देव उपवासाची अपेक्षा करतो का?
मोशेद्वारे दिलेल्या देवाच्या नियमशास्त्रात केवळ एका प्रसंगी—प्रायश्चित्ताच्या दिवशी उपवास करण्याची आवश्यकता होती. नियमशास्त्राने आज्ञा दिली, की त्या दिवशी इस्राएलांनी “आपल्या जिवास दंडन करावे,” म्हणजेच त्यांना उपवास करायचा होता. (लेवीय १६:२९-३१; २३:२७; स्तोत्र ३५:१३) परंतु, हा उपवास केवळ रीत म्हणून पाळला जात नव्हता. प्रायश्चित्ताचा दिवस पाळल्याने इस्राएल लोकांना त्यांच्या पापीपणाची व मुक्ततेच्या आवश्यकतेची मोठी जाणीव राखण्यास प्रवृत्त केले. त्यांनी त्या दिवशी, आपल्या पातकांबद्दल दुःख तसेच देवासमोर पश्चात्ताप व्यक्त करण्यासाठीही उपवास केले.
मोशेच्या नियमशास्त्राखालील हाच केवळ एक उपवास बंधनकारक असला तरी, इस्राएली लोकांनी इतर प्रसंगी देखील उपवास केले. (निर्गम ३४:२८; १ शमुवेल ७:६; २ इतिहास २०:३; एज्रा ८:२१; एस्तेर ४:३, १६) यामध्ये पश्चात्ताप व्यक्त करण्यासाठी स्वेच्छिक उपवासांचा देखील समावेश होता. यहोवाने यहुदाच्या पातकी लोकांना असे आर्जवले: “मनपूर्वक मजकडे वळा; उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा.” हा दिखावा बाह्यस्वरूपी नसावयाचा होता कारण देवाने पुढे म्हटले: “आपली वस्त्रे नव्हे, तर आपले हृदय फाडा.”—योएल २:१२-१५.
कालांतराने अनेक जण दिखाऊ रीत म्हणून उपवास पाळू लागले. यहोवाने अशा अप्रामाणिक उपवासाची घृणा केली व यास्तव ढोंगी इस्राएलांना विचारले: “मला पसंत पडणारा असा हा उपास आहे काय? मनुष्याच्या जिवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपासाचा दिवस आहे काय? लव्हाळ्यासारखे आपले डोके लवविणे आणि आपल्या अंगाखाली गोणताट व राख पसरणे याला उपास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय?” (यशया ५८:५) या स्वच्छंदी लोकांना, आपल्या उपवासांचा दिखाऊपणा करण्याऐवजी पश्चात्तापाच्या अनुरूप असलेली कृत्ये आचरण्यास सांगण्यात आले.
यहुद्यांनी ठरवलेले काही उपवास सुरवातीपासूनच देवाला नापसंत होते. उदाहरणार्थ, सा. यु. पू. सातव्या शतकात जेरुसलेमला पडलेला वेढा व त्याचा नाश यांजशी संबंधित असलेल्या आपत्तिकारक घटनांच्या स्मरणार्थ एके काळी यहुदाच्या लोकांचे चार वार्षिक उपवास होते. (२ राजे २५:१-४, ८, ९, २२-२६; जखऱ्या ८:१९) बॅबिलोनच्या दास्यत्वातून यहुद्यांना सुटका मिळाल्यानंतर, यहोवाने संदेष्टा जखऱ्या याच्याद्वारे म्हटले: “तुम्ही सत्तर वर्षे . . . . खरोखर माझ्यासाठी उपोषण केले काय?” देवाला या वस्तुस्थिती मान्य नव्हत्या कारण यहुदी स्वतः यहोवाकडून आलेल्या न्यायदंडांनिमित्त उपवास व शोक करत होते. आपत्तीस कारणीभूत ठरलेल्या त्यांच्या चुकीमुळे नव्हे तर त्यांच्यावर ओढवलेल्या आपत्तीमुळे ते उपवास करत होते. ते त्यांच्या मायदेशी परतल्यावर, गत गोष्टींवर शोक करत बसण्याऐवजी त्यांनी आनंद करण्याचा तो समय होता.—जखऱ्या ७:५.
ख्रिश्चनांनी उपवास करावेत का?
येशू ख्रिस्ताने केव्हाही आपल्या शिष्यांना उपवास करण्याची आज्ञा दिली नसली तरी, तो व त्याचे अनुयायी मोशेच्या नियमशास्त्राधीन असल्यामुळे त्यांनी प्रायश्चित्ताच्या दिवशी उपवास केले. याशिवाय, त्याच्या काही शिष्यांनी इतर प्रसंगी स्वेच्छेने उपवास केले, कारण येशूने त्यांना प्रथा पूर्णपणे टाळण्यास सांगितले नव्हते. (प्रेषितांची कृत्ये १३:२, ३; १४:२३) तरीदेखील, त्यांना ‘आपण उपवास करीत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून आपले तोंड विरूप करायचे’ नव्हते. (मत्तय ६:१६) अशा प्रकारच्या वरकरणी धर्मशीलतेमुळे कदाचित इतर मानव प्रशंसक नजरेने व संमतीने पाहतील. पण, देवाला असा दिखाऊपणा बिलकुल पसंत नाही.—मत्तय ६:१७, १८.
येशूने त्याच्या मृत्यूच्या वेळी आपल्या अनुयायांनी केलेल्या उपवासाबद्दलही सांगितले. याद्वारे तो उपवासाचा एखादा विधी ठरवत नव्हता. उलट तो, त्यांना अनुभवाव्या लागणाऱ्या तीव्र दुःखाची प्रतिक्रिया सूचित करत होता. एकदा त्याचे पुनरुत्थान झाल्यावर, तो पुन्हा त्यांच्यासोबत राहणार होता व त्यांना त्यानंतर उपवास करण्याचे काही एक कारण राहणार नव्हते.—लूक ५:३४, ३५.
“ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला,” तेव्हा मोशेचे नियमशास्त्र पूर्ण झाले. (इब्री लोकांस ९:२४-२८) नियमशास्त्राच्या समाप्तीसोबत प्रायश्चित्ताच्या दिवशी उपवास करण्याची आज्ञा देखील समाप्त झाली. अशा प्रकारे, बायबलमध्ये उल्लेखलेला एकच बंधनकारक उपवास देखील काढून टाकण्यात आला.
लेंटविषयी काय?
पण मग, ख्रिस्ती धर्मजगत कोणत्या आधारावर लेंटदरम्यान उपवास पाळतो? लेंट सण पाळण्याची पद्धत एका चर्चपासून दुसऱ्या चर्चमध्ये वेगवेगळी असली तरी कॅथलिक आणि प्रोटेस्टंट हे दोन्ही चर्चेस तो सण पाळतात. काही जण, ईस्टर आधीच्या त्या ४० दिवसीय काळादरम्यान दिवसाला केवळ एकदाच आहार घेतात. इतर जण केवळ ॲश वेन्सडे व उत्तम शुक्रवारी पूर्ण उपवास करतात. काहींच्या मते लेंट हा मांस, मच्छी, अंडी व दुधाचे पदार्थ वर्ज्य करण्याची अपेक्षा करतो.
लेंट सण कदाचित येशूच्या बाप्तिस्म्यानंतरच्या ४० दिवसीय उपवासावर आधारित आहे. येशू प्रत्येक वर्षी साजरा करण्यासाठी एक विधी स्थापन करत होता का? मुळीच नाही. हे, आरंभीच्या ख्रिश्चनांनी अशा प्रकारच्या प्रथा पाळल्याचा कोणताही अहवाल बायबल पुरवत नाही या वस्तुस्थितीवरून स्पष्ट होते. लेंट सण ख्रिस्तानंतर चौथ्या शतकात पहिल्यांदा पाळण्यात आला होता. ख्रिस्ती धर्मजगताच्या इतर कैक शिकवणुकींप्रमाणे तोही मूर्तीपूजक उगमांकडून उसना घेण्यात आला होता.
जर लेंट सण येशूने आपल्या बाप्तिस्म्यानंतर रानात केलेल्या उपवासाला अनुसरून केला जातो, तर मग तो ईस्टर, जो बहुधा त्याच्या पुनरुत्थानाचा समय आहे, याच्या आधी येणाऱ्या आठवड्यांमध्ये का पाळला जातो बरे? येशूने तर आपल्या मृत्यूच्या आधी उपवास केला नव्हता. शुभवर्तमान अहवाल सूचित करतात, की त्याने व त्याच्या शिष्यांनी त्याच्या मृत्यूच्या काही दिवसांआधी बेथानी येथील घरांना भेटी देऊन भोजन केले. शिवाय, त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने वल्हांडणाचे भोजन केले.—मत्तय २६:६, ७; लूक २२:१५; योहान १२:२.
येशूने आपल्या बाप्तिस्म्यानंतर केलेल्या उपवासातून काही शिकण्यासारखे आहे. तो एका महत्त्वपूर्ण सेवेस आरंभ करत होता. यामध्ये यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन व संपूर्ण मानव वंशाचे भवितव्य गोवले होते. हा, तीव्र मनन व मदत आणि मार्गदर्शनाकरता यहोवाकडे प्रार्थनापूर्वक वळण्याचा काळ होता. या समयात येशूने उचितरीत्या उपवास केला. यावरून, योग्य उद्देशास्तव आणि उचित प्रसंगी केलेला उपवास फायदेकारक असतो हे सूचित होते.—पडताळा कलस्सैकर २:२०-२३.
उपवास केव्हा लाभदायक ठरू शकतात
आपण आता अशा काही प्रसंगांचा विचार करू या की, जेव्हा देवाचा एखादा उपासक उपवास करू शकतो. पाप केलेल्या एखाद्या व्यक्तीला काही समयासाठी अन्न खाण्याची इच्छा होणार नाही. इतरांवर प्रभाव पाडण्यासाठी किंवा मिळालेल्या शिस्तीबद्दल राग व्यक्त करण्यासाठी तो असे करणार नाही. शिवाय, केवळ उपवास केल्याने देवाबरोबरचे संबंध सरळ होणार नाहीत. परंतु, यहोवाला आणि कदाचित स्नेही व कुटुंबाला दुःखी केल्यामुळे एखाद्या खरोखर पश्चात्तापी व्यक्तीला मनापासून वाईट वाटेल. दुःख व क्षमेसाठी केलेली कळकळीची प्रार्थना अन्न खाण्याच्या इच्छेला मारून टाकू शकते.
इस्राएलच्या दावीद राजाचा असाच अनुभव आहे. बथशेबाकडून त्याला होणाऱ्या पुत्राचा मृत्यू होईल हे जेव्हा त्याला कळाले तेव्हा त्या मुलावर दया मिळवण्यासाठी यहोवाला प्रार्थना करण्याच्या प्रयत्नांवर तो एकाग्र झाला. तो प्रार्थनेत पूर्णपणे गढून गेला तेव्हा त्याने उपवास केला. त्याचप्रकारे, आज काही विशिष्ट तणावपूर्ण परिस्थितींमध्ये अन्न घेणे उचित वाटत नसेल.—२ शमुवेल १२:१५-१७.
कधीकधी एखाद्या भक्तिमान व्यक्तीला एखाद्या खोल आध्यात्मिक बाबीवर लक्ष केंद्रित करावेसे वाटू शकते. बायबल आणि ख्रिस्ती प्रकाशनांमध्ये संशोधन करण्याची आवश्यकता भासेल. मनन करण्यासाठी काही अवधी लागेल. अशा प्रकारच्या तल्लीन करणाऱ्या अभ्यास सत्रादरम्यान, एखादी व्यक्ती आहाराच्या सेवनाने स्वतःला विचलित होऊ देणार नाही.—पडताळा यिर्मया ३६:८-१०.
गंभीर निर्णय घ्यायचे होते तेव्हा देवाच्या सेवकांनी उपवास केल्याची शास्त्रवचनीय उदाहरणे आहेत. नहेम्याच्या दिवसांमध्ये यहोवासमोर एक शपथ वाहायची होती व जर यहुद्यांनी ती शपथ मोडली तर ते शापास पात्र ठरणार होते. आपल्या विदेशी पत्नींना घटस्फोट देण्याचे व आजूबाजूच्या राष्ट्रांपासून स्वतःला वेगळे ठेवण्याचे वचन त्यांना द्यायचे होते. ही शपथ घेण्याआधी व त्यांच्या पातकाची कबुली देण्यादरम्यान, संपूर्ण मंडळीने उपवास केला. (नहेम्या ९:१, ३८; १०:२९, ३०) एखाद्या ख्रिश्चनाला जेव्हा भारी निर्णय घ्यायचे असतात तेव्हा कदाचित तो काही समयासाठी अन्न वर्ज्य करील.
आरंभीच्या ख्रिस्ती मंडळीतील वडील वर्ग काही वेळा निर्णय घेताना उपवासही करत होता. आज, मंडळीतील वडिलांना कदाचित एखाद्या न्यायिक प्रकरणाच्या संबंधाने कठीण निर्णय घ्यावयाचे असतात तेव्हा ते त्या प्रकरणाला हाताळताना अन्न वर्ज्य करतील.
विशिष्ट परिस्थितींमध्ये उपवास करण्याचे एखाद्या व्यक्तीवर अवलंबून आहे. याबाबतीत कोणी कोणाचा न्याय करावयाचा नाही. आपण “बाहेरून लोकांना नीतिमान” असल्याचे दाखवू नये; किंवा अन्नाला आपण इतके महत्त्वपूर्ण करू नये की ते गंभीर कर्तव्ये पार पाडत असताना व्यत्यय आणील. (मत्तय २३:२८; लूक १२:२२, २३) शिवाय, आपण उपवास करावा अशी देव आपल्याकडून अपेक्षा करत नाही किंवा आपण जर उपवास करत असू तर आपल्यावर प्रतिबंधही घालत नाही हे बायबल दाखवते.
[७ पानांवरील चित्रं]
येशूने आपल्या बाप्तिस्म्यानंतर ४० दिवस उपवास का केला ते तुम्हाला माहीत आहे का?