वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ७/१ पृ. २२-२५
  • मला या जीवनाचा कधीही पस्तावा झाला नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मला या जीवनाचा कधीही पस्तावा झाला नाही
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आईचे उत्तम उदाहरण
  • नोकरी आणि आध्यात्मिक प्रगती
  • त्रासदायक समयातील बेथेल सेवा
  • युद्धकाळात पायनियरींग
  • अनेक आनंदमय विशेषाधिकार
  • बेथेल सेवा—अधिक स्वयंसेवकांची आवश्‍यकता
    आमची राज्य सेवा—१९९५
  • तुम्ही स्वतःला उपलब्ध करू शकाल का?
    आमची राज्य सेवा—२००३
  • हे तुमच्याकरता सर्वात उत्तम करियर असू शकेल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • सर्वांसाठी एक निमंत्रण!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ७/१ पृ. २२-२५

मला या जीवनाचा कधीही पस्तावा झाला नाही

पॉल ऑब्रिस्ट यांच्याद्वारे कथित

सन १९१२ मध्ये मी सहा वर्षे वयाचा असताना आईने आपल्या पाचव्या मुलाला जन्म दिला आणि ती आम्हाला सोडून गेली. सुमारे दोन वर्षांनंतर बर्ता विबेल नामक तरुण आया आमच्या कुटुंबाची काळजी घेऊ लागली. एका वर्षानंतर बाबांनी तिच्याशी लग्न केले तेव्हा पुन्हा एकदा आई मिळाल्यामुळे आमच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता.

आम्ही स्वित्झर्लंडमधील बर्ग नामक जर्मन-भाषिक लोकांच्या छोट्याशा शहरात वास्तव्यास होतो. बर्ता खरोखरच एक ख्रिस्ती व्यक्‍ती होती आणि मला ती फार आवडत असे. तिने सन १९०८ मध्ये बायबल विद्यार्थ्यांसोबत (यहोवाच्या साक्षीदारांसोबत) प्रकाशनांचा अभ्यास करण्यास सुरवात केली आणि शिकत असलेल्या गोष्टी ती इतरांना देखील सांगत असे.

बर्ताशी बाबांनी लग्न केल्यानंतर १९१५ साली मी तिच्यासोबत “फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशन” पाहण्यासाठी गेलो. प्रांजळ बायबल विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्लाईड आणि फिल्म प्रस्तुती पाहिल्यानंतर तिने माझ्या मनाचा आणि हृदयाचा ठाव घेतला. इतर लोकांनी ही प्रस्तुती पाहून तोंडात बोटे घातली. बर्गच्या सभागृहात ही गर्दी झाली होती, की पोलिसांनी सभागृहाचे दरवाजे बंद करून उशिरा येणाऱ्‍या लोकांना माघारी पाठवले. अनेकांनी शिडीच्या साहाय्याने खिडकीतून सभागृहात शिरण्याचा प्रयत्न केला आणि काही जणांना ते शक्य देखील झाले.

आईचे उत्तम उदाहरण

त्यावेळी युरोपमध्ये पहिले महायुद्ध धूमसत होते आणि पुढे काय होणार, याविषयी लोकांना चिंता लागून राहिली होती. त्यामुळे देवाच्या राज्याचा सांत्वनदायक संदेश घरोघरी जाऊन सांगण्याचे आईने केलेले काम खरोखरच उदात्त होते. काहीवेळा आई मला तिच्यासोबत नेत असे आणि ते कार्य मला फार आवडतही होते. अखेरीस सन १९१८ मध्ये यहोवा देवाला समर्पणाचे द्योतक म्हणून आईने पाण्याचा बाप्तिस्मा घेतला.

आईचा बाप्तिस्मा होईपर्यंत बाबांनी तिच्या उपासनेबद्दल चकार शब्द काढला नाही; पण बाप्तिस्म्यानंतर ते आईला धारेवर धरू लागले. एके दिवशी त्यांनी तिच्याजवळील बायबल साहित्य हिसकावून घेऊन चुलीत भिरकावून दिले. आईला त्या चुलीतून केवळ बायबल कसेबसे काढता आले. परंतु त्यानंतर तिने जे काही केले ते चक्रावून सोडणारे होते. तिने बाबांना मिठी मारली. तिच्या मनात बाबांविषयी इतका सुद्धा रोष नव्हता.

बाबा हे पाहून थक्क झाले आणि त्यांचा रागाचा पारा एकदम उतरला. तथापि, अधूनमधून बाबा विरोध करायचे आणि आम्हाला त्यांच्या रागाला तोंडघशी पडावे लागत असे.

नोकरी आणि आध्यात्मिक प्रगती

सन १९२४ मध्ये तीन वर्षांची हेअरड्रेसरची अप्रॅन्टिसशिप केल्यानंतर मी घर सोडले आणि स्वित्झर्लंडमधील फ्रेंच-भाषिक भागात मला नोकरी मिळाली. फ्रेंच भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची संधी यामुळे मला मिळाली. घर सोडल्यामुळे माझ्या आध्यात्मिक प्रगतीला काही अंशी खीळ बसली होती, पण बायबल सत्यांप्रती असलेले माझे प्रेम कधीही थंड झाले नाही. आणि म्हणूनच मी सहा वर्षांनंतर घरी परतलो तेव्हा बर्गमध्ये होणाऱ्‍या ख्रिस्ती मंडळीतील सभांना जाऊ लागलो.

त्यानंतर काही काळाने मी सुमारे ४० किलोमीटर दूर असलेल्या रेनफेल्डन या शहरात राहण्यासाठी गेलो. तेथे माझ्या बहिणीच्या हेअरड्रेसरच्या दुकानात मी काम करू लागलो आणि त्याचबरोबर बायबल विद्यार्थ्यांच्या छोट्या गटांशी संबंध ठेवून मी आध्यात्मिकरीत्या प्रगती करत होतो. एके दिवशी आमचा मध्यसाप्ताहिक बायबल अभ्यास घेतल्यानंतर बंधू झॉदर या नियुक्‍त वडिलांनी विचारले: “रविवारी सेवाकार्यासाठी कोणकोण येणार आहे?” माझ्यासोबत कोणीतरी असेल आणि सेवाकार्य कसे करावे याचे मला मार्गदर्शन मिळेल असे गृहीत धरून मी जाण्यास तयार झालो.

रविवारचा दिवस उजाडला आणि मी क्षेत्रकार्याच्या ठिकाणी येऊन पोचलो, तेव्हा बंधू झॉदर यांनी मला म्हटले, “ऑब्रिस्ट त्या क्षेत्रात काम करतील.” माझ्या छातीत इतक्या जोराने धडधड होत होती तरी मी लोकांच्या घरोघरी जाण्यास आणि त्यांना देवाच्या राज्याविषयी सांगण्यास सुरवात केली. (प्रेषितांची कृत्ये २०:२०) त्यानंतर मात्र येशूने म्हटल्याप्रमाणे या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीआधी पूर्ण कराव्या लागणाऱ्‍या कार्याची अर्थात प्रचार कार्याची मला भीती अशी कधी वाटलीच नाही. (मत्तय २४:१४) मार्च ४, १९३४ रोजी वयाच्या २८ व्या वर्षी मी यहोवाला आपल्या समर्पणाचे द्योतक म्हणून पाण्याचा बाप्तिस्मा घेतला.

दोन वर्षांनंतर मला स्वित्झर्लंडमधील लुगॅनो या इटालियन-भाषिक शहरात हेअरड्रेसरची नोकरी मिळाली. इटालियन भाषा अस्खलितपणे येत नसतानाही मी तेथे राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यास लगेच सुरवात केली. आणि रविवारच्या माझ्या पहिल्याच सेवाकार्याच्या दिवशी मी सोबत घेतलेल्या सर्व २० पुस्तिकांचे वाटप केले. काही काळानंतर टेहळणी बुरूज या नियतकालिकाच्या अभ्यासासाठी आस्थेवाईक लोकांचा एक गट मला तयार करता आला. कालांतराने यांपैकी काही जणांनी बाप्तिस्मा घेतला आणि फेब्रुवारी १९३७ साली लुगॅनोमध्ये आम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीची स्थापना केली.

दोन महिन्यांनी, एप्रिल १९३७ मध्ये मला एक पत्र आले आणि त्या पत्राने माझे जीवन नाट्यमयरीत्या बदलले. एखाद्या देशातील यहोवाच्या साक्षीदारांना शाखा सुविधांना बेथेल या नावाने ओळखण्यात येते. तेथे काम करण्यासाठी मला बोलविण्यात आले होते. ते निमंत्रण मी लगेचच स्वीकारले—त्या निर्णयाचा मला कधीही पस्तावा झाला नाही. अशा प्रकारे मी अशा कामास सुरवात केली जे पूर्ण वेळेच्या सेवाकार्यामध्ये ६० वर्षांचे करीअर झाले आहे.

त्रासदायक समयातील बेथेल सेवा

त्यावेळी स्वीस बेथेल स्वित्झर्लंडची राजधानी असलेल्या बर्न शहरात वसलेले होते. तेथे आम्ही पुस्तके, पुस्तिका आणि नियतकालिके १४ भाषेत छापून त्या प्रकाशनांचे संपूर्ण युरोपमध्ये वाटप करीत असू. त्या काळात आमच्याकडे मोटारगाडी नेहमीच उपलब्ध नसल्यामुळे एकदा तर मी छापील साहित्य एकचाकी गाडीवर टाकून रेल्वे स्टेशनपर्यंत ढकलत नेले होते. बेथेलमध्ये माझी पहिली नियुक्‍ती कंपोजिशन डिपार्टमेंटमध्ये होती; छपाई ज्याच्या साहाय्याने केली जाते त्या लेड टाईपची असेंब्ली आम्ही येथे करीत असू. काही काळानंतर मला स्वागत कक्षावर काम करण्यासाठी सांगण्यात आले तसेच बेथेल कुटुंबाचा हेअरड्रेसर म्हणून देखील मी काम केले.

सप्टेंबर १९३९ मध्ये दुसऱ्‍या महायुद्धाला तोंड फुटले आणि नात्सी सैन्यांनी केलेल्या जोरदार हल्ल्यामुळे संपूर्ण युरोपमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. युद्धग्रस्त देशांमध्ये स्वित्झर्लंड तटस्थ राष्ट्र होते. सुरवातीला आमचे ख्रिस्ती सेवाकार्य पार पाडण्यात व्यत्यय आला नाही. पण जुलै ५, १९४० रोजी दुपारी दोन वाजता ज्यावेळी मी लॉबीत होतो तेव्हा एक मनुष्य एका सैनिकासोबत संगीन लावलेली रायफल घेऊन आत शिरला.

“ट्‌सूकर कुठं आहे?” तो इसम माझ्यावर खेकसला. फ्रान्झ ट्‌सूकर त्यावेळी स्वित्झर्लंडमधील आमच्या प्रचार कार्याचे शाखा पर्यवेक्षक होते.

“आपण कोण आहात हे त्यांना सांगण्यासाठी मला आपले नाव कळेल का?” मी विचारले. लगेच त्यांनी मला पायऱ्‍यांवरून वर फरपटत नेले आणि ट्‌सूकर यांच्या कार्यालयात त्यांना घेऊन जाण्याची मला तंबी भरली.

संपूर्ण बेथेल कुटुंबाला—त्यावेळी आम्ही ४० जण होतो—डायनिंग हॉलमध्ये एकत्रित होण्यासाठी फर्माविण्यात आले. आमच्यापैकी कोणी पळून जाऊ नये म्हणून इमारतीच्या बाहेर चार मशिनगन लावण्यात आल्या होत्या. आतमध्ये, सुमारे ५० सैनिकांनी इमारतीची झडती घेण्यास सुरवात केली. परंतु, त्यांचा अपेक्षाभंग झाला कारण यहोवाचे साक्षीदार लष्करी सेवेचा विरोध करण्यासाठी लोकांना प्रेरित करतात असा कोणताही पुरावा त्यांना सापडला नाही. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करून ते लष्कराच्या पाच मोटारींतून नेण्यात आले.

टेहळणी बुरूज नियतकालिक शासकीय अधिकाऱ्‍यांनी सेन्सॉर करण्यास आम्ही तयार न झाल्यामुळे स्वित्झर्लंडमधील या नियतकालिकाच्या प्रकाशनात खंड पडू लागला. यामुळे बेथेलमध्ये करण्यासाठी विशेष असे काही काम राहिले नाही, परिणामी बेथेलमधील तरुण सदस्यांना बेथेल सोडून पायनियर होण्यासाठी उत्तेजन देण्यात आले. पूर्ण वेळेचे प्रचार कार्य करणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांना पायनियर असे म्हटले जाते.

युद्धकाळात पायनियरींग

जुलै १९४० मध्ये बेथेलला येण्यापूर्वी मी स्वित्झर्लंडमधील ल्युगॅनोजवळील इटालियन-भाषिक क्षेत्रात राहत असे आणि आता मी त्याच क्षेत्रात परतलो होतो. या क्षेत्रातील कट्टर कॅथलिक लोकांवर अद्यापही फॅसिझमचा पगडा होता. अशा क्षेत्रात मी पायनियरींग करू लागलो.

मी माझे प्रचार कार्य सोडून द्यावे, असे एक पोलिस मला जवळजवळ दररोज सांगत असे. एके दिवशी मी एका बागेच्या फाटकाजवळ एका स्त्रीशी बोलत असता एका साध्या वेशातील मनुष्याने मला मागून येऊन पकडले आणि शहरात गस्त घालणाऱ्‍या गाडीत टाकून ल्युगॅनोमध्ये नेले. त्याठिकाणी मला पोलिसांच्या हाती सोपविण्यात आले. माझ्यावर प्रश्‍नांचा भडिमार करण्यात आला तेव्हा मी म्हटले, की आम्ही प्रचार करावा अशी यहोवा देवाची आज्ञा आहे.

“या पृथ्वीवर आज्ञा देणारे ते केवळ आम्हीच आहोत,” त्या अधिकाऱ्‍याने मगरूरपणे उत्तर दिले. “देव तुम्हाला स्वर्गात आज्ञा देईल!”

“सापांसारखे चतुर व कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा,” या येशूच्या सल्ल्याचा युद्धकाळात अवलंब करणे आमच्यासाठी फार अगत्याचे होते. (मत्तय १०:१६) म्हणून मी माझे बहुतेक साहित्य शर्टाच्या आतील खिशांत लपवत असे. आणि या साहित्यातील काही खाली पडू नये म्हणून मी गुडघ्यापाशी घट्ट असलेली विजार घालत असे.

इंगॅडीनच्या खोऱ्‍यात जावे अशी सूचना कालांतराने मला मिळाली आणि याठिकाणीसुद्धा पोलिसांसोबत आमचा उंदरामांजराचा खेळ चालूच होता. पूर्वेकडील स्वीस आल्प्समधील हे खोरे पाहून डोळ्यांचे पारणे फिटते, हिवाळ्यात हे खोरे बर्फाने पूर्णपणे आच्छादले जात असल्यामुळे मला क्षेत्रात जाता यावे म्हणून माझ्याकडे स्कीचा एक जोड होता.

कडाक्याच्या थंडीत स्कीने प्रवास करत असताना ऊबदार हातमोजे असणे आवश्‍यक आहे. परंतु हातमोज्यांचा वारंवार वापर केल्यामुळे ते विरायला लागले होते. आणि एके दिवशी अनपेक्षितपणे स्वेटर आणि ऊबदार हातमोजे असलेले एक पार्सल टपालाने मला मिळाले तेव्हा माझे मन कृतज्ञतेने भरून आले होते! बर्नमधील माझ्या आधीच्या मंडळीतील एका ख्रिस्ती बहिणीने माझ्यासाठी ते बनवले होते. मी आजही त्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा मी आभार व्यक्‍त करण्यासाठी प्रेरित होतो.

अनेक आनंदमय विशेषाधिकार

सन १९४३ या वर्षी स्वित्झर्लंडमध्ये स्थिरसावर होण्यास सुरवात झाल्यानंतर मला पुन्हा एकवार बेथेलमध्ये सेवा करण्यासाठी पाचारण करण्यात आले. सुमारे १०० किलोमीटर दूर असलेल्या लॉसानेमधील फ्रेंच-भाषिक मंडळीत काही समस्या उद्‌भवल्यामुळे तेथील प्रचारकांनी देवाच्या संघटनेप्रती योग्य तो दृष्टिकोन बाळगण्यात त्यांना मदत करता यावी म्हणून त्या शहराला नियमितपणे भेट देण्याचे काम माझ्यावर सोपविण्यात आले.

स्वित्झर्लंडमधील सर्व फ्रेंच भाषिक मंडळ्यांसाठी विभागीय पर्यवेक्षक म्हणून देखील मी नंतर काही काळ काम पाहिले. सप्ताहाच्या सुरवातीच्या दिवसांत मी बेथेलमध्ये काम करीत असे, परंतु प्रत्येक शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी आध्यात्मिक साहाय्य देण्यासाठी मी वेगवेगळ्या मंडळ्यांना भेटी देत असे. याखेरीज, सन १९६० मध्ये बर्न येथे फ्रेंच-भाषिक मंडळीची स्थापना झाली तेव्हा त्या मंडळीचा मी अध्यक्षीय पर्यवेक्षक बनलो. या पदावरून मी १९७० पर्यंत काम पाहिले आणि त्यानंतर थॉन या सध्याच्या सुंदर ठिकाणी बेथेल हालविण्यात आले.

थॉनमध्ये इटालियन-भाषिक लोकांच्या लहानशा गटाशी भेट झाल्यामुळे मला आनंद झाला आणि मी त्यांच्यासोबत कार्य करण्यास सुरवात केली. कालांतराने मंडळीची स्थापना करण्यात आली आणि कित्येक वर्षांपर्यंत अध्यक्षीय पर्यवेक्षक म्हणून मी काम केले. जोपर्यंत तरुण बांधव ही जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलण्यास सक्षम होत नाहीत तोपर्यंत मी अध्यक्षीय पर्यवेक्षक या नात्याने काम पाहिले.

यहोवाच्या साक्षीदारांच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनांस उपस्थित होणे, हा मला खास आनंदमय विशेषाधिकार वाटतो. उदाहरणार्थ, सन १९५० मध्ये यांकी स्टेडियम, न्यूयॉर्क येथे थियोक्रॅसिज इन्क्रीज हे संस्मरणीय संमेलन भरविण्यात आले होते. ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयाला भेट दिल्यामुळे माझ्यावर त्या भेटीची चिरस्थायी छाप पडली आहे. त्यानंतरच्या वर्षी लंडन, इंग्लंड येथील शुद्ध उपासना या संमेलनात बंधू मिल्टन जी. हेन्सश्‍चेल यांनी दिलेल्या भाषणाचे मला कधीही विस्मरण होणार नाही. या भाषणाने येशूच्या शब्दांवर जोर दिला: “मी तुम्हांस सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील.” (लूक १९:४०) बंधू हेन्सश्‍चेल यांनी विचारले, “धोड्यांनी ओरडावे असे तुम्हांला वाटते का?” “नाही!” असे म्हटलेल्या हजारो लोकांचा आवाज अद्यापही माझ्या कानांत निनादतो.

सन १९३७ मध्ये मी बेथेलमध्ये परतलो तेव्हा मला मिळणारा इतका कमी भत्ता पाहून माझ्या वडलांनी कपाळावर आठ्या पाडत विचारले, “अरे, तुझ्या म्हातारपणात तुझी काळजी कोण घेईल?” स्तोत्रकर्त्या दाविदाचे शब्द उद्धृत करून मी त्यांना उत्तर दिले: “नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतति भिकेस लागलेली मी पाहिली नाही.” (स्तोत्र ३७:२५) या शब्दांची मला निश्‍चितच प्रचिती आली आहे.

बर्ता विबेल हिने सुमारे ८० वर्षांपूर्वी बाबांसोबत लग्न केले आणि तिच्या उदाहरणामुळे तसेच मार्गदर्शनामुळे मी यहोवाला व त्याच्या गुणांना समजू शकल्यामुळे मला होणारा आनंद गगनात मावत नाही! आमच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी बर्ताची थट्टा केली तरी तिने आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९८३ पर्यंत यहोवाची विश्‍वासूपणे सेवा केली. यहोवा देवाची सेवा करावी लागल्यामुळे तिला कधीही पस्तावा झाला नाही. अविवाहित राहिल्याबद्दल तसेच यहोवाची सेवा करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचल्याबद्दल माझ्यावर देखील पस्तावण्याची पाळी कधी आली नाही.

[२५ पानांवरील चित्र]

बेथेलमध्ये कामाच्या ठिकाणी

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा