वाग्दत्त देशातून शिकण्यासारखे व्यवहार्य धडे
बायबलमध्ये अभिलिखीत असलेला वाग्दत्त देश खरोखर अतुलनीय होता. या सापेक्षतः लहानशा क्षेत्रात आपल्याला अतिशय वैविध्यपूर्ण भौगोलिक वैशिष्ट्ये आढळतात. उत्तरेकडे बर्फाच्छादित पर्वतशिखरे; तर दक्षिणेत उष्ण प्रदेश आहेत. येथे सुपीक सखल प्रदेश, ओसाड अरण्य प्रदेश व फलोद्यानांसाठी तसेच गुरे चारण्यासाठी टेकाड प्रदेश देखील आहेत.
येथे ठिकठिकाणी समुद्रसपाटीवरील उंची, हवामान व माती यांत असलेल्या विषमतेमुळे अनेक प्रकारची झाडेझुडुपे व इतर वनस्पती यांच्या वाढीला वाव आहे; यांतील काही अशा आहेत ज्या सहसा थंड ॲल्पाईन प्रदेशांत भरभराटीस येतात तर काही अतिउष्ण वाळवंटात व आणखी काही ज्यांची गाळाच्या मैदानांत किंवा खडकाळ पठारावर भरभराट होते. एका वनस्पतीशास्त्रवेत्त्यांचा असा अंदाज आहे, की या क्षेत्रांत जवळजवळ २,६०० निरनिराळ्या वनस्पती आढळतात! या देशाची पाहणी करणाऱ्या पहिल्या इस्राएली लोकांना लगेच त्याच्या उत्पादनक्षमतेचा प्रत्यय आला. एका ओहोळाजवळून त्यांनी एवढा मोठा द्राक्षांचा घोस आणला की दोघा मनुष्यांना तो काठीवर घालून न्यावा लागला! या ओहोळाला अगदी योग्य नाव देण्यात आले व ते म्हणजे अष्कोल, अर्थात “[द्राक्षांचा] घोस.”a—गणना १३:२१-२४.
तथापि, आता आपण या अलौकिक प्रदेशाच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचे, व खासकरून त्याच्या दक्षिणी भागाचे बारकाईने निरीक्षण करू.
तळवटी
वाग्दत्त देशाचा पश्चिमेकडील किनारा हा भूमध्य सागराचा तट आहे. समुद्रापासून ४० किलोमीटर अंतरावर तळवटी आहे. “तळवटी” या शब्दाचा अर्थ, “सखल प्रदेश,” असा आहे पण खरे पाहता, हा एक टेकाड प्रदेश आहे व पूर्वेकडील ज्यूडाच्या पर्वतांशी तुलना करण्यात येते तेव्हाच यास सखल प्रदेश म्हणता येऊ शकते.
सोबत दाखवण्यात आलेला आडव्या छेदाचा नकाशा पाहा व सभोवतालच्या इतर क्षेत्रांशी तळवटीचा संबंध लक्षात घ्या. पूर्वेकडे ज्यूडाच्या पर्वतराशी आहेत; तर पश्चिमेकडे फिलिस्टियाचा, किनारपट्टीवरील सपाट प्रदेश आहे. अशाप्रकारे, ही तळवटी एक तटस्थ क्षेत्र होती अर्थात बायबल काळात देवाच्या लोकांना त्यांच्या प्राचीन शत्रूंपासून अलिप्त ठेवण्यासाठी ती जणू एक प्रतिबंधच होती. पश्चिमेकडून हल्ला करणाऱ्या कोणत्याही सैन्याला इस्राएलाच्या राजधानीवर अर्थात जेरुसलेमवर चढाई करण्याआधी तळवटी पार करणे भाग पडत असे.
सा. यु. पू. नवव्या शतकात अशीच एक घटना घडली. बायबलच्या वृत्तानुसार सिरियाचा राजा हजाएल याने “स्वारी करून [बहुधा तळवटीच्या सीमेवर असलेले] गथ घेतले आणि नंतर यरुशलेमेकडे आपला मोर्चा फिरवला.” राजा यहोआश, मंदिराच्या व राजभवनाच्या विविध मौल्यवान वस्तूंची लाच देऊन हजाएलला थांबवण्यात यशस्वी झाला. तथापि, तळवटी ही जेरुसलेमच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण होती हे या वृत्तावरून स्पष्ट होते.—२ राजे १२:१७, १८.
आपण यातून एक व्यवहार्य धडा घेऊ शकतो. हजाएल यास जेरुसलेम हस्तगत करायचे होते पण त्याआधी त्यास तळवटी पार करणे भाग पडले. त्याचप्रकारे, दियाबल सैतान देवाच्या सेवकांपैकी “कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो,” पण सहसा त्याला आधी एक शक्तिशाली तटस्थ क्षेत्र पार करावे लागते; म्हणजेच हे सेवक कुसंगती व भौतिकवाद यांसारख्या बायबल तत्त्वांविषयी राखत असलेल्या निष्ठेवर त्याला आधी मात करावी लागते. (१ पेत्र ५:८; १ करिंथकर १५:३३; १ तीमथ्य ६:१०) बायबल तत्त्वांच्या संबंधाने तडजोड करणे हे सहसा गंभीर पातके करण्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल असते. यास्तव, आपल्या तटस्थ क्षेत्रास अभंग राखा. आज बायबल तत्त्वांचे पालन करा म्हणजे उद्या तुम्ही देवाच्या नियमांचे उल्लंघन करणार नाही.
ज्यूडाचा टेकाड प्रदेश
तळवटीपासून आणखीन आतील बाजूला ज्यूडाचा टेकाड प्रदेश आहे. या डोंगराळ भागात धान्य, जैतुनाचे तेल व द्राक्षरस हे चांगले उत्पन्न होतात. अधिक उंचीवर असल्यामुळे ज्यूडा एक अप्रतिम आश्रयस्थान देखील होते. याच कारणास्तव, राजा योथामाने तेथे “गढ्या व बुरूज” बांधले. लोक संकटकाळी येथे जाऊन आपला जीव वाचवू शकत होते.—२ इतिहास २७:४.
झायन या नावाने देखील ओळखले गेलेले जेरुसलेम हे ज्यूडाच्या टेकाड प्रदेशाचा प्रमुख भाग होते. तीनही बाजूंनी खोल दऱ्यांनी वेढलेले असल्यामुळे तसेच प्रथम शतकातील इतिहासकार जोसेफस याच्या मतानुसार उत्तर दिशेला सलग तीन भिंतीचे संरक्षण लाभल्यामुळे जेरुसलेम हे अगदी सुरक्षित भासत असे. तथापि, आश्रयस्थानातील संरक्षण कायम राखण्यासाठी भिंती व शस्त्रास्त्रे एवढेच पुरे नसते. तेथे पाणी असणे देखील आवश्यक असते. विशेषतः, शत्रूंचे सैन्य वेढा घालते तेव्हा हे आवश्यक असते; कारण पाणी नसल्यास वेढण्यात आलेल्या नागरिकांना काही काळातच शरण जाणे भाग पडेल.
जेरुसलेमला शिलोमच्या (शिलोह) तळ्यातून पाण्याचा पुरवठा मिळत होता. परंतु, सा. यु. पू. आठव्या शतकात, अस्सिरियन लोक वेढा घालतील असा अंदाज बांधून राजा हिज्कीया याने शिलोमच्या (शिलोह) तळ्यास सुरक्षित ठेवण्यासाठी त्याच्या सभोवताली एक कोट बांधून त्यास शहराच्या आत घेतले. वेढा घालणाऱ्या अस्सिरियन लोकांना स्वतःसाठी पाणी शोधण्यास खूप अडचण व्हावी म्हणून त्याने शहराबाहेर असलेले पाण्याचे झरे देखील बंद केले. (२ इतिहास ३२:२-५; यशया २२:११) एवढेच नव्हे; हिज्कीयाने अतिरिक्त पाण्याचा पुरवठा थेट जेरुसलेममध्ये वळविण्याचा मार्गही शोधून काढला!
हिज्कीयाने गिहोन नावाच्या झऱ्यापासून शिलोमच्या (शिलोह) तळ्यापर्यंत एक भुयार खोदून काढले; हे जुन्या काळातील अभियांत्रिकीकरणाच्या उल्लेखनीय पराक्रमांत मोडते.b उंचीला सरासरी १.८ मीटर असलेले हे भुयार ५३३ मीटर लांब होते. या भुयाराची जरा कल्पना करा—जवळजवळ अर्ध्या किलोमीटर इतके लांब, तेसुद्धा खडकातून खोदलेले! आज सुमारे २,७०० वर्षे उलटल्यावरही जेरुसलेमला भेट देणारे पर्यटक, सहसा हिज्कीयाचे भुयार या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभियांत्रिकीकरणाच्या या अद्भुत कलाकृतीतून अर्थात या भुयारातून जाऊ शकतात.—२ राजे २०:२०; २ इतिहास ३२:३०.
जेरुसलेमच्या पाणी पुरवठ्याचे संरक्षण व त्यात वृद्धी करण्यासाठी हिज्कीयाने केलेल्या प्रयत्नांतून आपल्याला एक व्यवहार्य धडा मिळू शकतो. यहोवा हा “जिवंत पाण्याचा झरा” आहे. (यिर्मया २:१३) बायबलमध्ये सामावलेले त्याचे विचार आपल्या जीवनाचे रक्षण करू शकतात. याच कारणास्तव, वैयक्तिक बायबल अभ्यास अत्यावश्यक आहे. तथापि, अभ्यासासाठी संधी व त्याकरवी मिळणारे ज्ञान हे तुम्हापर्यंत आपोआप प्रवाहित होणार नाही. हे साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अत्यंत धकाधकीच्या दिनक्रमातून जणू भुयार ‘खोदावे लागतील.’ (नीतिसूत्रे २:१-५; इफिसकर ५:१५, १६) एकदा सुरवात केल्यावर तुमच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करा; अर्थात तुमच्या वैयक्तिक अभ्यासाला सर्वश्रेष्ठ प्राथमिकता द्या. कोणीही किंवा काहीही या अमूल्य पाणी पुरवठ्यापासून तुम्हाला वंचित करणार नाही याची खबरदारी घ्या.—फिलिप्पैकर १:९, १०.
अरण्य प्रदेश
ज्यूडाच्या पर्वतराशींच्या पूर्वेकडे ज्यूडाचे अरण्य आहे; यास जेशिमोन म्हणजेच “वाळवंट” देखील म्हणतात. (१ शमुवेल २३:१९, तळटीप, NW) क्षार समुद्रावरील या ओसाड प्रदेशात विशेषतः खडकांतून जाणाऱ्या अरुंद दऱ्या व ओबडधोबड सुळके आहेत. केवळ २४ किलोमीटरच्या अंतरात १,२०० मीटरची खोली गाठणारे ज्यूडाचे हे अरण्य, पर्जन्यवाहक वाऱ्यांपासून सुरक्षित असल्यामुळे तेथे मर्यादित प्रमाणातच पाऊस होतो. अझाझेलासाठी प्रायश्चित्ताच्या दिवशी सोडण्यात येणारा बकरा याच अरण्यात पाठविण्यात येत होता यात काहीच शंका नाही. शौलाच्या भीतीने दावीदाने देखील येथेच पलायन केले होते. येथेच येशूने ४० दिवस उपास केल्यानंतर सैतानाने त्याच्यावर परीक्षा आणल्या होत्या.—लेवीय १६:२१, २२; स्तोत्र ६३, उपरिलेखन; मत्तय ४:१-११.
ज्यूडाच्या अरण्यापासून नैर्ऋत्य दिशेला सुमारे १६० किलोमीटर अंतरावर पारान नावाचे अरण्य आहे. इस्राएल लोकांनी ईजिप्तहून वाग्दत्त देशापर्यंत त्यांच्या ४०-वर्षांच्या प्रवासादरम्यान तळ दिलेली पुष्कळशी ठिकाणे येथे आहेत. (गणना ३३:१-४९) मोशेने, ‘आग्या सापांनी व विंचवांनी व्यापिलेल्या घोर व भयानक रानाचा आणि रुक्ष व निर्जल भूमीचा’ उल्लेख केला होता. (अनुवाद ८:१५) लाखो इस्राएल लोक येथे जिवंत राहू शकले हे मात्र नवलच आहे! तथापि, यहोवाने त्यांना सांभाळले होते.
हे लक्षात घेता, या आध्यात्मिकरीत्या ओसाड जगात यहोवा आपल्यालाही सांभाळू शकतो याची आपल्याला आठवण होत राहण्यास हवी. होय, आपण देखील साप व विंचू यांमधून चालत आहोत, अर्थात हे साप व विंचू अक्षरशः नव्हेत. आपल्याला दररोज अशा लोकांत वावरावे लागू शकते जे त्यांच्या अनिर्बंध विषारी भाषणाने सहज आपल्या विचारसरणीला दूषित करू शकतील. (इफिसकर ५:३, ४; १ तीमथ्य ६:२०) या अडचणी असूनही देवाची सेवा करण्यास झटणारे लोक खरोखर प्रशंसेस पात्र आहेत. त्यांचा विश्वासूपणा सबळ पुरावा देतो की यहोवा निश्चितच त्यांचा सांभाळ करत आहे.
कर्मेलची पर्वते
कर्मेल या नावाचा अर्थ आहे, “फलोद्यान.” सुमारे ५० किलोमीटरचे अंतर व्यापणाऱ्या या उत्तरेकडील सुपीक प्रदेशास द्राक्षमळे, जैतूनाचे उपवन व फळझाडांचे सौंदर्य लाभले आहे. या डोंगराळ राशीच्या शिखरांचे लावण्य व सौंदर्य पाहणाऱ्यांच्या मनात कायमचा ठसा उमटवितात. यशया ३५:२, इस्राएलच्या पुनःस्थापित देशाच्या फलदायी गौरवाचे द्योतक म्हणून ‘कर्मेलच्या ऐश्वर्याचे’ वर्णन करते.
कर्मेल येथे अनेक उल्लेखनीय घटना घडल्या. येथेच एलियाने बआलाच्या संदेष्ट्यांना आव्हान केले होते व तेव्हा यहोवाच्या श्रेष्ठत्वाचा पुरावा म्हणून “परमेश्वरापासून अग्नी उतरला.” तसेच कर्मेलच्याच माथ्यावरून एलियाने असा एक लहानसा ढग दाखवला होता ज्यामुळे मोठा पाऊस झाला व इस्राएलवर आलेला दुष्काळ चमत्कारिकपणे संपुष्टात आला. (१ राजे १८:१७-४६) शूनेमकरीण, एलियाचा उत्तराधिकारी अलीशा याकडे आपल्या मरण पावलेल्या मुलासाठी मदत मागावयास आली तेव्हा तो कर्मेल पर्वतावर होता; नंतर अलीशाने या मुलास पुनरुत्थित केले.—२ राजे ४:८, २०, २५-३७.
कर्मेलच्या उतारांवर आजही फलोद्याने, जैतुनाची उपवने व द्राक्षमळे ही आहेत. वसंतऋतूत या उतारांवर विलक्षण सुंदर फुलांचे गालिचे आंथरलेले असतात. शलमोनाने शुलेमकरिणीला म्हटले, “तुझा शिरोभाग कर्मेलासारखा आहे;” असे म्हणताना तो कदाचित तिच्या केसांच्या सौंदर्याचा किंवा तिच्या मानेवर तिचे बांधेसूद डोके किती सुस्वरूप दिसते याचा अप्रत्यक्ष उल्लेख करत असावा.—गीतरत्न ७:५.
कर्मेलच्या पर्वतांचे वैशिष्ट्यपूर्ण ऐश्वर्य हे यहोवाकडून त्याच्या आधुनिक काळातील उपासकांच्या संघटनेस लाभलेल्या आध्यात्मिक सौंदर्याची आपल्याला आठवण करून देते. (यशया ३५:१, २) यहोवाचे साक्षीदार खरोखर एका आध्यात्मिक परादीसमध्ये राहतात व ते दावीदाच्या भावनांच्या सहमतात आहेत, ज्याने लिहिले: “माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत. माझे वतन माझ्या मनाजोगे आहे.”—स्तोत्र १६:६.
प्राचीन इस्राएली लोकांना देवाच्या शत्रूंकडून निरंतर विरोध सहन करावा लागला, त्याच प्रकारे देवाच्या आजच्या काळातील आध्यात्मिक राष्ट्रासही बिकट आव्हानांना सामोरे जावे लागते हे कबूल आहे. तरीसुद्धा खरे ख्रिस्ती, यहोवाने पुरवलेल्या आशीर्वादांना कधीही नजरेआड होऊ देत नाहीत; या आशीर्वादांत बायबल सत्याचा नित्य वाढत जाणारा प्रकाश, जागतिक बंधुत्व व परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवन लाभण्याची संधी समाविष्ट आहे.—नीतिसूत्रे ४:१८; योहान ३:१६; १३:३५.
“[यहोवाच्या] बागेसारखा”
प्राचीन वाग्दत्त देश पाहणाऱ्यास मोहित करत असे. अगदी योग्यपणे, त्याचे वर्णन “दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत” असे करण्यात आले आहे. (उत्पत्ति १३:१०; निर्गम ३:८) मोशेने त्याचे वर्णन करताना म्हटले की तो एक ‘उत्तम देश’ आहे. तो पुढे म्हणाला: “खोऱ्यांत व डोंगरांत उगम पावून पाण्याने भरलेले नाले, झरे व ओढे त्यात वाहत आहेत; गहू, जव, द्राक्षवेली, अंजीर व डाळिंबे ह्यांचा तो देश आहे; त्या देशात टंचाई न पडता तू अन्न खाशील; तुला कोणत्याहि गोष्टीची वाण पडणार नाही; तेथले धोंडे लोहयुक्त आहेत व तेथल्या डोंगरांतून तुला तांबे खणून काढिता येईल.”—अनुवाद ८:७-९.
यहोवाने आपल्या प्राचीन लोकांसाठी इतक्या समृद्ध, सुंदर मायदेशाची तरतूद केली त्याअर्थी तो आपल्या आधुनिक काळातील विश्वासू सेवकांनाही सबंध जग व्यापणारे, शिवाय डोंगर, दऱ्या, नद्या व सरोवरे यांनी विभूषित असलेले एक वैभवशाली परादीस निश्चितच देऊ शकतो. होय, प्राचीन वाग्दत्त देश व त्याची वैविध्यपूर्णता ही आज यहोवाच्या साक्षीदारांना लाभलेल्या आध्यात्मिक परादीसची व भवितव्यात येणार असलेल्या नवीन जगातील परादीसची केवळ एक पूर्वझलक होती. या नवीन जगातील परादीसमध्ये स्तोत्र ३७:२९ येथे नमूद करण्यात आलेल्या अभिवचनाची पूर्तता होईल: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” यहोवा, आज्ञाधारक मानवजातीला हे परादीसरूपी घर देईल तेव्हा त्यातील सर्व “खोल्यांचे” निरीक्षण करण्यास व सर्वकाळ असे करू शकण्याच्या प्रत्याशेने ते केवढे हरखून जातील!
[तळटीपा]
a या प्रदेशातील एका द्राक्षाच्या घोसाचे वजन १२ किलोग्रॅम तर आणखी एकाचे २० किलोग्रॅमपेक्षा अधिक नोंदण्यात आले होते.
b गिहोन नावाचा झरा जेरुसलेमच्या पूर्वेकडील हद्दीच्या अगदी बाहेर स्थित होता. तो एका गुहेमुळे झाकलेला होता व यामुळे तो तेथे आहे हे अस्सिरियन लोकांना कदाचित माहीत नव्हते.
[४ पानांवरील नकाशा]
(For fully formatted text, see publication)
गॅलिली
कर्मेल पर्वत
गॅलिली समुद्र
समारिया
तळवटी
ज्यूडाची पर्वते
क्षार समुद्र
[४ पानांवरील नकाशा]
(For fully formatted text, see publication)
तळवटी ही देवाच्या लोकांत व देवाच्या शत्रूंमध्ये एक प्रतिबंध होती
मैल ० ५ १०
किमी.० ८ १६
फिलिस्टियाचा सपाट प्रदेश
तळवटी
ज्यूडाचा टेकाड प्रदेश
ज्यूडाचे अरण्य
रिफ्ट दरी
क्षार समुद्र
अम्मोन व मोॲबचा देश
[४ पानांवरील नकाशा/चित्रं]
(For fully formatted text, see bond publication)
हिज्कीयाचे भुयार: १,७४९ फूट लांब, निबर खडकांतून खोदलेले
शिलोम
दावीदपूर
टायरोपोयन दरी
उ
किद्रोन दरी
गिहोन
[६ पानांवरील चित्रं]
ज्यूडाच्या अरण्यात दावीदाने शौलाच्या भीतीने आश्रय घेतला. कालांतराने येथेच येशूला सैतानाद्वारे परीक्षेत पाडण्यात आले
[७ पानांवरील चित्रं]
कर्मेल पर्वत, जेथे एलियाने बआलाच्या संदेष्ट्यांना नमविले
[८ पानांवरील चित्रं]
“तुझा देव परमेश्वर तुला एका उत्तम देशात घेऊन जात आहे; खोऱ्यांत व डोंगरांत उगम पावून पाण्याने भरलेले नाले, झरे व ओढे त्यात वाहत आहेत.”—अनुवाद ८:७