वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ८/१५ पृ. २७-३०
  • एपफ्रदीत फिलिप्पैकरांचा जासूद

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एपफ्रदीत फिलिप्पैकरांचा जासूद
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “माझी गरज भागवून सेवा करणारा”
  • “त्याने आपला जीव धोक्यात घातला“
  • त्याचा चिंताक्रांतपणा
  • “अशांचा मान राखा”
  • मंडळीला बळकट करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • खिन्‍न झालेल्यांना सांत्वन
    खिन्‍न झालेल्यांना सांत्वन
  • आपल्याला एकमेकांची गरज आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • मी अपयशी होते तेव्हा काय करू शकते?
    सावध राहा!—२००५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ८/१५ पृ. २७-३०

एपफ्रदीत फिलिप्पैकरांचा जासूद

पौलाने फिलिप्पैकरांना लिहिले: “प्रभूच्या ठायी त्याचे स्वागत पूर्ण आनंदाने करा; आणि अशांचा मान राखा.” एखाद्या ख्रिश्‍चन पर्यवेक्षकाने आपल्याबद्दल असे आदरयुक्‍त उद्‌गार काढल्यास आपल्याला आनंद होईल यात काही शंकाच नाही. (फिलिप्पैकर २:२९) परंतु, पौल कोणाबद्दल बोलत होता? शिवाय, इतकी प्रेमळ शिफारस मिळण्याजोगे त्याने काय केले होते?

पहिल्या प्रश्‍नाचे उत्तर आहे, एपफ्रदीत. दुसऱ्‍या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी आपण, हे शब्द लिहिण्यास पौलाला कोणत्या परिस्थितींतून प्रेरणा मिळाली हे विचारात घेऊ.

सा. यु. ५८ या काळाच्या सुमारास फिलिप्पैकरांना माहिती मिळाली की पौलास जेरुसलेममध्ये एका संतप्त जमावाद्वारे मंदिराबाहेर ओढून बेदम मारण्यात आले, अधिकाऱ्‍यांद्वारे अटक करण्यात आली व अनिर्णायक तुरुंगवासानंतर त्यास साखळ्यांनी बांधून रोमला पाठवण्यात आले होते. (प्रेषितांची कृत्ये २१:२७-३३; २४:२७; २७:१) त्यांनी, पौलाविषयी काळजी वाटत असल्यामुळे त्याच्यासाठी काय करता येऊ शकते यावर विचार केला असावा. भौतिकदृष्ट्या गरीब आणि पौलापासून दूर असल्यामुळे ते त्याला जेमतेमच मदत देऊ शकत होते. तथापि, फिलिप्पैकरांना गतकाळात ज्या प्रेमळ भावनेने पौलाच्या सेवेला सहकार्य देण्यास प्रवृत्त केले होते तीच भावना अद्यापही त्यांना प्रेरित करत होती; शिवाय आता तर अधिकच, कारण तो एका कठीण परिस्थितीतून जात होता.—२ करिंथकर ८:१-४; फिलिप्पैकर ४:१६.

फिलिप्पैकरांनी, पौलाकडे देणगी घेऊन, कशाचीही गरज पडल्यास त्यास मदत करण्यासाठी आपल्यापैकी कोणाला त्याच्याकडे जाता येईल का याबद्दल विचार केला असावा. तथापि, प्रवास फार लांबचा व थकविणारा असा होता, शिवाय त्याला मदत करणे धोक्याचे ठरू शकत होते! योआखिम ग्निलका सांगतात: “एखाद्या कैद्याला भेट देण्यास साहसाची गरज होती व ज्या कैद्याचा गुन्हा अतिशय संदिग्ध भासला असावा अशा कैद्याला भेट देणे तर आणखीनच कठीण होते.” ब्रायन रॅपस्की हे लेखक म्हणतात: “कैद्यासोबत अतिशय जवळचे संबंध असणे किंवा त्याच्याबद्दल अथवा त्याच्या दृष्टिकोनांबद्दल सहानुभूतीशील असणे हे देखील जोखिमेचे होते. . . . चुकून बोललेल्या एका शब्दामुळे किंवा नकळत केलेल्या एखाद्या कृतीमुळे कैदी व त्याला मदत करणारा हे दोघेही आपले जीव गमावू शकत होते.” अशा परिस्थितीत, फिलिप्पैकर कोणाला पाठवू शकत होते?

अशा प्रकारच्या प्रवासाचा विचार करून कोणाच्याही मनात साहजिकच येणाऱ्‍या काळजीच्या व अनिश्‍चिततेच्या भावनांची आपण कल्पना करू शकतो. तथापि, एपफ्रदीत (हा कलस्सैचा एपफ्रास नव्हे) ती कठीण कामगिरी पार पाडण्यास स्वेच्छेने तयार झाला होता. ॲफ्रोडाइट या नावाचा अंश असणाऱ्‍या त्याच्या नावाबद्दल विचार करता, असे भासते की तो ख्रिस्ती विश्‍वासात धर्मांतर झालेला हेल्लेणी, अर्थात प्रेम व सुफलत्वाच्या या देवतेची भक्‍ती करणाऱ्‍या पालकांचा पुत्र असावा. पौलाने फिलिप्पैकरांना त्यांच्या औदार्याबद्दल आभार मानण्यासाठी पत्र लिहिले तेव्हा, “तुमचा जासूद व माझी गरज भागवून सेवा करणारा” या शब्दांत तो एपफ्रदीताचे यथायोग्यपणे वर्णन करू शकला.—फिलिप्पैकर २:२५.

एपफ्रदीताविषयी बायबलमधील माहितीकडे पाहिल्यास आपल्याला कळून येते की, पौलाच्या व आपल्या मंडळीच्या सेवेस स्वतःस वाहून घेण्याची त्याची स्वेच्छा कौतुकास्पद असली तरीसुद्धा, आपल्यासमोर उद्‌भवू शकतील तशाच प्रकारच्या समस्यांना एपफ्रदीतालाही तोंड द्यावे लागले होते. आपण त्याचे उदाहरण विचारात घेऊ.

“माझी गरज भागवून सेवा करणारा”

आपल्याकडे तपशीलवार माहिती नसली तरीही, एपफ्रदीत हा प्रवासानंतर रोममध्ये पोहंचला तेव्हा थकलेला असावा याची आपण सहज कल्पना करू शकतो. कदाचित त्याने वीया इग्नाटिया अर्थात मासेदोनियास पार करून जाणाऱ्‍या रोमी रस्त्याने प्रवास केला असावा. तो संभवतः ॲड्रिॲटिक ओलांडून इटॅलियन द्वीपकल्पाच्या ‘टाचेपर्यंत’ आला असावा व तेथून वरील दिशेने एपियन वे या महामार्गाने रोम येथे गेला असावा. हा प्रवास थकविणारा होता (एका दिशेने १,२०० किलोमीटर) व कदाचित एक महिन्याहून अधिक काळाचा असे.—पृष्ठ २९ वरील रकाना पहा.

एपफ्रदीताने कोणत्या मनोभावाने आपला प्रवास आरंभला? त्यास पौलाची “गरज” अथवा लेटुअरजिया, भागविण्यास पाठविण्यात आले होते. (फिलिप्पैकर २:३०) या ग्रीक शब्दाचा संबंध, नागरिकाने सरकारसाठी करावयाच्या स्वेच्छेने हाती घेतलेल्या कार्याशी जोडण्यात येत असे. नंतर या शब्दाचा, एखादे कार्य करण्यासाठी विशिष्ट पात्रता असणाऱ्‍यांकडून सरकार अनिवार्यपणे अपेक्षित असलेली सेवा, असा अर्थ लावण्यात येऊ लागला. ग्रीक शास्त्रवचनांत या शब्दाच्या वापरासंबंधाने एका विद्वानाने म्हटले: “ख्रिश्‍चन माणूस, देव आणि मानव या दोहोंची सेवा करतो; पहिले कारण असे की तो आपल्या पूर्ण अंतःकरणाने असे करू इच्छितो व दुसरे म्हणजे असे करणे हे त्यासाठी अनिवार्य असते कारण ख्रिस्ताची प्रीती असे करण्यास त्यास बाध्य करते.” होय, एपफ्रदीताने खरोखर केवढी उत्तम प्रवृत्ती प्रदर्शित केली!

“त्याने आपला जीव धोक्यात घातला“

जुगाराच्या भाषेतील एक शब्द वापरून पौल म्हणतो की, एपफ्रदीताने “आपला जीव धोक्यात घातला [पॅरॅबोल्यूसॅमेनॉस]” किंवा ख्रिस्ताच्या सेवेसाठी आपले जीवन अक्षरशः “पणास लावले.“ (फिलिप्पैकर २:३०) एपफ्रदीताने फाजील धाडसाने काही केले असावे असा विचार करण्याची जरूर नाही; उलटपक्षी, त्याची पवित्र सेवा पूर्णत्वास नेण्यातच काहीतरी जोखीम गोवलेली होती. त्याने आपली मदतीची कामगिरी वर्षाच्या प्रतिकूल हवामानात सुरू केली असावी का? अथवा, वाटेत कोठेतरी आजारी पडल्यावर, केवळ आपला प्रवास पूर्ण करण्याच्या हेतूने तर त्याने तो सुरू ठेवला नसावा? ते काहीही असले तरी, तो “खरोखर मरणोन्मुख झाला होता” हे मात्र खरे. कदाचित, त्याला पौलाची सेवा करण्यासाठी पौलासोबतच आणखी काही काळ राहावयाचे होते, याच कारणास्तव तो अपेक्षेपेक्षा लवकर परतला याविषयी पौल स्पष्टीकरण देऊ इच्छित होता.—फिलिप्पैकर २:२७.

तरीसुद्धा, एपफ्रदीत हा गरजवंतांना मदत करण्यासाठी स्वतःस निःस्वार्थपणे वाहून घेणारा एक धाडसी व्यक्‍ती होता.

आपण स्वतःस विचारू शकतो, ‘मी कठीण परिस्थितींत सापडलेल्या माझ्या आध्यात्मिक बांधवांना मदत करण्यासाठी कोणत्या टोकापर्यंत जाईन?’ ख्रिश्‍चनांसाठी ही तत्परतेची प्रवृत्ती ऐच्छिक नव्हे. येशूने म्हटले: “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी; जशी मी तुम्हावर प्रीति केली तशी तुम्हीहि एकमेकांवर प्रीति करावी.” (तिरपे वळण आमचे.) (योहान १३:३४) एपफ्रदीताने, “मरणोन्मुख” होईपर्यंत सेवा केली. यास्तव, एपफ्रदीत हा, पौलाने फिलिप्पैकरांस जी “चित्तवृत्ति” असण्याविषयी प्रोत्साहन दिले होते ती बाळगणाऱ्‍या व्यक्‍तीचे एक ज्वलंत उदाहरण होता. (फिलिप्पैकर २:५, ८, ३०) आपण त्या टोकाला जाण्यास तयार होऊ का?

तरीसुद्धा, एपफ्रदीत चिंताक्रांत झाला. असे का?

त्याचा चिंताक्रांतपणा

तुम्ही एपफ्रदीताच्या ठिकाणी आहात अशी क्षणभर कल्पना करा. पौलाने कळविले: “कारण तो आजारी आहे हे तुमच्या कानी आले असे त्याला समजल्यावरून त्याला तुम्हा सर्वांची हुरहुर लागून तो चिंताक्रांत झाला.” (फिलिप्पैकर २:२६) आपण आजारी आहोत व अपेक्षेप्रमाणे पौलास मदत करू शकलो नाही हे मंडळीतील बांधवांना कळल्याचे एपफ्रदीतास माहीत होते. खरे तर, असे भासले असावे जणू एपफ्रदीताने पौलाच्या त्रासात आणखी भर घातली. पौलाचा सोबती अर्थात वैद्य लूक यासही एपफ्रदीताची काळजी घेण्यासाठी कदाचित इतर बाबींकडे दुर्लक्ष करावे लागले असेल का?—फिलिप्पैकर २:२७, २८; कलस्सैकर ४:१४.

यामुळेच कदाचित एपफ्रदीत चिंताक्रांत झाला असावा. आपल्या मंडळीतील बांधव आपल्याला नाकाबील समजत असतील असा त्याचा ग्रह झाला असावा. संभवतः त्यास दोषी असल्यासारखे वाटत होते व म्हणूनच आपल्या विश्‍वासूपणाची त्यांना खात्री करून देण्याकरता त्याला त्या सर्वांची “हुरहुर” लागली होती. पौलाने एपफ्रदीताच्या अवस्थेचे वर्णन करण्यासाठी, “चिंताक्रांत असणे” हा अर्थबोध असणारा एक फारच प्रभावी ग्रीक शब्द अर्थात ॲडेमोनिओ हा उपयोगात आणला. जे. बी. लाइटफुट या विद्वानांच्या अभिप्रायानुसार, हा शब्द, “शारीरिक अस्वस्थतेमुळे किंवा दुःख, शरम, निराशा इ. यांसारख्या मानसिक पीडांमुळे निपजणाऱ्‍या गोंधळलेल्या, अस्वस्थ, विचलित स्थितीचा अर्थबोध देऊ शकतो.” ग्रीक शास्त्रवचनांत, याव्यतिरिक्‍त या शब्दाचा एकमात्र उपयोग गेथशेमानेच्या बागेत येशूच्या तीव्र यातनेसंबंधाने करण्यात आला आहे.—मत्तय २६:३७.

शेवटी पौलाने असे ठरविले की फिलिप्पैकरांकडे त्यांच्या जासूदाच्या अनपेक्षितपणे परत येण्याचे कारण समजावणारे पत्र हाती देऊन एपफ्रदीतास पाठवून देणेच योग्य ठरेल. “मला . . . एपफ्रदीत ह्‍याला तुमच्याकडे पाठविण्याचे अगत्य वाटले,” असे म्हणताना पौल त्याच्या परत जाण्याची जबाबदारी स्वतःवर घेतो व याकरवी एपफ्रदीताच्या अपात्र ठरण्याविषयी होत्या नव्हत्या त्या सगळ्या शंका दूर करतो. (फिलिप्पैकर २:२४, २५) आपणास नेमलेले कार्य पूर्ण करण्यास अपात्र ठरणे तर दूरच पण एपफ्रदीत हा त्यासाठी मरता मरता वाचला होता! पौल प्रेमळपणे सल्ला देऊन म्हणतो, “ह्‍यावरून प्रभूच्या ठायी त्याचे स्वागत पूर्ण आनंदाने करा; आणि अशांचा मान राखा; कारण माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्तसेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.”—फिलिप्पैकर २:२९, ३०.

“अशांचा मान राखा”

एपफ्रदीतासारखीच चित्तवृत्ती असणारे स्त्रीपुरुष प्रशंसेस पात्र ठरतात. सेवा करण्यासाठी ते स्वतःस वाहून घेतात. आपल्या घरापासून दूर राहून मिशनरी या नात्याने, प्रवासी पर्यवेक्षक या नात्याने किंवा वॉच टावर संस्थेच्या एखाद्या शाखा दफ्तरात सेवा करण्यासाठी पुढे आलेल्यांविषयी विचार करा. वाढत्या वयामुळे किंवा तब्येत साथ देत नसल्यामुळे एकेकाळी ते करत असलेले कार्य करणे आता काहींना शक्य होत नसल्यास, त्यांच्या विश्‍वासू सेवेच्या अनेक वर्षांकडे पाहता ते आदर व सन्मानास पात्र आहेत.

तथापि, कमजोर करणारे आजारपण कदाचित चिंताक्रांतपणा व दोषभावना यांस जन्म देतील. एखाद्याला अधिक करण्याची इच्छा असेल. केवढी वैफल्यावस्था! अशा परिस्थितीत सापडलेल्यांना एपफ्रदीताकडून शिकता येईल. नाहीतरी, तो आजारी पडला हा काय त्याचा दोष होता? निश्‍चितच नाही! (उत्पत्ति ३:१७-१९; रोमकर ५:१२) एपफ्रदीत हा देवाची व आपल्या बांधवांची सेवा करू इच्छित होता, तथापि, आजारपणाने त्यास असे करण्यास असमर्थ केले.

पौलाने एपफ्रदीतास त्याच्या अस्वस्थतेमुळे दोषी ठरवले नाही, उलट त्याने फिलिप्पैकरांस त्याच्या पाठीशी राहण्यास सांगितले. त्याचप्रकारे, आपणही आपले बांधव खिन्‍न असतात तेव्हा त्यांचे सांत्वन करण्यास हवे. सहसा आपल्याला त्यांच्या विश्‍वासू सेवेच्या नमुन्यासाठी त्यांची प्रशंसा करता येईल. पौलाने एपफ्रदीताविषयी इतके चांगले उद्‌गार काढून त्याची प्रशंसा केली यामुळेच त्यास सांत्वन मिळाले असेल व याकरवी त्याचा चिंताक्रांतपणाही नाहीसा झाला असावा. ‘आपले कार्य व आपण पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि आपण देवावर दाखविलेली प्रीती, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही,’ याबद्दल आपणही खात्री बाळगू शकतो.—इब्री लोकांस ६:१०.

[२९ पानांवरील चौकट]

प्रवासातील अडचणी

एपफ्रदीताने केला होता त्याप्रकारचा, दोन मुख्य युरोपियन शहरांमधील प्रवास हा आपल्या या काळात, फारसा कठीण नसेल. हा प्रवास जेट विमानात बसून तास दोन तासात आरामशीर पूर्ण करता येईल. तथापि, पहिल्या शतकात अशाप्रकारचा प्रवास करणे वेगळे होते. त्याकाळी, एका ठिकाणाहून दुसऱ्‍या ठिकाणी जाणे हे अडचणीचे होते. पायी चालणारा वाटसरू दररोज ३० ते ३५ किलोमीटरचे अंतर पार करू शकत होता; तथापि, असे करताना त्याला प्रतिकूल हवामान व इतर गोष्टींची, शिवाय ‘लुटारूंचीही’ भीती होती.—२ करिंथकर ११:२६.

रात्रीच्या मुक्कामाची ठिकाणे व शिधासामग्री यांविषयी काय?

इतिहासकार मायकलँजेलो काजानो डी आसीवेडो सांगतात की, रोमी महामार्गांवर “मान्सीयोनेस अर्थात सर्व सोयींनी युक्‍त हॉटेल होते; यांत उपयोगी माल, तबेले व कर्मचाऱ्‍यांसाठी निवासस्थाने उपलब्ध होती; शिवाय दोन मान्सीयोनेस च्या मध्ये अनेक म्युटाट्योनेस म्हणजेच थांबण्याची ठिकाणे होती व येथे थांबून घोडे किंवा वाहन बदलून इतर जरुरी वस्तू घेता येत होत्या.” ती पथिकाश्रमे अत्यंत कुविख्यात होती कारण तेथे सहसा समाजातील अतिनिम्न वर्गांतील लोकच जात असत. खाणावळीवाले प्रवाशांना लुटण्याखेरीज आपल्या उत्पन्‍नांत वेश्‍याव्यवसायातून मिळणाऱ्‍या पैशांची भर घालीत असत. लॅटिन भाषेचा उपहासात्मक कवी जुवेनाल याच्या मते एखाद्याला अशा पथिकाश्रमात राहणे भाग पडल्यास त्याला, आपण हमखास “एखाद्या खुनी व्यक्‍तीला खेटून झोपलो आहोत किंवा खलाशी, चोर, व फरार गुलाम यांच्या सहवासात आहोत अथवा फाशी देणारे व शवपेट्या बनवणारे . . . यांच्या शेजारी आहोत असे आढळले असेल. एकाच कपातून सारेजण पितात; स्वतःचा बिछाना तर सोडाच पण एकट्याला वापरता येईल असा आपला स्वतंत्र टेबलही कोणाला उपलब्ध नसतो.” इतर जुन्या लेखकांनी तेथील घाणेरड्या पाण्याविषयी तसेच भरगच्च, अस्वच्छ, कोंदट व पिसवांनी भरलेल्या खोल्यांविषयी नापसंती व्यक्‍त केली.

[२७ पानांवरील नकाशा/चित्र]

(For fully formatted text, see publication)

रोम

[चित्र]

रोमी काळातील प्रवासी

[Map: Mountain High Maps® Copyright© 1995 Digital Wisdom, Inc.; Traveler: Da originate del Museo della Civilta Romana, Roma]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा