध्ये अनंत गोष्टी सांगण्यासारख्या आहेत—सेवाकार्यातील आपला आनंद, आपल्या कमतरता आणि अपरिपूर्णता, निराशा, आपल्याला असलेल्या आर्थिक चिंता, कामातील अथवा शाळेतील दबाव, आपल्या कुटुंबाचे कल्याण तसेच आपल्या स्थानिक मंडळीची आध्यात्मिक स्थिती या केवळ काही गोष्टी आहेत.
तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमचे मन काही वेळा भरकटले जाते का? तर मग एकाग्र होण्यासाठी अधिक प्रयत्न करा. तथापि, यहोवा ‘आपल्या आरोळीकडे लक्ष’ देण्यासाठी नेहमी तयार असतो. (स्तोत्र १७:१) यास्तव आपल्या स्वतःच्या प्रार्थनांकडे लक्ष देण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू नये का? होय, तुमचे मन भरकटता कामा नये, उलटपक्षी ‘आध्यात्मिक गोष्टींवर तुमचे चित्त’ लावा.—रोमकर ८:५.
आपण ज्या पद्धतीने यहोवाला संबोधतो ती बाब देखील महत्त्वाची आहे. आपल्याला मित्र समजावे असे यहोवाला वाटत असले तरी आपल्याला या गोष्टीचे कधीही विस्मरण होता कामा नये, की आपण या विश्वाचा सार्वभौम असलेल्याशी बोलत आहोत. प्रकटीकरण अध्याय ४ आणि ५ वाचा आणि धडकी भरविणाऱ्या तेथील दृश्यावर मनन करा. आपण ज्यास प्रार्थना करतो त्या देवाचे वैभव योहानाने दृष्टान्तात पाहिले. ‘राजासनावर बसलेल्याकडे’ प्रार्थना करण्यास शक्य होणे आणि त्याची मान्यता प्राप्त होणे हा किती मोठा विशेषाधिकार आहे! आपली भाषा अनादरयुक्त किंवा पोरकटपणाची असावी असे आपल्याला केव्हाही वाटणार नाही. ‘आपल्या तोंडचे शब्द आणि मनातील विचार यहोवाला मान्य’ होण्यासाठी आपण एकसारखा प्रयत्न केला पाहिजे.—स्तोत्र १९:१४.
आपल्या वक्तृत्वपूर्ण शब्दांनी आपण यहोवाला प्रभावित करत नाही, हे आपण ओळखले पाहिजे. आपले शब्द कितीही साधेसोपे असले, परंतु ते आदरयुक्त, मनापासून असल्याने त्या शब्दांनी यहोवा आनंदी होतो.—स्तोत्र ६२:८.
गरजेच्या काळात सांत्वन आणि समज
आपल्याला जेव्हा गरज असते किंवा सांत्वन हवे असते तेव्हा आपण बहुतेकवेळा आधारासाठी आणि सहानुभूतीसाठी जवळच्या मित्राकडे जातो. खरे तर यहोवासारखा इतर कोणताही मित्र इतका सुगम्य नाही. तो “संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो.” (स्तोत्र ४६:१) “सर्व सांत्वनदाता देव” या नात्याने आपण कोणत्या परिस्थितींमधून जात आहोत याची त्याला इतरांपेक्षा पूर्ण कल्पना आहे. (२ करिंथकर १:३, ४; स्तोत्र ५:१; ३१:७) अत्यंत बिकट परिस्थितीत असणाऱ्यांकरता तो सहानुभाव आणि दया दाखवतो. (यशया ६३:९; लूक १:७७, ७८) यहोवा एक समजदार मित्र आहे, हे ओळखल्याने आपण त्याच्याशी कळकळीने, उत्सुकतेने अगदी मनमोकळेपणाने बोलतो. सखोल भय आणि चिंता व्यक्त करण्यास आपण उद्युक्त होतो. यहोवापासून ‘लाभणारे सांत्वन आपल्या जिवाचे समाधान’ कसे करते याचा अनुभव आपल्या स्वतःला होतो.—स्तोत्र ९४:१८, १९.
आपल्या चुकांमुळे कधीकधी आपण यहोवाला प्रार्थना करण्यास योग्य नसल्याचे आपल्याला वाटेल. परंतु तुमच्या जिवलग मित्राने तुमचे मन दुखावले आणि नंतर तुमच्याकडे त्याविषयी क्षमा मागितली तर तुम्ही काय कराल? तुम्ही त्याचे सांत्वन करून त्याला खात्री देणार नाही का? तर मग तुम्ही यहोवाकडून यापेक्षा कमी अपेक्षा करावी का? यहोवाचा मित्र मानवी अपरिपूर्णतांमुळे पाप करतो तेव्हा तो आपल्या मित्राला उदारपणे क्षमा करतो. (स्तोत्र ८६:५; १०३:३, ८-११) हे जाणल्यामुळे आपण आपल्या चुका कोणतीही आडकाठी न ठेवता त्याला कबूल करण्यापासून मागे हटत नाही; आपण त्याच्या प्रेमावर आणि दयेवर विश्वास ठेवू शकतो. (स्तोत्र ५१:१७) आपण स्वतःच्या चुकांमुळे निराश असल्यास, १ योहान ३:१९, २० येथील शब्दांनी आपण सांत्वन प्राप्त करू शकतो: “आपण सत्याचे आहो हे ह्यावरुन आपल्याला कळून येईल; आणि ज्या कशाविषयी आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरविते त्याविषयी आपण स्वतःच्या मनाला त्याच्यासमोर उमेद देऊ; कारण आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्व काही कळते.”
तथापि, देवाच्या प्रेमळ चिंतेचा अनुभव घेण्यासाठी आपल्यावर बिकट संकट येण्याची गरज नाही. आपल्या आध्यात्मिक आणि भावनात्मक कल्याणावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही गोष्टीत यहोवाला आस्था आहे. होय, आपल्या भावना, आपले विचार, आपल्या चिंता प्रार्थनेत उल्लेख करण्यासाठी अगदी क्षुल्लक आहेत, असा विचार करण्याची काहीएक आवश्यकता नाही. (फिलिप्पैकर ४:६) तुम्ही तुमच्या जिवलग मित्रासोबत असता तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनातील केवळ प्रमुख गोष्टींची चर्चा करता का? तुम्ही तुलनात्मकरीत्या छोट्याछोट्या गोष्टी एकमेकांना सांगत नाही का? त्याचप्रमाणे यहोवा “तुमची काळजी घेतो,” हे जाणून तुमच्या जीवनातील कोणत्याही बाबीची चर्चा तुम्ही त्याच्याशी कोणतीही आडकाठी न ठेवता करू शकता.—१ पेत्र ५:७.
तुम्ही केवळ तुमच्याच गोष्टी सांगत बसला तर साहजिकच तुमची मैत्री फार काळ टिकणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या प्रार्थना देखील आत्म-केंद्रित असू नयेत. यहोवा आणि त्याच्या आस्थांप्रती असलेले आपले प्रेम आणि चिंता देखील आपण व्यक्त करण्यास हवी. (मत्तय ६:९, १०) प्रार्थना म्हणजे देवापासून मदत मागण्याची संधीच नव्हे, तर आभार आणि स्तुती व्यक्त करण्याचा देखील तो एक प्रसंग आहे. (स्तोत्र ३४:१; ९५:२) नियमित व्यक्तिगत अभ्यासाद्वारे ‘ज्ञान घेतल्यामुळे’ तुम्हाला याबाबतीत मदत प्राप्त होईल, यामुळे यहोवाशी आणि त्याच्या मार्गांशी अधिक परिचित होण्यास तुम्हाला मदत होते. (योहान १७:३) स्तोत्रसंहितेचे पुस्तक वाचणे आणि इतर विश्वासू सेवकांनी स्वतःला यहोवापाशी कसे व्यक्त केले याची नोंद घेणे, हे तुम्हाला विशेषतः सहायक असल्याचे दिसून येईल.
यहोवाची मैत्री ही खरोखरच एक अमूल्य इनाम आहे. आपल्या प्रार्थना अधिक सलोख्याच्या, मनःपूर्वक आणि व्यक्तिगत करण्याद्वारे आपण ते दाखवून देऊ शकतो. असे केल्याने स्तोत्रकर्त्याने व्यक्त केलेल्या आनंदाचा आपल्याला अनुभव येईल, त्याने म्हटले: “ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्याजवळ आणितोस तो धन्य.”—स्तोत्र ६५:४.
[२८ पानांवरील चित्र]
संपूर्ण दिवसभरात आपल्याला जेव्हाकेव्हा संधी मिळते तेव्हा आपण देवाला प्रार्थना करू शकतो